कुठल्याही माणसाचा आयुष्याचा उद्देश काय असतो? आजच्या जगात पैशाला इतके महत्त्व आले आहे की पैसा मिळवला म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे मिळविण्याकरिता शिक्षण सगळ्यात महत्त्वाचे आहे असे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येते.
गेले काही वर्षे शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा चालला आहे तो आपण सगळे बघतोच आहोत. काहीही करून मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याची धडपड. आता तर काय म्हणे इंजिनीयरिंगला मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय बंधनकारक असणार नाहीत. अर्थात, यामुळे फार काही नुकसान होणार नाही. पर्याय म्हणून दिलेले इतर विषय पैसे मिळवण्यासाठी कामात आले की मूळ हेतू पूर्ण होणारच. पण या सगळ्या खेळात शिक्षणाच्या दर्जाचे काय?
मुळात शिक्षणाचा उद्देश फक्त त्या ज्ञानाचा वापर करून पोट भरणे, चरितार्थ चालवणे आणि भरपूर पैसे कमावणे हाच आहे का? तसे असेल तर मग मला एक सांगा की पूर्वी आपल्या गावगाड्यातील बारा बलुतेदार मंडळींपैकी कोण पैसे कमावत नव्हता? त्यांच्यापैकी कोणी भिकारी झाला होता असे ऐकले आहे? नाही ना? शक्यच नाही.
बारा बलुतेदारी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रोजगार हमी योजना होती. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होणार;शेतीचे पारंपरिक ज्ञान तो आपल्या वडिलांकडून घेणार आणि बाप आपल्या स्वानुभवाच्या अजून चार गोष्टी जोडून ते ज्ञान आपल्या मुलाला देणार; यात पोटापाण्याची चिंता मिटलेली असे. लहान असतानाच वडिलांच्या बाजूला बसून हातात लाकडाचा तुकडा घेऊन सुताराचा मुलगा वडिलांचे काम बघून बघूनच शिकत असे. त्यामुळे तो ज्यावेळी २० वर्षांचा होई त्यावेळी तो पूर्ण कुशल सुतार झालेला असायचा.
आई-वडिलांचे गुण लहान मुलांच्यामध्ये उतरतात. मग त्याच गुणांसाठी पोषक असे वातावरण असेल तर ती मुले त्या क्षेत्रात आई-वडिलांपेक्षा अधिक प्रगती करतात. हे जेनेटिक्स अर्थात वंशशास्त्राच्या अभ्यासकांनीसुद्धा सिद्ध केले आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हजारात फार विरळा मुले अद्वितीय किंवा लोकोत्तर गुण घेऊन जन्माला येतात; बाकी सर्व मुले सामान्य असतात.
जुन्या काळी तरुण मुले सर्वसाधारणपणे आपल्या आई-वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवत असत; यात पिढीजात कौशल्य अंगी असे. शिवाय आई-वडिलांच्या हाताखाली लहानपणापासून काम केल्याने तारुण्यात पदार्पण करेपर्यंत ते कौशल्य सर्वार्थाने विकसित झालेले असे. त्या तरुणाला त्याची उपजीविका चालवता येईल इतके त्याच्या क्षेत्रातील ज्ञान तो वीस वर्षांचा असताना प्राप्त झालेले असे. हजारातील सर्वसामान्य लोकांसाठी ही पद्धती उत्तम होती. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्नच कधी निर्माण होत नसे. आता जे हजारातील विरळा असतील, ते त्यांना आवडणारी वाट चोखाळतील आणि त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणूस गाठतील आणि शिकतीलही. हे करताना होणारे त्रास ते सहन करतील. पण तो मार्ग चोखाळण्याची सामाजिक चौकटीत मुभा होती; त्यात काहीही गैर मानले जात नसे.
सर्वसाधारणपणे असे दिसते की कोणतीही विद्या संपूर्ण शिकायला सुमारे १२ वर्षे लागतात. त्यामुळे आठव्या वर्षी मुलांची मुंज झाल्यावर त्यांच्यातील कौशल्ये ओळखून त्यांनी त्या त्या विषयांचा अभ्यास सुरू केल्यास वयाच्या वीस वर्षांपर्यंत ती मुले त्या विषयात पारंगत होऊ शकत. मग शिल्पकला असेल, नृत्य असेल, पारंपरिक बारा बलुतेदारी असेल किंवा राजा, अधिकारी बनवणारे गुरुकुलातील शिक्षण असेल; वयाच्या विसाव्या वर्षी ते निपुण झालेले असत आणि त्यांच्या कौशल्यांची परीक्षा होऊन त्यांना रोजगार मिळत असे.
जो नृत्य, संगीत शिकणार असेल तो त्या गुरूकडे १२ वर्ष फक्त तेच आणि तितकेच शिकत असे. त्या जोडीला या जगात गरजेचे प्राथमिक व्यावहारिक शिक्षण त्याला त्याच्या घरी तो आठ वर्षांचा होईस्तोवर मिळालेले असे.
याने आपल्या देशाचे काय वाईट झाले? आपल्याकडील लोक सर्वोत्कृष्ट दर्जाची उत्पादने बनवत होते. आपण जगाच्या व्यापारात २३% हिस्सा बाळगून होतो आणि तो फक्त मसाल्याचा नव्हता. त्यात उत्कृष्ट दर्जाचे कापड, अत्युत्कृष्ट दर्जाच्या शोभेच्या वस्तू होत्या. दगड, लाकूड, धातू, वस्त्र या सगळ्यांवर केले जाणारे नक्षीकाम तर आपल्या तोडीचे संपूर्ण जगात कुठेही होत नव्हते. जगाला कितीतरी धातू शेकडो वर्षे पुरवठा करणारा एकमेव देश हा आपला बहुमान होता. यांपैकी मुख्य धातू म्हणजे जस्त आहे. शुद्ध जस्त ओतून काढणे हे शेकडो वर्षे जगाला ज्ञात नव्हते; ते तंत्रज्ञान फक्त आपल्याकडे होते.
आपल्याकडील हजारो वर्षे टिकतील अशी मंदिरे, त्यावरील शिल्पकला हे सगळे या विश्वसनीय यंत्रणेचे यश होते. लोहार असेल, सुतार असेल, चांभार असेल तरी खाऊन पिऊन सुखी होते. ज्याच्याकडे जे कौशल्य असेल तो त्या क्षेत्रातील शिल्पी होऊन संपत्ती कमावत असे. हे व्यवसाय म्हणजे त्या त्या लोकांची जात होती.
मी ऐकलेले एक उदाहरण सांगतो:-
अलेक्झांडर उर्फ सिकंदर आपल्या देशावर हल्ला करायला का आला माहिती आहे? भारतात एक तगर नावाचे गाव होते. तेथील कापडाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की तगरचे कापड वापरणे हे सिकंदराच्या राज्यात श्रीमंतीचे, ऐश्वर्याचे लक्षण मानले जाई. तगरच्या कापडाची इतकी मागणी वाढली की तेथील स्थानिक कापडउद्योग बंद पडायची वेळ आली. मग सिकंदराने तगर येथील कापडावर अतिरिक्त कर बसवला. तरीही त्या कापडाची विक्री कमी झाली नाही. खुश्कीच्या मार्गाने तगर कापड खैबरखिंडीतून जगभरातील बाजारपेठेमध्ये जात होते.
आता हे तगर गाव कोणते आहे माहिती आहे? तगर म्हणजे तर. उस्मानाबाद/धाराशिव जवळचे तेर नावाचे गाव. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ. आज जाऊन पहा. कापडातील क सुद्धा तिथे दिसणार नाही. ते सगळे तंत्रज्ञान समूळ नष्ट झाले आहे.
ब्रिटिश आले आणि त्यांनी या संपूर्ण यंत्रणेला सुरुंग लावून उद्ध्वस्त केले. ब्रिटिशांच्या कृपेने आणि मॅकालेच्या शिक्षणाने आपण जुनी बारा बलुतेदारी संकल्पना संपवून टाकून त्यांना भिकेला लावले. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात न्यूनगंड पेरला गेला आणि आपली सामाजिक, आर्थिक चौकट पूर्ण उद्ध्वस्त झाली. हा गोंधळ सार्वत्रिक पातळीवर आपल्या समाजाला उद्ध्वस्त करतो आहे हे समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज आपली मंदिरे, हलाखीत जगणारे काष्ठशिल्पी आणि विणकर मंडळी या त्या गतवैभवाच्या भग्न खुणा आहेत.
आज तथाकथित समानता आली आहे. पण यामुळे काय झाले? बारा बलुतेदारीतील प्रत्येक बलुतेदार, शेतकरी, ब्राह्मण सगळेच्या सगळे आपल्या मुलांना एकाच शैक्षणिक चरकात घालतात. भारतसरकारसुद्धा ‘सर्व शिक्षण अभियान’ योजनेंतर्गत सर्व नागरिकांना शिक्षण देण्याची संकल्पना मांडते. पण शिक्षण म्हणजे काय याचा विचार आपण केला आहे का? लिहिता-वाचता येणे म्हणजे शिक्षण म्हणायचे का? आजच्या जमान्यात शिक्षण सुरू होते तीन वर्षांचे असताना. आणि आपण ज्याला पायाभूत शिक्षण म्हणू ते पूर्ण होते १५ वर्षांचे असताना; म्हणजे दहावीमध्ये. या १२ वर्षांत ते मूल काय शिकते? देशाचा आणि जगाचा इतिहास, भाषा, गणित, विज्ञान. आनंद आहे; पण यांपैकी कोणते ज्ञान वापरून त्याला दोन वेळेस खायला काही मिळू शकते? कोणतेच नाही. कारण त्याच्यासारखे दहा लाख विद्यार्थी हेच ज्ञान घेऊन उभे आहेत.
मग पुढे तीन शाखा: कला, वाणिज्य आणि शास्त्र. अजून दोन वर्षे शिका म्हणजे बारावी व्हाल. त्यातून काही रोजगारासाठी मिळाले का? नाही. मग पदवी मिळवा. मूळ पदवी मिळणार साधारण विसाव्या वर्षी म्हणजे शिक्षण घेतले १७ वर्षे. या मूलभूत पदवीच्या शिक्षणावर तो कोणती नोकरी मिळवू शकतो? कारकून, चपराशी, सेल्समन, डिलिव्हरी बॉय, हॉटेलमधील वेटर? आणि हेच काम करू शकणारे १० लाख स्पर्धक त्याच्याबरोबर उभे आहेत; आणि तेसुद्धा फक्त राज्य पातळीवर. संपूर्ण देशाचा विचार केला तर दोन कोटी निश्चित असतील.
विद्यार्थी जर हुशार असेल आणि बारावीनंतर इंजिनीयरिंगला गेला तर मेकॅनिकलमध्ये त्याला पहिल्या वर्षी काय शिकवतात? फाईल्स आणि त्यांचा वापर करण्याचे ज्ञान. हे ज्ञान पारंपरिक लोहार आपल्या मुलाला गंमत म्हणून ८ वर्षांचा असताना शिकवत असे. परंतु आधुनिक जगात त्या मुलाला त्याच्या १८ व्या वर्षी ते शिकवले जाते. पूर्वी लेथ चालवायला शिकवायचे आज सगळीकडे CNC मशीन्स आल्या आहेत. पारंपरिक मशीन्सचा वापर वेगाने कमी झाला आहे. पण विडंबन असे की विद्यार्थी ह्या शिक्षणासाठी काही लाख रुपये मोजतो आहे. बरं, तेही ठीक आहे! पण फायलिंग शिकून तो मुलगा त्याचा काही उपयोग पुढच्या आयुष्यात करतो आहे का? उत्तर – अजिबात नाही. फायलिंग करणे ही कला आज फक्त डायमेकरसारख्या मंडळींसाठी उरली आहे; बाकी कोणीही याचा वापर करत नाही.
परंतु चार वर्षांच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये मुलांना हे शिकवणे त्यांना भाग आहे कारण त्यांना बेसिक माहिती नसेल तर पुढे त्याचे आकलन कसे होईल? आणि हो, जर बेसिक १८ व्या वर्षी शिकला तर तो पूर्ण कुशल अभियंता कधी होईल? ३० वर्षांचा झाल्यावर?
यापेक्षा भयानक स्थिती वैद्यकीय क्षेत्राची आहे. पाच वर्षांची पदवी, मग पुढे तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम; नंतर कुठेतरी उमेदवारी आणि मग खऱ्या अर्थाने चांगली नोकरी अथवा वैद्यकीय व्यवसाय. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थाने पायावर कधी उभे राहणार? ३५ वर्षांचे झाले की? या मुलामुलींची लग्ने कधी होणार? लग्नासाठी व्यावसायिक स्थैर्य हे आजच्या समाजात जितके आवश्यक समजले जाते, तसे पूर्वी नव्हते. बारा बलुतेदारी असताना हे स्थैर्य कुटुंबाकडूनच मिळत असे आणि ते पुरेसे असे. विवाहासाठी मुळात ही अट नव्हतीच आणि ती आजही नसावी असे वाटते.
समानतेच्या नावाखाली सगळ्या लोकांना जातीचा अभिमान शिकवला गेला पण सोबतीने जातीचा पारंपरिक व्यवसाय हा गौण आहे हेदेखील मेंदूत भरवले गेले. परिणाम काय? जातीचे कौशल्य संपूर्ण संपले आणि उरला आहे पोकळ अभिमान आणि समानतेच्या गोंडस चरकात चिरडून जाणारी आयुष्ये.
मंडल आयोगाने जातीनिहाय आरक्षणाची व्याप्ती, खोली आणि उंची वाढवून घटनाकारांच्या मूळ विचारांना हरताळ फासला. तिथेच हिंदू समाजातील मतभेदाची दरी रूंदावण्यास आणखी जोमाने सुरुवात झाली. एकेका जातीच्या संघटना उभ्या राहिल्या, मोर्चे निघू लागले, आणि सामाजिक समरसतेचे स्वप्न धूसर होऊ लागले. सवर्ण असणे म्हणजे शतकानुशतकाच्या पापाचे वाटेकरी असणे, सवर्ण असणे म्हणजे ह्या देशातील जातीआधारीत गुन्ह्याला कारणीभूत असणे अशा चष्म्यातून सर्व काही बघायला सुरुवात झाली. एकप्रकारे सवर्ण हा वैचारिकदृष्ट्या अस्पृश्य झाला. सरकारी नोकर्या, शाळा व कॉलेजातील प्रवेश इथे “गुणवत्ता” दुय्यम ठरली आणि जातीचा दाखला अव्वल ठरला आणि देशबांधवांमधली तेढ वाढण्याचे पर्व सुरू झाले.
आज प्रत्येकाला आपल्या जातीचा फक्त कट्टर अभिमान उरला आहे पण त्याचे जातवैशिष्ट्यानुसार असणारे कौशल्य संपून गेले आहे. याची त्याला खंत तर अजिबात नाहीच पण समानता देणाऱ्या राज्यघटनेत त्याला जातीनिहाय आरक्षण मात्र हवे आहे. कारण काय तर त्यायोगे त्याच्या पुढच्या पिढ्यांना मॅकालेच्या शिक्षणपद्धतीत पोट भरण्याची संधी शोधता येईल. जुन्याची नाळ नुसतीच तोडली नाही तर तिच्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण केला गेला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे नवीन म्हणून आहे त्यात भवितव्यच दिसत नाही म्हणून मग आरक्षणाची भीक मागायची वेळ आली आहे.
याचा भयानक परिणाम काय झाला याची तुम्हाला कल्पना आहे? आज सरकारी शिपायाच्या नोकरीसाठी कोण अर्ज करतात याचा तुम्ही विचार करू शकता? अगदी PhD पासून सगळ्यांचे लाखांनी अर्ज येतात. मिळेल ती नोकरी स्वीकारण्याची तयारी असलेला आणि मानसिकरीत्या त्रिशंकू झालेला संपूर्ण समाज असे भयानक चित्र आज दिसते.
काळ असाच पुढे गेला आणि मग स्वतःला मागास ठरवून घेण्याची व त्याद्वारे आरक्षण पदरात पाडून घेण्याची अहमहमिका सवर्णातील जातबांधवांमध्ये सुरू झाली. अत्यंत जहाल भाषेतील पत्रके, वक्तव्ये विशिष्ट जातसमुहाला लक्ष्य करून मांडण्याचे उद्योग पुरोगामी महाराष्ट्रात सुरू झाले. त्याला राजकीय आश्रय, पाठींबा आणि उत्तेजन महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून मिळाले. पाहता पाहता द्वेषाचा आणि स्वतःच्या जातबांधवांना आरक्षण मागण्याचा हा कर्करोग वाढत जाऊन, आज एका निर्णायक वळणावर आला आहे.
बिघडलेलं सोशल इंजिनियरिंग जर आपण बदललं नाही तर हा प्रश्न दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना खऱ्या अर्थाने मनात रुजवायची असेल तर शिक्षण, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास या मूलभूत गोष्टींवर अगदी मुळापासून काम करत प्रगल्भ समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे. असा प्रगल्भ समाज हा सशक्त राष्ट्र बनवतो. आपल्या इथलं असलेलं क्वालिटी ऑफ लाईफ, जातिव्यवस्था, धार्मिक भावनेचं झालेलं उन्मादीकरण, मग त्यामध्ये रस्त्यांची स्थिती, सार्वजनिक स्वच्छता, या आणि यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. घरापासून कॉलेजपर्यंत जाताना फ्लेक्सवर दिसणारे, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून मिरवणारे भावी नेते, कानावर सातत्याने पडणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात राजकारण्यांचा झालेला शिरकाव या सगळ्यांचा तरुणांच्या मनावर सुप्त परिणाम होत असतो.
त्यामुळेच दरवर्षी सुमारे चार लाख तरुण हा देश सोडत आहेत. अनेक घरातून मुलं-मुली परदेशात शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी पकडून स्थायी होतात. नव्वदीत सुरू झालेल्या या ट्रेंडने आता चांगलाच वेग पकडला आहे. बरेचदा आपण “आजची तरुणाई पैशाच्या मागे लागली आहे” किंवा “चंगळवाद फोफावला आहे” इतकं बोलून वस्तुस्थितीची बोळवण करून टाकतो. ही तिकडे गेलेली मुलं-मुली भारतात असणाऱ्या लोकांचा चेष्टेचा विषय बनतो. परंतु त्यामागील कारणमीमांसा करायला आपण तयार आहोत का? शेवटी जाणारे जातातच; राहणारे राहतातच. ह्यात कोण चूक, कोण बरोबर ह्याचा संबंध नाही. ‘बेटर लाईफ स्टाईल’ची इच्छा बाळगणे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणे ह्यात काहीही गैर नाही.
आपले पूर्वज सुखी-समाधानी-तृप्त आणि ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगले हे विधान जसे अतिरंजित आहे तसेच सवर्ण समाजाने शोषण केले हेही.
ब्रिटिशांचे आणि ब्रिटिशधार्जिण्या समाजसुधारकांचे सतत पटवून देणे हीदेखील काही अंशी अतिशयोक्तीच आहे. परंतु त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज संपूर्ण समाजाची शोचनीय अवस्था झाली आहे.
उच्चशिक्षणाची किंवा उत्कृष्ट काही करण्याची आस असलेल्या लोकांना परावृत्त करण्याचा अथवा घाबरविण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. मुख्य मुद्दा असा आहे की जे सामान्य आहेत त्यांच्यासाठी अशीच शिक्षणव्यवस्था असावी जी त्यांना विसाव्या वर्षी स्वयंपूर्ण करू शकेल. आणि महत्त्वाचे म्हणजे आपले पारंपरिक कौशल्याचे जे व्यवसाय आहेत त्यांचे पुनरुज्जीवन होणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला माहीत आहेच की आजसुद्धा हस्तनिर्मित उत्पादने वाट्टेल त्या दराने विकली जातात; पैठणी कोणत्याही यंत्रमाग साडीच्या काही पट महाग विकली जाते. शिक्षणधोरण दोन्ही विचारांना समजून असावे. ते सामान्य जनतेचा विचार करणारे आणि काही विरळा मुलांना संधी देणारे असावे.
सुदैवाने आज भारतसरकार या गोष्टीचा विचार करते आहे असे निदान वाटते तरी आहे. स्किल इंडिया, मेक इन इंडिया ह्या अत्यंत धोरणात्मक बाबी आहेत. परंतु दुर्दैवाने तरुणांना त्यांच्या गावी राहायचेच नाही. त्यांचे स्वप्न काय तर शहरात जाऊन नोकरी करायची; मग ती काहीही असो आणि त्याच्यासाठी कसलीही तडजोड करायला ही मुले तयार असतात. पदवीधर कशाला व्हायचे तर जी मिळेल ती नोकरी करायला अशी दारुण परिस्थिती आहे. याचे प्रमुख कारण शेतकऱ्याचा मुलगा असे म्हटले तर त्याची लग्नाच्या बाजारातील किंमत शून्य असते. आज शहरात असेही दिसून येते की न्हावी, सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशिअन, मसाज करणारे, ॲमेझॉन किंवा स्वीगीसारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय, ओला किंवा उबर टॅक्सीचालक किंवा अगदी कुत्र्यांना फिरवून आणणारे यांचे उत्पन्न चांगले असले तरी त्यांच्या कामाचा दर्जा हीन समजला जातो.
अमेरिका किंवा पश्चिम युरोपसारख्या देशात कुठल्याही कामाला कमी लेखले जात नाही कारण तिथे श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते. आपल्याकडे ते अस्तित्वातच नाही. आपल्या देशाबाबत मी एक धाडसी विधान करतो की – Employment is inversely proportional to education. जेवढे तुम्ही जास्त शिकता तेवढे रोजगाराचे आणि मिळकतीचे मार्ग कमीकमी होऊ लागतात. कारण समाजाने ठरवलेल्या काही प्रतिष्ठित कामांव्यतिरिक्त इतर कामे करायला स्वतःलाच लाज वाटू लागते. हे सगळं बघितलं की मानसिक उद्वेग होतो आणि मग म्हणावसं वाटतं – शिक्षणाच्या आईचा घो!!
आज समानतेचे नाव घेत आपण संपूर्ण राष्ट्राची, राज्याची आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याची सुद्धा वीण उसवत चाललो आहोत; परंतु त्याचे भान कोणालाही नाही. गांभीर्याने विचार नाही केला तर भविष्यकाळ फार काही आशादायक दिसत नाही.
मला कल्पना आहे की ज्या पद्धतीने बारा बलुतेदार पूर्वी अस्तित्वात होते त्यानुसार आज ते राहू शकणार नाही. त्यात बदल करावाच लागेल. परंतु त्या प्रणालीकडे अथवा तशा समूहांकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची नक्कीच गरज आहे.
yeshwant.marathe@gmail.com
बारा-बलुतेदारी जन्मावरून काम ठरविणारी कालबाह्य पद्धत आहे. आज “गुणवत्ता दुय्यम ठरली आणि जातीचा दाखला अव्वल ठरला”, हा एक oversimplified दृष्टिकोन आहे. एक साधा argument: सगळे मनुष्य सारखे, तर आरक्षण पूर्वी 65 % लोकांना 65% उच्च jobs का मिळत नव्हते? “सगळे व्यवसाय सारखे”, आणी सवर्ण सुद्धा गरीब असतांना आजही महानगरपालिकेत कचरा उचलणारे, गटर साफ करणारे पैैकी 35% सवर्ण आहेेत का? आरक्षणचे धोरण या प्रश्नांतून समजून घेणे आवश्यक आहे.
सद्य परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारा अतिशय छान लेख.
वेगळा विचार मांडला आहेस. अभ्यासक्रमामध्ये बदल निश्चित आवश्यक आहे. किती वेळा नोकऱ्या उपलब्ध असतात पण त्यासाठी आवश्यक लोकं मिळत नाहीत. कंपनी ट्रेनिंग देऊन मनुष्यबळ तयार करते. ही तफावत भरून काढण्यासाठी योग्य अभ्यासक्रम आणि शॉप फ्लोरवर इंटर्नशिप हे अभ्यासक्रमात आलं तर खूप बदल होईल. बारा बलुतेदार पध्दत माझ्या मते आता relevant नाही. प्रत्येकाच्या आवडीनुसार कामाचे क्षेत्र निवडणं जास्त संयुक्तिक आहे.
मला हे वाचून खूप वाईट वाटले.
कारण या लेखातील काही वाक्य आक्षेपार्ह आणि निषेध करण्या लायक आहेत. हा माणूस खूप नकारात्मक असून लेखकास समतेऐवजी समरसता हवी आहे.
आमच्या अनेक समाजसुधारकांना इंग्रज धार्जिणे ठरवून हा माणूस त्यांचा घोर अपमान केलेला आहे.
माझ्या मते हा संपूर्ण लेख छापण्यापूर्वी संपादकांनी वाचलेला आहे याबद्दल शंका येते.
प्रस्तुत लेखातील प्रश्न जरी बरोबर असले तरी त्यामागची कारण मीमांसा मात्र तितकीशी पटली नाही. ‘जुनं ते सोनं’ अशा प्रकारचा एक विचार लेखात जाणवतो. परंतु माझ्या मते, जसे पाणी साठून राहिले तर त्याचे डबके होते, वाहत राहिले तर ते नदीप्रमाणे उपयोगी ठरते. तसेच, बदलत्या समाजानुरुप आपल्या सर्वच व्यवस्था, शिक्षण एवढेच नव्हे तर धर्म, धार्मिक संकल्पना, rituals या सुधा काळानुरूप बदलत्या राहिल्या पाहिजेत.
एकेकाळी समृद्ध असलेल्या आपल्या देशात अंधारयुग अवतरले ते शिक्षण आणि हस्त कौशल्य याची फारकत केल्यामुळेच ही महत्त्वाची बाब लेखक ध्यानात घेत नाही. त्यामुळे शिक्षणासंबंधी हा लेख एकतर्फी झाला आहे.
श्री. यशवंत,
लेखातले विचार एकदम पटले. सध्याच्या केंद्र सरकारने नवीन कौशल्याधारीत शैक्षणिक धोरण अमलात आणायचे ठरविले आहे ते योग्य आहे.
पारंपरिक समाज व्यवस्थेत तयार अन्न, शिक्षण व औषध विकू नये / लाभाच्या अपेक्षेने सेवा देऊ नये असा दंडक होता.
आज दुर्दैवाने ह्या तिन्ही क्षेत्रात बाजारूपणाचा कळस गाठला गेला आहे. त्यामुळे आर्थिक विषमता (राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर) वाढतच चालली आहे.
विनायक गोखले
यशवंतराव, आपण या लेखात खरोखरच उत्कृष्ट विचार मांडले आहेत. इंग्रजांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी बलुतेदार पध्दत मोडित काढली. आपल्या देशातील संस्कृती नष्ठ करुन फक्त कारकून बनवणारी शिक्षणपद्धती रुढ केली. लोकमान्य टिळकांचा याला विरोध होता. पण ब्रिटिश राज्यकर्ते असल्याने त्यांनी ही शिक्षणपद्धती आपल्या देशावर लादली; आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेवर आलेल्या सरकारने शिक्षणक्षेत्राची हेळसांड केली. सुरुवातिला अनेक वर्ष शिक्षणमंत्री मदरशात शिकलेला मौलवी होता. शिक्षणक्षेत्राला पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला नाही. पण आता विद्यमान सरकारने कौसल्याधारित शिक्षणपद्धती राबविण्याचा संकल्प केला आहे आणि आपले राज्यसरकार सुद्धा त्या दृष्टीने पाउले उचलत आहे. तेव्हा आगामीकाळात शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.