२०१३ मध्ये मी फेसबुक उघडलं तेव्हा, आदिवासी समुदायातला एखादा दुसराच फेसबुक वापरणारा युवक असेल. परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये माध्यमांचा जो शिरकाव मानवी समाजात झाला आहे ना, त्याचे परिणाम ग्रामीण आणि आदिवासी समुदायातली मुलंही भोगत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, टीक्टॉक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ही सगळी समाजमाध्यमे आदिवासींच्या मुलांना आता परिचयाची झाली आहेत. चॅटजीपीटीही जास्त दूर नाही. आणि ही सगळी माध्यमे मुलांकडून अतिप्रमाणात वापरली जात असल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्येक घरामध्ये दिसतोय. मुलांच्या हट्टापायी, किंवा मुलं सारखी चोरून दुसऱ्यांचे मोबाईल पाहत राहतात, म्हणून दहा ते बारा हजार रुपये किमतीचे मोबाईल फक्त पाच ते सहा वर्षांच्या मुला-मुलींना घेऊन दिलेले पालक मी ग्रामीण भागात पाहिले आहेत. वीस वर्षांपूर्वी माझ्या तांड्यामध्ये असं चित्र नव्हतं. तेव्हा फक्त भाडेतत्त्वावर टीव्ही आणून सामुहिक पाहिला जायचा. मला आठवतं, एका वर्षी गणपती मंडळाने एका शेतकऱ्याच्या शेतीमधला मूग उधळा घेऊन त्या पैशाने तांड्यावरच्या माणसांना चित्रपट आणून दाखवले होते. तेव्हा चित्रपट आणि टीव्हीबद्दल आकर्षण होतं; पण टीव्हीला आयुष्यात प्राथमिकता नव्हती. टीव्ही काहीतरी कर्ज काढून आणला किंवा टीव्ही नसल्यामुळे कोणालातरी तांड्यावर अस्वस्थ वाटलं असं नव्हतं. हा लेख समाजमाध्यमे आपल्या आयुष्यात आल्यापासून मला आलेल्या काही अनुभवांवरून मी लिहीत आहे. त्यांपैकी काही अनुभव पुढे तुम्हाला वाचता येतील. त्या अनुभवांवर विचार करता येईल.
अक्षरभूमी शाळेमध्ये शिकायला येणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलासोबतचा आमचा अनुभव इथे मांडतो आहे. एक दिवस शाळेत मुलांना मोबाईल वापरावर परवानगी नाही म्हणून आम्ही एका मुलाकडून मोबाईल घेतला तर, त्या मुलाने रागात येऊन जमिनीवर पडलेले बारीक दगडाचे तुकडेच खाल्ले. त्या मुलाकडून एकदमच अशी कृती झाल्यावर पुढे आम्हाला त्याचाशी काय बोलावे आणि काय नाही असे झाले.
दुसरा अनुभव एका बारा वर्षांच्या मुलासोबतचा. एकदा आम्ही मुलं पडीतमधून खेळत घराकडे येत होतो. रस्त्यात एक मुलगा आम्हाला मोबाईल खेळताना दिसला. आम्ही त्या मुलाला विचारलं, “मोबाईलमध्ये असं काय पाहतोय रे? खेळायला का नाही आला?” हे ऐकल्यावर लगेच त्याने हातातला मोबाईल जमिनीवर आपटून फोडला.
वरच्या दोन्ही घटनांमधून मला लक्षात आलं की मुलांच्या हातात कमी वयात असतानाच आलेल्या समाजमाध्यमांमुळे मुलं किती टोकाची हिंसक होत आहेत. आणखी येणाऱ्या काळात अशा मुलांच्या आयुष्यात नवनवीन माध्यमं आल्यावर त्यांच्या पालकांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागू शकेल याची कल्पना करता येत नाही.
यामध्ये दुसरा आणखी महत्त्वाचा प्रश्न दिवसेंदिवस डोकं वर काढतोय. तो म्हणजे फसव्या ॲप्लिकेशन्सचा बाजार! रमी सर्कल, A23, ड्रीम ११, यांसारख्या गेम ॲप्समुळे खेड्यामध्ये राहणारी आणि अपुरं किंवा मध्यम शिक्षण असणारी माणसं दररोज अडकत आहेत. सध्या मान्सून पुढे गेला असला तरी शेतीसाठी लागणाऱ्या डवरे, दुबा, वखरणी बनवणे आणि शेतीला उपयोगी साहित्य दुरूस्त करून शेतीमध्ये वापरासाठी तयार करण्याचा हा काळ आहे. मात्र गावामध्ये ड्रीम ११ वर कोण कोण किती जिंकलं आणि कोण आज किती पैसे हारलं याची चर्चा पहायला मिळते.
तिसरा आणि शेवटचा अनुभव मला इथे मांडावासा वाटतोय. काही महिन्यांपूर्वी बारावीत शिकणार्या मुलाच्या एका पालकाशी माझी भेट झाली होती. त्यांचं छोटं गॅरेज आहे. गाडी दुरूस्त करता करता मला ते गृहस्थ म्हणाले, “मुलाने माझ्यासोबत खूप वाद घालून एकोणवीस हजाराचा मोबाईल घेतला.” मी म्हटलं, “तुम्ही मुलाचं का ऐकता?” ते म्हणालेत, “अहो, तो बरोबरीचा झाला ना! मारेल!! म्हणून मला त्याचं ऐकावं लागतं.” पुढे ते म्हणाले, “आता मुलगा दिवसभर त्या मोबाईलमध्ये फ्री-फायरचा गेम खेळत राहतो. आणि महिन्याच्या शेवटी त्याला मोबाईल रीचार्ज करण्यासाठी पैसे नाही दिले तर मारायची धमकी देतो. काय करावं?” पुढे ते म्हणाले, “यावर्षी दोन एकरात आठ क्विंटल सोयाबीन झालं आन् वरतून पाऊस पाण्याचं असं फिरलेलं चक्र! मुलाच्या अशा वागण्यामुळे स्वतः घर अन् दुकान बंद करून पुण्याला कामासाठी जाण्याचा विचार करतोय.” हे ऐकल्यावर पुढे मला काही बोलता आले नाही.
या सगळ्या अनुभवांतून आदिवासी माणसासहित ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या पालकांचा प्रश्न समोर येतोय. मोबाईलचा अतिरेकी वापर आणि घरोघरी बिघडलेल्या मुलांच्या मोबाईल वापराच्या वास्तवाने घाबरून गेलेले पालक!! ही स्थिती सगळीकडे दिसते. शाळा, महाविद्यालये, मोठ्या संस्था, विद्यापीठांमध्ये ‘मोबाईलचा सकारात्मक वापर आणि त्याचा चागंला उपयोग’ अशा विषयावर अभ्यासक्रम काढण्याची तयारी करायला पाहिजे असं मला लेखामधून सांगावं वाटतं.!!
प्रत्यक्ष अनुभवलेली विदारक परिस्थिती मोजक्याच पण अचूक शब्दात अतिशय प्रभावीपणे मांडली आहेत. आपले आणि संपादकांचे अनेक आभार. Apps चे एवढे गंभीर परिणाम होत असतील याची अजिबात कल्पना नव्हती! काही प्रगतिशील व कल्पक शेतकरी मोबाईल फोन वापरून घरूनच शेतातला पंप सुरु करू शकतात हे वाचून आनंद झालेला आठवतो आहे – पण या दुष्परिणामांची अपेक्षा नव्हती!
कार्टून पाहू दिले नाही म्हणून हातपाय आपटून आक्रस्ताळेपणा करणारी मुले माहिती आहेत पण त्यांनी टीव्ही सेट फोडल्याचं ऐकलं नव्हतं! असो, पुनः एकदा धन्यवाद.
Mobile is an instrument, अवजार. कुणीही शेतकरी आपल्या लहान मुलाला कुदळ, कोयता यांच्याशी खेळू देणार नाही. त्याचा वापर कसा करायचा याचेही शिक्षण लागते. तसेच मोबाईल चा वापर कसा करायचा याचेही शिक्षण लहान मुलाला द्यावे लागते.
त्याच्या किंवा तिच्या हातात मोबाईल दिला, आणि तो वापरण्याचे स्वैर स्वातंत्र्य दिले की त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. यासाठी पालक आणि मुले यांच्या मध्ये जवळचे नाते हवे. फक्त धाक दाखवून मुलांवर योग्य ते संस्कार होत नाहीत. त्यासाठी मुलांना वेळ द्यावा लागतो. त्यांच्या मनात वाचन, खेळ याबद्दल आकर्षण वाटायला हवे. पण एवढा वेळ काढणे हे पालकांना ( शहरी किंवा ग्रामीण ) समजत नसावे,किंवा जमत नाही.
मुले मोबाईल किंवा सोशल मीडिया च्या आहारी जाणे हे कुटंब आणि समाज याचे मुलांवर योग्य ते संस्कार घडवून आणण्यात आलेले अपयश आहे.
साहेबराव, आपण स्मार्ट फोनमुळे लहान मुलांवर होणाय्रा परिणामांबद्दल सत्य घटनांवर आधारित चांगले विवेचन केले आहे. आज शहरीच नाही, तर ग्रामीण भागातही एक किंवा दोनच मुलं असतात. त्यामुळे त्यांचे अती लाड होऊन ती मुलं बिघडत असतात. शिवाय पालकांना आपल्या मुलांना आवश्यक वेळही देता येत नाही. त्यामुळे पूर्वी टिव्हीला चिकटलेली असायची, आणि आता मोबाईलला. पण त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडत आहे ही गोष्ट सत्य आहे. पण पालकही हतबल झालेले आहेत.