जमीन आणि माती या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. मराठीत बऱ्याच वेळा हे दोन शब्द आपण सहजपणे, फारसा विचार न करता एकाच अर्थाने वापरतो. आज आपण या दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. उत्पादक, सुफला माती आणि जमीन ही सर्वकाळी, सर्व मानवजातीची गरज राहिलेली आहे. आपले अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे आणि म्हणून त्यांची देखभाल करणे, योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे.
जमिनीची धूप हे सर्वांत मोठे अरिष्ट आहे. वारा, ऊन, पाऊस यांचे जमिनीवर सतत आक्रमण होत असते. इतके की काही ठिकाणी योग्य व वेळेवर काळजी न घेतल्याने प्रदेश उजाड झाले आहेत. सतत वाढणारी लोकसंख्या (भारतात दरवर्षी 2 कोटी) पाहता अशा तऱ्हेने नापीक होत जाणारी जमीन फार धोकादायक होऊ शकते.
जमिनीचे नियोजन (Land use planning) हा शब्द फार थोड्यांना माहीत असतो आणि ज्यांना ही संकल्पना ठाऊक असते ती बहुधा नगररचनेच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात नाही. इथे शेतीची व्यापक व्याख्या मला अभिप्रेत आहे, केवळ अन्नधान्योत्पादनाच्या संदर्भातच नव्हे. सूर्यप्रकाश, जमीन, पाणी यांच्या एकत्रित सहाय्याने घेतलेले वनस्पतिजन्य उत्पादन म्हणजे शेती. फळांची शेती, फुलांची शेती, वृक्षशेती, धान्यशेती, कुरण शेती, चारा शेती असे शब्द आपण वापरणार आहोत.
पृथ्वीवर फक्त 29 टक्के जमीन आहे. बाकीचे 71 टक्के पाण्याने व्याप्त आहेत. ही जमीनही कधी उताराची, कधी सपाटीची, कधी डोंगराळ, कधी खडकाळ, कधी पाणथळ, कधी कोरडी ठणठणीत अशी अनेक प्रकारची असते. तिच्यावरील मातीचा थर 10-15 सेंमी इतका पातळ पासून ते 4-5 मीटरपेक्षाही जाडीचा असू शकतो. अशावेळी जमिनीचे तिच्या प्रकारानुसार आणि योग्यतेनुसार नकाशे बनविणे आवश्यक ठरते. पण असे नकाशे बनविणे वाटते तितके सोपे नसते, कारण जमिनीची क्षमता (Land capability) अनेक घटकांवर अवलंबून असते. मातीच्या थरांची खोली, मातीच्या कणांची संरचना याला ‘मातीचे फूल’ म्हणतात. मातीचा कस, मातीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती, मातीतून पाणी झिरपण्याचा वेग, मातीच्या खालच्या थरांचा पाणी वाहून नेण्याचा वेग, पावसाच्या पाण्याचा अपधाव, हवेतील तापमान, पावसाची तीव्रता, विषुववृत्तीय हवामान की समशीतोष्ण हवामान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्राच्या सान्निध्यातील हवामान की खूप दूरवरचे जमिनीच्या आतील भागाचे हवामान, हवामानातील आर्द्रता असे अनेकानेक घटक असतात.
तरीही हे सर्व लक्षात घेऊन अमेरिकन कृषिखात्याने जमिनीचे ढोबळमानाने आठ प्रकार कल्पिले आहेत. यात जमिनीच्या भू-भौतिकीय घटकांचा व जडणघडणीचा प्रामुख्याने विचार केला आहे. उदा. जमिनीचा उतार, खडकाळपणा वगैरे. आपल्याला याच्या तपशिलात इथे जायचे नाही आहे, पण उघडच आहे की अति उताराच्या जमिनीवर धान्यशेती करणे सोपे नाही. अशा ठिकाणी शेती अवजारे वापरणेही त्रासदायक व खर्चिक होते. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो, कसणूक खूप महाग होते. शाश्वत, टिकाऊ उत्पन्नासाठी बांधबंदिस्ती (terracing) करावी लागते, सतत वरखते, भरखते यांचा पुरवठा करावा लागतो. आपल्याला माहीतच असेल की डोंगरावर वरी, नाचणी काढणारे आदिवासी किती तोकडे उत्पादन घेत असतात ते.
इतके करूनही जमिनीच्या या कल्पित आठ प्रकारांपैकी चार प्रकार पूर्णतः अनुत्पादक असतात. त्यावर कोणत्याही वनस्पती घेता येत नाहीत. जागतिक पातळीवर फक्त 44 टक्के जमीन ही शेतीलायक आहे. एकूण पृथ्वीच्या क्षेत्रफळातील 13% जमीनच शेतीलायक आहे. देशपरत्वे हे प्रमाण कमी जास्त होते. चीनचे भौगोलिक क्षेत्रफळ भारताच्या जवळ जवळ तीन पट असूनही शेतीयोग्य क्षेत्रफळ भारताच्या जवळपासच आहे. (तरीही उत्पादन दीडपट आहे हा भाग वेगळा). भारतातल्या भारतात गंगेचे खोरे आणि पश्चिम महाराष्ट्र–कोकण यांची तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हा अमेरिकेची ही वर्गवारी दिशादर्शक इतकीच समजावी. मात्र शेतीलायक जमिनीचे महत्त्व यावरून अधोरेखित होते. त्यातील एक एकर देखील वाया जाता कामा नये.
याशिवाय जमिनीचे नियोजन करताना वनस्पतींमधील फरकही लक्षात घ्यावे लागतात. बहुवार्षिक झाडांची मुळे खूप खोलवर जातात तर मध्यमजीवी फळझाडांची (पपई, पेरू, केळी) मुळे वरच्या 1-2 मीटरमधेच असतात. तृणधान्ये, गळिताची धान्ये, कडधान्ये अशा मोसमी अल्पजीवी वनस्पतींना वरची 25-30 सें.मी. माती पुरते. कुरणे, गवते, तण ही कायमच वास्तव्य करून असतात. कंदमुळांनाही फार खोल जमीन लागत नाही. हवामानाचाही विचार करावा लागतो. वर्षभर माफक पाऊस आणि थंड हवामान अशा युरोपीय देशातील वनस्पती आपल्याकडे कशा चालतील? तरीही अमेरिकेतील युरोपातील तंत्रमंत्रावरील आधारित संशोधन आपण जसेच्या तसेच आयात करताना दिसतो. ते देश 35°-45° अक्षांशावर आहेत. आपण महाराष्ट्रात 15° – 18° अक्षांशांवर आहेत.
आपल्याकडे आता ‘पंचायत राज’ आहे. पंचायतीच्या अखत्यारित असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर तिचाच अधिकार असतो. गेल्या काही वर्षांतील नदीच्या पात्रातील वाळूच्या उपश्यासंबंधात हा प्रश्न आता धसास लागतो आहे. तेव्हा गावाच्या शिवाराचा नकाशा काढून, त्यातील भू-भौतिकी घटक लक्षात घेऊन (Soil map, slope map, erosion map…) कुठे, किती भागावर, कोठचे पीक घ्यायचे, कुठे चराईसाठी गायरान ठेवायचे, कुठे गावतळे-मत्स्यपालन शक्य आहे, कुठे गाव-रान (जंगल-झाडी) उभे करायचे, कुठे फळबागा, भाजीपाला घ्यायचा, या साऱ्याचे चांगले नियोजन करता येईल. समतल रेषांच्या अभ्यासातून बांध, बंदिस्ती, पाणलोट क्षेत्रविकास, धूप नियंत्रण यांचा विचार व कृती आराखडा करता येईल. आज GIS आणि Satellite imagery च्या साहाय्याने या गोष्टी अल्पवेळात आणि वाजवी किंमतीत होऊ शकतात. जमीन नियोजनाचे प्रश्न, पाणलोट क्षेत्र विकास, धूप नियंत्रण, चराई कुरणे, मत्स्यशेती, गावतळी हे विषय एकट्या दुकट्याचे नाहीत. ही सामूहिक कृतींनी करायची आणि टिकवून ठेवायची गोष्ट आहे. त्यासाठीची मानसिकता शालेय जीवनापासूनच जोपासायला हवी. सर्व काही सरकारवर ढकलून देण्याची वृत्ती आपण सोडली पाहिजे. “उद्धरेत आत्मनात्मानम्” हेच खरे.
इथवर जमिनीविषयीची थोडक्यात माहिती आपण करून घेतली. आता आपल्या शेतीवरील मातीची उत्पत्ती आणि संवर्धन (Soil husbandry) याविषयी जाणून घेऊ या. एका अर्थाने जमीन ही भूशास्त्रीय घडामोड आहे. सह्याद्री, दख्खनचे पठार हे होतेच. माती मात्र जमिनीची झीज आणि भर यातून आली आहे. मानवी हस्तक्षेपाला कृषीला इथे वाव आहे.
पृथ्वी ज्यावेळी अस्तित्वात आली त्यावेळी तिचे वरचे आवरण खडकाचे होते. महाराष्ट्रात बसाल्ट, कर्नाटकात ग्रनाईट आहेत. हे सर्व खडक खनिजांचे बनलेले असतात. इंग्रजीत त्यांना minerals म्हणतात. बसाल्टमध्ये 40 टक्के सिलिका आणि मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशिया असतो तर ग्रनाईटमध्ये 70 टक्के सिलिका आणि मोठ्या प्रमाणावर अॅल्युमिना असतो. याशिवाय लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, गंधक, मॅग्नेशियम, टिटॅनियम, मँगनीज, बोरॉन अशी खनिजे कमी अधिक प्रमाणात असतात. शिवाय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हेही असतात. अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणच्या मातीच्या घटकांत व त्यांच्या प्रमाणांत फरक असतात.
ऊन, पाऊस, वारा, पाण्याचे प्रवाह इत्यादींमुळे खडकांचे विघटन होत असते. त्यांचे तुकडे, दगड, गोटे, रेती, रेव असे विभाजन होऊन मातीचा थर तयार होतो. त्या थराखाली अर्धवट विभाजन झालेला खडक (मुरूम) असतो आणि सर्वांत खाली घट्ट, एकसंध खडक सुरू होतो. याशिवाय अनेक वर्षांच्या वनस्पतिजन्य व जीवजिवाणूंपासून बनलेला ह्यूमसही वरच्या मातीच्या थरात असतो.
शेतीच्या दृष्टिकोनातून मातीविषयी अनेक गोष्टी आपणाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वांत प्रथम मातीची घडण म्हणजेच पोत आणि बांधणी समजून घेऊ या. काही वेळा केरकचरा Humus संक्रमण पट्टा खनिजे + Humus Clays, Minerals जमीन Horizon A तंतूमुळे Horizon B सोटमूळ बाधित खडक Horizon C मातृखडक माती भरभरीत, जाड पोताची असते तर काही वेळा अगदी मुलायम पोताची असते. हातात घेऊन आणि डोळ्यांनीदेखील हे पहाता येते. या दृष्टीने मातीचे 3 मुख्य घटक असतात. रेती (sand), रेव : चिकणमाती (clay) आणि पोयट्याची माती (loam). ही वर्गवारी मातीच्या कणांच्या आकारावरून ठरते. 5 um ते 1-2 pm पर्यंतचे हे कण असतात. (1 um – 1/1000 mm) या सर्व कणांचे एक आदर्श मिश्रण असते. बऱ्याचवेळा त्याला गार्डनसॉईल म्हणतात. उदा. चिकणमातीचे प्रमाण खूप असल्यास त्यात रेती मिसळावी लागते किंवा विटांचा चुरा मिसळतात.
यानंतर या कणांची बांधणी कशी झाली आहे हे महत्त्वाचे असते. मातीच्या सूक्ष्म कणांचे गुच्छ तयार होतात. हे गुच्छ परस्परांशी जोडलेले असतात. त्यांच्या प्रमाणावरून आणि रचनेवरून मातीच्या अंतर्गत पोकळ्यांचे प्रमाण व प्रकार ठरत असतात. मोठ्या पोकळ्या (> 50um) या पाणी झिरपण्याची (permeability) आणि अंतर्गत प्रवाहांची (transmission) क्षमता ठरवतात. अशा मोठ्या पोकळ्यात केशाकर्षण असत नाही. पोकळ्यांचा आकार थोडा कमी झाला (0.5 – 50um) तर त्यांच्यात पाणी साठून राहते, धरून राहते. त्याहीपेक्षा पोकळ्यांचा आकार कमी झाला (0.005 0.5um) तर दलदल तयार होते. माती अपार्य होते, झिरपा होत नाही आणि शेवटी माती दडस, घट्ट होते. अशा मातीची मशागत फार कष्टाची होते. शिवाय मातीचे काही कण पाणी शोषून घेतात (ab- sorption). काही कणांच्या पृष्ठभागाला पाणी नुसते चिकटून रहाते. (adsorption). हे पाणी वनस्पतींच्या दृष्टिकोनातून फारसे उपयोगी नसते.
माती आणि पाणी यांचे हे परस्परसंबंध फार महत्त्वाचे आहेत. झाडे काही आपल्यासारखी भांड्यातून पाणी पीत नाहीत. त्यांना फक्त ओलावा, वाफसा लागतो. मुळे आणि जीवाणू यांची क्रियाप्रक्रिया होण्यासाठी osmosis ची क्रिया घडावी लागते तर पानांतून सतत होणाऱ्या transpiration साठी केशाकर्षणाने पाणी वरवर चढण्याची गरज असते.
याशिवाय वनस्पतींना त्यांच्या जैवरासायनिक प्रक्रियांसाठी अनेक खनिजांचीही गरज पडते. केवळ पाणीच नव्हे तर ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन आणि पोटॅश, फॉस्फरस, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, बोरॉन, तांबे, मॅगनीज अशी सोळा द्रव्ये लागतात. शिवाय मातीचा आम्ल-विम्ल निर्देशांक सांभाळावा लागतो. या सर्वांना जमिनीची रासायनिक सुपीकता म्हणतात.
पाणी हे जगातील सर्वांत मोठे द्रावक आहे. त्यात अनेक द्रव्ये विरघळतात. त्याचे दोन परिणाम होतात. 1. झिरपणारे, मुरणारे पाणी क्षार, खते, कीटकनाशके घेऊन जाते. 2. त्याचबरोबर जेव्हा ते जमिनीवरून वाहत जाते तेव्हा मातीचे सूक्ष्म कण वरच्या भागातील छिद्रे बुजवितात.
जमिनीत किती जीवाणू, गांडुळे इ. आहेत. त्यावर तिची जैविक सुपीकता अवलंबून असते. रासायनिक खतांपेक्षाही जैविक सुपीकता महत्त्वाची असते. वनस्पतींची मुळे आणि रासायनिक खते, खनिजे यांच्यातील हा महत्त्वाचा दुवा आहे.
भौतिक सुपीकतेविषयी वर विवेचन आलेच आहे. या तिन्ही सुपीकतांचे उत्तम संतुलन म्हणजेच चांगल्या कसा-पोताची माती. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की, जमिनीची उत्पादकता 32 टक्के खते, पोत, जैवभार यांवर अवलंबून असते. 41 टक्के नेमक्या ओलाव्यावर तर 17 टक्के जमिनीचे व्यवस्थापन, मशागत यावर अवलंबून असते. अर्थात हे आकडे केवळ दिशादर्शक समजावेत. बी-बियाणे, कीड नियंत्रण, हवेतील आर्द्रता, तापमान हे बाह्य स्वरूपाचे आहेत, त्यांचा मातीशी संबंध नाही.
वरील धावते विवेचन ऐकून सर्वसाधारण शेतकरी म्हणेल की आम्हाला याचा काय उपयोग? हे तर सारे शुद्ध वैज्ञानिक पातळीवर, तज्ज्ञांच्या पातळीवरचे आहे. आमच्या शेतांवर, फळबागांत, कुराणात आम्ही काय करायचे? खरे तर अनेक पिढ्या शेतकरी उत्तम शेती करत आहेत. आपले हवामान, खाण्यापिण्याच्या सवयी, गुराढोरांचा सांभाळ लक्षात घेऊन, त्याप्रमाणे वाण निवडून शेती करत आहेत. पण मध्यंतरीच्या काळात अशा काही घटना घडल्या की शेतीचे बसलेले गणित विस्कटले. इंग्रज अमदानीत शेतसारा कर रूपाने म्हणजे रोख पैशाच्या रूपातच द्यावा लागू लागला. पूर्वीसारखा उत्पादनातील हिश्याच्या स्वरूपात नाही. त्यामुळे शेतमाल बाजारात आला. शिवाय कराची रक्कम निश्चित झाल्यामुळे तिचा उत्पादनाशी संबंध राहिला नाही. उत्पादन येवो न येवो, कमी येवो जास्ती येवो, कर (शेतसारा) भरावाच लागतो.
“कसेल त्याची जमीन’ या कार्यक्रमांतर्गत जमिनीचे फेरवाटप झाले. त्यात जमीन अनेक लहान-लहान तुकड्यांत विभागली गेली. वारसदारीमुळे तिचे आणखी लहान तुकडे झाले. मात्र त्याच ओघात लहान शेतकऱ्यांना संसाधने, भांडवल यांची सोय झाली नाही. परिणामी जमिनीची, मातीची आबाळ झाली. दिवसेंदिवस त्या निःसत्त्व होत गेल्या. हरितक्रांतीच्या काळात प्रथम गरज म्हणून व पुढे लोभापायी NPK (नत्र-फॉस्फरस- पोटॅशियम मिश्रखते) समीकरणाचा आणि कीटकनाशकांचा अमर्याद उपयोग सुरू झाला. पाण्याचाही बेहिशोबी वापर सुरू झाला. ऊस, क्षारयुक्त जमिनी, मीठफुटी जमिनी, खर्चिक उपाय.
शेतीचा बाजारपेठेशी संबंध जोडला गेल्यावर एकल पीक पद्धतीने जोर धरला. वर्षानुवर्षे एकाच तुकड्यावर ऊस, कापूस, द्राक्ष, गहू घेण्यात येऊ लागले. मिश्रपीक, पीक फेरपालट, सेंद्रिय खते, जमीन पालापाचोळ्यांनी झाकणे, इत्यादी सर्व मागे पडले. जमिनीतील जीव-जीवाणू, गांडुळे यांच्यात प्रचंड घट झाली. जड यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे जमिनी घट्ट दाबल्या गेल्या. त्यांच्यातील रवाळपणा, भुसभुसीतपणा नष्ट झाला. एकूणातच जमिनींचा कस, पोत,फूल पार उद्ध्वस्त झाले.
शेती ही जीवनशैली न राहता तिला उद्योगाचे स्वरूप आले. दीर्घ पल्ल्याचा विचार मागे पडून तात्कालिक नफा, जास्तीत जास्त नफा हेच ध्येय ठरले. आज तर पुढची पिढी शेतीत राहणारच नाही अशी स्थिती आहे. अमेरिकेत शेतकऱ्याचे सरासरी वय 58 वर्षे आहे. कमीत कमी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणे, हे विकासाचे गमक ठरले; मात्र त्याचवेळी कमाल जमीन धारणा कायदा अशी विसंगती निर्माण झाली.
असे सांगण्यात येते की अमेरिकेत फक्त 3-4 टक्के लोक शेती करतात. आपल्याकडे ही टक्केवारी 40-45 च्या घरात आहे. सहज मनात विचार चमकून गेला की आपल्याकडेही अमेरिकेसारखा विकास झाला तर केवळ 4 टक्के लोकांकडे 44 टक्के जमिनीची मालकी जाणार? 4-5 टक्के लोकांकडे देशातील 80-85 टक्के पैसा आहेच (जागतिक अब्जाधीशांच्या यादीत भारतीय सतत वाढत आहेत) मग लोकशाही, समाजवाद, समता यांचे काय? असो, थोडेसे विषयांतर झाले. या सर्वांतून बाहेर पडायचे तर आपल्याला परत निसर्गाकडे वळणे भाग आहे. निसर्गावर मात नव्हे तर निसर्गाला जाणून घेऊन, पर्यावरणातील परस्परावलंबन समजून घेऊन, मृत जमिनी सजीव करून जिवंत करून, मातीचे जतन, संवर्धन करून, सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर करून, सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर करून, मृदासंधारण, “माती अडवा पाणी जिरवा’ कार्यक्रम राबवून, बाहेरचे पाणी शेतात न येऊ देता आणि शेतातले पाणी बाहेर न जाऊ देता असा सर्वंकष कार्यक्रम राबवला पाहिजे.
पाणलोट क्षेत्रविकास, मृदासंधारण, बांधबंधिस्ती, वारघटीची झाडे लावणे, ग्रामपंचायतीच्या पातळीवर शिवाराचे नियोजन करणे अशी सर्व कामे सामूहिक श्रमशक्तीवरच होतात. स्वतःच्या शेतीवर पीक फेरपालट, मिश्रपीक, पट्टापद्धत, बांधावरची झाडे, गांडूळ खते, शेतातून बाहेर गेलेला माल कुठच्या स्वरूपात परत शेतावर आणणे, (गोबर, विष्ठा, मूत्र, ठोंब, धसकटे, पालापाचोळा… असे सर्व भांडवल परत शेतात जाणे), हे सर्व व्यक्तिगत पातळीवरच करायला हवे. त्यासाठी वाचन, अभ्यास, व्यक्तिगत अनुभवांची देवाणघेवाण याचीही जोड द्यायला हवी. शेतकऱ्याने आधी स्वावलंबी, स्वयंपूर्ण, स्वयंपोशी बनावे.
समाजानेही “मला काय त्याचे” हा विचार सोडून द्यावा. आपल्या सगळ्यांना दोन वेळचे जेवण, कपडालत्ता, कागद लागतो ना? जमिनीवरची माती खरवडून विटा पाडणे, जंगल कटाई करणे, धडाधड जमिनी ‘बिगरशेती’ करून बिल्डर-डेव्हलपरच्या घशात घालणे; ही काय जबाबदार, जाणत्या समाजाची लक्षणे आहेत? विनोबाजींचे याबाबतचे अवतरण मुखपृष्ठावर दिले आहे, तो या लेखाचा समारोप समजावा. 6, सुरुची, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400057. मोबा. 9819836317