सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे चित्र आता पार पालटले असेल नाही ?’ माझा आशावाद पाहून म्हणाले, ‘मेड इन इंडिया वाचली का ? आपल्या अकोल्याच्या पुरुषोत्तम बोरकरची ती कादंबरी वाचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’ कादंबरी मिळवली. अगदी ताजी सत्याऐंशीची. वऱ्हाडी बोलीतली विकासाची करुण कहाणी. किमती ठरवून कमिटीवरच्या जागा देणारे पुढारी, ‘उदरी अल्कोहोल अन् डोक्स रेतीत’ असे चेले, ‘गावात हजारात एखादाच सुखी, बाकीचे नऊशेनब्व्याण्णव कसं तरी पर्याय नसलेलं जिनगायीचं लोढणं गळ्यात अटकवल्यासारखे. त्यांना एकच सुख माहीत, मादीचं. ‘मंग लेकराईचं लेंढार’ ‘अशे नऊशेनव्ळ्यांणव मरेल मुर्दे गावागावात जिते हिंडतात, त ऑल इंडियात किती ?’ असा हिशोब कादंबरीचा नायक पंजाब स्वतःशी मांडत असतो.
वाटलं कादंबरीच ही. काही तथ्य काही मिथ्या यांचे मिश्रण असणार. गेल्या महिन्यात खेडेभागात जाणे झाले. अकोल्यापासून पुढे शंभरेक कि.मी. अंतरावर मराठवाड्याच्या आसपास एका आप्ताकडे. विकास योजनेतली नोकरी याच भागात सुरू केली होती. मागचे दिवस आठवत गेलो. याच गावी सहकार अधिकारी श्री. राजेसाहेब यांच्या बरोबर गेलो होतो. परवानाधारक सावकारांची दप्तरे त्यांना पहावी लागत. बकासुरी सावकारी आता कायद्याने बंद झाली होती. अव्वाच्या सव्वा व्याज आकारता येत नसे. सावकारी पाश सैल झाले, आता लौकरच कायमचे सुटतील असा तारुण्याला साजेसा समज झाला होता. ज्या आप्ताकडे गेलो ते एकदा जमीनदार होते. आता दारिद्र्य आले होते. उन्हाळ्यात मुलीचे लग्न केले. तूट भरून काढायला ५०० रु. कर्ज घेतले ते अजून फिटले नव्हते. दरमहा फक्त व्याज भरत होते. फक्त शंभर रुपये महिना ! धनको कोणी पठाण नव्हता मारवाडी नव्हता. एक अल्पभूधारक जमेल तशी मजुरी करणारा शेजारी १०० रु. वर सालिना २४० रु. व्याज घेत होता. त्याला हटकले तेव्हा म्हणाला, ‘मी त काईच नाई, गावात पुसा. शेकडा ३० न् ४० चालू हाये.’ त्याचं खोटं नव्हतं.
मागच्या आठवड्यात कांडलकरसाहेबांची भेट झाली. विकास खात्यात काही काळ आम्ही सोबती होतो. एकदम हाडाचे कृषि अधिकारी. दौऱ्यात असलो की हे नेहमी पिछाडीला. शेतातून पाय निघायचा नाही. लवकरच बी.डी.ओ. झाले. स्वतःच्या खात्यात जिल्हा कृषिअधिकारी आणि त्या पातळीच्या हुद्द्यावर राहून निवृत्त झाले. अमरावती जिल्ह्यात अगदी सातपुड्याच्या पायथ्यापाशी यांचे गाव. वडिलोपार्जित काळी पुष्कळ. शिवाय जीवनध्यास. म्हणून गावी परतले. क्षेम कुशल झाल्यावर, ‘आता काय करता ?’ या त्यांच्या प्रश्नावर उत्तर म्हणून आजचा सुधारकचे वर्तमान सांगितले. त्यांनी अंक आपुलकीने पाहिले. सामाजिक कार्याबद्दल त्यांची आस्था आनुवंशिक सत्यशोधक चळवळीचे लोण त्यांच्या गावी पाऊणशे वर्षापूर्वी पोचलेले. ‘दीनमित्र’ मध्ये लिहिणारे लेखक त्यांच्या गावी होते. आजचा सुधारक चाळून झाल्यावर म्हणाले, ‘साहेब, (एकमेकांना साहेब म्हणण्याची जुनी वहिवाट सांभाळून होते.) आमच्या लोकांना याच्यात गोडी नाही. आम्ही शहरापासून दूर दूर आहोत. पण आमच्या पोरासोरांना कष्ट नकोसे झाले आहेत. बिनकामाचा पगार पाहिजे. वाटलं होतं तसं काहीच नाही करता येत. कास्तकारीची हालत धरलं त चावते अन् सोडलं त पळते अशी झाली आहे.
‘बाबा सत्रा वर्षे इंग्रजीचा प्राध्यापक होता. एक वेळ अशी आली की, शेती की नोकरी यांतून एकीची निवड करणे भाग पडले. याने शेतीचा मार्ग धरला. हा प्रसंग वीस वर्षांपूर्वीचा. नोकरीपेक्षा धावपळ नक्कीच जास्त होती. पण पस्तावायचे कारण नव्हते. नोकरी सोडली तेव्हा वर्षाचे नऊ दहा हजार मिळत. शेतीत खर्चवेच जाता पंचवीस हजार हाती राहात. परवा भेटीला गेलो तेव्हा सांगत होता : शेती कमी केली. एक बगीचाही काढला. एक उरला तोही विकून आता मोकळा होणार. शेती अमरावती जिल्ह्यातल्या प्रसिद्ध गहू उत्पादक भागात होती. मजुरी वाढली पण मजुराने काम कमी केले, सरकारने भाव बांधून मुस्कटदाबी केली, शेजारच्या राज्यात कापसाला दुप्पट भाव येतो. पण आम्हाला राज्यबंदी. इकडे जागतिक खुल्या बाजारपेठेच्या गोष्टी. वीस वर्षात सगळे भाव दसपट वाढले. त्यांच्यापुढे शेतमालाचे भाव काहीच नाहीत. कोरडवाहू शेती निव्वळ आतबट्ट्याचा धंदा झाली आहे. बाबा ब्राह्मण शेतकरी नाही.
बाबा म्हणतो ते खरे असेल तर मग इतर लोक कशी शेती करतात? बबन यवतमाळ जिल्ह्यात एका तालुक्याच्या गावी वकीली करतो. चांगली चालते. जवळ खेड्यावर शेती आहे. शेतीला पूरक उत्पन्नाचे साधन म्हणून निलगिरी वृक्षसंवर्धनाची एक योजना तो चालवतो आहे. शेतकऱ्याचे परावलंबन पोटतिडकीने सांगत होता. बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे, त्यांची फवारणी – प्रत्येक बाबतीत आपली फसवणूक तो उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. असंतोष त्याच्या उरी दाटला आहे. तरी बंधुआ मजदुराप्रमाणे तो शेतीशी जखडलेला आहे. त्याला दुसरा पर्यायच नाही. जाईल कुठे ? बबन चिडून सांगत होता : आज हालत अशी आहे सर, की सहा बैलांचा कास्तकार तेरवीला जायचे तर मजुराजवळ शंभरची नोट मागतो. मजूर बरे ! पण तेही व्यसनात अडकलेले ! वडील म्हणत, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता उत्तम व्यापार गादीवर बसला आहे, मध्यम नोकरदार खुर्चीवर अन् कनिष्ठ शेतकरी गळक्या खोपटात ओल्या जमीनीवर पाय पोटाशी घेऊन.
अकोला जिल्ह्यातल्या एका मध्यम आकाराच्या गावी मित्र निवृत्तीनंतर विसावला आहे. खूप वर्षांनी पत्ता मिळाला तसा भेटीला गेलो होतो. सहाजिकच आनंदला. म्हणाला, राहा दोन दिवस. उद्या ब्राह्मणसभेचा कार्यक्रम आहे. गावात दोनशेच्यावर ब्राह्मण कुटुंबे आहेत. दुसरे दिवशी सभेचे आमंत्रक त्याच्याकडे आले होते. ओळख झाली तसे म्हणाले, अगदी जरूर या. तुम्ही नागपूरचे. पुन्हा मासिक काढता. आपल्या समाजाला मनोगत सांगा. मार्गदर्शन करा. मात्र कार्यक्रम भरगच्च आहे पाच मिनिटेच देता येतील. कार्यकर्ते असावेत तसे ते उत्साही होते. माझ्या होकारा नकाराचा प्रश्नच नव्हता.. सगळे गृहीत. समाजातल्या गुणवत्ताप्राप्त व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम होता. आम्ही काढतो ते मासिक या सभेला आवडेल असा भोळाभाव मी बाळगून नव्हतो. मार्गदर्शनाचा प्रश्नच नाही, पण वेळ आलीच तर काय सांगावे म्हणून मनोगत जुळवीत बसलो. कार्यक्रमाला जाणे भाग होते. मित्राचा मुलगाच गौरवाचा मानकरी होता. एकीकडे गप्पागोष्टी चालू होत्या, तरी मन विचार करत होते :
आज २ ऑक्टोबर. गांधीजींच्या आणि शास्त्रीजींच्या प्रतिमांचे पूजन आपण केले. शास्त्री जन्माने ब्राह्मण नव्हते पण विद्येने त्यानी ही पदवी मिळवली. गीता म्हणते, जन्माने माणूस शुद्र असतो, संस्काराने द्विज होतो. खुद्द गांधी गीताभक्त होते. दात घासताना रोज एक श्लोक असे करून त्यांनी समग्र गीता मुखोद्गत केली. तेही संस्कारित द्विजच. त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले. वडील भावाने घासातला अर्धा घास काढून त्यांना शिकवले. भावाकडून आलेल्या पैशात फक्त एकवेळ जेवण होई. रात्री पाणी पिऊन झोपत. एकच सदरा रात्री धुवून दुसम्या दिवशी घालत. त्यांचा इंग्रज चरित्रकार लिहून गेला, ही ब्राह्मणजात फार अजब. विद्येसाठी कितीही कष्ट उपसले तरी थोडेच मानतील. त्याचे लिहिणे खरे होते. बृहस्पतीपुत्र कचाचे उदाहरण आहे. असुरांच्या गुरूपासून विद्या संपादन करताना प्राण पणाला लावून त्याने संजीवनी विद्या मिळवली. खरी विद्या माणसाला पुनर्जन्म देते. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला.
या उलट नारायणभटाचे चरित्र पाहा. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्याकडे धर्मकार्यासाठी नेमणूक असलेला हा ब्राह्मण. पंचगंगेवर मंत्रपूर्वक कार्तिकस्नान करावें म्हणून याच्याघरी घोडागाडी धाडली तर हा नायकिणीकडे पडलेला. घरी जाऊन शूचिर्भूत झाल्यावर याला राजवाड्यावर न्यावे म्हणून गाडीवानाने गाडी वळवली तर तो सरळ राजमहालावर चलायला सांगतो. शूद्रांना मंत्र सांगायचे, त्यासाठी आंघोळ कशाला असा त्याचा सवाल. आता हा कोणता संस्कार ! हे कोणते द्विजत्व ! या अनाचारातून जो ब्राह्मणद्वेषाचा भडका उडाला तो आज शंभर वर्षे झाली तरी पोळतो आहे.
ब्राह्मण्य केवळ जन्माने येते की विद्येने याचा मनाशी पक्का निर्णय झाला पाहिजे. जर ब्राह्मण्य म्हणजे विद्येची उपासना आणि ब्राह्मण म्हणजे विद्यासेवक असे समीकरण पटले तर या सभेला आणखी दोन गोष्टी करता येतील का ? १. बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षात सर्वोच्च गुण मिळविलेला गावातला विद्यार्थी, मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याला येथे सन्मानित करता येईल ?
आणि २. ज्या जोडप्यातील एक जोडीदार ब्राह्मण असेल त्या जोडप्याला, त्यांच्या संततीला या सभेत स्थान मिळेल ?
ज्ञानकोशकार केतकर समाजशास्त्राचे मोठे ज्ञानी आणि वेदविद्येचे अभिमानी. ब्राह्मणांनी इतर समाजाला ब्राह्मण्याची द्वारे बंद केली हे हिंदु समाजाच्या अवनतीचे एक कारण असे ते मानत.
माझे हे मनोगत. ते एखाद्या सभासदाला रुचणार नाही. सहज आलेल्या पाहुण्याने असे बोलावे काय ?
परि तेथ असे एकू आधारु ! आम्ही विश्वाला आर्य करायला निघालो आहोत, असे आमचे वैदिक ऋषी म्हणत. आणखी, ‘विश्वातून चोहोकडून भद्र विचार येथे येवोत, त्यांचे स्वागत आहे असाही वेदमंत्र आहेच की ! पण हे सारे मनातले मांडे मनातच राहिले. पन्नास साठ गौरवमूर्ति. त्यांच्या दुप्पट त्यांचे पालक, गणगोत असा भरगच्च मेळावा. सत्कारांचे मानकरी प्रायः विद्यार्थीच होते. प्रायमरी स्कॉलरशिप परीक्षेपासून पी. एच्.डी पर्यंतचे. पण व्यावसायिक उत्कर्ष मिळवलेल्यांचाही त्यांत अंतर्भाव होता. कारकुनीने सेवेला प्रारंभ करून तहसीलदारपदी विराजमान झालेले सत्कारात समाविष्ट होते. तद्वत संगीत, चित्रकला, खेळांतील मर्दुमकी असा चौफेर वेढा होता. कोणी सुटू नये याची काळजी घेण्यास्तव सभास्थानीही घोषणा होत होत्या. प्रास्ताविकात की नंतरच्या एकदोन भाषणात मननीय विचार मांडले जात होते. समाज राज्यव्यवस्थेकडून बहिष्कृत होत आहे. भेदरलेल्या अवस्थेत आहे. भविष्य अंधकारमय आहे. बंधूंनो, विद्या मिळवा, स्वावलंबी व्हा. समाजाला धरून राहा, वगैरे वगैरे. मनात आले, बोहरा समाजातला एक मित्र अलीही त्यांचे नेते असेच बोलत असल्याचे सांगत होता. उशीरा सुरू झालेला कार्यक्रम पसरत गेला. इतका की, मुख्य अतिथींनी पुरस्कार वाटले, पण भाषणाऐवजी मौन पसंत केले. अध्यक्षांनी दोन वाक्यात समारोप केला. भूक जिवंतपणाचे प्रतीक आहे. विजेत्यांनो, आणखी विजयाची भूक ठेवा. आमंत्रकच सभेचे चालक होते. अवधानी होते. त्यांनी मनोगतला फाटा दिला. सहा वाजायला आले होते. टी. व्ही. वर ‘नहले पे दहला’ आहे याची आठवण त्यांना होती. आणि सर्वांना होती. शान्तिविहार सिव्हिल लाइन्स, नागपूर. ४४०००१