आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांविषयी काही प्रतिक्रिया येथे नोंदवू इच्छितो.
(१) डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीय
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे याचा अर्थ धर्म स्वीकारणाच्या व्यक्ती संपादक वा सल्लागार राहू शकत नाहीत असा करणे अविवेकी आहे. अंतिमतः ईश्वराच्या एक ना एक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या स्वीकारावर धर्माची उभारणी होते असे मानले तरी, निरपवादपणे असा स्वीकार ऐहिक जीवनात विवेकनिष्ठा नाकारण्यात परिणत होतो असे मला दिसत नाही. आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत ईश्वराचे अस्तित्व नाकारणे बंधनकारक नाही. बौद्धिक तर्काच्या आधारे ईश्वराचे आस्तित्व सिद्ध करता येत नसले तर ईश्वर नावाची शक्ती नाहीच असेही ‘सिद्ध करता येत नाही. ईश्वर मानणारा व न। मानणारा, दोघेही विवेकनिष्ठेच्या कसोटीला तेवढेच उतरू शकतात. ईश्वरविषयक कोणती धारणा विवेकनिष्ठेशी संवादी आहे, ईश्वराच्या नावे खपविल्या जाणार्याई कोणत्या गोष्टी विवेकनिष्ठेला छेद देणार्यार आहेत यांची मांडणी नेमकेपणाने करावयास हवी.
‘श्रद्धाळू’ हा शब्द वापरण्यात आला आहे. जी गोष्ट भ्रामक, असत्य, केवळ काल्पनिक आहे हे माहीत असूनही श्रद्धेने ती खरी, सत्य वा वास्तव म्हणून स्वीकारणे म्हणजे श्रद्धाळूपणा अशी व्याख्या संपादक करीत आहेत का? स्वतःच्या ज्ञानाच्या, प्रचीतीच्या, चिंतनाच्या, समजेच्या मर्यादा ध्यानात आल्यावर, जे या सर्व बाबतींत, तसेच आचरणाच्या बाबतींत स्वतःच्या पुढे आहेत अशी खात्री असेल तर अशा व्यक्तींनी दाखविलेल्या वाटेनेजाणे यात विवेकच प्रकट होत नाही काय?स्वतःच्या विवेकाच्या साह्याने वाट शोधावयाची याचा अर्थ, दरेक व्यक्तीची वेगळी असली तरच ती विवेकाने शोधलेली मानावी असा घ्यावा असे संपादकांचे मत तर नाही?पूर्वसूरींनी घालून दिलेल्या वाटांनी बरेचसे दैनंदिन ऐहिक जीवन व्यतीत होणे हे जगभरच्या मानवसमूहांचे वैशिष्ट्य आहे. सवयीच्या चाकोत्यांमुळे बुद्धीवर निष्कारण ताण पडत नाही, तिच्यावर नको एवढे ओझे येत नाही. तेव्हा, येथेही खरी गरज आहे ती धर्मसंस्थेवर, धर्मप्रवर्तक व ऋषिमुनी, साधुसंत यांच्यावर लोकांना ‘श्रद्धाळू बनविण्याचा सरसकट आरोप न करता, आजच्या समाजात प्रचलित असलेल्या जुन्या व नव्याने बोकाळणाच्या घातक, भ्रामक, संकुचित किडव्या, अडाणी समजुतींवर, आचारांवर नेमकेपणाने प्रहार करण्याची. यांपैकी काही समजुती (व आचार) पूर्णपणे लौकिक, आधुनिक जीवनात पोसल्या गेलेल्या असतील. जाहिरातबाजीचे युग अशा अनेकानेक समजुती व आचार पसरवीत असल्याचे आपण अनुभवत आहोत.
विवेकवादाचा पुरस्कार करणारे संपादकच धर्म, श्रद्धा यांच्या संदर्भात बुद्धिप्रामाण्यवादाचे ‘प्रवर्तक व ‘ऋषिमुनी यांच्यापैकी काहींनी केलेल्या युक्तिवादांची स्वतःचा विवेक पणाला न लावता पुनरुक्ती करून त्यांच्या अर्थाचा श्रद्धाळूपणा प्रकट करीतआहेत.
ईश्वर न मानणारी व्यक्तीही सश्रद्ध असू शकते. माणसाच्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे किंवा ‘सत्यमेव जयते’ अशी विधाने व्यक्ती करते तेव्हा श्रद्धेचा आशय व आकार स्पष्ट होतो. वास्तव जगातले स्थलकालविशिष्ट अनुभव, यशापयश, बौद्धिक तकन सिद्ध वा असिद्ध करता न येण्याची मर्यादा यांनी तिच्या ध्रुवपदावरून न ढळेल अशा प्रकारे गोष्टी व्यक्ती जीवन व कृती यांच्या संदर्भात विवेक करून निरपवादपणे स्वीकारते. अशी श्रद्धा बाळगण्याच्या विरुद्ध शंकेखोर मन बुद्धीचा हत्यार म्हणून वापर करण्यात पटाईत असते. श्रद्धा बुद्धीचा अनादर करीत नाही; पण जीवनाधार तत्त्वे व मूल्ये, जीवनादर्श, श्रेये यांचा सर्व शंकांपलीकडे पोचणारा स्वीकार बुद्धीला विचारून करता येत नसतो याची जाण त्या पाठीशी असते.
थोडक्यात, विवेकनिष्ठ सुधारक हा त्याच वेळी श्रद्धावान असू शकतो, तसेच तो धर्म स्वीकारणारा पण असू शकतो. माणसे अश्रद्ध व धर्मविरहित बनविणे हे आजचा सुधारकचे उद्दिष्ट नसावे. विवेकनिष्ठा रुजविणे हे उद्दिष्ट असावे.
मला असेही सुचवावयाचे आहे की, संपादकांची वैयक्तिक भूमिका आणि आजचा सुधारकची भूमिका यात फरक करणे विवेकाला धरून होईल. ‘धर्म इहवादी असूच शकत नाही असे म्हणण्यात धर्म व इहवाद यांच्या विशिष्ट व्याख्या आधारभूत आहेत. पण त्या सर्वमान्य व्याख्या आहेत असे मला दिसत नाही.’ धर्म, इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकनिष्ठा या शब्दांच्या योग्य व्याख्यांविषयी भिन्न मते/मांडणी आजचा सुधारकमधून प्रकट होण्यास वाव राहणे इष्ट व निकडीचे आहे. या दृष्टीने आजचा सुधारकच्या संपादक मंडळावर समविचारी पण मतभिन्नता असणार्याय व्यक्तींना जागा असावी.
विवाहादींच्या बाबतीत माणसे कशी का वागतात याचे स्पष्टीकरण संपादकांनी दिलेआहे. ‘विवेकवाद’ काही प्रसंगी गुंडाळून ठेवून विवेकाने वागावे हे शहाणपण वा हा समंजसपणा ते प्रकट करतात! वास्तविक संपादकांसारखे मत बाळगणार्यांानी जाहीरपणे आपापल्या जन्मप्राप्त धर्माचा त्याग करून स्वतःच्या जीवनात घासूनपुसून विवेकवाद आचरावयास हवा. निरुपद्रवी व आनंददायी धर्मरीतींचे पालन करण्याने बिघडत नाही, मानसिक व सामाजिक आधार देणारी जन्मप्राप्त धर्माची ओळख राखण्यास हरकत नाही. आपद्धर्म म्हणून प्रसंगी मुरड घालणारे वर्तन करणे माणसांची मने राखणारे असते व माणसांची मने राखणे ही चांगली गोष्ट आहे ही समज हा विवेकाचा भाग आहे. या अंगाने पाहिले असता ‘विवेकवाद हा अविवेकी बनण्याचा धोका स्पष्ट होतो. कोणत्याही तत्त्वविचाराची एक सर्वंकष व साचेबंद वादप्रणाली (आयडियालॉजी) बनविण्यातच अविवेक मला आढळतो. आधुनिक काळातील या विशेष प्रकारच्या प्रवृत्तीला रोखणे हे आजचा सुधारकचे एक काम आहे.
(२) लोकसंख्यावाढ
वेगाने वाढत जाणारी लोकसंख्या ही एक गंभीर लक्ष द्यावे अशी समस्या आहे जरूर. पण ती अनेक पदर असलेली गुंतागुंतीची गोष्ट आहे.
कृत्रिम उपायांनी मुले जन्माला येण्यास प्रतिबंध करू नये, परमेश्वराची देणगी म्हणून त्यांचे स्वागत करावे व आपणास शक्य होईल तेवढ्या कसोशीने सांभाळ करावा, ही भूमिका लोकसंख्येचे नियमन करण्याच्या खरोखर आड येत आहे असे म्हणण्याचा अनुभवप्रामाण्यपद्धतीचा (empirical) आधार कोणता? की या बाबतीत नेमके ज्ञान नसणे, कुटुंब नियोजनासाठी जी साधने/ पद्धती सुचविल्या जातात त्या जनसामान्यांच्या परिस्थितीमध्ये विभिन्न कारणांनी समुचित (appropriate) नसणे, वंश चालू ठेवण्यासाठी मुले मोठी होईपर्यंत जगण्याची खात्री बाळगता येईल अशी आर्थिक वआरोग्यविषयक परीस्थिती नसणे, या प्रकारची कारणे जास्त आड येत आहेत?
मुलांच्या योगक्षेमाची जबाबदारी पार पाडण्याची शक्ती पालकांमध्ये नाही असे ठरविण्याची कसोटी कोणती?आर्थिक उत्पन्न ही कसोटी लावावयाची?अनुभव असे सांगतो की या देशात औपचारिक कसोटीला न उतरतील अशी अगणित कुटुंबे स्वतःच्या ठायी ही शक्ती असल्याचे व्यवहारात दाखवून देतात. योगक्षेमाची व्याख्या उच्च मध्यमवर्गीय पातळीवरून करावयाची की रोजीवर जगणार्याा मजुराच्या पातळीवरून?हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. संपादकांचा युक्तिवाद स्वीकारला तर किमानपक्षी दारिद्र्यरेषेखालील ४० ते ५० टक्के कुटुंबांवर अपत्य जन्मास घालण्यास बंदी घालावी लागेल! या प्रमाणावर सक्ती करण्याची गोष्ट पार पाडणारे शासन किती हुकूमशाही व भ्रष्ट शासन असेल याची कल्पना करून पहावी. आणि मातापिता होण्याचा आनंद व समाधान यांच्यापासून वंचित ठेवण्यातले अमानुष क्रौर्य केवढे असेल?
भिकारी, महारोगी, वेडे यांच्या संदर्भातील संपादकांचा युक्तिवाद हा काही प्रमाणात अज्ञानावर आधारित आहे, काही प्रमाणात पूर्वग्रहदूषित आहे. समाजात कोणालाही उकिरडेधुंडाळावे लागू नयेत. तशी फेररचना करण्यास नालायक ठरलेल्या समाजधुरीणांनी अनिच्छेने भिकारी बनावे लागणार्यात स्त्रीपुरुषांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पण करून त्यांना वरआणखी पशुवत् वागणूक द्यावी? वेडे अनेक प्रकारचे असतात, आणि सगळेच वेडे बेवारशी होऊन रस्त्यांवरून फिरत नाहीत. अशा अवस्थेतील वेडे अपवादभूतच असतात, ही गोष्ट संपादक कसे विसरले?हीच गोष्ट महारोग्यांबाबतही खरी आहे. विद्रूप झालेले महारोगी, तेही रस्त्याकडेला भीक मागणारे, बघून संपादकांनी कल्पना केलेली आहे. महारोग्यांची मुले निरोगी असतात. दीर्घकाळ घनिष्ठ संपर्कात राहिली तरच त्यांनाही महारोग होण्याचा धोकासंभवतो.
या विषयावर वाहवत जाऊन अविवेकी लेखन केल्याचा अपराध संपादकांकडून घडला आहे. रस्त्यावरील भिकारी, महारोगी, वेडे पाहून भयग्रस्त मनाने, तुच्छभाव बाळगून लेखन केले गेले का?याही मंडळींसंबंधी बंधुभाव, त्यांच्याविषयीचे कर्तव्य त्यांच्याविषयी समान आदराची भावना जागृत होऊन लेखन झाले असते तर विवेकनिष्ठेला शोभून दिसले असते.
संपादकीय
आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांवर श्री वसंत पळशीकर यांनी आक्षेप घेतले आहेत.
धर्मातराविपयीच्या आमच्या संपादकीयासंबंधी त्यांचे म्हणणे असे आहे की धर्म मानणे विवेकवादाच्या विरुद्ध नाही, आणि तसेच आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत ईश्वराचे अस्तित्व नाकारणे बंधनकारक नाही. ही दोन्ही मते आम्हाला चुकीची वाटतात. त्याची कारणे यापूर्वी आजचा सुधारकात अनेकवेळा विस्ताराने देऊन झाली आहेत. परंतु ज्याअर्थी तरीही श्री पळशीकर त्या मतांचा पुनरुच्चार करीत आहेत त्याअर्थी ती कारणे संक्षेपाने फिरून एकदा मांडणे आवश्यक आहे असे दिसते.
धर्म म्हणजे काय हे काटेकोरपणे सांगणे कठीण असले तरी निदान काही गोष्टी ‘धर्म ही संज्ञा लागू होण्याकरिता अवश्य आहेत असे म्हणता येईल. ईश्वराचे अस्तित्व, परलोक, मरणोत्तर अस्तित्व इत्यादि गोष्टींवरील विश्वास हे धर्माचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. परंतु यातील एकही गोष्ट मानावयास पुरेसा काय, कसलाही पुरावा नाही. विवेकवादाचे एक प्रमुख तत्त्व असे आहे की ज्या विधानांच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा असेल अशाच विधानांवर आपण विश्वास ठेवावा. म्हणून ईश्वरादि गोष्टींचा स्वीकार करणे विवेकवादविरोधी आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या अस्तित्वाचा किंवा सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही अशा गोष्टीवर ठाम विश्वास. म्हणून श्रद्धा आणि विवेकवाद यात विरोध आहे.
श्री पळशीकर म्हणतात की आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत ईश्वराचे अस्तित्व नाकारणे बंधनकारक नाही, कारण ईश्वर आहे हे जरी सिद्ध करता न आले तरी तो नाही हेहीसिद्ध करता येत नाही. ईश्वर मानणारा व न मानणारा दोघेही विवेकनिष्ठेच्या कसोटीस सारखेच उतरू शकतात. परंतु या विधानांत मला गंभीर दोष दिसतात. एखादी वस्तू आहे किंवा तिला अस्तित्व आहे याचा पुरावा म्हणजे ती वस्तू प्रत्यक्ष अनुभवाला येणे, किंवा निदान अशा गोष्टी अनुभवाला येणे की ज्यांच्यामुळे त्या गोष्टीचे अस्तित्व मान्य करावे लागावे. पण एखादी गोष्ट नाही याचा काय पुरावा असू शकेल बरे? एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करण्याचा काय उपाय आहे? मला वाटते की त्या गोष्टीच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा सापडत नाही हाच तिच्या नास्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे. आपण काही प्रसिद्ध उदाहरणे घेऊ. केवळ काल्पनिक अशा वस्तूचे उदाहरण म्हणून आपल्या तत्त्वज्ञानात शशशृंगाचे देतात. सशाचे शिंग नाही असे आपण मानतो कशावरून? तर ते कोणीही पाहिले नाही म्हणून. त्याचा कोणालाही अनुभव आलेला नाही याहून जास्त आणखी कोणता पुरावा आपल्याला हवा आहे? या न्यायाने ईश्वराचा कोणालाही अनुभव आलेला नाही आणि त्याच्या अस्तित्वाचे सर्व युक्तिवाद सदोष आहेत हे ईश्वर न मानण्याचे पुरेसे कारण नाही काय?
एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा कोणताही साधक पुरावा नाही हा तिच्या नास्तित्वाचा पुरावा समजला जातो असे आपण वर पाहिले. पण आणखी एका प्रकारचा पुरावा असू शकेल. त्या वस्तूच्या अस्तित्वाला बाधक पुरावा असू शकेल. उदा. एखादा मनुष्य जर दुष्टपणे वागत असेल तर तो त्याच्या दयाळूपणाला बाधक पुरावा होईल.
आता असा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक असणारा निर्णायक पुरावा उपलब्ध आहे. तो म्हणजे जगातील प्रचंड प्रमाणातील दुःख. ईश्वराची सर्वमान्य कल्पना सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ आणि सर्वोत्तम असा पदार्थ अशी आहे. परंतु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला जगातील अपार दुःख बाधक ठरेल हे स्पष्ट आहे. ईश्वर अस्तित्वात असताना एवढे दुःख जगात आहे याची संगती लावण्याचा उपाय म्हणजे त्याच्या वरील तीन गुणांपैकी एखादा नाकारणे. परंतु कोणता गुण नाकारणार? आणि तो गुण नाकारल्यावर ईश्वर ईश्वर राहील काय?
एखादी वस्तू शक्य आहे याचा तत्त्वज्ञानातील एक अर्थ असा आहे की ती अशक्य नाही, आणि अशक्य नाही याचा अर्थ ती वस्तू आत्मविसंगत नाही, वंध्यापुत्रासारखी व्याघातमय नाही. वंध्यापुत्र कोठेही नाही याचे कारण त्या कल्पनेत आत्मव्याघात आहे. आता ईश्वराची कल्पना आत्मव्याघातमय नाही असे आपण समजू या. तर यावरून आपण म्हणू शकू की मग ईश्वर असणे अशक्य नाही, म्हणजे ती असणे शक्य आहे. पण या अर्थाने शक्य असणे म्हणजे एखाद्या वस्तूच्या अस्तित्वाचा साधक पुरावा नव्हे. या अर्थाने (म्हणजे आत्मविसंगतिमुक्त) असंख्य वस्तू शक्य आहेत. दहा तोंडांचा रावण, मानवी भाषा बोलणारा वानर, अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असलेला नृसिंह – हे सर्व पदार्थ शक्य आहेत.
ह्या प्रकारची शक्यता तार्किकीय (logical) शक्यता होय. पण तिच्याखेरीज नैसर्गिक शक्यता (natural possibility) नावाचीही एक शक्यता आहे. जिला कोणताही निसर्गनियम बाधक नाही ती नैसर्गिक शक्यता, आणि जिला एखादा नैसर्गिक नियम बाधक आहे ती नैसर्गिक अशक्यता. उदा. एखादा मनुष्य पन्नास फूट उंच आहे ही गोष्टनिसर्गतः अशक्य आहे, परंतु अशा मनुष्याची आपण कल्पना करू शकतो या अर्थाने ती गोष्ट तार्किकीय दृष्ट्या शक्य आहे. काही गोष्टी तार्किकीय दृष्ट्याही शक्य नसतात. उदा. वंध्यापुत्र. ही कल्पना व्याघातमय असल्यामुळे आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. या अर्थाने दशानन, नृसिंह, हनुमान या गोष्टी (तार्किकदृष्ट्या) शक्य आहेत, पण तेवढ्यामुळे त्या अस्तित्वात आहेत असे म्हणता येत नाही. त्या व्याघातमय नाहीत (म्हणजे त्या तार्किकीय अर्थाने शक्य आहेत) म्हणून त्या आहेत असे मानणे विवेकसंमत होईल असे म्हणणे भाबडेपणाचे होईल. ईश्वराचीही गणना अशा वस्तूंमध्येच करावी लागेल.
श्री. पळशीकरांच्या म्हणण्यावरून असे वाटावे की विज्ञानाच्या दृष्टीने ईश्वर मानणे व न मानणे सारखेच. परंतु विज्ञानात ईश्वराचा संबंध कोठे येतो याचा शोध केला तर कोठेच नाहीं हेच उत्तर द्यावे लागते. असा एकही वैज्ञानिक सिद्धांत नाही की ज्याच्या सत्यत्वाकरिता ईश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे, किंवा ज्याच्या उपपादनाकरिता ईश्वराचे अस्तित्व वैज्ञानिक स्वीकारतात.
आता हे खरे आहे की अनेक वैज्ञानिक ईश्वर मानतात. पण त्याचा अर्थ एवढाच आहे की अनेक वैज्ञानिक विवेकवादी नाहीत. परंतु असाही वैज्ञानिक जोपर्यंत वैज्ञानिक संशोधन करतो आहे तोपर्यंत तो ईश्वरकल्पनेवरील आपला विश्वास त्यात शिरू देत नाही. वैज्ञानिकाची ईश्वराविषयीची आस्तिक मते त्या त्या व्यक्तीची वैयक्तिक मते असतात.
श्रद्धा आणि विवेक यांच्या संबंधात श्री पळशीकर म्हणतात की ‘ईश्वर न मानणारी व्यक्तीही सश्रद्ध असू शकते.माणसाच्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे” किंवा “सत्यमेव जयते” अशी विधाने व्यक्ती करते तेव्हा श्रद्धेचा आशय व आकार स्पष्ट होतो. त्यांनी दिलेल्या उदाहरणांचा आपण बारकाईने विचार केल्यास आपल्या असे लक्षात येते की ‘श्रद्धा ह्या शब्दाचे दोन वेगळे अर्थ आहेत. ज्ञानाच्या क्षेत्रात ‘श्रद्धा’ म्हणजे ज्याच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही, अशा विधानावरील अटळ विश्वास. असा विश्वास विवेकवादाच्या तत्वानुसार पूर्णपणे अविवेकी आहे. परंतु ‘श्रद्धा’ ह्या शब्दाचा एखाद्या मूल्यावरील अढळ निष्ठा हा अर्थही आहे. या अर्थाने महात्मा गांधींची अहिंसेवरील निष्ठा ही श्रद्धाच होती. येथे सत्य किंवा असत्य विधानाचा प्रश्नच नसून एखाद्या मूल्याची सतत जपणूक करण्याचा प्रश्न आहे.‘सत्यमेव जयते’ हे विधान म्हणून त्याकडे पाहिले तर ते उघडच असत्य आहे, कारण सत्याचा नेहमीच जय होत नाही. परंतु त्याचा अर्थ सत्यनिष्ठा असा केला तर तो श्रद्धाविषय म्हणता येईल. मूल्यांवरील श्रद्धा ही गोष्ट अविवेकी नसून विवेकी आहे. अर्थात श्रद्धांचाही विवेक करावा लागतो. म्हणून तर आपण धर्मवेड्या माणसाची श्रद्धा चुकीची आहे असे म्हणतो.
माणसाच्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे हे वाक्य विधानार्थी आहे असे म्हणता येईल, आणि त्यातील ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी साधा ‘विश्वास’ हा शब्द वापरणे जास्त योग्य होईल. कारण माणसाचा चांगुलपणा वारंवार दृष्टीस पडलेला आहे. परिस्थितीमुळे तो पुष्कळदा नाहीसा झाल्यासारखा वाटतो, पण तो योग्य तहेने हाताळल्यावर प्रगट होतो असा आपल्याला अनुभव वारंवार आलेला असल्यामुळे त्यावरील विश्वास साधार आहे, निराधार नाही, आणि म्हणून असा विश्वास बाळगणे विवेकवादाशी सुसंगतच आहे.
२. लोकसंख्यावाढ
याही संपादकीयावर श्री पळशीकरांनी आक्षेप घेतला आहे. लोकसंख्यावाढीवरील संपादकीय लिहिण्यात संपादकांकडून वाहवत जाऊन अविवेकी लेखन केल्याचा अपराध घडला आहे असे श्री पळशीकर लिहितात. मला त्यांचा हा निकाल मान्य नाही.
याचे कारण असे आहे की लोकसंख्यावाढ रोखण्याच्या नितांत आवश्यकतेबरोबरच मला त्या विषयाशी संबद्ध अशा एका गंभीर समस्येकडे वाचकांचे लक्ष वेधायचे होते. ही समस्या म्हणजे प्रजोत्पत्ती करताना अपत्यांचे काय होईल याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची आपली मनोभूमिका. अपत्यजन्माकडे पाहण्याची आपली दृष्टी अशी आहे की स्त्रीपुरुष एकत्र आले की त्यांना अपत्ये होणारच. ती गोष्ट आपल्या हातातील नाहीच. त्यामुळे जसे पशृंमध्ये प्रजोत्पादन होते त्याच धर्तीवर माणसामध्येही प्रजोत्पादन होते असे दुर्दैवाने म्हणावे लागते. वस्तुतः अपत्याला जन्माला घालणे ह्या क्रियेत काही गंभीर जबाबदार्यार अंतर्भूत आहेत. अपत्याला जन्म देणे म्हणजे त्याच्या योगक्षेमाची व्यवस्था करणेही आलेच. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार इत्यादि अत्यावश्यक गोष्टी जी मातापितरे देऊ शकत नाही त्यांना अपत्योत्पादनाचा अधिकारच असू शकत नाही. अशा स्त्रीपुरुषांच्या मुलांना कुपोषणामुळे, रोगराईमुळे, द्रारित्र्यामुळे, शिक्षण न मिळाल्यामुळे जी बहुविध भयानक दुःखे भोगावी लागतात ती ती जन्मली नसती तर त्यांना भोगावी लागली नसती. आज आपल्या समाजातील किती बालके अशा टाळता येण्यासारख्या आपत्तींना बळी पडतात हे पाहिले की माझ्या म्हणण्याची प्रचीती येईल.
आता हे खरे आहे की अपत्यजन्माबरोबर फार मोठ्या जबाबदार्याी मातापित्यावर येतात ही जाणीव होणे कालपरवापर्यंत दुरापास्त होते. निसर्गाने मानवाला कामविकार एवढा प्रबळ दिला आहे की त्याच्या तडाख्यातून क्वचितच कोणी सुटू शकतो आणि मग समागमाचा अपरिहार्य परिणाम अपत्यजन्म असल्यामुळे तो टाळणे अशक्यप्राय असते. त्यामुळे अपत्यजन्माबरोबर येणार्याज जबाबदारीची जाणीवही क्वचितच असते. पण आज ती स्थिती राहिलेली नाही. संततिप्रतिबंधक साधनांच्या उपलब्धतेमुळे समागमातून अपत्यजन्मसंभव अटळ राहिलेला नसून तो टाळणे आपल्या आटोक्यात आलेले आहे आणि म्हणूनच या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे केवळ शक्यच नव्हे, तर अवश्यही झाले आहे.
मातापिता बनण्यास अपात्र असलेल्या स्त्रीपुरुषांना अपत्य जन्माला घालण्याची सक्तीने बंदी केली तर ४० ते ५० टक्के कुटुंबातील स्त्रीपुरुषांना मातापिता होण्याचा आनंद व समाधान यांपासून वंचित ठेवण्यातील अमानुष क्रौर्य केवढे असेल?’ असे श्री पळशीकर विचारतात. पण त्यांना दारिद्रयातअनारोग्यकारक परिस्थितीत जन्माला येणार्याअ आणि कुपोषण, उपासमार, रोगराई यांना बळी पडणाच्या बालकांचे दुःख कसे दिसत नाही? अशी लक्षावधि मुले दरवर्षी कुत्र्यामाजरांसारखी जन्मतात आणि मृत्युमुखी पडतात यातील क्रौर्य त्याहून कितीतरी पटींनी मोठे आहे.
जेव्हा केव्हा या देशात कल्याणकारी राज्य येईल आणि त्यात बालकांची काळजीमातापित्यांची सांपत्तिक स्थिती न पाहता केली जाईल, तेव्हा कदाचित् मी सुचविलेला उपाय वापरावा लागणार नाही. पण असे कल्याणकारी राज्य येथे येईपर्यंत तरी शारीरिक, सांपत्तिक, शैक्षणिक पात्रता अंगी नसलेल्या स्त्रीपुरुषांना अपत्यहीनतेचे दुःख सोसावे लागले तरी चालेल; पण निरपराधी बालकांवर दारिद्री, रोगी, अडाणी आणि अल्पजीवी जीवन लादण्याचे पाप तरी त्यांच्या हातून घडू नये.
वंश चालू ठेवण्यासाठी मुले मोठी होईपर्यंत जगण्याची खात्री बाळगता येईल अशी आर्थिक व आरोग्यविषयक परिस्थिती नसणे हे अनेक अपत्यांना जन्माला घालण्याचे एक कारण पळशीकर देतात. यासंबंधात मला असे म्हणायचे आहे की वंश चालू ठेवण्याची आपल्या समाजात प्रत्येकाला विलक्षण चिंता लागून राहिलेली असते. खरे पाहिले असता बहुतेक वंश इतके सामान्य असतात की ते चालू राहिले काय किंवा न राहिले काय, त्याने काही फरक पडणार नाही. आता आपल्या धर्मानुसार अपत्याने (पुत्राने) श्राद्ध केले नाहीतर पितर नरकात जातात हे खरे आहे. पण ही समजूत आपण किती दिवस चालू ठेवणार आहोत. निदान या कारणासाठी वंश चालू राहण्याची गरज नाही हे लोकांना शिकविले पाहिजे.