पत्रसंवाद

अॅड. अतुल सोनक, दिवाकर मोहनी यांचा ‘जातिभेद आणि निवडणूक’ हा लेख वाचला. त्यांनी सुचवलेल्या निवडणूकपद्धतीसाठी घटनेतील आणि निवडणूक कायद्यातील अनेक कलमे बदलवावी लागतील. असे होण्याची मुळीच शक्यता नाही. त्यांच्या लेखातील इतर अनेक बाबींवरील आक्षेप न नोंदवता सरळ निवडणूक प्रक्रियेत त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या अंमलात का येऊ शकणार नाहीत याबद्दल मला काय वाटते ते इथे नोंदवतो.

समजा चार प्रमुख पक्ष आहेत, अशी सुरुवात करून त्यांनी काही उपाय सुचवले आहेत. आपल्या इथे लोकशाही आहे आणि अनेक पक्ष आहेत, त्यात अजून नवी भर पडतेच आहे. एका पक्षाची अनेक शकले झालेली आपण पाहिली, आम आदमी पार्टीसारखे आंदोलनातून निर्माण झालेले पक्षही आपण पाहिले. राष्ट्रीय पक्ष आणि राज्याराज्यातील निरनिराळे पक्ष यांची संख्या इतकी जास्त आहे की चार पक्षांसाठी मोहनी यांनी सुचवलेला फॉर्मुला अंमलात आणता येणार नाही. त्यांनी सुचवलेली जाहीरनामा पद्धत ही योग्य वाटत नाही. वेगवेगळ्या विचारधारा मानणारे पक्ष असल्यामुळे निवडणुका झाल्यावर ज्या जाहीरनाम्याला जास्त मते मिळतील तो जाहीरनामा सर्व पक्षांनी मिळून अंमलात आणायचा हे प्रत्यक्षात विनासायास होईल असे वाटत नाही. समजा एखाद्या पक्षाने इतर अनेक बाबींबरोबरच बाबरी मशीद ज्या जागेवर होती त्या जागेवर राम मंदिर बांधण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आणि त्या पक्षाच्या जाहीरनाम्याला सर्वात जास्त 39 टक्के मते मिळाली. इतर पक्षांना 35 टक्के, 14 टक्के आणि 12 टक्के अशी मते मिळाली. मग राममंदिर बांधायचे की नाही ? राममंदिर बांधकामाला किती लोकांचा विरोध आहे आणि किती लोकांना वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधून हवे आहे हे कसे ठरवायचे ?

जाहीरनाम्याचा नियम दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजे ग्राम पंचायतीपर्यंत लागू कसा करता येईल ? त्यामुळे आपली संघराज्य प्रणाली धोक्यात येईल. आपापल्या राज्यात राजासारखे वागणारे मुख्यमंत्री पक्ष, पक्षाची घटना, नियम, आचार संहिता कशी गुंडाळून ठेवतात, हे आपण नेहमीच बघतो. जाहीरनाम्याला महत्त्व दिले गेले तर या महत्त्वाच्या (VVIPs) व्यक्तींचे काही कामच उरणार नाही. नेत्यांची अस्थिर मनोवृत्ती, वैयक्तिक राग-लोभ, महत्त्वाकांक्षा, हे सर्व बघता केंद्रीय सरकारच नव्हे राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत केव्हा गडगडेल हे सांगता येत नाही. आपले महत्त्व कमी करणारे कायदे किंवा घटनादुरुस्ती राजकीय नेते (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) कधीही करीत नाहीत हा आजवरचा अनुभव.

आपल्या भारतातील राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीची किती बूज राखली जाते याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. समजा सुचवलेल्या पद्धतीनुसार काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याला सर्वात जास्त मते मिळाली आणि वारंवार घराणेशाहीचा आरोप झेलणाऱ्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने आपले भाऊबंद, नातेवाईक, जवळचे मित्र यांना खासदार करून त्यापैकी अनेकांना मंत्री केले तर चालेल का ? लालूप्रसाद यादवांच्या पक्षाला बहुमत मिळाले आणि त्यांनी पूर्ण कुटुंब मंत्रिमंडळात घेतले तर चालेल का? ज्या पक्षाच्या हाती सत्ता येईल त्या पक्षश्रेष्ठींनी ठरवलेल्या लोकांना मंत्रिमंडळात घेतले जाईल. मनमानीची शक्यता नाकारता येत नाही.

देशहित हीसुद्धा सापेक्ष बाब आहे. भाजपाला जे देशहिताचे वाटेल ते काँग्रेसला देशहिताचे वाटेलच असे नाही. डावे, उजवे मध्यम असे किती प्रकार आहेत. धर्मनिरपेक्ष, धर्मांध, जातीयवादी, छद्म-धर्मनिरपेक्ष, राज्याची अस्मिता बाळगणारे, असे एक ना अनेक प्रकार आपल्या येथे आहेत. प्रत्येकाचा स्वार्थ जपता जपता नाकी नऊ येतील. जातीनिहाय आरक्षणाबाबत, महिला आरक्षणाबाबत वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, ज्या भूमिकेला /कार्यक्रमाला जास्त मते मिळतील त्या भूमिकेला इतर पक्ष समर्थन कसे देतील? एका पंचवार्षिक योजनेत मंदिर बांधकामाला जास्त मते मिळाली तर मंदिर बांधायचे आणि पुढल्या वेळी मंदिर पाडण्याच्या भूमिकेला जास्त मते मिळाली तर मंदिर पाडायचे का ? कर प्रणालीत आमूलाग्र बदल करता येईल का ? प्रत्येकाची वेगळीच तऱ्हा असल्यामुळे मोहनी यांचे मॉडेल यशस्वी होईल याची सुतराम शक्यता नोही. त्यांचे मॉडेल समजदार आणि सुजाण नागरिकांसाठी ठीक आहे; पण आपण भारतीय नागरिक कसे आहोत हे विन्स्टन चर्चिल यांनी आधीच सांगून ठेवले आहे. अधिक काय लिहावे ? भ्रमणध्वनी: 9860111300

इतिहासाचे तत्त्वज्ञान सदाशिव आठवले ह्या ठिकाणी वाद नाही तो फक्त घटना घडते ह्याबद्दल. माणसांना आजतागायत असंख्य उत्तरे सुचलेली आहेत, आणखीही सुचतील. इतिहासाचे वास्तव स्वरूप समजून घेण्यासाठी त्यांच्यापैकी महत्त्वाच्या मीमांसांची थोड्या अधिक तपशीलाने पाहणी करावी लागेल. ही पाहणी म्हणजेच इतिहासाचे तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञान ह्या शब्दामुळे गोंधळ होण्याचा संभव आहे, म्हणून स्पष्ट करणे आवश्यक आहे की ह्या ठिकाणी तो शब्द एखाद्या विषयासंबंधीची सर्व बाजूंनी केलेली चिकित्सा अशा सर्वसाधारण अर्थाने वापरेलेला आहे. तत्त्वज्ञानात पुष्कळदा अभिप्रेत असलेला अंतिम सत्याचा निर्णय, गूढ शक्तीचे विवरण किंवा ईश्वरस्वरूपाचा बोध असा कोणताही अर्थ ह्या ठिकाणी घ्यावयाचा नाही. इतिहासाचे तत्त्वज्ञान म्हणजे पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या स्थित्यंतरांसंबंधीच्या ईश्वरी योजनेचा आविष्कार अशी समजूत युरोपीय विचारवंतांत शतकानुशतके रूढ होती. अशा कोणत्याही अर्थाने तत्त्वज्ञान शब्द येथे योजलेला नाही. ईश्वरी योजनेबरहुकूम सर्व गोष्टी घडत असतात, माणसाच्या हाती काहीही नाही, सबंध इतिहास म्हणजे ईश्वरी इच्छेचा खेळ आहे हा इतिहासासंबंधीचा एक दृष्टिकोण झाला. परंतु माणसांचा इतिहास माणसे स्वतःच घडवितात, ईश्वर म्हणून कोणी नाही, असला तरी त्याचा मानवाच्या इतिहासाशी संबंध नाही असाही एक दृष्टिकोण असू शकतो आणि हेही एक इतिहासाचे तत्त्वज्ञाने. इतिहास माणसाला अत्यावश्यक आहे, त्यावाचून त्याला एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही हे मत किंवा इतिहास पूर्णपणे निरर्थक आणि निरुपयोगी आहे हे मत- ह्या दोहोंतही इतिहासासंबंधी काही तत्त्वज्ञान आहेच. सदाशिव आठवले (इतिहासाचे तत्त्वज्ञान ह्या पुस्तकातील)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.