भ… भवितव्याचा!

शिक्षणव्यवस्थेविरुद्ध लढा हा पूर्वीपासून चालत आला आहे. पूर्वी काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजकाल कायद्याने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी शिक्षणातील नेमके मर्म काय याबाबतीत वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर; जेव्हा व्यक्ती सक्षम होऊन कारकीर्द घडवण्याच्या मार्गावर असतो तेव्हादेखील त्याचे मार्गदर्शन न झाल्याचे जाणवते. बहुतांश भाग ग्रामीण असून भारतामध्ये भवितव्याच्या केवळ ठराविक दिशाच निवडल्या जातात. त्यामागे परंपरागत जुने विचार, आर्थिक समस्या अशा वेगवेगळी कारणे आहेत. भवितव्य ऐन शिखरावर असताना आपण निवडलेला अभ्यासक्रम शिकूनदेखील त्यात गुणवत्ता नाही हे विद्यार्थ्यांस जाणवते. यासाठी विद्यार्थी – शिक्षक – पालक यांमधील कोणा एकाला दोष देणे योग्य ठरत नाही. शिक्षणावर काम करणाऱ्या कित्येक संस्था आहेत, खाजगी शिकवण्या तर पदोपदी आढळून येत आहेत. शिक्षणाची पायामुळे विकसित करताना व्यवहाराला अनुसरून शिक्षणव्यवस्था हल्ली दिसत नाही. अभ्यासक्रम हा सोपा केला गेला आहे आणि तो संपला तरीही ज्या शाखेतून तो केला जात आहे त्यासंदर्भातील भविष्याच्या दिशा माहीत नसतात. शिवाय त्या दृष्टीने आगेकूच करणे हे प्रत्येकाला जमत नाही. कित्येक गुणवंत विद्यार्थी फक्त धडपड करून जेमतेम कुठेतरी नोकरीच्या शोधात असतात अन् त्यातून काम जरी मिळाले तरी ते काम गुणवत्तापूर्ण असेल याची काही शाश्वती नसते.

वास्तव स्थिती पाहता स्पर्धापरीक्षा हा केवळ एकच मार्ग म्हणून पाहणे हे आजच्या काळात योग्य नाही. व्यक्तीला अधिकारी म्हणून निर्माण करण्यात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असला तरी योग्य वयात योग्य मार्गदर्शन लाभणे गरजेचे आहे. स्पर्धापरीक्षा आणि त्यासाठी आवश्यक असणारी सारी कौशल्ये ही विशिष्ट वयापासून अभ्यासात समाविष्ट करणे गरजेचे आहे. लाखो अर्ज भरून प्रत्यक्ष जागा किती आहेत हे पाहणे गरजेचे आहे. स्पर्धापरीक्षेची तयारी करताना इतर कामे न केल्याने विद्यार्थ्यांकडे ती कामे करण्याबाबतचा आत्मविश्वास नसतो. तसेच यश-अपयश या चक्रात गुंतून वेळ, पैसा वाया घालवण्यापेक्षा भवितव्यासाठी दुसरा पर्यायपण महत्त्वाचा आहे याचे भान असायला हवे. स्पर्धापरीक्षेची तयारी करतानासुद्धा गुणवत्तापूर्ण आणि वास्तवात अधिकारी म्हणून घडण्यास उपयुक्त तयारी असायला हवी.

भवितव्य म्हणजे नेमके काय? त्याचा दर्जा कसा असावा हे वयात येताना ठरवणे गरजेचे आहे. भवितव्याची दिशा ठरणे गरजेचे आहे. गुणवत्ता म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर, त्याला व्यवहाराची जोड असायला हवी. शिकवणीवर्गांसारख्या इतर बाबींपेक्षा शालेय शिक्षण कशाप्रकारे बदलेल; गाव ते शहर संपूर्ण शालेय विकास कसा होईल यादृष्टीने शिक्षक, शिक्षणाधिकारी, विद्यार्थी, विकास आराखडा बनवणारे अधिकारी, सुजाण पालक या सगळ्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरते. गुणवत्ता विरुद्ध आरक्षण हे गुणोत्तर आजच्या घडीला प्रमाणबाह्य झाले आहे. गुणवंत विद्यार्थी अन् आरक्षणामुळे स्पर्धेत पुढे गेलेले विद्यार्थी यांच्यात नक्कीच फरक आहे. पुस्तकात पाहून फक्त घोकंपट्टी करण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयानुसार प्रायोगिक शिक्षणाचा अभ्यासात समावेश असायला हवा. कित्येक वर्षे शिक्षणावर काम करण्यात आले असून शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. मात्र रोजगरनिर्मितीसाठी ज्या प्रकारचे शिक्षण व्हायला हवे त्याचा अद्यापही अभाव आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी यापलीकडे मानवनिर्मित तंत्रज्ञान विकसित होत असून मानवाचे काम यंत्राने घेतले आहे आणि ते पाहण्यासाठी कुशल बुद्धीची आवश्यकता असून त्यादृष्टीने शिक्षणातदेखील यासारख्या गोष्टीचा समावेश असावा. 

एकूणच स्पर्धा ही केवळ माणसासोबत मर्यादित राहिली नसून मानवनिर्मित तंत्रज्ञानासोबतसुद्धा झाल्याने त्या दृष्टीने तयारी करणे गरजेचे आहे. कौशल्य, कला यांचा मुख्यत्वे अभ्यासात समावेश करून व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराभिमुख मार्गदर्शन इत्यादींवर काम करणे गरजेचे आहे. वाढत्या स्पर्धेत रोजगारासाठी जे जे शक्य आहे त्या आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच पर्याय वर्तमान तसेच भविष्याला सुकर बनवू शकतो. शिक्षण हा केवळ मार्ग असून त्याला व्यवहारोपयोगी कसे बनवता येईल; भवितव्याचा ‘भ’ कसा घडेल अन् राष्ट्रीय विकासात हातभार कशाप्रकारे लागेल याचा विचार शिक्षणव्यवस्थेत जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाने करणे गरजेचे आहे. 

सातारा 
८३८१०९११७४

अभिप्राय 1

  • भ..भवितव्याचा या लेखात मयुरीजींनी शिक्षणक्षेत्राविषययी समर्पक विचार मांडले आहेत. पण अंक प्रकाशित होऊन तीन महिने झाले; तरी एकही प्रतिक्रिया आली नाही. यावरून या विषयीची लोकांची अनास्थाच दिसून येते. खरेतर स्वातंत्र्यप्राप्तीपासून त्यावेळच्या सरकारकडून शिक्षणक्षेत्राची अक्षम्य हेळसांड करण्यात आलेली आहे. सुरुवातीला अनेक वर्षे मदरशात शिक्षण घेतलेला मौलवी शिक्षणमंत्री होता व नंतरही मुस्लिम शिक्षणमंत्री होते. सरकारी उत्पन्नाचा फक्त आडीच टक्के निधी शिक्षणक्षेत्रासाठी देण्यात येत असे. खेडेगावात शाळा देवळात किंवा चावडीत भरवली जात असे. पहिली ते चौथी चार वर्ग फक्त एकच शिक्षक शिकवत असे. खरेतर शिक्षणक्षेत्र सरकारच्या आखत्यारित असणे आवश्यक असते. पण त्यावेळच्या सरकारने आपली जबाबदारी टाळून शिक्षणक्षेत्रात खाजगी संस्थांना प्रवेश दिला, आणि त्यावर नियंत्रण ठेवले नाही. शिक्षणक्षेत्राचे व्यापारीकरण केले. त्यामुळे खाजगी शिकवणी वर्गांचे पेव फुटले.

    आता पालकांनी पदवीच्या मागे न लागता दहावीनंतर आपल्या पाल्याला आयटीआयमध्ये व्यावसायिक शिक्षण द्यावे; जेणेकरून तरुण कांही व्यवसाय करण्यास सक्षम होऊ शकेल. हुशार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाकडे वळावे.

    विद्यमान सरकार कौशल्यविकासावर भर देत आहे. मेक इन इंडिया सारखे प्रकल्प राबवत आहे. त्यात कुशल कारागिरांना चांगले भवितव्य आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.