डॉ. के. रा. जोशी यांच्या मूळ आक्षेपांना दिलेले माझे उत्तर त्यांना पटलेले नाही. आणि त्यांनी अनेक आक्षेप घेणारा एक लेख पाठविला आहे. त्याला यथामति उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचा पहिला आक्षेप असा आहे मी कांट आणि उपयोगितावाद यांची सांगड घालण्याच्या केलेल्या प्रयत्नावर. ते म्हणतात की त्या दोन उपपत्ती तमःप्रकाशवत् परस्परविरुद्ध असून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एकही नीतिमीमांसक झाला नाही. हे त्यांचे म्हणणे मान्य केले तरी त्यावरून असा समन्वय कोणाला जमणारच नाही असे सिद्ध होत नाही. निदान त्यांनी माझ्या प्रयत्नात काय दोष आहे ते सांगायला हवे होते. ते न करता, अजून असा प्रयत्न कोणीही केला नाही असे म्हणून त्यावरून वाचकांनी काय तो निष्कर्ष काढावा असे ते म्हणतात.
परंतु मला असे म्हणायचे आहे की मी घातलेली सांगड शक्य आहे. ती पूर्णपणे परस्परविरुद्ध असलेल्या दोन तत्त्वांची सांगड नाही. कांट व मिले यांची मते अतिशय भिन्नआहेत हे खरे आहे. परंतु याचा अर्थ कांटच्या उपपत्तीतील एकही तत्त्व मिलला मान्य नव्हते असा होत नाही.
आता माझ्या मते कांट आणि मिल यांच्यात भेद आहे तो कर्तव्य ठरविण्याच्या निकषाचा. कांटच्या मते ज्या कर्माच्या नियमाचे सार्विकीकरण करणे शक्य असेल ते कर्म कर्तव्य, तर याच्याविरुद्ध मिलचे म्हणणे ज्या कर्माने जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण होईल ते कर्म कर्तव्य. आता माझे म्हणणे असे होते की सार्विकीकरणाची कसोटी ही कर्तव्याची अवश्य अट सांगते, पण त्याची पर्याप्त अट ती सांगत नाही. आणि मी असे सुचविले की कांटच्या अवश्य अटीला पर्याप्त अटीची जोड देण्याकरिता आपल्याला उपयोगितावादाचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे कर्तव्यकर्म हे केवळ साविकीकरणाच्या कसोटीला उतरते हे पुरत नसून त्याने मानवाचे हित साधले पाहिजे. आणि अमुक गोष्ट हितकारक आहे याचा निर्णायक पुरावा सुख, संतोष किंवा समाधान याखेरीज अन्य काय असू शकेल?म्हणजे अर्थात् कर्तव्यकर्म सुखकारक असले पाहिजे, आणि उपयोगितावादाच्या मतानुसार ते जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण करणारे असले पाहिजे. कांट आणि मिल् यांची सांगड मी या एका मुठ्याच्या बाबतीत घातली.
आता कांट हा सुखाचा शत्रू होता, सुखकारक कर्म कर्तव्य असू शकत नाही असे त्याचे मत होते असा एक गैरसमज दृढमूल झालेला आहे. परंतु इतरांचे सुख त्याला महत्त्वाचे वाटत होतेच, पण स्वतःचे सुखही मनुष्याने साधले पाहिजे असे तो एका ठिकाणी म्हणतो त्याकडे मी वाचकाचे लक्ष वेधतो. Moral Law या त्याच्या नीतिशास्त्रावरील पहिल्या ग्रंथात पृष्ठ ११-१२ वर तो म्हणतो ‘To assure one’s own happiness is a duty, (at least indirectly).’ एवढेच नव्हे तर Critique of Practical Reason या दुसर्याa ग्रंथात तो असे ही म्हणतो की सदाचार आणि सुख ही एका विशिष्ट प्रमाणात असली पाहिजेत हे नीतीचे एक पूर्वगृहीत आहे, आणि हे प्रत्यक्षात उतरण्याकरिता सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वोत्तम ईश्वर मानावा लागतो असा युक्तिवाद तो करतो. हा युक्तिवाद कितपत बरोबर आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु तो सुखाचा शत्रू होता किंवा सुखाविषयी तो संपूर्ण उदासीन होता हे खरे नव्हे हे त्यावरून दिसून येते.
डॉ. जोश्यांच्या मताने कांट आणि मिले यांच्यात आणखी एक मोठा विरोध आहे – कर्तव्य करण्याच्या हेतूसंबंधाने, कांटचे म्हणणे असे आहे की कर्तव्य कर्तव्य म्हणूनच केले पाहिजे आणि मिलचे मत याहून भिन्न होते. हेही मला मान्य नाही. कारण वस्तुतः कर्तव्य हे कर्तव्य आहे म्हणून करायचे असते ही गोष्ट इतकी स्वतःसिद्ध आहे की ती कोणालाही मान्य व्हावी. कर्तव्याच्या कसोटीने कर्तव्य म्हणून निश्चित झालेले कर्म प्रसंगी असे असू शकेल की ते त्याने आपला स्वार्थ साधतो, आणि अशा प्रसंगी आपण ते कर्म स्वार्थाखातर करू शकतो. कांट म्हणतो की अशा कर्मात नैतिक मूल्य नसते. नैतिक मूल्य म्हणजे सदीहेचे मूल्य, आणि ते ज्या कर्मात सदोहा असेल (म्हणजे जे कर्म कर्तव्याकरिता केले जाते) त्यातच फक्तनिर्माण होते. आता ही गोष्ट मला वाटते नीतीचा विचार करणार्याा कोणालाही पटावी अशीचआहे.
आता हे मत मिलला मान्य नव्हते असे दाखविणारा कसलाही पुरावा नाही, उलट त्याची त्याला जाणीव होती हे दाखविणारा पुरावा आहे. तो म्हणतो की नैतिक अवधारणे (moraljudgments) जशी कर्मासंबंधी असतात तशी ती कर्यासंबंधानेही असतात, आणि कर्माच्या हेतूचा संबंध कर्याच्या नैतिकतेशी आहेच याचा अर्थ असा की एखादे कर्म महत्तम सार्वजनिक सुख निर्माण करणारे असले तरी ते जर एखाद्याने स्वार्थाखातर किंवा सूडबुद्धीने केले असेल तर त्याबद्दल कर्ता दोषास पात्र आहे. ज्याला कांट नैतिक मूल्य म्हणतो ते मूल्य अशा कर्मात उद्भवणार नाही असेच मिलला अन्य शब्दांत म्हणायचे आहे हे उघड आहे.
आता डॉ. जोशी म्हणतात की कर्तव्य कर्तव्य म्हणून केले पाहिजे ही गोष्ट उपयोगितावाद्याने स्वीकारली तर तो कर्तव्यनिर्णयार्थ बहुजनसुख हे प्रयोजन गृहीत धरतो, आणि कर्तव्य करतेवेळी ते सर्व विसरून जातो असे मानण्याची आपत्ती येते. पण यात आपत्ती काय आहे ती कळत नाही. महत्तम बहुजनसुख ज्याने निर्माण होईल ते कर्म करणे कर्तव्य आहे असे तो म्हणतो. असे कर्म करावे कारण ते आपले कर्तव्य आहे याखेरीज आणखी काय उत्तर कोणी देऊ शकेल?
सार्विकीकरणाच्या क्रियेविषयी डॉ. जोशांचा गैरसमज झाला आहे. ते म्हणतात, ‘सत्य बोलणे हे कर्तव्य आहे काय हे त्याचे सार्विकीकरण करणे शक्य आहे काय हे प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी तपासणे असंभव आहे. परंतु सार्विकीकरण शक्य आहे काय हे निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष व अनुमान यांची गरज नाही. मी अमुक कर्म ज्या नियमानुसार करीन म्हणतो तो नियम सार्वत्रिक नियम झाला तर चालेल काय असे विचारायचे असते. मी एकटा नव्हे, तर सर्वच लोक अशा परिस्थितीत असे वागले तर काय होईल असा प्रश्न विचारणे अवश्य आहे, आणि त्याकरिता प्रत्यक्ष ज्ञानावर आधारलेली कल्पनाशक्ती चालवावी लागेल. खरे म्हणजे कांटचे हेही म्हणणे इतके रास्त आहे की ते कोणालाही मान्य व्हावे. नीतीचे नियम सर्वांवर सारखेच बंधनकारक असतात. नीती व्यक्तीव्यक्तीत पक्षपात करीत नाही. एखादे कर्म मी करणे कर्तव्य (किंवा अनुज्ञेय) असेल तर ते तशा परिस्थितीत असलेल्या प्रत्येक मनुष्यानेही करणे कर्तव्य (किंवा अनुज्ञेय) होईल, एवढेच सार्विकीकरणाच्या तत्त्वाचे तात्पर्य आहे.
डॉ. जोशी यांचा एक आक्षेप मी मनुष्यजातीच्या हजारो वर्षांच्या अनुभवाचा जो दाखला दिला त्यावर आहे. ते म्हणतात की विवेकवादाची प्रतिज्ञा प्रत्यक्ष व त्यावर आधारलेली अनुमाने यांच्याहून अन्य प्रमाण न मानता सगळा विचार मांडण्याची आहे. परंतु मनुष्यजातीच्या हजारो वर्षांच्या अनुभवाचा दाखला देणे म्हणजे चक्क शब्दप्रमाण मानणे झाले. याला माझे उत्तर असे आहे की प्रत्यक्ष व अनुमान यांवर आधारलेले शब्दप्रमाण विवेकवाद्याला मान्य आहे. त्याला मान्य नाही अलौकिक पदार्थाचे ज्ञान देणारे शब्दप्रमाण. शिक्षक आपल्याला जे सांगतो ते आपण खरे धरून चालतो, म्हणजे आपण त्यांचा शब्द स्वीकारतो. पण याचे
कारण त्याला विषयाचे ज्ञान आहे आणि तो विश्वसनीय आहे या गोष्टीही आपल्याला माहीत असतात. उदा. शिक्षक पदवीधर असतो, आणि त्याची नेमणूक बन्याच पुराव्याच्या आधारे केलेली असते. आणि शिवाय तो जे सांगतो ते आपण तात्काळ नसलो तरी काही काळानंतर तपासू शकतो. या प्रकारचे शब्दप्रमाण विवेकवादाला मान्य आहे. स्वर्ग, नरक, मोक्ष, इत्यादि अलौकिक गोष्टींचे ज्ञान देऊ करणारे नव्हे.
डॉ. जोशांचा एक आक्षेप माझ्या पुढील मतावर आहे. मी असे म्हणालो होतो की कोणते कर्म माझे कर्तव्य आहे हे ठरविण्याकरिता विविध कर्मातून निष्पन्न होणार्याल संभाव्य सुखदुःखाचा हिशेब करून कोणते कर्म महत्तम बहुजनसुखकारक आहे ते मी ठरवायचे. हे करताना माझ्या वैयक्तिक अपूर्णतेमुळे माझा हिशेब चुकणे अशक्य नाही. म्हणजे मला जे कर्म महत्तम-सुखोत्पादक कर्म वाटते ते तसे नसेल. तर अशा परिस्थितीत मी काय करावे?या प्रश्नाला उपयोगितावाद्याचे उत्तर असे आहे की शेवटी ज्याला त्याला आपले कर्तव्य काय आहे हे स्वतःच ठरवावे लागते. यात इतरांची मदत होऊ शकते; पण त्यांचेही चुकू शकते. मग मी काय करावे?याला उत्तर असे आहे की माझ्याकडून शक्य तो सर्व शोध करून कोणते कर्म महत्तम सुखोत्पादक आहे ते ठरवावे आणि ते करावे. समजा नंतर असे कळले की ते चुकीचे होते तरी आपण ज्यावेळी ते कर्म केले तावेळी तेच कर्म आपले कर्तव्य आहे अशी आपली प्रामाणिक समजूत होती, आणि म्हणून जर ते कर्म महत्तम सुखोत्पादक नव्हते असे नंतर आपल्याला कळले तरी आपण केले ते कर्म करणे बरोबरच होते असे उपयोगितावादी मानतो. आणि ही त्याची विचारसरणी बरोबर आहे हे मान्य करावे लागेल.
एक शेवटचा मुद्दा हरिश्चंद्राचे आत्यंतिक सत्यपालन, वसिष्ठांची क्षमा आणि क्रांतिकारकांची आत्माहुती ही कर्मे उपयोगितावादी विचारसरणीनुसार अनैतिक ठरतील ही आपत्ती कशी दूर करणार?यालाही उपयोगितावादी उत्तर देऊ शकेल. तो म्हणेल की क्रांतिकारकाची आत्माहुती बहुजनसुखोत्पादक कर्म होते असे सहज म्हणता येते. त्याची आत्माहुती त्याला व त्याच्या कुटुंबीयांना क्लेशकारक असली तरी तिचा क्रांतीला किंवा स्वातंत्र्यचळवळीला लागलेला हातभार मोठा असतो हे नाकारता येणार नाही. भगतसिंगाने केलेले आत्मबलिदान हे आजही स्फूर्ती देणारे आणि देशभक्तीला प्रेरणा देणारे ठरले आहे.आणि हीच गोष्ट हरिश्चंद्र व वसिष्ठ यांच्याविषयीही म्हणता येण्यासारखी आहे. स्वप्नात दिलेले वचन जागे झाल्यावर पाळावे का हा विचारणीय मुद्दा आहे. पण तो बाजूला ठेवला तर त्याने घालून दिलेल्या उदाहरणाचे हितकारक परिणाम अजून इष्ट प्रभाव पाडू शकतात. कर्मातून उद्भवणारी सुखदुःखे लक्षात घेताना केवळ तात्कालिक सुखदुःखे विचारात घेऊन चालत नाही, तर दूरदृष्टीने भविष्यात घडणारी संभाव्य सुखदुःखेही हिशेबात घ्यावी लागतात. तसे केले तर वरील कमें नैतिकच होती, अनैतिक तर नक्कीच नव्हती, असे म्हणता येते.
डॉ. जोशी यांनी उपस्थित केलेल्या बहुतेक आक्षेपांना मी यथाशक्ति उत्तरे दिली आहेत. त्यांनी त्यांचे निदान अंशतः तरी समाधान होईल अशी आशा आहे.