ज्यांची देवाच्या अस्तित्वावरच नव्हे तर देवाच्या चांगुलपणावर व दयाळूपणावरदेखील श्रद्धा आहे ते लोक सहसा प्रतिपादन करतात की संकटसमयी ही श्रद्धा अनेकांसाठी दिलासाकारक ठरते. ह्या प्रतिपादनाचा जरा खोलात जाऊन विचार करू या.
जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा जगण्यातला आनंदच हरवला आहे असे वाटते, तेव्हा स्वतःची समजूत काढण्याचे वेगवेगळे मार्ग लोक वापरतात. एक प्रकारची माणेस स्वतःला सांगतात, “सध्याच्या दुःखभोगामागे सर्वशक्तिमान परमेश्वराची अंतिमतः माझ्या भल्यासाठीच काही योजना असेल. मला कदाचित ती समजू शकत नसेल, तेव्हा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून दुःख आणि वेदना निमूटपणे सोसाव्यात हेच माझ्या हिताचे आहे.” जर देव सर्व काही भल्यासाठीच करतो असे अशा माणसाला खरोखर मनापासून पटलेले असेल, तर त्याला दुःखापासून आराम मिळतही असेल. परंतु अशी समजूत कोणी करून घ्यावी का नाही, हा मात्र फार वेगळा प्रश्न आहे. कारण “अंतिमतः भले” कशाला म्हणायचे या प्रश्नाला समाधानकारक उत्तर नाही, वा शेवट नाही. एका माणसाचा नाश कदाचित त्याच्या कुटुंबाच्या भल्यासाठी असू शकेल. एका कुटुंबाच्या नाशाने क्वचित एखाद्या गावाचे वा प्रांताचे वा जगाचे भले होऊही शकत असेल. परंतु एकाचे अहित वा नाश करून दुसऱ्याचे भले करणाऱ्या शक्तीस ‘दयाळू’ हे विशेषण कसे लावता येईल, हा प्रश्नदेखील देवावर अंधविश्वास असलेल्यांच्या आकलनापलिकडचा आहे. असो. या जगाचा नियंता देव आहे, व तो अंतिमतः जगाच्या भल्यासाठीच कार्यरत आहे, असा अढळ व प्रामाणिक विश्वास असलेल्या माणसाला प्रत्येक अडचणीत काही दिलासा मिळत असणारच. परंतु हा दिलासा अज्ञानावर आधारित आहे हे मान्य करायला हवे.
तसेच, दिलासा मिळवण्यासाठी अधिक विवेकवादी मार्ग उपलब्ध आहे हेही नमूद . करायला हवे. विश्वाचा, अगर आपल्या लहानग्या पृथ्वीचा इतिहास पाहिला तर नैसर्गिक घडामोडींमागचा कार्यकारणभाव स्पष्ट होईल. जीवाची उत्पत्ती, विविध घटकांमधून सजीव सृष्टीचे प्रकटीकरण, नवनवीन प्रजाती उदयाला येणे व नष्ट होणे, मनुष्यप्राणी व इतर निसर्गघटकांचा होणारा परस्परव्यवहार, एका प्रजातीची दुसऱ्या प्रजातीशी वागणूक, निसर्गातील घटकांचा आणि इतर सजीवांचा मनुष्यजीवनावर होणारा परिणाम, या सर्व गोष्टींमागे कारणे व त्यांचे परिणाम यांची एक साखळी आहे. ही साखळी अखंड आहे. या साखळीचे अंतिम उद्दिष्ट जोखणे कठीण आहे, किंबहुना तसे ते जोखता येत नाहीच. मागच्या कडीवर पुढली आधारित आहे, परंतु या साखळीस काही एका पूर्वनियोजित मुक्कामास पोहोचायचे आहे असे दिसत नाही. जगातील घटनांना स्वतोमूल्य नाही. या घटनांचे मूल्य मनुष्यप्राण्यावर त्यांच्या होणाऱ्या परिणामाप्रमाणेच जोखता येईल. आणि जो तो मनुष्य हे मूल्य त्याच्या स्वतःवर होणाऱ्या परिणामांधारेच ठरवेल. त्यामुळे हे मूल्य बदलते असेल, व्यक्तिसापेक्ष असेल. एखाद्या सैनिकाचा युद्धात होणारा मृत्यू त्याच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने एक मोठे संकट असेल, तर शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने एक इष्ट घटना असेल. खरे तर शत्रूच्या सैनिकांनी हा मृत्यू व्हावा म्हणून प्रयत्न केलेले असणार.
विचार करता आपल्यास दिसून येते की स्थळकालातील घटना काही कारणांमुळे घडतात. या घटना मग पुढच्या घटनांचे कारण बनतात. कारण, त्याचा परिणाम, हा परिणाम नवीन घटनेचे कारण, अशी ही साखळी आहे. ना शास्त्रज्ञ, ना तत्त्वज्ञ या अखंड साखळीची सुरुवात वा अखेर शोधू शकले आहेत, किंवा वर्तवू शकले आहेत. घटना ‘चांगल्या’ अगर ‘वाईट’ नसतात, त्यांचे व्यक्तिसापेक्ष परिणाम चांगले वा वाईट असतात. जे घटनांबाबत तेच इतर मूल्य संकल्पनांबद्दलदेखील म्हणता येईल.
एखादे पुस्तक, विधान वा चित्र श्लील किंवा अश्लील नसते, तर पाहणाऱ्या किंवा वाचणाऱ्याच्या मनातील प्रतिक्रिया अश्लील असते असे प्रतिपादन केले असता एका पारंपरिक लेखकास ते फारच आक्षेपार्ह वाटले. परंतु, खरे पाहता, एखादे निर्जीव चित्र वा छापलेला मजकूर, त्यांच्याकडे पाहणारा जिवंत निरीक्षक नसल्यास, मूल्यविहीन असतात. असो.
जर निसर्ग निरुद्देश्य असेल व हे जग, ‘चांगले’ वा ‘वाईट’ नसेल, तर जगन्नियंत्याच्या ‘दयाळूपणाने संकटसमयी स्वतःचे समाधान करून घेण्यात काही अर्थ दिसत नाही. संकटे ही यायचीच. इतर मनुष्यप्राण्यांच्या मदतीने त्यांच्यातून मार्ग काढावा, भविष्यात ती येणार नाहीत याची काही तजवीज करता आली तर पहावे. संकटसमयी मी स्वतःस सांगेन / बजावेन, “ही आपत्ती माझ्यावर कोसळली ही खरेच मोठ्या दुःखाची बाब आहे. मी हे दुःख विसरण्याचा, या संकटातून इतरांच्या मदतीने व स्वप्रयत्नाने बाहेर पडून, मनुष्य म्हणून उपयोगी जीवन पुन्हा कंठण्याचे माझे मानस राहील. दैवी मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
“जे घडते आहे ते माझ्या भावनांना निरपेक्ष, माझ्या भावनांना विचारात न घेता घडत आहे.” निसर्गनियम चांगले वा वाईट नसतात. ते फक्त असतात. स्वतःची वागणूक तदनुरूप बदलणे हेच माणसाच्या हातात असते. विवेकवादी माणूस आपत्तीतून असाच मार्ग काढतो. रीझन, ऑगस्ट 1934 च्या अंकातून साभार. [ हा लेख प्रभाकर नानावटींनी उपलब्ध करून दिला.]