या चळवळींतून व विकासाच्या समीक्षेतून आजवरच्या वर्चस्ववादी ज्ञानविज्ञानावरही सवाल केले गेले आहेत व ज्ञानविज्ञानांचे बहुलवादी अस्तित्व ठसवले गेले. एका वर्गाचे ज्ञान किंवा अमुक प्रकारचेच विज्ञान यांना एकमेवाद्वितीय, प्रमाण मानण्याऐवजी प्रत्येक समाजघटकाचे व विभिन्न देशकालातील अनुभव व प्रयोगांनी सिद्ध होत आलेले ज्ञान-विज्ञान देखील महत्त्वाचे आहे, प्रमाण आहे, जी जाणीव अनेक चळवळी रुजवत आहेत. एखाद्याच वर्गाच्या, एकाच विशिष्ट कालातील वा भूभागातील व एकाच पद्धतीच्या ज्ञानाचे प्रमाण्य व त्याची मक्तेदारी असणे हे सुद्धा वर्चस्वाचे व शोषणाचे एक मुख्य कारण आहे. साधारण जनसमूह सुद्धा शेकडो वर्षे आपली बुद्धी, सर्जनक्षमता व परंपरेने शेती, पाणी, आरोग्य, तंत्रविज्ञान विकसित करत आले आहेत. त्यांना व त्यांच्या क्षमतांना दुय्यम लेखण्याची वसाहतिक वृत्ती यापुढे चालणार नाही. लोकांच्या ज्ञानविज्ञानालाही कठोर वैज्ञानिक निकषांवर तावून-सुलाखून घ्यावे लागेल. प्रश्न आहे, समान वागणुकीचा व स्थानाचा. अनेक ज्ञान परंपरांची काही समान निकषांच्या कसोटीवर सिद्ध झालेली बहुलता ही यापुढील समतेच्या, लोकशाहीच्या व पर्यावरणीय निरंतरतेच्या संदर्भात महत्त्वाची ठरेल. संजय संगवई (‘नद्या आणि जनजीवन’ मधून )