पॅलेस्टाइनमधील ज्यू विचारवंत, नंतरच्या काळातील ख्रिस्तप्रणीत धर्म आणि तज्जन्य विवेचन ह्यातून आलेले इतिहासविषयक सिद्धान्तसुद्धा असेच ईश्वरी सूत्राच्या कल्पनेवर आधारलेले आहेत. ज्यू तत्त्वज्ञांच्या मते मानवाचा आणि मानवाच्या इतिहासाचा परमेश्वर हा जनकच आहे. माणसाच्या इतिहासातील सर्व चढउतार, यशापयश हे ईश्वरी हस्तक्षेपानेच होत असतात. म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्या आज्ञा प्रत्यक्षात माणसांना कधी धर्मगुरूंमार्फत किंवा उपदेशकांमार्फत समजतील, तर कधी राज्यकर्त्यांमार्फत. धर्मोपदेशक आणि राजे हे दोघेही ईश्वरांचे अधिकृत प्रतिनिधीच आहेच. पुष्कळदा दुष्काळ, युद्ध वगैरे ज्या आपत्ती येतात त्यांत ईश्वराचा हेतू माणसांना धडे शिकविण्याचा असतो. ईश्वरी आज्ञांचे उल्लंघन केले तर काय होईल ह्यांची प्रात्यक्षिके तो सर्वशक्तिमान परमेश्वर दाखवीत असतो सगळी ईश्वरी योजना चक्रपर अशीच आहे. कोणे एके काळी सुवर्णयुग होते, त्यानंतर माणसाचे पतन झाले, माणूस घसरला; तिसरा कालखंड म्हणजे सावकाशपणे झालेल्या त्या घसरगुंडीचाच काळ. मग अवतार होईल, माणसांना पुन्हा योग्य तो जीवनमार्ग दाखविला जाईल, आणि पुन्हा सुवर्णयुग येईल; असा काही घटनाक्रम ज्यू विचारवंतांनी सांगितला आहे. त्यांतल्या काहींनी काळवेळाचे अचूक भविष्यही वर्तवले, मात्र काहींनी अवतार नेमका केव्हा होईल हे सांगता येणार नाही अशी कबुली दिली. अवतार होणार हे निश्चित, पण एका ज्यू उपदेशकाच्या शब्दांतच सांगावयाचे तर; तो अवतार रात्रीच्या चोरासारखा केव्हा अचानक येऊन माणसांना चकित करील ते मात्र सांगणे कठीण. -सदाशिव आठवले (इतिहासाचे तत्त्वज्ञान ह्या पुस्तकातून)