पत्रव्यवहार

डॉ. निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 (10-03-2004) पृ. 489 वरील परिच्छेद 3 मधील आध्यात्मिकांच्या दाव्यातील एक भाग “…आत्माच… भौतिक गोष्टींचे नियंत्रण करतो….” सिद्ध झालेला नाही. तर्काला किंवा मानवी संवेदनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाणविणारी वस्तू अशी भौतिक वस्तूची व्याख्या आहे. म्हणूनच, भौतिक उपकरणांना न जाणवणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व आत्म्याच्या व्याख्येमुळे कधीही मान्य केले जाणार नाही. त्यासाठी प्रयोगाचीही गरज नाही. चांगल्या वैज्ञानिक कल्पनेचे (hypothesis) दोन अत्यावश्यक गुणधर्म असे की तिच्यामध्ये किमान घटक (factor) असतात आणि तिला तपासणारा प्रयोग त्या कल्पनेमध्येच सुचविलेला असतो. आत्मा या घटकाशिवाय सर्व सिद्धान्त चालत असताना एक नवा (खरे तर सर्वांत जुना) घटक कशाला? ‘भौतिक गोष्टींमध्ये बदल घडविणे’ याचाच अर्थ ‘भौतिक गोष्टींना जाणविणे’ असा असल्यामुळे वरील दावा तर्काच्या पलीकडे आहे. प्रयोगाशिवाय त्याला खरे मानू नये. ठकार यांनी पुरोगामी भासणारे प्रश्न विचारून प्रतिगामी उत्तरे सुचविली आहेत. याला devil’s advocate म्हणतात. गृहीतकाला सिद्ध करणारे प्रयोग पुरस्कर्त्याने करायचे असतात.

परिच्छेद 4 : सिद्धांताच्या वरील व्याख्येत आत्मा सिद्धांत बसत नाही. आत्मा शोधण्यासाठीचा शक्य कोटीतील भौतिक प्रयोग सुचविला गेलेला नाही. भौतिक नसलेल्याविषयी आम्हाला बोलायचेच नाही. पत्रात अनेकदा ‘absence of evidence is not evidence of absence’ या अर्थाचा युक्तिवाद आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी उदाहरण दिले जाते की एखाद्याने हजार घरांमध्ये चोरी केली नाही असे सिद्ध झाले तरी तो त्याने इतर कोठेही चोरी केली नाही याचा पुरावा ठरत नाही. या सुप्रसिद्ध युक्तिवादाचे अंशतः खंडन करण्यासाठी वैज्ञानिक सिद्धान्तांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करावे लागेल. विशिष्ट (specific) सिद्धान्तः उदा. ‘हा एक निळा कुत्रा आहे.’ आणि सर्वसमावेशक (comprehensive) सिद्धान्तः उदा. ‘जगात कुठेतरी किमान एक कुत्रा निळा आहे.’ विशिष्ट सिद्धांत खरे-खोटे ठरविता येतात तर सर्वसमावेशक सिद्धान्त फक्त खरे ठरविता येतात. ते खोटे ठरविता येत नसल्याने विरोधकांवर जबाबदारी नसते. विरोधकांचे मत मानावे लागते. ‘absence’ हा युक्तिवाद पहिल्या प्रकारासाठीच वैध आहे. ‘याने येथे चोरी केली आहे’ हा पहिल्या प्रकारचा सिद्धांत आहे. ‘याने कोठेतरी चोरी केली आहे’. ‘शरीरात कोठेतरी आत्मा असतो’ किंवा ‘जगात कोठेतरी देव आहे’ हे दुसऱ्या प्रकारचे सिद्धान्त असल्याने खरे ठरेपर्यंत ते खोटे असतात.

(27-03-2004) आध्यात्मिक फसवणूक हा सर्वच धर्माचा अविभाज्य भाग असल्याचे ‘आपण’ सारे मानतो. उदा. पुरोहिताने पूजा करून “तुला पुण्य मिळेल.” असे सांगणे ही फसवणूक आहे. असे असताना, “स्वर्गात जाण्यासाठी धर्मांतर करा,” ही काही वेगळी फसवणूक ठरत नाही. एका लबाड माणसाचे सावज दुसऱ्याने पळविणे समाजाविरुद्ध गुन्हा नाही. केवळ चोरावर मोर आहे. पहिल्या गुन्हेगाराला शिक्षा होण्याआधी दुसऱ्याला शिक्षा देणे अयोग्य आहे.

पैसे किंवा इतर भौतिक वस्तू देऊन धर्मांतर करविण्यास मान्यता मिळावी. या मागणीच्या समर्थनार्थ माझा युक्तिवाद असा आहे. एखादा माणूस भूकबळीने मरत असताना जेवण देण्याच्या अटीवर एखाद्याने धर्मांतर करविले आणि जेवणही दिले तर पहिल्या धर्माच्या अनुयायांनी याला आक्षेप घेणे अयोग्य आहे. “तुमचा धर्मबांधव मरताना जर तुम्ही काळजी केली नाहीत तर त्याचा धर्म बदलला जात असताना सुद्धा आक्षेप घेऊ नका.” असे त्यांना सांगितले पाहिजे. धर्माची जाहिरात आणि विक्री झाली तर काय अडचण आहे? Tradable commodity बनविल्याने धर्माचे खच्चीकरण होईल. गरीब लोक सतत धर्मांतर करून पैसे मिळवू शकतील. यामुळे धर्मांतर करविण्यातला उत्साहच संपेल.

स्वतःची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी, कागदोपत्रीतरी सरकारला नको असलेल्या (पहा घटना 51 Ah) वस्तूचा वापर करण्याला सरकारने आक्षेप घेतला तर याचा अर्थ होतो की सरकारला घटना अडगळीत टाकायची आहे. भूकबळी टाळण्याची किमान जबाबदारीही न पेलू शकणाऱ्या सरकारने वाटेल ती किंमत देऊन लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. धर्मांतर करणारे शिक्षणाचा खर्च उचलतात, स्वयंरोजगाराचे मार्ग शोधून देतात. ही सारी कल्याणकारी सरकारची कामे आहेत. शिक्षणशुल्कावरील मर्यादा उठविणाऱ्या सरकारने किमान NGO ना लोककल्याण करण्यास अनुमती द्यावी. घटनेच्या निर्बंधाप्रमाणे धर्म ही निरुपद्रवी, निरुपयोगी बाब आहे. स्वस्त असली तरी ‘किंमत’ म्हणून ती गमावणे हे तेंडुलकरांच्या परोपकाराच्या व्याख्येत बसते. खुल्या अर्थव्यवस्थेत उद्योगांची वाट लागते या निरीक्षणाचा धर्मोद्योगाविरुद्ध लाभ घेतला पाहिजे.

‘आजचा केसरी’ या नावाला माझा आक्षेप आहे कारण टिळक प्रतिगामी होते. चंद्रकांत या. मुळे, एन/304, गोकुळ गार्डन, ठाकुर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू.), मुंबई – 400101

आपल्या लिखाणात अभिनिवेश दिसून येतो तो आपल्या विचारशीलतेला कमीपणा आणणारा आहे. अभिनिवेशामुळे विचार गढूळ होतो. भाषेची पातळी खाली येते. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोण अभिनिवेशपूर्ण म्हणून उथळ आहे. वास्तविक, नरेंद्र मोदी, आपण दोघेही किंवा आपण सर्व यांच्या कृति, परिस्थितीचा परिपाक असतात. परंतु ही गोष्ट विचारात न घेता आपण व इतर काही नरेंद्र मोदींना गुजरातमधील दंगलीबद्दल दोषी ठरविण्यात एकांगी विचार व उतावळेपणा करीत आहात.

गीतरामायणांतील ‘दैवजात दुःखें भरता दोष ना कुणाचा’ हे गीत माडगूळकरांना महाकवि व फडक्यांना श्रेष्ठ गायक ठरवून गेले. भरताला व भारताला (तुम्हाला-आम्हाला) खूप शहाणपण शिकवून गेले. भरत आईला ‘माता न तू, वैरिणी’ असे सणसणीत शब्द सुनावून आला होता. त्याला रामचंद्रांनी ‘माय कैकेयी ना दोषी। नाहि दोषि तात… पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ।’ या शब्दांनी समजाविले. त्यातून मर्यादापुरुषोत्तमाच्या शहाणपणाची व भरताच्या बंधुप्रेमाची श्रेष्ठ कथा निर्माण झाली! लोकांच्या हृदयाला भिडली.

आपण अहमदाबादमधल्या माणसांच्या हत्यांमुळे हादरलेले दिसता. अर्जुनालाही स्वजनांच्या हत्येच्या नुसत्या कल्पनेने (पाहून नव्हे!) कापरे भरले होते (‘वेपथुश्च शरीरे मे’) अर्जुनाने हत्येविरुद्ध बिनतोड वाटणारा युक्तिवाद केला. श्रीकृष्णांनी त्याचा प्रतिवाद तर केलाच शिवाय आपले विश्वरूपदर्शन घडवून, हा विश्वाचा कारभार किती विराट व रौद्र स्वरूपात चालतो ते दाखवून दिले आणि तू काही केले नाहीस तरी हे सर्व मरणार असे अर्जुनास सांगितले तेव्हा अर्जुनाची घाबरगुंडी उडाली तशी गुजराथेतील उद्रेक पाहून अनेकांची उडाली पण विश्वरूपदर्शन घडवून समजावयाला भगवान श्रीकृष्ण नाहीत. मात्र गीता आहे परंतु हल्ली भगवद्गीतेशी संपर्क असलेले विरळा.

पण 1946 ते 1947 या एक वर्षात पाकिस्तानसाठी झालेल्या ‘डायरेक्ट अॅक्शन’मध्ये लाखो माणसे मारली गेल्याचे वृत्त आमच्या पिढीने प्रत्यक्ष वाचले. नंतरच्यांनी ‘गांधी’ चित्रपटात त्याची दृश्ये पाहिली; Freedom at Midnight पुस्तकात त्याची वर्णने वाचली. हिंसा करणारा कळला नाही. थांबवणारा मिळाला नाही. एकाने, मातृभूमीचे तुकडे करण्यापूर्वी त्याच्या देहाचे तुकडे होतील असे आश्वासन दिले होते पण ते खरे ठरले नाही. ‘मी 125वर्षे जगणार’ हे म्हणणेही खरे झाले नाही. याला काय म्हणणार? ‘एखाद्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले’ असे म्हणणे हे भोंगळ विधान. वास्तविक लोक नेत्याच्या शोधात असतात व काही व्यक्तींकडे विशेष गुण असतात त्यांना पाठिंबा हवा असतो. म्हणजे चणे आहेत तेथे दात नाहीत, दात आहेत तिथे चणे नाहीत अशी परिस्थिती असते. दोघांचा मेळ हा योग.

‘1977 साली फलाण्या व्यक्तीने जनता पार्टी संघटित केली’ हेही विधान ढिसाळच. पार्टी संघटित करणे ज्याला खरोखरी जमले त्याला पार्टीचे विघटन थांबविता आले असते. पहिले ‘जमले’ दुसरे जमले नाही. ‘जमले’ हाच योग्य शब्द आहे. जेव्हा काही गोष्टी जमून येतात तेव्हा एखादी घटना घडते. जसे हवेतील कमीजास्त दाबामुळे चक्रीवादळ, जबरदस्त पर्जन्यवृष्टी होते. ते वादळ किंवा पर्जन्यवृष्टी कुणी घडवून आणलेली नसते. राज्यात जागोजाग जो उद्रेक झाला तो ‘एका व्यक्तीने घडवून आणला’ असे म्हणण्यात त्या एका व्यक्तीच्या प्रेरणेने हालणारे इतके लोक सर्वत्र होते असा अर्थ आहे व त्या व्यक्तीचा मोठा प्रभाव कबूल करणे आहे व लोक कुणी भडकविले की भडकण्याइतके बुद्धिहीन होते असे म्हणणे आहे. आपला प्रभाव आपल्या आजूबाजूंच्या लोकांवर किती पडतो ते प्रत्येकाने तपासून पहावे म्हणजे ती व्यक्ती प्रभावी आहे व लोक बुद्धिहीन आहेत ही दोन्ही प्रमेये चुकीची आहेत हे लक्षात येईल तसेच परिस्थिती त्या घटनेला अनुकूल होती-कारण होती हेही लक्षात येईल. फाळणीच्या वेळचा हिंसाचार जिनांनी केला किंवा महात्माजींनी केला असे कुणी म्हटले नाही. मग अहमदाबादच्या हिंसाचाराला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असे कसे म्हणता येईल?

मोदींना नामोहरम करण्याचा पराकोटीचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी, त्यांच्या विरोधकांनी केला होता. तरीही लोकांनी मोदींना मते दिली इतकेच नव्हे तर त्यांच्या पक्षाला विधान- सभेत बहुमत मिळवून दिले हा त्यांच्या धोरणाचा आणि संघटनकुशलतेचा प्रचण्ड विजय आहे. दंगलीत कुठे लोकक्षोभ अनावर झाला असेल व सुक्याबरोबर ओलेही जळले. विजय तेंडुलकरांसारखे लेखणीबहाद्दर या वयात नरेंद्र मोदीला गोळ्या घालण्याची भाषा करण्याइतके संतापले तेथे सामान्य जनांची काय कथा! त्याचा दोष लोकशाही पद्धतीने, प्रचण्ड पाठिंब्याने निवडून आलेल्या व्यक्तीला देणे, अद्वातद्वा बोलणे, हुकूमशाही वृत्तीचा ठरविण्याचा प्रयत्न करणे हे पराभूत मनोवृत्तीचे लक्षण आहे. कै. प्रा. ना. सी. फडके यांचे तर्कशास्त्रावरचे एक पुस्तक आहे. त्यात एक विधान आहे – Democracy is sure to end in despotism. त्याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे : लोकशाहीत पक्ष असतात. पक्षांचे पुढारी लोकप्रिय असतात. सर्वांत मोठ्या पक्षाचा पुढारी सर्वांत जास्त लोकप्रिय असतो सत्ता त्याच्या हाती एकवटते. तो हुकूमशहा होतो.

इंदिरा गांधींचे असेच झाले, राजीव गांधीचे जवळजवळ तसेच झाले. दोघेही मारली गेली. ती दोघे लोकशाहीची निष्पत्ती होती! जे लोकप्रिय नव्हते ते पाचोळ्यासारखे उडून गेले. उदाहरणार्थ – गुजराल, वि. प्र. सिंग, देवेगौडा, चरणसिंग. वाजपेयी टिकले आहेत तेही परिस्थितिवशात्! मोदी याचे दहा वर्षांपूवींचे गुण निर्विवाद दुर्गुण म्हणता येण्याजोगे नाहीत. ‘सेल्फ डिनायल’ हा दुर्मिळ गुण आहे. कुणी तसे म्हटल्याने तो दुर्गुण ठरत नाही कारण भर्तृहरीने फार पूर्वीच अत्यंत मार्मिकपणे म्हटले आहे- ‘तत्को नाम गुणो भवेत्सुगुणिनां यो दुर्जनैनाङ्कितः। सज्जनाच्या कोणत्या गुणाला दुर्जनांनी नाव ठेवले नाही?

तेव्हा नरेंद्र मोदीविरुद्धची आपली हाकाटी आपणास कमीपणा आणणारी आहे. मुळात सुधारकी बाणा हाच अहंकार आहे. जुन्या सुधारकांची जिवंतपणी प्रेतयात्रा निघाली. ‘एका अनुभवी पत्रकाराने, दिसायला दिलखुलासपणे, बहुतेक अनवधानाने, काहीशा अनिच्छेनेच लिहिले होते की बाबरी मशीद पाडली गेली याचे दुःख झालेली हिंदु व्यक्ति शोधावीच लागेल!’ आता मशिदीखाली देऊळ होते हे उघड झाल्यावर तर शोधूनही सापडणार नाही.

शहाबानू केसमधील निर्णय कशा प्रकारे झाला? न्यायमूर्तींनाही आपल्या भवितव्याचा विचार असतोच, मुंबई बार कौन्सिलने जज्शी नाते असलेल्या वकिलांना त्या कोर्टात वकिली करण्यास बंदी केली. याचा अर्थ काय? सर्व काही राहू द्या, हिंदू-मुसलमान संबंध सलोख्याचे राहण्यासाठी काय करावे याची काही योजना तुमच्याकडे असल्यास ती प्रसिद्ध करा आणि निवडणुकीला उभे राहा. ते खरे सुधारणेचे कार्य ठरेल. तुमच्यासारखे लोक असतील तर मोदींना कोण मत देतो हो!

[चंद्रकांत या. मुळे यांस आपले 23/03/04 ला लिहिलेले पत्र पावले; आणि ते वाचून वाईट वाटले. इतका जुना मुद्दा घेऊन आपण आम्हा सुधारकांवर अभिनिवेशाचा जो आरोप केला तो काही बाबतीत खरा आहे; पण त्यातून कोणीच मुक्त नाही, आपण सुद्धा. आपल्या मनातल्या हिंदुत्वाभिनिवेशामुळे आपलाही विचार गढूळ झाला आहे असे मी नम्रपणे आपल्या ध्यानात आणून देऊ इच्छितो. मुळात आम्ही तरी गुजरातमधील दंगलीबद्दल नरेंद्र मोदींना दोषी ठरवत नाही. आम्ही नरेंद्र मोदींना दंगलींना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याचप्रमाणे अॅड. चंद्रकांत मुळे यांना दंगलीचे समर्थन करण्याबद्दल दोषी ठरवतो; आणि हे आपल्या मनातील अभिनिवेशामुळे घडले हे पुन्हा आपल्या नजरेस आणू इच्छितो. दंगल करणे आणि दंगलीचे समर्थन करणे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण दोघे दंगलीचे समर्थन करणारे आहात. दंगल करणारे हिंदू मुसलमान दोन्ही होते. त्यांची कृती अंशाच्या आणि छेदाच्या ठिकाणी समान असल्यामुळे त्या कृतीचे मूल्य आता शून्य झाले आहे. दोघांचेही कृत्य तितकेच गर्हणीय आहे. ज्यांनी कुणी निरपराध प्रवाशांना जाळले त्यांचा निषेध करणे आणि त्यांना शासन करणे आवश्यकच आहे; आम्ही तो तीव्र निषेध करतो आणि ज्यांनी निरपराध्यांची हत्या केली त्याच सर्वांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करतो. ही शिक्षा देण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने करायला हवे होते; ते त्यांनी केले नाही. उलट त्यांचे शासन निरपराध्यांची हत्या करणाऱ्यांना आणि चोर सोडून संन्याशाला बळी देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या नीच पातळीवर उतरले म्हणून त्यांचा निषेध आणि त्यांच्या या अधमपणाचे समर्थन केल्याबद्दल आपला निषेध करण्याचे कटू कर्तव्य मला आज करावे लागत आहे; आणि ते करताना मी अत्यंत दुःखी झालो आहे.

नरेंद्र मोदींच्या, किंवा आपणा सर्वांच्या कृती परिस्थितीचा परिपाक म्हणून घडतात असे आपले विधान तर आश्चर्यकारक आहे. झालेल्या परिस्थितीबद्दल नरेंद्र मोदींना दोषी ठरवू नये असे आपण म्हणता आणि त्याच किंवा तशाच परिस्थितीचा परिपाक असलेल्या गोधरा येथे आगगाडीचा डबा जाळणाऱ्या लोकांना त्यांच्या कृतीबद्दल दोषी ठरविता यामागचे आपले तर्कशास्त्र माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे. एवढेच नव्हे तर काही निरपराध्यांच्या मृत्यूबद्दल प्रचंड प्रमाणावर दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालता ह्याचेही मला अतिशय नवल वाटते.

गीत रामायणातील ‘पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा’ हा न्याय जर सर्वांनाच लावायचा असेल तर तो गोधरा येथे आगगाडी जाळणाऱ्यांना का लावायचा नाही ह्याचे उत्तर आपल्या पत्रातून मिळत नाही, ह्याचे कारण आपल्या मनातील अभिनिवेश सोडून दुसरे आणखी कोणते असणार!

आता पुढच्या परिच्छेदातील विश्वरूपदर्शनाकडे वळू. येथेदेखील भगवंताचे वचन मोदींच्या समर्थनार्थ आपण वापरले आहे. आपल्या ठिकाणी हिंदुत्वाभिनिवेश नसता तर गोधऱ्याला झालेल्या आगगाडीच्या जाळपोळीनंतर आपण स्वतःची समजूत “ते आगगाडीतले लोक मेलेलेच आहेत त्यांच्यावर पेट्रोल ओतणारे लोक केवळ निमित्त मात्र आहेत आणि ते क्षमेस पात्र आहेत” अशी काढली असती. आपल्यासाठी अभिनिवेशामुळे गीताविचारदेखील गढूळच झाला आहे असे म्हणावे लागते.

1946-47 दरम्यान झालेला रक्तपात हा तत्कालीन परिस्थितीचा परिपाक होता, असे आपणाला का वाटत नाही? थोडक्यात काय तर अभिनिवेशाचा दोष आमच्यापेक्षा आपल्या ठिकाणी जास्त असू शकतो. पुढे आपण ‘गुजरातमधील दंगल तत्कालीन परिस्थितीमुळे घडली; तिथले लोक इतके बुद्धिहीन नव्हते किंवा मोदी ही फार प्रभावशाली व्यक्ती आहे असे म्हणता येणार नाही,’ हा मुद्दा मांडला आहे. ह्याविषयी पहिल्या परिच्छेदात पुरेसे विवेचन करून झाले आहे.

मोदींना विधानसभेत बहुमत मिळाले हे लोकांच्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे असे खरोखरच आपणाला वाटते काय ? हा मोदींच्या धोरणाचा आणि संघटनकुशलतेचा विजय होता. हे आपले विधान वाचून तर मला आश्चर्य वाटले. कारण याच गुजराथमधल्या लोकांनी गांधींना आपले मानले आहे आणि काँग्रेसला वर्षानुवर्षे निवडून दिले आहे. काँग्रेसला निवडून देणे किंवा मोदींना निवडून देणे ही दोन्ही बुद्धिहीनतेची लक्षणे आहेत; आणि त्यांच्यामध्ये अन्य धर्मीयांबद्दल द्वेष निर्माण होऊ शकणे हेही गुजराथ्यांच्या निर्बुद्धपणाचे लक्षण आहे. आपल्या भारतातली पुष्कळ प्रजा आपल्या मतदानाचा अधिकार निर्बुद्धपणे वापरते. ह्यासाठी किती पुरावे देऊ?

लालू यादव, जयललिता, मायावती ही मंडळी स्वतः मुख्यमंत्री होतात अथवा आपल्या हस्तकांना मुख्यमंत्री करतात, तसेच नरेंद्र मोदी हेही प्रजेच्या मानसिक कमजोरीचा आणि विवेकशून्यतेचा फायदा घेतात; आणि निवडून येतात. त्याचा कसला गौरव मानायचा? एका बाजूला नरेंद्र मोदी लोकशाही पद्धतीने निवडून आले याबद्दल लोकशाहीचा गौरव करायचा आणि पुढे लोकशाही हुकूमशाहीत परिणत होते म्हणून ती त्याज्य आहे असे सुचवायचे ह्यामधली संगती मला लागत नाही. लोकप्रियता हा कोणत्याही माणसाच्या थोरवीचा निकष असू शकत नाही. बुवाबाजी करणारे सगळे लफंगे लोकप्रिय असतातच.

आपल्या पत्रात, “श्री वाजपेयी टिकले आहेत; तेही परिस्थितिवशात्” ह्या एकाच वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. मोदींच्या ठिकाणी Self denial हा दुर्मिळ गुण आहे असे आपण म्हटले आहे ते मला नीटसे कळले नाही. भर्तृहरीचे जे वचन आपण “तत्को नाम गुणो भवेत् सुगुणिनां यो दुर्जेनैनांकित: ?” उद्धृत केले आहे, ती दुधारी तलवार आहे. “सज्जनांच्या कोणत्या गुणाला दुर्जनांनी नावे ठेविली नाहीत?” हे वाक्य मोदींचे निन्दक म्हणजे आम्ही हेच कुणी सज्जन ह्या अर्थानेही घेता येते. मुळात, सुधारकी बाणा हाच अहंकार आहे हे खरे आहे. आपण आम्हा मंडळींना सुधारण्याचा हा जो प्रयास करीत आहात तो देखील आपल्या अहंकारातूनच उद्भवला आहे. “जुन्या सुधारकांची जिवंतपणी प्रेतयात्रा निघाली.” हे आम्हांला भूषणावह वाटते. तत्कालीन जड आणि सनातनी समाजाला सुधारकांनी सुचविलेल्या ‘सुधारणां’मध्ये तर्कदोष काढता न आल्यामुळे सुधारकांची टिंगल करण्यापलीकडे त्यांना दुसरे काहीच करता येण्याजोगे नव्हते; व त्यांची ती कृती म्हणजे सुधारकांचा विजयच होता. व म्हणूनच त्यामुळे सुधारकांचे बळ निःसंशय वाढले. मागे एकदा मी कर्नाटकात गेलो असता तेथील कर्मठ ब्राह्मणांनी, “मुंबई-महाराष्ट्राशी संपर्क झाल्यामुळे आमच्या येथील विधवांची स्थिती बदलली; तो संपर्क झाला नसता तर त्या तश्याच खितपत पडल्या असत्या.” अशी कबुली मजजवळ दिली. कर्नाटकात सुधारणेचे वारे महाराष्ट्रातून पोचले; व ते आगरकर-कर्वे यांच्या प्रयत्नांमुळे. आपण म्हणता की, “बाबरी मशीद पाडली गेली याचे दुःख झालेली हिंदू व्यक्ती शोधावीच लागेल! आता मशिदीखाली देऊळ होते हे उघड झाल्यावर तर शोधूनही सापडणार नाही!” ह्या आपल्या विधानाशी मात्र मी मुळीच सहमत नाही. माझ्या मते बाबरी मशीद पाडली गेली ह्याचे सर्वांत जास्त दुःख (नरसिंहरावांपेक्षा) लालकृष्ण अडवाणींना झाले. अडवाणींना मशीद पाडायची नव्हतीच, मशीद पाडतो अशी नरसिंहरावांना दहशत दाखवायची होती. मशीद पडू नये उलट केन्द्र सरकारने भाजपाचे उत्तरप्रदेशातील सरकार पाडावे अशी त्यांची इच्छा होती. पण नरसिंहरावांनी ती त्यांची इच्छा सफल होऊ दिली नाही व अडवाणींचा सर्व बनाव त्यांच्याच अंगाशी आला! अयोध्येच्या बाबरी मशिदीखाली रामाचेच मंदिर होते हे सिद्ध झालेले नाही.

हिंदू-मुस्लिम-संबंध सलोख्याचे राहण्यासाठी आम्ही जे काही थोडेबहुत प्रयत्न करतो, ते हिंदुत्वाचा अभिनिवेश असणारे (आपणांसारखे संख्येने खूप मोठे) लोक हाणून पाडतात. अण्णा हजारे यांचाही सरकारला वळण लावण्याच्या बाबतीतला अनुभव आमच्यासारखाच आहे. – दिवाकर मोहनी]

प्रे. र. सराफ, ‘डोंबिवली, मुंबई. आपण माझ्या शंकेचे निरसन केलेत. आभारी आहे. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे गणितातील सौंदर्य काय असते ते युक्लिडच्या प्रमेयाने समजले. ह्या अंकातले सर्वच लेख सामान्य व्यक्तीला (आमच्यासारखे वाचक) डोळ्यासमोर ठेवून लिहिले आहेत. आता जाता जाता एक विनोद: ही गोष्ट सत्तर-ऐंशी वर्षापूवीची आहे. त्यावेळी न्यूक्लिअर फिजिक्स ही नवीन शाखा नुकतीच सुरू झाली होती. पॅरिसला ह्या शास्त्रज्ञांचे संमेलन भरले होते. त्याचे वृत्त देताना लंडनच्या टाइम्सचा वार्ताहराने वृत्त पाठवले – Physicists from all over the world met and discussed Nuclear Physics. पण टाइम्सच्या संपादकाला वाटले की वार्ताहराने स्पेलिंगमध्ये काहीतरी गफलत केली आहे. त्याने Nuclear च्या ऐवजी Unclear असा शब्द टाकला. [सराफ यांनी पृष्ठे 408-9 मधील चौकटीबाबत काही शंका विचारल्या होत्या-त्यांचे देशमुखांनी निरसन केले – सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.