काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच.
माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या जाण्याचे दुःख बाजूला राहिले. त्याच्या पार्थिव देहाची विटंबना चालू होती आणि विधींच्या नावाखाली त्याच्या सुपुत्राकडून जे काही प्रकार करून घेतले गेले, ते पाहून उद्वेग वाटला. काही काळापूर्वी आद्य सुधारक आगरकरांचा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या शीर्षकाचा एक निबंध वाचल्याचे आठवले आणि गेल्या दीड शतकात आपल्या धर्मात आणि संस्कृतीत किती फरक झाला ते पाहाण्याची इच्छा झाली आणि तो लेख पुन्हा एकदा वाचला. त्यातले काही उतारे पुढे उद्धृत करीत आहे.
१. “मेलेल्या मनुष्याच्या प्रेताचा चट्दिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणाला म्हणता येत नाही. प्रेताचे आणि आपले बरेच हाल केल्याशिवाय व करून घेतल्याशिवाय त्याचा शेवटचा निरोप घेणे अशक्य झाले आहे. पण त्यातल्यात्यात हिंदू लोकांनी, विशेषतः वैदिक धर्माचे प्यारे भक्त जे ब्राह्मण, त्या आम्ही हे और्ध्वदेहिक प्रकरण करवेल तितके भयप्रद, अमंगळ व कष्टमय केले आहे. निदान आम्हास तरी आमच्या अंत्यक्रियाविधीत नावाजण्यासारखे काहीएक दिसत नाही.”
२. “चितेच्या गोवऱ्या रचण्यास लागण्यापासून प्रेताची राख होईपर्यंत विधीच विधी! हे भीषण, बीभत्स, अमंगळ हिंदुधर्मा, तुझा आज्ञेने आज शेकडो वर्षे जी क्षौरे केली, डोळ्यातून पाणी गळत असताना कणकीचे गोळे करून ते प्रेताच्या अनेक भागांवर ठेविले, क्रव्यादाग्नीच्या भयाण ज्वालांभोवती मातीच्या गळत्या घागरी डोक्यावर घेऊन ज्या प्रदक्षिणा घातल्या, व उत्तरीयाने गळ्यात दगड बांधून घेऊन व तोंडाला हात लावून तुझ्या नावाने काढू नये तसले ध्वनि काढले, त्या सर्वांबद्दल तू आम्हास काय दिले आहेस?”
वरील परिच्छेदात वर्णिलेले सर्व विधी आज, एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मला पाहायला मिळाले.
३. “कोणत्याही मनुष्याने आपल्या बापाखातर, आईखातर, बायकोखातर किंवा दुसऱ्या कोणत्याही आप्ताखातर एक वेळेस काय पण दर पंधरवड्यास जरी नखशिखांत क्षौर केले त्याबद्दल आम्ही त्यास फारसा दोष देणार नाही. पण जो कोणी दुसऱ्याच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या एका केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न करील, त्याला त्याबद्दल दोष दिला पाहिजे. इतकेच नाही तर दंडही केला पाहिजे असे आम्ही समजतो!”
या परिस्थितीत आजही (२१ व्या शतकात) फारसा बदल झालेला दिसत नाही. अश्या दुःखद प्रसंगी समाजातला एक शहाणा पुढाकार घेऊन नको नको त्या विधींची लांबण लावतो आणि काही आणखी शहाणे या प्रकारांना माना डोलावून मान्यता देताना दिसतात. हे दृश्य बघून एका समाजशास्त्रज्ञाने पांच माकडांवर केलेला एक प्रयोग आठवतो. एका पिंजऱ्यात पाच माकडांना ठेवले होते आणि मधोमध उंचावर केळ्यांचा घड टांगलेला होता. तिथपर्यंत जाण्यासाठी एका शिडीची सोय होती. पहिल्या वेळी एक माकड शिडी चढायला लागल्याबरोबर त्या शास्त्रज्ञाने सर्व माकडांना बर्फाच्या थंड पाण्याने भिजवून टाकले. दुसऱ्या वेळी दुसरे माकड वर चढू लागल्यावरही सर्वांना तीच शिक्षा मिळाली. त्यानंतर त्या शास्त्रज्ञाने पाण्याचा पाईप काढून टाकला, पण ज्या ज्या वेळी एखादे माकड शिडी चढायला निघे, त्यावेळी इतर चार माकडे त्याला मारहाण करीत. त्यानंतर पिंजऱ्यातली एकेक अनुभवी माकड काढून त्या जागी नवी माकडे दाखल केली गेली. पाचही माकडे बदलल्यावरसुद्धा पिंजऱ्यातला रिवाज काही बदलला नाही. शिडी चढू पाहणाऱ्या माकडाला बेदम मारहाण करण्याचे प्रत्येक माकाडाला माहीत होते, पण का ते कोणालाही माहीत नव्हते. आपला समाज या माकडांपेक्षा काय वेगळे वागतोय?
४. “पण ध्यानात ठेव, या तुझ्या अश्लाघ्य निर्घृण वर्चस्वाचा अंत होण्याचा काल अगदी समीप येऊन ठेपला आहे. आजपर्यंत त्वां आम्हांस ज्या अनंत यातना भोगण्यास लाविले आहे, व जी अनन्वित कर्मे आम्हांकडून करविली आहेस त्या सर्वांबद्दल तुझी पाळें-मुळें खणून काढून विचारकुंडात पेटलेल्या प्रचंड अग्नीच्या कल्लोळात तुझी आहुति देणाऱ्या नवीन ऋत्विग्वर्गाचा अवतार नुकताच झाला आहे. तेंव्हा जर तुला आपल्या अस्तित्वाची आकांक्षा असेल तर वेळेवर शुद्धीवर ये आणि आमच्या सर्व शरीरभर काचत असलेले तुझे पाश काढून घे नाहीतर भारतखंडात तुझे नावदेखील राहणार नाही. मित्रत्वाच्या नात्याने तुला आज ही छोटीशी नोटीस दिली आहे व आमच्याने होतील तेवढ्या आणखीही देण्यात येतील. तेवढ्यांनी तू वृत्तीवर आलास आणि कालास उचित असे वर्तन करू लागलास तर ठीकच आहे. नाहीं तर तुझे नशीब तुझ्याबरोबर.”
आपल्या समाजाच्या दुर्दैवाने आगरकरांची ही ‘नोटीस’ आपल्या धर्माने मनावर घेतलेली दिसत नाही. दीडशे वर्षांत आपण काही वैचारिक प्रगती केलीच नाही, की नजीकच्या काळात वेगाने अधोगती सुरू झाली आहे? मित्राच्या अंत्यसंस्कारानंतर मनात उफाळून आलेल्या या विचारांवर मी अनेक मित्र आणि आप्तेष्टांबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण बहुतेकांनी दुर्लक्ष केले किंवा विषय टाळला. एक-दोघांनी ‘घरातल्या वडिलधाऱ्या माणसांचे मन राखायचा’ घासून गुळगुळीत झालेला मुद्दा काढला. त्यावर ‘वडिलधाऱ्यांचे मन राखण्यासाठी केशवपन आणि सतीची प्रथा परत आणावी का?’ असा प्रश्न करता संवाद संपला. नंतर नंतर नुसते मित्र गमावण्याचीच नाही तर शत्रू निर्माण करण्याची आणि धर्मरक्षकांकडून हल्ला होण्याची भीती वाटायला लागल्याने हा प्रकार बंद केला. या पार्श्वभूमीवर, लोक चिखलफेक करीत असताना, जिवंतपणी प्रेतयात्रा काढली तरी, जे इतक्या धैर्याने समाजप्रबोधन करीत राहिले त्या आगरकरांबद्दलचा आदर शतपटीने वाढला आणि ‘आजच्या सुधारका’ची समाजाला किती गरज आहे याचीही जाणीव झाली.
आता वाचकांना एक विनंती करतो. मला आलेला निराशाजनक अनुभव माझ्या एकट्याचा आहे, की सर्वांना थोड्याफार फरकाने असेच मित्र-आप्तेष्ट भेटतात? त्यांच्याबरोबर तुम्ही या विषयांवर चर्चा करता का? आणि कोणाला काही यश मिळालं असेल तर तेही सांगा. फार एकाकी वाटते आहे.
नाही. तुम्ही एकटे नाही. पूर्वी र धों कर्वे एकटे होते. अनेक बुद्धीवादी समाजात वाळीत टाकले जात. आता आपण दूरवर का असू, एकमेकांशी व्हॉट्सॲप,फेसबुक याद्वारे संपर्क साधू शकतो. एकमेकांना आधार देऊ शकतो.पुस्तक आपले सोबती आहेत. त्यांच्या लेखकाशी विचारव्यवहार करू शकतो.”आजचा सुधारक’ आहे आपली मते मांडायला. तेव्हा कायम मन मोकळं करत राहा.
सुनिलजी, आपण उद्घृत केलेल्या अंत्यसंस्काराच्या प्रथा त्याज्यच आहेत. पण कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाली तर जे रीतीरिवाज करण्यात येतात ते विज्ञान आणि आरोग्य शास्त्रावर आधारित आहेत. पुरातनकाळात लोक विज्ञान आणि आरोग्य शास्त्राला जुमानत नसत. म्हणून त्या काळातील धुरिणांनी त्या रिवाजांची सांगड धर्माशी घातली होती. कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्यास सुतक पाळणे, क्षौर करणे, त्या घरात समाचारासाठी गेलेल्या व्यक्तिने घरातिल कोणाला न शिवता अंगावरचे कपडे धुवून डोक्यावरून आंघोळ करणे, या सर्व प्रथा आरोग्य शास्त्रावर आधारित आहेत. जसेकी मृत झालेली व्यक्ती संसर्गजन्य आजाराने मृत झालेली असणे शक्य असल्याने जंतूसंसर्ग होऊ नये या साठी या प्रथा सुरु केलेल्या होत्या. दहा दिवसांनी संपूर्ण घर सारवून धूप लावून जंतुंचा नाश करणे.क्षौर केल्याने केसातिल जंतूंचा नाश करणे वगैरे वगैरे. पण आजच्या जमान्यात एखादी व्यक्ती हृदयविकाराने मृत झाली तर जंतू संसर्गाची शक्यता नसल्याने या प्रथा पाळणे आवश्यक नाही असे माझेही मत आहे. पण पूर्विंच्या प्रथांना सरसकट दोष देणे योग्य वाटत नाही.