जालियांवाला बाग/अबु घरीब 

13 एप्रिल 1919 ला घडलेल्या एका घटनेने भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याचे भवितव्य ठरले. त्या घटनेमुळे स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व गांधींकडे गेले. नेहरू पितापुत्रांनी याच घटनेमुळे इतर विचार सोडून देऊन संपूर्ण स्वराज्याचे उद्दिष्ट स्वीकारले. 

दिवस बैसाखीचा, वसंतोत्सवाचा. अमृतसर शहरातील भिंतींनी वेढलेले, एकाच अरुंद बोळातून जा-ये करता येईलसे एक मैदान, नाव जालियांवाला बाग. ब्रिटिश साम्राज्याचा निषेध करणारी एक शांततामय सभा भरलेली. ब्रिगेडियर जनरल आर.ई.एच. डायरला ही सभा भरवणे हा ब्रिटिश साम्राज्याचा उपमर्द वाटला. त्याने आपल्या हाताखालच्या सैनिकांना सभेवर गोळीबार करायचे आदेश दिले.. 

सभा प्रक्षोभक नव्हती. ती बेकायदेशीर असल्याची घोषणा केली गेली नाही. सभा सोडून जाण्याचे आदेश दिले गेले नाहीत. हवेत किंवा पायांवर फैरी झाडण्याचे सांगितले गेले नाही. सारा मारा धडांवर आणि चेहऱ्यांवर करायला सांगितले गेले. 

‘अमृतसर मॅझॅकर’ हा दोन गटांपैकी सबळ बंदूकधाऱ्यांनी दुबळ्यांचा केलेला पराभव नव्हता. सभेपासून कोणताच धोका नसलेल्या सोजिरांनी रागलोभाचा विचार न करता प्रशिक्षित कौशल्याने निःशस्त्रांचे शिरकाण केले होते. 

1600 गोळ्या झाडल्या गेल्या. त्यामुळे 379 लोक मेले आणि 1137 जखमी झाले इतर 84 गोळ्याच काय त्या वाया गेल्या. हा संतापाचा किंवा उन्मादाचा प्रकार नव्हता. वसाहतवादी, साम्राज्यवादी इच्छेपुढे गुलामांचे छळले जाणेच फक्त होते. डायर हा एक कार्यक्षम मारेकरी होता. कल्पनाशून्य, असंवेदनशील, दुष्ट असा खाकी नोकरशहा होता; साम्राज्यवादी वृत्तीचे मूर्त रूप होता. त्याने साम्राज्यवाद वसाहतवाद खरा कसा असतो हे जनसामान्यांपुढे उघड केले. 

शासक गुलाम या विषम संबंधातही काही पथ्ये पाळायची असतात, नाहीतर तो संबंधही संपू लागतो. या पथ्याची लक्ष्मणरेषा डायरच्या कृतीने ओलांडली गेली. 

आपण गुलाम आहोत ही स्पष्ट राजकीय जाणीव कोट्यवधी भारतीयांना त्या दिवशी झाली. रवींद्रनाथ टागोरांनी आपली ‘सर’ ही पदवी परत केली. अनेक भारतीय सेनाधिकाऱ्यांनी आपापली ‘कमिशने’ (पदे) परत केली. गांधींच्या स्वराज्याच्या भूमिकेला नीतीचे सात्त्विक अधिष्ठान मिळाले. आता त्यांच्या सत्याच्या संकल्पनेशी स्वराज्य ही संकल्पना एकरूप झाली तशीही त्यांची सत्याची संकल्पना शब्दकोशांच्या बरीच पुढे होती. आता सैतानी साम्राज्याला हुसकून लावण्याशी ती सांधली गेली. 

जालियांवाला प्रकरणाच्या ‘अधिकृत’ चौकशीने केवळ डायरच्या कृतीवर रंगसफाई केली. काँग्रेस पक्षाने मोतीलाल नेहरूंना जाहीर चौकशी करायला सांगितले. जवाहरलाल चौकशीसाठी अमृतसरला गेले. भिंतीच्या एका भागात त्यांना सदुसष्ट काडतुसांच्या खुणा दिसल्या. ‘बागे’त येण्याजाण्याचा बोळ तपासल्यावर जवाहरलालांनी नोंदले की लोकांना कुत्र्यामांजरासारखे रांगत नव्हे तर सापकिरडांसारखे पोटावर सरपटत जायला लावले. 

दिल्लीला परतताना त्यांच्या डब्यात डायर व इतर फौजी अधिकारी होते. अमृतसर शहराची राखरांगोळी करणे कसे सहज शक्य होते आणि आपण दयाभावनेने ते कसे टाळले, याबाबत डायर बढाया मारत होता. “मी त्यांची असंवेदनशील वृत्ती पाहून स्तंभित झालो” असे जवाहरलाल नोंदतात. 

पण इतर ब्रिटिशांची प्रतिक्रिया अधिकच सुन्न करणारी होती. त्यांनी डायरचे सत्कार घडवून त्याला सुमारे अडीच लक्ष पौंडांची थैली अर्पण केली. मूळ जालियांवाला हत्याकांडाइतकेच हेही दुष्ट होते. नेहरूंनी नोंदले 

“हे पूर्णपणे अनैतिक आणि असभ्य होते. पब्लिक स्कूल्सच्या भाषेत ही ‘हाईट ऑफ बँड फॉर्म’ होती. अगदी चित्रदर्शी तऱ्हेने साम्राज्यवादाचे पाशवी रूप दिसत होते, आणि त्या वादाने ब्रिटिश उच्चवर्गीयांच्या आत्म्याला ग्रासले आहे, हे जाणवत होते. 

[शशी थारूर यांच्या ‘नेहरू: द इन्व्हेंशन ऑफ इंडिया (पेंग्विन व्हायकिंग 2003) या ग्रंथातला हा उतारा साम्राज्यवादाचे विसाव्या शतकातले रूप जालियांवाला बाग घटनेने कसे उघडकीस आणले ते नोंदतो.]

******* 

माझ्या मुलीने ‘टुडे’ या कार्यक्रमात दाखवलेले फोटो पाहून विचारले, “त्या माणसांच्या हातांना तारा का बांधल्या आहेत ?” मला वाटले होते की लहान मुलांना युद्ध म्हणजे काय हे समजावून देणे कठिण असते. तेसुद्धा सोपे वाटावे इतके हे कठिण होते. पौरुषाच्या कल्पनेला, लैंगिक व्यवहारांच्या खाजगीपणाला अपार महत्त्व देणाऱ्या संस्कृतोत वाढलेल्यांचे आत्मे जायबंदी करायला असे करतात, हे मला सांगवेना. 

एखाद्या पुरुषाला नागवे करून स्त्री- पहारेकऱ्यापुढे हस्तमैथुन करायला लावणे, माणसांच्या गळ्यात कुत्र्यांचे पट्टे बांधणे, विजेच्या शॉक्सची भीती घालणे पण या फोटोमध्ये दुष्ट कोण, सुष्ट कोण हे ओळखणे सोपे होते. त्या मूठभर अमेरिकन शिपायांनी अनेकांची जी प्रचंड हानी केली आहे, तशी इतक्या कमी लोकांनी कधीच केली नसेल. 

राष्ट्रपती बुश म्हणाले, “ही माझ्या ओळखीची अमेरिका नव्हे.” मला अबु घरीबला जायचा मोह होतो. हे फोटो खरे नसणार असेलच तर प्रातिनिधिक नसणार- प्रातिनिधिक असले तर अमेरिकनांबाबतचे नसणार – असे व्हावेसे वाटते. 

पण इकडे रश लिंबॉफसारखे कर्मठ रॉक शो’ यजमान म्हणतात की (त्यांच्यासाठी एवढे सारे करूनही) कृतघ्न इराकी लोक आपल्यावर हल्ले करतात या भावनेतून वैफल्यग्रस्त झालेल्या सोजिरांची ही ‘टेन्शन’ घालवण्यासाठी केलेली ‘मौजमस्ती’ आहे. आणखी कोणीतरी सांगते की सद्दामच्या काळातही अबु घरीबला हेच होत होते. जेव्हा आपला नीचपणा इतरांच्या नीचपणापेक्षा सुसह्य कसा आहे ते आपण सांगू लागतो, तेव्हा आपण बरेच काही गमावून एका नैतिक गर्तेत पडत असतो. 

काहीतरी मौल्यवान असे हरपले आहे. जिथे सद्दाम कैद्यांच्या हातांवर गिरमिटे चालवत असे आणि त्यांना तेजाबात बुडवत असे तिथे आपण नवी मूल्ये रुजवण्याऐवजी जुनेच पाढे गिरवतो आहोत, अमेरिका अमेरिकनांना जशी दिसते तशी ती इतरांना दिसावी असे प्रयत्न होत नाही आहेत. उलट इतरांना आपण जसे दिसतो तसेच आपल्यालाही दिसू लागलो आहोत. 

मला अनेक अमेरिकन माहीत आहेत, ज्यांनी या (इराक) युद्धाला तत्त्वांवर आधारित पाठिंबा दिला होता. त्यांच्या वेदनाही आता दिसतात. महासंहारक शस्त्रास्त्रे सापडलीच नाहीत. आपल्या सोजिरांवरील हल्लेही थांबले नाहीत. इतर राष्ट्रे आपापली सैन्ये काढून घेऊ लागली. तरीही अनेक अमेरिकनांना “आपण मदत करायला इथे आलो आहोत” असेच वाटत होते. ‘मदत’ याचा कमीत कमी असा अर्थ असायला हवा होता की आता अबु घरीब हे यातनाघर नसेल. 

आता बगदादचे एक दैनिक पहिल्या पानावर फोटो छापून खाली मथळा देते आहे, “बुशने कबूल केलेले हे स्वातंत्र्य ही लोकशाही.” अनेक अमेरिकनांच्या मनातला युद्ध सुरू करतानाचा सात्त्विक भाव संपला आहे. 

बरे, फोटो नाकारता येत नाहीत. आपले इतरांवर वर्चस्व स्थापायला लागणारी भाषा वैश्विक असते. आणि हे गुन्हेगार तरी कोणते पार्ट टाईम शिपाईगिरी करणारा विक्रेता, शेजारच्या घरातली पोरेपोरी. 

“आम्ही असतो तर असे झाले नसते” असे म्हणायची स्त्रियांना उजागरी राहिली नाही आहे. चिनी इंग्लंड (फोटोंमधली तरुणी) आणि तिच्या हातातला कैद्याच्या गळ्यातला पट्टा “आता अबु घरीब इतके छान आहे की आता कैदी बाहेर जायला तयार होणार नाहीत” असे सांगणारी महिला जनरल. या स्त्रियांनी क्रौर्यात आणि निर्ढावलेपणात स्त्रियाही कमी नाहीत हे दाखवून दिले आहे.. 

महत्त्वाची माहिती मिळवायला, सूटकेसमधल्या अॅटमबाँबची जागा शोधायला ही तंत्रे वापरली, असा ‘तात्त्विक’ बचावही देता येत नाही. ना गुन्हेगार ‘बड़े’ होते, ना पहारेकरी चौकशीची तंत्रे जाणणारे होते. अमेरिका हे काफर, नीच, भ्रष्ट, दुष्ट राष्ट्र आहे असे सांगणाऱ्या जिहादींना या सोजिरांनी महासंहारक कोलीत दिले आहे. जिहादींच्या क्रियांना वैधता दिली आहे. असले प्रकार होऊ नयेत म्हणून अमेरिकेत ‘शक्तिमान’ गुन्हेगारांना गुन्ह्यांच्या मानाने कठोर शिक्षा दिली जाते. 

कुठे दिलासा शोधायचाच असेल, तर इतर सोजिरांकडे पाहायला हवे – त्यांनीच हे उघडकीला आणले. यानंतरच्या मानभंगातून (humiliation) नम्रता (humility) येईल, अशी आशा करू या. 

[‘टाइम’ नियतकालिकाच्या 17 मे 2004 च्या अंकातील नॅन्सी गिब्जच्या ‘देअर ह्युमिलिएशन अँड अमेरिकाज’ या लेखाचे हे रूपांतर. अमेरिकन सेनेतील पोरसवदा स्त्रीपुरुषांच्या दुष्टाव्याच्या फोटोंनी लेखिका अस्वस्थ झाली आहे, हे ठीक पण ‘वुई हॅव कम हिअर टु हेल्प’ या ‘देखाव्या’मागचा साम्राज्यवाद कधीही ‘नम्रते’शी जुळणारा नसतो, हे किती अमेरिकनांना जाणवते, हा प्रश्नच आहे. – सं.] 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.