फलज्योतिष हे एक शास्त्र आहे असा अनेक लोकांचा विश्वास असतो. त्याचे उदाहरण म्हणून कधी काळी कोणीतरी सांगितलेले खरे ठरलेले भाकित लोक सांगतात. पण त्यानेच किंवा इतरांनी सांगितलेली शेकडो चुकीची ठरलेली भाकिते ते सोइस्करपणे विसरून जातात. वास्तविक खरेपणा खोटेपणा ठरविण्यासाठी खरी आणि खोटी दोन्ही भाकिते लक्षात घेतली पाहिजेत.
फलज्योतिष सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाश्चात्य, भारतीय, चिनी इ. त्यांत एकवाक्यता नाही. भारतीय पद्धतीचा विचार केला तरी तिच्यातील सायन-निरयन वाद, दशांचे प्रकार, नक्षत्रपुंज आणि त्यांचे प्रदेश – या व अशा अनेक तपशिलातील विरोधाभास श्री रिसबूड यांनी १९९१ मध्ये लिहिलेल्या फलज्योतिष काय आहे व काय नाही या पुस्तकामध्ये अतिशय सुबोध रीतीने स्पष्ट करून दाखविला आहे.
कोणतीही पद्धती घेतली तरी फलज्योतिषामागील आधारतत्त्व म्हणजे मनुष्याच्या जन्मवेळेची ग्रहांची निरनिराळ्या राशींमधली स्थिती त्या मनुष्याचे भवितव्य ठरविते हे आहे. अनेक लोकांचा असा समज आहे की हे शास्त्र मुळात भारतीय आहे. परंतु हा समज चुकीचा आहे. वैदिक वाङ्मयात राशींचा उल्लेख नाही. भारतीय ज्योतिःशास्त्रात नक्षत्रांचा उल्लेख आहे. उदा. गुरु-पुष्य योगावर राम-सीता विवाह झाला. नंतर प्रभू रामचंद्रांना वनवास घडला. यावरून गुरु-पुष्य योगावर विवाह करू नये असा समज रूढ झाला. पाश्चात्य आणि भारतीय राशींची नावे समानार्थी आहेत म्हणून राशी आणि फलज्योतिष भारतामधून पश्चिमेकडे गेले असा अनेकांना समज होतो. परंतु कर्क (खेकडा) आणि वृश्चिक (विंचू) यांना वैदिक वाङ्मयात आणि पुराणात महत्त्वाचे स्थान नाही. उलटपक्षी ग्रीक पुराणात ज्यूनोने ओरायन नावाच्या उद्दाम महाकाय योद्ध्याला दंश करण्याची विंचवाला आज्ञा केली. त्याच्या दंशामुळे ओरायन मरण पावला; म्हणून या परस्परांच्या शत्रूंना आकाशात विरुद्ध दिशांना म्हणजे १८० अंशावर स्थान दिले आहे. तसेच मत्सरग्रस्त ज्यूनोने हर्क्युलस हा वीरपुरुष सागरसर्पाशी लढत असतांना त्याचा पाय पकडून ठेवण्यास खेकड्याला सांगितले. परंतु हर्क्युलसने खेकड्याला पायाखाली तुडविले. या कथांवरून राशिपद्धती आपण ग्रीक लोकांपासून घेतली असे दिसते. भारतीय फलज्योतिषाचा वराहमिहिर (जन्म इ. स. ५०५) हा संस्थापक मानला जातो. त्याने पूर्वीच्या ज्योतिर्गणितात दुरुस्त्या केल्या. परंतु स्वतंत्र नवीन कार्य करण्याची त्याची प्रकृती नव्हती असे आढळते. तो आर्यभट्टाच्या (जन्म सन ४७६) पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पनेचा विरोधक होता व त्याचा भूकेंद्रीय सिद्धांतावर विश्वास होता. त्या काळात किंवा तत्पूर्वी भारत ग्रीस संपर्क होता व त्यामार्गे वराहमिहिराने १२ राशी उचलल्या असाव्या.
ज्या काळात फलज्योतिषाचा आरंभ झाला त्या काळात तारे, ग्रह यांच्या संरचनेबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यांना देवतास्वरूप मानण्यात येई, व ते प्रत्येक मनुष्याचे जीवन नियंत्रित करतात अशी धारणा होती. आज या ग्रहांबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे. सूर्य हा तारा आहे, चंद्र हा उपग्रह आहे, बुधशुक्रादि ग्रह हे जड पदार्थ असून ते सूर्याभोवती परिभ्रमण करतात. राहू-केतू हे तर जड पदार्थही नाहीत. ते चंद्राच्या कक्षेचे पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी होणारे छेदबिंदू आहेत. त्या जागी कोणताही ग्रह नाही. मग या काल्पनिक बिंदूंचा मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकेल ?
अन्योन्यक्रिया राहू केतू वगळता इतर तथाकथित ग्रह हे सर्व पृथ्वीसारखे जड पदार्थ आहेत. त्यांचा मनुष्याच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडू शकतो या क्रियेचा निश्चितपणे प्रस्थापित झालेल्या भौतिकीच्या आधारे विचार करणे योग्य ठरते. परस्परांवर परिणाम करण्याच्या अन्योन्य- क्रिया (इंटरअॅक्शन) तीन प्रकारच्या संभवतात. (१) सजीव- सजीव, (२) निर्जीव (जड) – निर्जीव (३) निर्जीव सजीव. फलज्योतिषाचा आधार म्हणजे तिसऱ्या प्रकारची अन्योन्यक्रिया आहे.
सजीव- सजीव : मनुष्य हा सजीव विचारशील प्राणी आहे. त्याच्या आयुष्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनाचा, सहवासाचा किंवा विचारांचा प्रभाव पडू शकतो व त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळू शकते.
निर्जीव-निर्जीव : कोणत्याही निर्जीव किंवा जड वस्तूचा दुसऱ्या निर्जीव वस्तूवर परिणाम चार प्रकारच्या क्रियांमुळे होतो. या क्रियांचे कारण म्हणजे चार प्रकारची बले. (१) प्रबल बल (स्ट्रॉंग किंवा न्यूक्लिअर फोर्स). याचा प्रभाव अणुकेंद्रकाच्या आंतच असतो. (२) क्षीण बल (वीक फोर्स). हे विशिष्ट परिस्थितीतच कार्य करते. या दोन्ही बलाच्या कार्याची मर्यादा १ लक्ष कोट्यंश सें. मी. आहे. म्हणून फलज्योतिषाच्या बाबत त्यांचा विचार करण्याचे कारण नाही. (३) विद्युच्चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) बल. हे बऱ्याच अंतरापर्यंत कार्य करते. परंतु ग्रहांचे विद्युच्चुंबकीय बल इतके अशक्त आहे की त्यांचा पृथ्वीवर प्रभाव पडत नाही. (४) गुरुत्वाकर्षण. हे तर सर्वात अशक्त बल. या चार बलांचे तुलनात्मक प्रमाण १०३८ : १०२५ १०३६ : १ असे आहे. न्यूटनच्या नियमानुसार दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणबलाची किंमत त्यांच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. चंद्राच्या आकर्षणामुळे सागराला भरती येते, कारण समुद्राचे वस्तुमान मोठे आहे; पण बाटलीतील पाण्याला भरती येत नाही, कारण त्या पाण्याचे वस्तुमान कमी असल्यामुळे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल नगण्यच होते.
निर्जीव- सजीव : मनुष्याचे आयुष्य आनुवंशिकतेमुळे त्याला मिळालेल्या गुणांवर आणि त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवर (नेचर आणि नर्चर) अवलंबून असते. मनुष्याची विचारशक्ती त्याच्या कवटीच्या आत दडलेल्या १.५ किलोग्रॅम वजनाच्या मेंदूमध्ये आणि त्याला निगडित असलेल्या न्यूरॉन्सच्या जालकामध्ये असते. मनुष्य विचार करून निर्णय घेतो; ते चुकीचेही असू शकतात. पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्याला असते. फलज्योतिषात तथ्य असले तर त्याला अर्थ असा की जन्मवेळच्या ग्रहस्थितीमुळे त्या मनुष्याच्या जीन्स आणि डीएनए मध्ये असे बदल घडून येतात की त्याचे आनुवंशिक गुण, स्वभाव, वृत्ती यात फरक पडतो. एवढेच नव्हे तर पुढील आयुष्यात त्याच्याशी संपर्कात येणाऱ्या सर्व परिस्थितीवर ग्रहांचा प्रभाव पडतो. ही कल्पना उपलब्ध विज्ञानाच्या कसोटीला उतरत नाही. कोणी असे म्हटले की आजवर अज्ञात असलेल्या बलांच्या द्वारे ग्रह स्थितीप्रमाणे प्रत्येक मनुष्यावर वेगवेगळे प्रभाव पाडतात तर खालील शंकांचे तर्कशुद्ध निरसन झाले पाहिजे.
काही प्रश्न कुंडलीतील ग्रहांच्या स्थानांवरून त्यांचा एकमेकांमधील कोन माहीत होतो, म्हणजे तिच्यावरून ग्रह आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषांमधील कोन समजतो परंतु यापासून पृथ्वी- ग्रह अंतर सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी ग्रहांचे कक्षांमधील स्थान निश्चित करूनच पृथ्वी-ग्रह अंतर काढता येते. सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वी-ग्रह अंतरेही सतत बदलत असतात. जड वस्तूमुळे होणारे परिणाम त्या जड वस्तूपासूनच्या अंतरावर अवलंबून असतात. आता प्रश्न असा आहे की कोणत्याही ग्रहाच्या (उदा. गुरू किंवा शनी) कक्षेमध्ये निरनिराळ्या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती असते की त्यामुळे त्या जागी असलेल्या ग्रहाचा पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या मनुष्यावर विशिष्ट परिणाम व्हावा ?
(२) मनुष्याचा जन्म केव्हा मानायचा? स्त्रीबीजाचे शुक्राणूद्वारे फलन झाले की नव्या जीवाची निर्मित सुरू होते. याला जन्म म्हणायचे की मूल बाहेर पडते ती जन्मवेळ मानायची? हा दुसरा अर्थ घेतला तर योग्य वेळी ऑपरेशन करून डॉक्टर मुलाचे भविष्य बदलवू शकतो हे मान्य करावे लागेल. आता सीझेरिअन करून शुभमुहूर्तावर बालक बाहेर काढा असा आग्रह धरणारे माता पिता आढळू लागले आहेत. फलज्योतिष जिंदाबाद!
(३) कित्येकदा जुळ्या मुलांच्या जन्मवेळेत फार थोडा फरक असतो. त्यापैकी एक मुलगा तर दुसरी मुलगी असते. एकाचा लौकर मृत्यू होतो तर दुसरा दीर्घायुषी असतो. वेळेमधल्या अल्पफरकाने ग्रहस्थितीत व त्यांच्या परिणामात एवढा प्रचंड बदल कसा होतो?
(४) जन्मकुंडलीवरून विवाह, अपत्यसंभव, मृत्यू यांचे भविष्य करता आले तर अपत्याच्या जन्मवेळेचेही भविष्यकथन करता येईल. आधुनिक विज्ञान आणि संगणित यांचा उपयोग करून अपत्याची जन्मकुंडली मांडून त्याचे भविष्य सांगता येईल. अशाच क्रियेचे पुनरावर्तन करून सर्व वंशाचे भविष्य सांगता येईल !
(५) जन्मवेळेच्या ग्रहस्थितीचा मनुष्याच्या आयुष्यावर परिणाम होत असला तर तो गुरे-ढोरे, पक्षी, कीटक इ. प्राण्यांवरही झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील पांढऱ्या उंदरांवर फलज्योतिषाचे प्रयोग करून आधारभूत सिद्धांताचा पडताळा घेता येईल.
(६) फलज्योतिषाखेरीज हस्तसामुद्रिक, भाग्यांक (न्यूमरॉलॉजी), चेहऱ्यावरून भविष्य, प्रश्नकुंडली इ. अनेक प्रकार आहेत. या सर्वांचे निष्कर्ष सारखेच असतात काय ?
(७) ग्रहांच्या अनिष्ट परिणामांचे परिमार्जन यज्ञ, ग्रहशांती, मंतरलेले ताईत, विशिष्ट रत्नांचा उपयोग यांनी कसे होऊ शकते?
भविष्यकथनाची विधाने फार मोघम स्वरूपाची असतात. त्यातून हवा तसा अर्थ काढता येतो. मनुष्यदेखील खरी ठरलेली भाकिते लक्षात ठेवतो. एखादी घटना खरोखरच घडली तर त्याला असे आठवते की पूर्वी ‘क्ष’ ने भविष्य केले होते तसे खरेच घडले. पण ‘क्ष’ ने वर्तविलेली चुकीची भविष्ये तो विसरून जातो. फलज्योतिषीदेखील आपल्या खऱ्या ठरलेल्या भविष्याचा डांगोरा पिटतात आणि खोट्या ठरलेल्या भविष्याबद्दल साळसूदपणे चूप बसतात.
सांख्यिकी फलज्योतिषाची भाकिते सांख्यिकीय (स्टॅटिस्टिकल) स्वरूपाची आहेत असे वाटणे शक्य आहे. या दृष्टीने सिल्व्हरमन यांनी १६०० विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. त्यांची जन्मवेळ, नैसर्गिक वृत्ती इ. बद्दल प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा केली. या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर व्यक्तिमत्त्व- वैशिष्ट्य आणि जन्मराशी यात काहीही सहसंबंध आढळला नाही. तसेच २९७८ यशस्वी विवाह आणि ४७८ घटस्फोटित जोडप्यांच्या राशींच्या अभ्यासामधूनही काही सहसंबंध निश्चित करता आला नाही.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत प्रा. वि. म. दांडेकर यांनी आयसेन्क आणि नियास यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सच्या १४, २१ व २८ फेब्रुवारी १९९३ च्या अंकांत सविस्तर लेख लिहिले आहेत. त्यात त्यांनी डॉ. गॉकेलाँ (गॉकेलिन) यांच्या संख्याशास्त्रीय पद्धतीवर आक्षेप घेतले आहेत. तथापि काही बाबतीतील निष्कर्षांवरून, उदा. शास्त्रज्ञ आणि कलावंत यांच्या जन्मकालीन ग्रहस्थितीत आढळणारा फरक व आईबाप आणि त्यांची मुले यांच्या जन्मकुंडलीतले साम्य, यावरून फलज्योतिषात काही तथ्य आहे असे सूचित होते, असे त्यांचे मत आहे. असे असले तरी जन्मपत्रिकेच्या आधारे भविष्यकथन म्हणजे फसवणूक आहे हे गॉकेलिनचे म्हणणे मान्य केले पाहिजे असे मत त्यांनी प्रकट केले आहे.
या विवेचनावरून फलज्योतिषाला आधारभूत असलेली तत्त्वे अशास्त्रीय असल्याचे आढळते. अर्थातच मुहूर्ताच्या संकल्पनेलाही काहीअर्थ राहात नाही.
खालील भविष्ये काही प्रसिद्ध फलज्योतिषांनी वर्तविली आहेत. त्यावरून ज्योतिष-कथनावर किती विश्वास ठेवावा हे ठरवावे. भाकिते फिल्म इंडिया (ऑगस्ट १९५८). (१) १९६३-६४ मध्ये जागतिक महायुद्ध होऊन त्यात भारत सामील होईल. (२) १९६२ ते १९६५ च्या दरम्यान काश्मीर भारतात पूर्णपणे विलीन होईल (३) १९६५ मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे विसर्जन होईल. (४) १९६५-६६ मध्ये पाकिस्तान भारतात सामील होईल.
इंडिया टुडे (जाने. १९९१). (१) जगन्नाथ मिश्रा केंद्रीय मंत्रिमंडळात जातील. (२) अटलबिहारी बाजपेयी ६१ व्या वर्षी केंद्रशासनात राहतील. (३) नोव्हेंबर १९८२ मध्ये भारत-पाक युद्ध होऊन त्यात पाकिस्तानचा विनाश होईल. दुसऱ्याच्या मते ते ऑक्टोबर १९८४ मध्ये होईल. (४) १९८१-८४ मध्ये तिसरे जागतिक महायुद्ध होईल. (५) भारतात १९८२-८३ मध्ये अध्यक्षीय प्रणाली येईल. (६) काँग्रेस (यू) ला उज्वल भविष्य आहे.
इंडिया टुडे (१५-११-८९). (१) १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस (आय् ) सत्तेवर येईल; दुसऱ्या ज्योतिष्याच्या मते त्या पक्षाचा पराभव होईल. दोन ज्योतिष्यांनी काँग्रेस (आय) ला २७५ पेक्षा जास्त जागा मिळतील असे वर्तविले होते.
इलस्ट्रेटेड वीकली (२०-५-८४). (१) राजीव गांधी पंतप्रधान होणार नाहीत. (२) भारत-पाकिस्तान संबंध मैत्रीचे राहतील. (३) इंदिरा गांधी निवडणूक जिंकतील, पण सत्तेवर राहणार नाहीत; दुसऱ्याचे मत असे की त्या निवडणूक जिंकून पुष्कळ काळ पंतप्रदानपदी राहतील. (४) सप्टेंबर १९८४ पर्यंत पंजाब समस्या सुटेल.
हरियाणामधील १९८७ च्या निवडणुका काँग्रेस (आय् ) ने फलज्योतिषाच्या सल्ल्यावरून घेतल्या होत्या. त्याचा काय परिणाम झाला हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
फलज्योतिषाचा एकच फायदा म्हणजे कमकुवत मनाच्या लोकांना फळाची आशा दाखवून त्यांना कार्यप्रवण करणे. जुगारी, सिनेमा नटनटी, राजकीय पुढारी यांचे स्वतःचे ज्योतिषी असतात. ते मुख्यत्वे त्यांचे मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करतात. त्यांच्या अस्थिर जीवनांत अनिश्चितीच्या प्रसंगी त्यांचे मनोबल वाढवितात. मनुष्याने फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे विज्ञानाने जे ज्ञानभांडार सुनिश्चित स्वरूपात खुले केले आहे त्यावर विश्वास न ठेवतां अज्ञानाविषयी अंधश्रद्धा बाळगणे आहे. केप्लर म्हणतो ‘खगोलशास्त्र ही सुजाण माता आहे, तर फलज्योतिष ही तिची मूर्ख कन्या होय.
‘श्रीधाम, रहाटे कॉलनी पं. नेहरू मार्ग, नागपूर ४४० ०२२