गेल्या दहा वर्षांत दलित-बहुजन कलावंतांच्या आगमनाने अनेक चित्रपट, टीव्ही आणि वेबसिरीज आणि माहितीपटांनी बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि विचार टिपण्यास सुरुवात केली आहे. या सांस्कृतिक उलथापालथीची नितांत गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा देशाच्या राजकीय पटलावर आले, तेव्हा भारतातील लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाला ‘अस्पृश्य’ म्हणून संबोधले गेले आणि त्यांना धोकादायक आणि अपमानास्पद व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. मूलभूत मानवी हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. या सामाजिक कुप्रथांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आंबेडकरांनी राष्ट्रवादी नेतृत्वावर ठेवला. जातिनिहाय वर्गवारी आणि विषमता न सुटल्यास ब्रिटिश साम्राज्यवादापासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याला काहीच किंमत राहणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. अस्पृश्य जातींच्या मुक्तीच्या मुद्द्याकडे पाहण्याचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन, सामाजिकदृष्ट्या उपेक्षित गटांच्या कल्याणासाठी राज्यघटनेसाठी जाहीरनामा बनविण्यात त्यांनी दिलेले योगदान आणि या गटांना महत्त्वाकांक्षी राजकीय वर्गात नेण्याची त्यांची दूरदृष्टी यामुळे आधुनिक भारताच्या क्रांतीचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख जनमानसात प्रस्थापित झाली आहे.
भारतीय सिनेसृष्टीत आंबेडकर अदृश्य
स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकसंस्कृतीने आंबेडकरांकडे दुर्लक्ष केले आहे. पुरोगामी आणि राष्ट्रवादी मूल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय हिंदी सिनेमांनी जातिविरोधी चळवळ, अस्पृश्यता आणि जातिभेदाचे मुद्दे यांपासून अंतर राखले. तसेच आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पाहिले नाही. १९८० च्या दशकापासून आणि उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या आगमनापासून, आंबेडकरी राजकीय शक्ती प्रभावी असूनही, मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांना अशा राजकीय बदलांचे महत्त्व फारसे पटले नाही. गेल्या दशकभरात, विशेषत: दलित-बहुजन सामाजिक पार्श्वभूमीचे कलाकार, चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञ यांच्या आगमनामुळे आंबेडकरांच्या पडद्यावरील प्रतिनिधित्वात लक्षणीय वाढ झाली आहे. ‘दलित सिनेमा’ हा नवोदित पण महत्त्वाचा प्रकार म्हणून विकसित होत आहे.
‘दलित सिनेमा’ची निर्मिती
प्रादेशिक चित्रपटांमध्ये, विशेषत: तामिळ आणि मराठी चित्रपटांमध्ये डॉ.आंबेडकर सर्वप्रथम एक महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्व म्हणून दिसले. दिग्दर्शक पा.रंजित यांनी ‘कबाली’ (२०१६) आणि ‘काला’ (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये, माफिया आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या एका लढवय्या म्हणून आणि आत्मविश्वासी दलित नायकाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आंबेडकरांच्या प्रतिमांचा वापर केला. मारी सेल्वराजन यांच्या ‘मामन्नान’ (२०२३) या चित्रपटात आपल्याला दलित नायक एक अँग्री यंग मॅन म्हणून दिसतो, जो समाजातील उच्चभ्रूंच्या अधिकारांवर रागाच्या मुठीने प्रहार करतो आणि लोकांना संघटित करून राजकीय लढाई जिंकतो. त्याचप्रमाणे शैलेश नरवाडे यांच्या ‘जयंती’ (२०२१) या मराठी चित्रपटात नायकाला त्याच्या जीवनात अर्थ शोधण्याची प्रेरणा देणारा न्यायाचा गहन आवाज म्हणून आंबेडकरांना योजण्यात आले आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ (२०२१) या हिंदी चित्रपटात पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीचा जल्लोष प्रेक्षकांनी पडद्यावर पाहिला. ह्या चित्रपटात आपण लोकांना आनंदाने नाचताना पाहतो, तेव्हा येथे आंबेडकरांची प्रतिमा केवळ जातिविरोधी प्रतीक म्हणून नव्हे तर तरुण पिढीसाठी प्रेरणा आणि उत्सवाचे रूपक अशा उन्नत स्वरुपात दर्शविली आहे.
टीव्ही आणि वेबसीरीजमध्ये आंबेडकर
वेबसीरिज आणि टीव्ही शोमध्येही आंबेडकरांची उपस्थिती पडद्यावर दिसू लागली आहे. अमेझॉन प्राईमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुभाष कपूर यांच्या ‘महाराणी ३’ या वेबसीरीजमधील क्लायमॅक्समध्ये नायिका राणी भारती (हुमा कुरेशी) ‘जय भीम’चा नारा देताना दाखवली आहे. राणी भारती कुठलाही संकोच न बाळगता आपली ‘खालची’ जातीय ओळख मिरवतात आणि मॅकियावेलियन रणनीती वापरून आपल्या राजकीय विरोधकांशी लढतात. त्याचप्रमाणे सुधीर मिश्रा यांच्या नेटफ्लिक्सवरील ‘सीरीयस मेन’ या मालिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीने अशा एका दलित नायकाची भूमिका साकारली, ज्यात तो आपल्या सामाजिक स्थानाचा आणि तर्कबुद्धीचा वापर करून व्यवस्थेला धडा शिकवतो. ‘पाताललोक’ (अमेझॉन प्राइम), ‘दहाद’ (अमेझॉन प्राईम), ‘आश्रम’ (एमएक्स प्लेअर) यांसारख्या मालिका आणि ‘कथाल’ (नेटफ्लिक्स) आणि ‘परीक्षा’ (झी ५) यांसारख्या चित्रपटांनी दलित पात्रांची नवी प्रतिमा मांडली आहे. ह्या चित्रपटांत आंबेडकरांच्या छायाचित्रांचा किंवा पुतळ्यांचा वापर अनेकदा पात्रांना त्यांच्या सामाजिक अस्मितेबद्दल जाणीव आहे हे दाखवण्यासाठी तसेच समान सामाजिक न्याय आणि सन्मानाची मागणी लोकांसमोर सहजपणे मांडण्यासाठी केला जातो.
या संदर्भात ‘मेड इन हेवन’ या वेबसीरीजमधील नीरज घायवान यांची ‘द हार्ट स्किप अ बीट’ ही कथा सर्वांत प्रभावी अशी आहे. यात पल्लवी मानके (राधिका आपटे) ही एक स्वाभिमानी दलित प्राध्यापिका आहे; आयव्ही लीग विद्यापीठात ती नोकरी करते आणि तिला तिची पूर्वाश्रमीची ‘अस्पृश्य’ ओळख दाखवण्यास काहीच संकोच वाटत नाही. परंतु, एका संवेदनशील आणि पुरोगामी भारतीय-अमेरिकन वकिलाशी लग्न करताना ती जेव्हा विवाह संस्कारांत बौद्धविधींचा समावेश करण्याचा आग्रह धरते तेव्हा तिला सामाजिक दडपणाला व चिंताग्रस्ततेला सामोरे जावे लागते. डॉ.आंबेडकरांचे छायाचित्र केंद्रस्थानी ठेवून त्यांना भारतात प्रस्थापित करू इच्छित असलेल्या सामाजिक तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणारा हा सोहळा अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आला आहे.
‘डॉक्युमेंटरी’मध्ये आंबेडकर
आता तर तरुण माहितीपट निर्मातेदेखील आंबेडकरांबद्दल नवी उत्सुकता दाखवताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, ज्योती निशा यांचा ‘बी.आर. आंबेडकर : नाऊ अँड देन’ (२०२३) हा एक फीचर-फिल्म लांबीचा माहितीपट आहे, ज्यात भारतातील दलित जीवनाच्या सद्यःस्थितीचा वेध घेतलेला आहे. निशा स्वत:ला बहुजन-स्त्रीवादी चित्रपटनिर्माती म्हणवून घेतात आणि सामाजिक न्यायासाठी, प्रतिष्ठेसाठी सुरू असलेला आंबेडकरी लढा आणि पितृसत्ताक वर्चस्वाविरुद्धचा लढा समजून घेण्यासाठी दर्शकांना एक नवीन दृष्टिकोन प्रदान करतात. अशाच प्रकारे ‘चैत्यभूमी’ (२०२३) (जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ६ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले) या माहितीपटाचे दिग्दर्शन सोमनाथ वाघमारे यांनी केले आहे. हा संगीतमय चित्रपट मुंबईतील चैत्यभूमीच्या स्मरणोत्सवाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकणारा आहे. बाबासाहेबांचे अंतस्थान आता ऐतिहासिक स्मारकात कसे रुपांतरित झाले आहे हे दाखवून देणारी आणि लाखो अनुयायांना प्रेरणा देणारी, त्यांना गुंतवून ठेवणारी ही एक उत्कृष्ट निर्मिती आहे.
लोकप्रिय चित्रपट, माहितीपट आणि वेबसीरीजमध्ये आंबेडकरांची वाढती उपस्थिती दर्शवते की, दलित-बहुजन सांस्कृतिक मूल्ये आता हळूहळू लोकप्रिय माध्यमांमध्ये विलीन होत आहेत. ही एक छोटीशी सुरुवात असली, तरी मनोरंजन उद्योगाच्या लोकशाहीकरणासाठी संवाद सुरू करण्याची तसेच सामाजिकदृष्ट्या उपेक्षित गटांशी बोलण्याची आणि त्यांच्या सांस्कृतिक कथनांचा अवलंब करण्याची क्षमता यात आहे. हॉलिवूड दिग्दर्शक अवा डुवर्ने यांच्या ‘ओरिजिन २०२३’ या (इसाबेल विल्करसन यांच्या ‘कास्ट’ या पुस्तकावर आधारित) नव्या चित्रपटात दिसून येते, ज्यात आंबेडकरांना ज्यूंच्या विरोधातील वांशिक भेदभाव आणि द्वेषाचे जागतिक संदर्भ समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून योजले आहे. आंबेडकरी विचारांच्या सामर्थ्याची ही जणू पावतीच आहे.
संस्कृतीवर, विशेषत: सिनेमावर आजवर पारंपरिक सामाजिक अभिजन वर्गाचे वर्चस्व राहिले आहे आणि त्याला फारसा विरोध न होता त्यांचे सामाजिक आणि राजकीय हित याद्वारे साधले गेले आहे. उपेक्षित सामाजिक गट हे अशा करमणूक संस्कृतीचे निष्क्रीय प्राप्तकर्ते असतात. या व्यवस्थेत लोकशाहीमूल्य रूजविण्याची गरज आहे. आंबेडकरांचे पडद्यावरील दिसणे आणि नवोदित ‘दलित सिनेमा’ शैलीचे आगमन यामुळे सामाजिक जवाबदारी बाळगणारी एक नवी सिनेमॅटिक संस्कृती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा मूळ इंग्रजी लेख दै. इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रात १५ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा-
https://indianexpress.com/article/opinion/columns/dalit-cinema-kathal-kabali-ambedkar-9269265/
मूळ लेखक हरीश एस. वानखेडे हे नवी दिल्ली येथील जेएनयूच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.
मराठी अनुवाद : प्रा.डॉ.प्रियदर्शन भवरे, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे समाजशास्त्राचे अध्यापन करतात.
संपर्क : bhawarepriyadarshan@gmail.com
प्रा.डाँ. प्रियदर्शनजी, आपण अतिशय चांगल्या विषय हताळला आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व असूनही दुर्लक्षित राहिलेले आहे. काँ. पक्षाने जरी आपल्या राज्यघटनेच्या कार्यात त्यांच्या विद्वत्तेचा वापर केला होता, तरी राजकीय क्षेत्रात त्यांना विरोधच केला होता. खरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दलित समाजातिल ज्या तरुणांनी डाँ. बाबासहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आरक्षणाच्या आधारे स्वत:ची प्रगती करून घेतली, त्यांनीच डाँ. बाबासाहेबांच्या तत्वांना हरताळ फासला. स्वत:ची उन्नत्ती झाल्यावर त्यांनी दलित समाजाशी असलेली आपली नाळच तोडली. ते सवर्णात सामिल होण्याचा प्रयत्न करू लागले. आपली जात लपवण्यासाठी ते बाबासाहेबांचा फोटोही आपल्या घरात लावत नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात हे सर्व घडले, पण आज विद्यमान सरकारच्या काळात बाबासाहेबांना प्रकाशात आणण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत ही अत्यंत स्प्रृहणीय गोष्ट आहे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ची प्रगती करुन घेतलीच पण आपल्या ज्ञातिबांधवांच्या प्रगतीसाठी आपले जीवन वेचले. पण त्यांच्याच जातिबांधवांनी त्यांची प्रतारणा केली. हीच गोष्ट पहाना, हे त्रैमासिक प्रकाशित होऊन महिना होत आला. पण या लेखावर माझी पहिली दाद दिली जात आहे.