नास्तिकसाधना

साधना अथवा तपस्या यांना कोणत्याही क्षेत्रात खूप महत्त्व आहे. एखादे ज्ञान अथवा कौशल्य स्वतःमध्ये मुरवण्यासाठी वर्षानुवर्षे झपाटून जाऊन आणि सातत्याने प्रयत्न करीत राहणे म्हणजे साधना, तपस्या हा याच अर्थाचा शब्द. विज्ञान, कला, क्रीडा यांसारख्या कुठल्याही क्षेत्रात कठोर साधनेशिवाय काही साधण्याची शक्यता नाही. पण मुळात हे दोन्ही शब्द आध्यात्मिक साधनेसाठी वापरले गेले आहेत आणि आजही त्या क्षेत्रातच त्यांचा वापर मुख्यतः होतो. आध्यात्मिक साधना कशासाठी करतात? तर साक्षात्कारी, ज्ञानी, योगी, संत असे काहीतरी होण्यासाठी. या प्रकरणात मला काही अंशी धक्कादायक वाटेल असे एक विधान करायचे आहे; ते म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने आध्यात्मिक साधना करणाऱ्या साधकापेक्षा नास्तिक माणसाला संतपदाला जाणे जास्त सहज आणि सोपे आहे. किंबहुना खरा नास्तिक हा संत होणेच अपरिहार्य आहे.

आपली संतपणाची व्याख्या काय ते आधी स्पष्ट करू या. अहंकाराचा त्याग केलेला, स्थितप्रज्ञ, निरपेक्ष, निःस्वार्थी, निर्लिप्त आणि रंजल्यागांजलेल्यांना आपले म्हणणारा तो संत. या व्याख्येबद्दल कुणाचे दुमत असण्याचे काही कारण असेल असे मला वाटत नाही. ही व्याख्या जुनी आणि सर्वमान्यच आहे.

नास्तिकसाधनेची कल्पना आणि त्यासंबंधी वर केलेले विधान हे काही मी धक्कादायक विधान करण्याच्या हौसेखातर केलेले नाही हे नक्की. माझ्या वयाच्या सतराव्या वर्षापासून मी पारंपरिक साधनेला सुरुवात केली. आणि जेव्हा केली तेव्हा ती पूर्ण भक्तिभावाने केली. पुढे अनेक वर्षांनंतर त्यातूनच नास्तिकसाधनेचा जन्म झाला आणि तिची माझी नित्याची गाठ बांधली गेली. दोन्ही प्रकारच्या साधनांमध्ये वर्षानुवर्षे ध्यास घेऊन रमल्यानंतर आणि त्याचबरोबर इतरही अनेक साधकांना बरीच वर्षे अगदी जवळून पाहिल्यानंतर माझे हे मत दिवसानुदिवस अधिकाधिक पक्के होत गेले आहे. हे कधीतरी अकस्मात झालेले मतपरिवर्तन नाही. मला माझ्या अनुभवावरून तरी असे वाटते की नास्तिकसाधना भक्तिसाधनेपेक्षा कमालीची सोपी, कितीतरी अधिक प्रभावशाली आणि मुख्य म्हणजे खूपच तर्कशुद्ध आहे.

नास्तिकपणातून संतत्वाचा जन्म होणे अगदी सहज आहे असे मी का म्हणतो ते समजून घेणे फारसे अवघड नाही. संतांची व्याख्या करण्यासाठी आपण वापरलेले एक एक गुण घेऊन त्याचा नास्तिकतेशी का आणि कसा संबंध आहे, आणि त्याच्यापुढे जाऊन हा संबंध जास्त जवळचा आणि थेट कसा आहे ते पाहू.

आपल्या बहुतेक सर्व दुःखांच्या आणि दुसऱ्याला बोचतील अशा आपल्या अवगुणांच्या मुळाशी अहंकार असतो. स्वतःच्या अहंकाराचा नाश ही कदाचित जगातल्या सर्वांत अवघड गोष्टींपैकी एक असावी. नेमकी हीच गोष्ट नास्तिक विचाराला सर्वांत सोपी आहे. प्रत्येक सजीव ही एक रेणूंची रचना आहे. भौतिक रासायनिक नियमांप्रमाणे चालणारी. या रेणूंच्या रचनेपलीकडे त्यात काहीही नाही. ज्याला आपण ‘मी’ समजतो तो निव्वळ भ्रम आहे. अहंकार ज्या ‘मी’ वर आधारित आहे तो ‘मी’च जर अस्तित्वात नाही तर अहंकार राहील कसा? उत्क्रांतीमध्ये हा भ्रम कधीतरी निर्माण झाला असला पाहिजे. तो नक्की कधी झाला हे समजायला मार्ग नाही. तो फक्त माणसातच आहे की इतर कुठल्या प्राण्यांमध्येही आहे हेही आज माहीत नाही. पण असा भ्रम एकदा निर्माण झाल्यानंतर तो टिकून राहणे साहजिक आहे कारण त्याच्यात उत्क्रांतीच्या अंगाने निश्चितच फायदा आहे. प्रत्येक सजीव आपल्या जगण्यासाठी, वाढीसाठी आणि विणीसाठी धडपडत असतो. ही धडपड जाणीवपूर्वक केलेली असते असे नाही. ही धडपड जाणिवेच्या पातळीवर असली नसली तरी ती चालूच राहणार कारण जो जीव ही धडपड करील त्याचेच जीन पुढच्या पिढीत जाणार. त्यामुळे मीपणाचा भ्रम नसतानाही ही धडपड असणारच यात शंका नाही. फरक इतकाच पडतो की मीपणाच्या भ्रमाबरोबरं ही धडपड जाणिवेच्या पातळीवर येऊन पोचते. किमान माणसाच्या बाबतीत तरी ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण माणसाच्या बुद्धीला कारणे शोधण्याची भूक आहे. इतर कोणत्याही सजीवाच्या तुलनेत ती सहस्रपटींनी अधिक आहे. आपण एखादी गोष्ट का करतो याचे आपण आपल्याशीच आणि दुसऱ्यांना justifications देण्याचा प्रयत्न करीत असतो. रेणूंच्या एका जडजंबाल रचनेला ‘मी’ असे नाव दिले की सर्व justifications खूप सोपी होऊन जातात. हा या भ्रमाचा फार मोठा फायदा आहे. या फायद्यामुळे केव्हातरी अपघाताने उत्क्रांत झालेला हा भ्रम किमान माणसात तरी टिकून राहिला असणे तर्काला धरून आहे. पण टिकला, दृढ झाला तरी तो भ्रम आहे, ही गोष्ट खरी. सत्य काय ते मनात स्पष्टपणे ठसले की हा भ्रम दूर होऊ शकतो. अहंकाराचा पाया असलेला हा भ्रम उखडला जाणे यापेक्षा अहंकारनाशाचे अधिक चांगले दुसरे साधन कोणते असू शकेल?

पारंपारिक साधनेतही ‘मी देह आहे’ हा भ्रमच मानला आहे. पण त्यातून सुटका करून घेताना ‘मी आत्मा आहे’ असा दुसरा, त्याहून गहिरा भ्रम निर्माण केला गेला आहे. हा आत्मा जन्ममरणाच्या चक्रात अडकला आहे, त्यातून त्याला मुक्त करायचे आहे, वगैरे गोष्टी मानल्यानंतर अहंकाराच्या आणखी सूक्ष्म पातळ्या निर्माण होतात. उदाहरणार्थ एखाद्याची ध्यानयोगात इतरांपेक्षा खूप चटकन प्रगती झाली तर हा जन्मजन्म साधना करत आला आहे असे त्याचे कारण दिले जाते. यातून येणारा सूक्ष्म अहंकार टाळणे फार अवघड आहे.

पारंपारिक साधनेतला अहंकाराचा दुसरा मोठा सापळा ‘गुरुभक्ती’मध्ये आहे. सांप्रदायिक साधनेत सद्गुरु परमेश्वरच मानला जातो. त्याच्या पायाशी संपूर्णपणे शरणागत व्हायचे असते. ज्ञानी पुरुषाचे स्थान सामान्य माणसापेक्षा एकदम वेगळ्याच पातळीवर मानले जाते. वास्तविक अशी आदराची, पूज्यतेची स्थाने असणे आणि तिथे नतमस्तक होणे, शरणागत होणे हे अहंकारनाशाचे खूप चांगले साधन असले पाहिजे. पण चिचुंद्रीला हाकलायला दार उघडावे आणि त्यातून अस्वल आत यावे अशातला प्रकार इथे होतो. आध्यात्मिक साधना करणारा माणूस केव्हातरी सिद्ध, साक्षात्कारी, ज्ञानी होणार असे अपेक्षित आहे. आपण त्या पातळीवर जायचे आहे या विचारानेसुद्धा मनात अहंकाराच्या कितीतरी गाठी तयार होतात. त्यातून तुम्हाला काहीएक अधिकार प्राप्त झाला असे मानून जर चार लोक तुमचा सन्मान करू लागले तर विचारूच नका. कितीतरी चांगले साधक या सापळ्यात फसलेले मी जवळून पाहिले आहेत. या सापळ्यात न अडकणे हे लक्षावधींमध्ये एखाद्यालाच साधत असेल असे मला वाटते.

पण मुळात हा सापळा निर्माणच कशाला करायचा? नास्तिकसाधनेत कुणी परमपूज्य नाही, कुणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. श्रेष्ठ-कनिष्ठपणाच्या संकल्पना मुळातूनच नसल्यामुळे बळेबळेच समानता आणण्याचा अट्टाहास करण्याचेही काही कारण उरत नाही. संभाव्यतेच्या नियमांमुळे माणसामाणसांत फरक असतो. कुठलेही दोन दगडसुद्धा अगदी एकसारखे नसतात. मग माणसे कशी असतील? त्यामुळे एखाद्याची साधनेत लवकर प्रगती झाली तर त्याला जन्मजात योगी वगैरे मानण्याचे काही कारण नाही. आपल्यामध्ये जन्मजात असलेला एखादा गुण अथवा दोष संभाव्यतेच्या नियमानुसार आला आहे हे मनाला एकदा स्पष्टपणे समजले की अहंगंड आणि न्यूनगंड या दोन्ही फुग्यांना टाचणी लागते.

निसर्ग पूर्णपणे निर्हेतुक आहे. विश्वातल्या घडामोडी आणि विशेषकरून पृथ्वीवर झालेली अत्यंत सुंदर अशा सजीव सृष्टीची उत्पत्ती पाहिली तर यात काहीतरी योजनाबद्धता असली पाहिजे असे प्रथमदर्शनी तरी वाटते. पण सजीवसृष्टीची उत्क्रांती बारकाईने अभ्यासली तर त्याच्यामागे काम करणारी सगळीच तत्त्वे पूर्णपणे निर्हेतुक आहेत हे लक्षात येते. माणूस निर्माण करण्याच्या हेतूने काही उत्क्रांती झाली नाही, तरीसुद्धा माणूस निर्माण झाला.

निसर्गाचा हा निर्हेतुकपणा स्वतःच्या रोजच्या वागण्यात आणणे यापेक्षा ‘कर्मयोग’ म्हणजे आणखी वेगळे ते काय? हेतू हा काही निसर्गाचा धर्म नाही. उत्क्रांतीमध्ये ज्या कारणांनी मीपणाचा भ्रम आला त्याच कारणांनी कर्मामागचा ‘हेतू’ ही आला असला पाहिजे. पण हेतू हे काही कर्माचे उगमस्थान नाही. हेतू हा कर्मासाठी अपरिहार्यही नाही. Survival ची, धडपड साध्यातसाधे जीवाणू-विषाणूही करीत असतात. त्यांना कुठे माणसासारखी विचारशक्ती असते? मनात कोणता हेतू धरून ते ही धडपड करतात? हेतू मावण्याइतके विकसित मन नसतानाही त्यांचे सर्व व्यवहार चालतात. आपण तरी आपले सगळे व्यवहार हेतुपुरस्सर करतो असे कुठे आहे? अजाणता आणि निर्हेतुकपणे आपण श्वासोच्छ्वास नाही का करीत? श्वासोच्छ्वास जितका सहजपणे होतो तितक्या सहजपणाने इतरही सगळे कमीअधिक गुंतागुंतीचे व्यवहार करणे शक्य आहे. असे सहज व्यवहार होणे ही एक आत्यंतिक सुखाची अवस्था असते. सगळे काही करीत असताना मन relaxed राहते, मोकळे राहते, पूर्णपणे निर्लिप्त, निरपेक्ष आणि निःस्वार्थी होऊन जाते.

विश्वातल्या घडामोडींना कोणतीही केंद्रीय योजनाबद्धता नसते. कुणाच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडत नसतात. प्रत्येक सजीव स्वतःच्या टिकून राहण्यासाठी सहजपणे धडपडत असतो. निर्जीव सृष्टीला तर तेवढाही ‘हेतू’ नसतो. हे समजून न घेतल्यामुळे आपण स्वतःसाठी कितीतरी लहान-मोठ्या समस्या आणि दुःखे निर्माण करीत असतो. मी कधी कुणाचे वाईट केले नाही मग माझ्यावर हा अन्याय का झाला, अशासारख्या प्रश्नांमध्ये आपण गुरफटून कुढत राहतो. खरे तर हेतू इतक्याच न्याय-अन्याय या कल्पनाही मानवनिर्मित आहेत. निसर्गात कुठे न्याय नाही आणि म्हणून अन्यायही नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला कार्यकारणभाव असतो ही गोष्ट खरी, पण एकाच गोष्टीवर एकाच वेळी इतक्या विविध शक्ती काम करीत असतात की त्यांतून काय होईल ते शंभर टक्के अचूकपणे कधीच सांगता येत नाही. भाकिते करता येतात पण ती संभाव्यतेची. प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांमध्ये एक प्रकारची अनिश्चितता, अबद्धता, randomness, स्वैरपणा असतो, हे समजून घेतल्याने मन आणखी निर्हेतूक आणि relaxed राहायला मदत होते.

माझे दोन गमतीचे अनुभव असे आयुष्यात अवघड काळ अनेकदा येतात- जातात. खूप प्रतिकूल, अवघड आणि वादळी अशी काही वर्षे माझ्या आयुष्यात दोन वेळा येऊन गेली. त्यांपैकी पहिल्यावेळी मी आस्तिक होतो तर दुसऱ्या वेळी नास्तिक झालो होतो. पहिल्या वेळी जेव्हा सगळ्या गोष्टी विचित्र घडत होत्या, कुठल्याच बाजूने मनाने सारखे काही घडत नव्हते, सगळ्याच बाजूंनी कोंडी झाली होती तेव्हा माझ्या माने श्रद्धेचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळा देवाची करुणा भाकली, गाऱ्हाणे मांडले, अगदी भांडणसुद्धा केले. याने परिस्थितीत काही बदल होणार नव्हता व तशी माझी तेव्हासुद्धा अपेक्षा नव्हती. पण माझ्या श्रद्धेने मला बळ यावे आणि जगाला बदलता आले नाही तरी स्वतःशीच असलेल्या समस्या तरी सुटाव्यात, अशी अपेक्षा जरूर होती. मागे वळून पाहताना आता असे जाणवते की या गोष्टींनी मला कितीतरी जास्त मनस्तापच झाला, जो सहज टाळता येण्यासारखा होता.

याउलट असाच सुमारे तीन वर्षांचा अवघड कालखंड परत जेव्हा आला तेव्हा नास्तिकपणा माझ्यात पुरेसा मुरलेला होता. त्यामुळे जरी आशानिराशेचे खेळ एकीकडे चालू होते, वैतागाचे, frustration चे उद्गार या तीन वर्षांत अर्ध्या एक डझनवेळा तोंडून बाहेरही पडले असतील, तरी पण मागच्या तुलनेत मी कितीतरी संतुलित राहिलो. याची कारणे अनेक असतील. वयाबरोबर आलेली स्वाभाविक परिपक्वताही असेल. पण मला वाटते की सर्वांत महत्त्वाचे कारण नास्तिकता हेच आहे. घटनांमागची अनिश्चितता, randomness आणि निर्हेतुकता यांचा चांगला परिचय असल्यामुळे माझ्यावर अन्याय होतो आहे असा कडवटपणा मनात घर करून राहिला नाही. जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडताहेत अशी माझी समजूत असती तर तो माझ्यावर अन्याय करीत आहे असे मला वाटले असते. कुठलीही गोष्ट कुणा एकाच्या इच्छेने होत नाही हे माहीत असल्यावर राग तरी कुणाचा करणार?

पण याहूनही मोठे एक कारण आहे. मीपणाचा भ्रम नाहीसा करणे याचाच दुसरा अर्थ विश्वव्यापक ‘मी’ ला ओळखणे. ‘मी’ ही स्फूर्ती, हे स्पंदन या विश्वाच्या अस्तित्वाच्या मुळाशी आहे. ते अनुभवता येते. या व्यापक ‘मी’ला एखाद्या रेणूंच्या ढिगापुरते मर्यादित समजणे हा भ्रम आहे. हा भ्रम दूर झाला की मी व्यापक होतो. या मोठ्या मीपणाचा क्षणकाल जरी अनुभव आला तरी तो माणसाचा दृष्टिकोन बदलू शकतो. मग डोंगरावरून पाहणाऱ्याला हत्ती आणि गाढवामधला फरक जसा अगदी छोटा वाटतो तसा आयुष्यातल्या अनुकूल-प्रतिकूल, सुखाच्या दुःखाच्या घटनांमधला फरक अगदी नगण्य होऊन जातो. स्थितप्रज्ञता म्हणजे आणखी वेगळे ते काय?

स्थितप्रज्ञ म्हणजे भावनाशून्य नव्हे, तर भावनांच्या वादळांनीसुद्धा उन्मळून, उखडून न जाणारा. छोट्याशा डबक्यात एखादा दगड पडला की ते अख्खेच डहूळते. मोठ्या सरोवरात तेवढ्याच आकाराचा दगड तितक्याच वेगाने पडला तर तितक्याच लहरी उठतात. पण त्या सरोवराच्या तुलनेत त्या लहरी नगण्य असतात. जो माणूस स्वतःच्याच भावनांमध्ये गटांगळ्या खातो त्याला दुसऱ्याच्या भावना समजून घेणे फार कठीण आहे. चांगल्या भूकंपमापक यंत्राचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्याची स्वतःची कंपने अत्यल्प असली पाहिजेत. स्वतःची सुखदुःखे अत्यल्प असलेली व्यक्तीच दुसऱ्याची सुखदुःखे जाणून घेऊ शकते, आणि ‘जे का रंजले गांजले…’ हे तेव्हाच होऊ शकते. संतलक्षणे इथे पूर्ण होतात. ईश्वरभक्ती हे संतलक्षणातले माझ्या मते अत्यंत गौण आणि अनावश्यक लक्षण आहे. ईश्वरभक्तीने संत होता येते यात शंका घेण्यासारखे काही नाही. आपल्या डोळ्यांसमोर ज्ञानोबा-तुकोबा आहेतच. पण भक्तीपेक्षा नास्तिकतेचा मार्ग अधिक जवळचा आहे असे मला वाटते. आजवर बंद असलेला हा मार्ग विज्ञानाने खुला केला आहे. त्यावर ज्याची इच्छा असेल त्याने चालावे.

नास्तिकसाधना सोपी आहे असे नुसते म्हणून मला थांबता येणार नाही. त्या साधनेची तत्त्वे, दिशा, मार्ग यांचे बारकावेसुद्धा सांगितले पाहिजेत. नास्तिकसाधनेचे सगळे तत्त्वज्ञान यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये सांगून झालेले आहे. ते तर्कशुद्ध आहे. त्यामुळे ते पटायला कठीण नाही. पण पटले तरी आपले मन ते सहजासहजी मानत नाही. कळण्या आणि वळण्यामध्ये खूप अंतर असते. ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे साधना. एखादी तान कशी यायला पाहिजे ते समजलेले असते. पण गळ्यातून ती निघत नसते. ती निघेपर्यंत घेत राहणे म्हणजे साधना. तसे रेणूंच्या एका ढिगातला ‘मी’ मानणे हा भ्रम आहे, मी हे शरीर नाही, जीव नाही, आत्मा नाही, मी विश्वव्यापक आणि निर्विकल्प आहे, असे काही आपल्या मनाकडून सहजासहजी वळत नाही. कारण सत्य शोधण्यासाठी काही मानवी मनाची उत्क्रांती झालेली नाही. ‘मी’चे खरे स्वरूप मनावर ठसवावे लागते, बिंबवावे लागते. त्यासाठी जे करावे लागेल ती साधना.

या साधनेचे मला भावलेले स्वरूप मी येथे मांडत आहे. नास्तिकसाधनेत पारंपारिक साधनेची काही अंगे जवळजवळ जशीच्या तशी स्वीकारण्यासारखी आहेत. काही थोडेफार बदल करून घेण्यासारखे आहेत आणि काही अगदी वेगळी आहेत.

नास्तिक साधनेला सर्वप्रथम हवी ती शोधकता आणि तर्कशुद्धता. हे विज्ञानाला लागणारे मूलभूत गुण आहेत व नास्तिकसाधना विज्ञानावर आधारित असल्यामुळे याच गुणांच्या जोपासनेतून साधनेची सुरुवात व्हायला हवी. शोध घेत राहणारे, न उलगडलेली कोडी उलगडण्याची इच्छा बाळगणारे मन विज्ञानालाही लागते आणि नास्तिकसाधनेलाही. पुढे मात्र नास्तिकसाधना विज्ञानाला ओलांडून जाते. त्यामुळे नास्तिकसाधनेचे सारे गुण वैज्ञानिकामध्ये असले पाहिजेत असे नाही. मात्र वैज्ञानिकाचे सगळे गुण नास्तिकसाधकाला आवश्यक आहेत. विज्ञान ही नास्तिकसाधनेची सुरुवात आहे. सगळ्या माणसांमध्ये जिज्ञासा सारखीच असते असे नाही. त्यात कमीअधिक असतेच. पण आपण आपली जिज्ञासा आणि विज्ञानाला लागणारे इतरही गुण बहुधा कायम मारत आलेलो असतो. ते मारण्याऐवजी जोपासण्याचा प्रयत्न करणे हे नास्तिकसाधनेचे पहिले सूत्र. पारंपारिक साधनेत विज्ञानाच्या गुणांची तशी गरज नाही. उलट अनेकदा फार प्रश्न विचारणे, पारंपरिक साधनेत योग्य मानले जात नाही.

नास्तिकसाधनेचे दुसरे सूत्र आहे वैराग्य. येथे आपण विज्ञान सोडून पुढे जातो. हे विज्ञानाला वैराग्य हवेच असे काही नाही. साधनेला मात्र त्याची फार आवश्यकता आहे. दोन्ही प्रकारच्या साधनांना. याचे कारण मन जर कायम अतृप्त राहिले, तहानलेले, वखवखलेले राहिले तर ते इतर कुठली गोष्ट नीट ग्रहण करू शकत नाही. मनाच्या ग्रहणशक्तीवरच तर सगळी साधना अवलंबून असते. या ग्रहणशक्तीच्या आड येणाऱ्या तृष्णा दूर करणे म्हणजे वैराग्य. कपडे फाडून हिमालयात जाणे, संन्यास घेणे, भगवी – पांढरी अथवा इतर काही वस्त्रे वापरणे, उपवास करणे, स्त्रीचे तोंड न पाहणे अशा गोष्टींचा वैराग्याशी काही संबंध नाही. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक न करता आपल्या मनाचा स्वभाव आणि कल ओळखून त्याच्या सगळ्या तृष्णा मोठ्या युक्तीने शमवत जाणे ही सर्वांत चांगली वैराग्यसाधना आहे. हे नक्की कसे करायचे याचा काही सरधोपट मार्ग काढत जावे लागते. माझ्या बाबतीत अनेकदा असे झाले आहे की ज्या गोष्टींची तहान अगदी तीव्र होती आणि अनेक वर्षे होती, त्या गोष्टी एकदाच मिळाल्यावर ती संपून गेली. हीच गोष्ट परत परत मिळावी असा हव्यास मनानेच धरला नाही. पण प्रत्येकाचे प्रत्येक बाबतीत असेच होईल असे नाही. कधीकधी एखादी तहान दडपून टाकावी लागते तर कधी आपोआपच शांत होते. पण दडपता किंवा शमवता येत नसेल तर पुढचा सर्वांत उत्तम उपाय म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करायचे. याने काम झाले नाही असे सहसा होत नाही.

मुळात वैराग्यात खूप मोठे सुख आहे. तहान ही दुःखाची भावना आहे. त्यामुळे तहान नसणे हे त्याच्या विरुद्ध असेल हे समजायला फार मोठ्या तर्कशास्त्राची गरज नाही. पण वैराग्य ओढूनताणून आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा बागुलबुवा उभा केला तर ते कष्टप्रद होते. पण आपण आपली एकएक तहान विझवत, भागवत, दूर लोटत अथवा मागे सारत जाऊ लागलो की त्यातल्या सुखाची चव लागायला लागते. बिन तहानेची तृप्ती व्हायला लागली की मग मन तहानेला थाराच देईनासे होते. याचा अर्थ मनात काही इच्छाच निर्माण होत नाहीत असा नाही. पण इच्छा सहजपणे ये जा करतात. इच्छेची तृष्णा होऊन छळत राहत नाही. स्वप्ने पाहिली जातात, ती पूर्ण करण्याची धडपडही केली जाते पण या सगळ्याच गोष्टी श्वास घ्यावा आणि सोडाव्या इतक्या सहजपणे होतात. असे झाले म्हणजे वैराग्य कायमचे स्थिरावले.

विज्ञानबुद्धी आणि वैराग्य ही साधनेची दोन अंगे पूर्णवेळ अभ्यासण्याची आहेत. दिवसातून तास अर्धा तास करण्याचा हा अभ्यास नाही. तसा वेळेचा तुकडा पाडून काही होण्यासारखेही नाही. या गोष्टींचा पाठपुरावा जागेपणी अखंडच करायला पाहिजे.

पण दिवसाकाठी तास अर्धा तास करण्याचीही एक साधना आहे. साधनेचे हे अत्यावश्यक अंग म्हणजे ध्यान. नास्तिकसाधनेतली ध्यानपद्धती अगदी सरळ आणि सोपी आहे. जागेपणी मन पूर्णपणे निस्तरंग झाले असताना जे ‘मी’चे नैसर्गिक स्फुरण राहते ते शोधणे आणि अनुभवणे हे त्याचे उद्दिष्ट. यातले मन निस्तरंग होणे हाच अवघड भाग. पुढच्या गोष्टी आपोआप होतात. आपण साधे नुसते डोळे मिटून बसलो तर मनात नाना गोष्टी एकसारख्या उठत राहतात. मन निस्तरंग कसे होणार?

यासाठी श्वासाची मदत घ्यायची. श्वास शांत केला की मन शांत व्हायला मदत होते. मनातल्या तृष्णा मिटलेल्या असल्या की ते शांत होणे आणखी सोपे असते, श्वास हे मन एकाग्र करण्यासाठीही चांगले स्थान आहे. तेव्हा ध्यानातली पहिली पायरी म्हणजे एकाग्रतापूर्वक श्वास संथ आणि शांत करायचा. तो मिनिटाला अमुक इतक्यापर्यंत कमी झाला पाहिजे वगैरे काहीही नियम नाहीत. अमुक प्रकारचा प्राणायाम केला पाहिजे असे काही बंधन नाही. मन शांत करण्याचे साधन म्हणून श्वासाचा वापर करायचा इतकेच. यात एक छोटीशी युक्ती वापरता येते. श्वासावर मन केंद्रित करायचे तर ते राहत नाही. पुन्हा पुन्हा भरकटते. श्वास आपला चालूच राहतो. मन पुन्हा भलतीकडे. हे टाळण्यासाठी एक छोटीशी गोष्ट उपयोगी पडते. निसर्गतः श्वासाचे चक्र श्वास, उच्छ्वास, लय असे चालते. श्वास सोडल्यानंतर आपण काही क्षण थांबतो आणि मग पुढचा श्वास घेतो. या चक्रात थोडा बदल करून श्वास घेतल्यावर एक दोन क्षण थांबून मग तो सोडायचा. ही क्रिया नैसर्गिक क्रियेपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे ती लक्षपूर्वकच करणे भाग पडते. त्यामुळे मन श्वासावर एकाग्र होणे थोडे सोपे जाते. मन बऱ्यापैकी शांत होण्याइतका श्वासाचा वापर करून घेतला की पुढे श्वासाची संगत सोडायची आणि मग मनात उठणाऱ्या तरंगांकडे नुसते पहात राहायचे. हे पाहणारा कुणी आत्माबित्मा नसतो. मनच मनाकडे पाहत असते. मन जर पुरेसे शांत असेल तर त्यात उठणाऱ्या विचारांमध्ये मध्येच क्षणकाळाची ‘गॅप’ सापडू लागते. या गॅपकडे लक्ष देत राहिले की हळूहळू सवयीने ती गॅप जास्त वेळा येऊ लागते आणि किंचित् जास्त वेळ टिकूही लागते. असे करता करता कालांतराने म्हणजे बहुधा काही वर्षांनी सलग काही क्षणांसाठी तरी निस्तरंग अवस्था मिळू शकते. तेथे मन झोपलेले नसते. जागे असते. जाणिवेत असते. पण ज्याची जाणीव ठेवावी असे काहीच नसते.

अशा वेळीच फक्त ‘मी’ हा स्पंद अनुभवाला येऊ शकतो. हा स्पंद अथवा ही ज्ञप्ति कशाच्याही सापेक्ष नसते. या ‘मी’ ला नाव नसते, शरीर नसते, identity नसते, स्थान नसते आणि काळही नसतो. ही काही ध्यानामध्ये अथवा ध्यानामुळे निर्माण झालेली स्थिती नाही. तो ‘मी’ तिथे होताच. फक्त पाणी निवळल्यावरच तळ दिसतो तसे सगळे तरंग निवळल्यावरच त्याचा अनुभव आला. असा त्याचा अर्थ. हा अनुभव मग अनेकदा यायला लागून हळूहळू दृढ होतो. हे काही ईश्वरदर्शनासारखे नाही की बारा वर्षे तप केल्यावर ईश्वराने एकदा दर्शन दिले की तपश्चर्येची पूर्ती झाली. पुढे रोजच किंवा कधीही डोळे मिटले असता मन नितळ होऊन हा अनुभव घेता येतो. आणि हा शेवट नाही तर ही सुरुवात असते.

अर्थात ध्यानाची सगळी प्रक्रिया पाच मिनिटांत सांगून झाली तरी प्रत्यक्षात एवढे व्हायला काही वर्षे सहज लागतात, कुणाला कमी कुणाला अधिक. ध्यानाला कुठे बसावे, कधी बसावे, कसे बसावे, कुठल्या आसनात, यासारख्या गोष्टींना फार महत्त्व नाही. सोयीचे आणि सुखाचे होईल तसे करावे. अर्ध्या तासापासून ते दीडतासापर्यंत एक बैठक असावी. अगदीच थोडा वेळ बसून फार काही साधत नाही. मन स्थिरस्थावर करण्यातच वेळ संपून जाते. याउलट एकदम दोन चार तास बसून तेवढ्या पटींनी जास्त फायदा होत नाही.

क्षणकाल निस्तरंगतेचा अनुभव यायला लागल्यानंतर साधनेची स्वर्वांत महत्त्वाची पायरी सुरू होते. ती म्हणजे या अनुभवाचे interpretation, आणि ते आपल्या रोजच्या व्यवहारात मुरवणे. सांप्रदायिक भाषेत याला ‘अनुसंधान’ म्हणतात. आपले रोजचे व्यवहार नेहमीसारखेच करत असताना अधूनमधून क्षणभर त्या व्यवहारांच्या पलीकडे पाहावे. कुणाशी भांडणाचा प्रसंग आला तर योग्य तितके भांडावे, पण माझ्याशी भांडणाराही ‘मी’च आहे याची आठवण ठेवावी. सन्मानाचे, अभिमानाचे प्रसंग आले तर ‘मी’ हा भ्रम आहे हे समजून असावे. तीव्र दुःखाचे प्रसंग आले तर डोंगरावरून हत्तीकडे पाहिल्यासारखे त्याच्याकडे पाहावे. आणि नुसताच relaxed असा मोकळा वेळ मिळाला तर ध्यानकाळात आलेला निखळ निर्विकल्प अस्तित्वाचा अनुभव आठवावा आणि उघड्या डोळ्यांनीच त्यात शिरण्याचा प्रयत्न करावा. उघड्या डोळ्यांनी ध्यान करणे पुढे पुढे शक्य होते. निर्विकल्पाचा अनुभव हळूहळू मुरू लागलेला असताना ते शक्य होते. एखादे जंगल, पर्वत, सरोवर, समुद्रकाठ अशा ठिकाणी ध्यानस्थ बसावे आणि तो अनुभव ताजा असतानाच डोळे उघडावेत. अशावेळी ध्यानात सापडलेले ‘मी’चे स्वरूप डोळे उघडल्यानंतर सगळीकडे जाणवू लागते. मी, मन आणि मनाला ग्रहण होणारे समोरचे दृश्य या भिन्नवस्तू राहत नाहीत. नीरव जागी आणि ध्यानाचा अनुभव ताजा असताना हे सहजपणे होते. पण पुढेपुढे हाच अनुभव ट्रॅफिक जॅममध्येही येऊ शकतो.

नास्तिकसाधना पूर्ण कधी होते याचे उत्तर ‘कधीच नाही’ असे आहे. याच्यामध्ये साक्षात्कार, पूर्ण ज्ञान, सिद्धी यासारख्या कुठल्याच कल्पना नाहीत. अमुक एक अवस्था प्राप्त करण्यासाठी ही साधना नाही. यातून कुणी सिद्ध, योगी, ज्ञानी पुरुष, कुणी सद्गुरु वगैरे निर्माण व्हावा असा त्यातला उद्देशही नाही. साधना पूर्ण होण्याची संकल्पनाच नसल्यामुळे ती अपूर्ण राहिली तर काय, असाही प्रश्न नाही. साधना पहिल्यापासूनच सुखाची आणि सुख देणारी आहे. ती उत्तरोत्तर अधिकाधिक सुख देत राहते आणि त्याला काही वरची मर्यादा नाही. नास्तिकसाधना हे सुख मिळवण्यासाठी करावी किंवा सत्याच्या शोधाच्या ओढीनी करावी. ती केल्यामुळे कुणाचा ‘उद्धार’ वगैरे होत नसतो. मुळात सगळे जीव भवसागरात गटांगळ्या खात असतात अशी काही कल्पना नसल्यामुळे कुणी कृपावंत सद्गुरूंनी बुडत्यांना वर काढण्याची आवश्यकता नाही. मुळात कुणी बद्ध नाही तर मुक्त व्हायचे कशापासून?

नास्तिकसाधनेमागे दोनच प्रेरणा असू शकतात. एक म्हणजे जिज्ञासा. मी म्हणजे काय, माझा आणि विश्वाचा संबंध काय, जाणीव म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे काय यासारख्या प्रश्नांचा शोध आणि दुसरी म्हणजे सुखाने जगण्याची इच्छा, ज्ञान आणि वैराग्यातल्या सुखाची इच्छा. या दोन्ही प्रेरणा किंवा दोन्हीपैकी एक प्रेरणा प्रत्येकात असतेच असे नाही. खरे तर बहुसंख्यांमध्ये नसतेच. त्यामुळे लोकांनी याच मार्गाने चालावे, हाच उद्धाराचा एकमेव मार्ग आहे असा आग्रह धरण्याचा, आपल्या संप्रदायाचा प्रसार व्हावा म्हणून मुद्दाम काही प्रयत्न करण्याचा अट्टाहास करण्याचे कारण नाही. [मिलिंद वाटव्यांच्या एका अप्रकाशित हस्तलिखित पुस्तकातले हे एक प्रकरण आहे. विज्ञान विशेषांकातील (जाने.-फेब्रु. 2004) ‘आत्मा हवा का?’, हा लेखही एक प्रकरण होते. – सं.] 10 प्रणव सोसायटी, फाटक बाग, 1000/6 क, नवी पेठ, पुणे – 411 030

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.