कृत्रिमप्रज्ञा या विषयावर काही तज्ज्ञ विचारवंतांनी धोक्याची सूचना दिली आहे. जसजशी कृत्रिमप्रज्ञा प्रगत होत जाईल तसतशी मानवी मेंदूची अधोगती होईल. प्रज्ञा या मूळ विषयाचा गाभा माहिती नसलेली पिढी केवळ संगणकाच्या सहाय्याने कामे करू लागतील. संपूर्ण समाज कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. कोरोनाच्या धोक्यापेक्षा किंवा अणूयुद्धाच्या धोक्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. मेंदूचा ताबा कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. OpenAI ही कृत्रिमप्रज्ञेवर संशोधन करणारी संस्था आहे. ChatGPT आणि DALLE/2 अश्या कंपन्यांसोबत आता मायक्रोसॉफ्ट कंपनी जोडली गेली आहे. रोबोटिक्स प्रणालीने तंत्रज्ञान जेवढे विकसित केले त्यामुळे अमर्याद बेकारांचे लोंढे तयार झाले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ॲलॉन मस्क साहेबांनी कृत्रिमप्रज्ञेचे हत्यार मानवसमाजाच्या सक्षमीकरणासाठी निर्माण केले असा जरी दावा केला असला तरी त्यामुळे मानवी मेंदूचे निर्मूलनच होणार आहे.
मानवी मेंदूची कार्यपद्धती ही Endocrine system (अंतस्रावी प्रणाली) शी जोडलेली आहे. त्यांत अनेक Endocrine glands चा (अंतस्रवी ग्रंथी) परस्परसंबंध जोडलेला आहे. Pituitary gland, Thyroid gland, Adrenal glands, यांपासून निर्माण होणारी संप्रेरके व त्यांचा मानवी मेंदूत सहभाग ही महत्त्वाची योजना निसर्गनिर्मित आहे व सततच्या अभ्यासाच्या सरावाने ती विकसित होत जाते. मेंदूचे विविध भाग यात भाग घेत असतात. Hypothalamus, Hypophysis, Pineal Body यांसारख्या अनेक भागांतून Growth Hormones, Oxytocin, Acetylcholine, Epinephrine, Prolactin सारखी संप्रेरके तयार होत असतात व त्यांवर संवेदी मज्जातंतूंचा (Sensory Nerve) ताबा असतो. ही संप्रेरके रक्तात प्रवाहीत होत असतात व त्यावर मोटर मज्जातंतूंचा ताबा असतो. संपूर्ण मज्जासंस्था ही संलग्न आहे. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरासाठी हे सर्व अभ्यासण्याची गरज भासणार नाही, फक्त की-बोर्डचे ज्ञान पुरेसे आहे. संगणकात भरल्या गेलेल्या विदेवर निर्धारित कामे पुरी होऊ शकतात. अशा परिस्थितीत मग मेंदू कार्यक्षम राहील काय?
गर्भधारणेसाठी बिजांड लागते व त्याच्या तयारीसाठी गर्भाशय नियमितपणे Corpus Luteum गर्भाशयाचा अंतस्तर तयार करते. आता जर कृत्रिमप्रज्ञेच्या चकतीच्या (Chip) सहाय्याने Corpus Luteum तयार होऊ लागले तर संपूर्ण अंतस्रावी प्रणालीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल व संपूर्ण ग्रंथीमध्ये बदल घडत जातील. गुणसूत्रांवर याचा परिणाम होऊन अनुवांशिकतेत बदल घडत जातील याचा विचार कृत्रिमप्रज्ञा विचारवंतांनी केला पाहिजे. या धोक्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. स्त्रियांमध्ये शारीरिक बदल होऊ शकतात. पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची कमतरता किंवा अशक्तपणा असेल तर कृत्रिमप्रज्ञेच्या चकत्यांमार्फत कदाचित सशक्त Testosterone (लैंगिक संप्रेरक) तयार होईलही. पण त्यातून निर्माण होणाऱ्या भावी पिढीतील घातक संक्रमणाची जबाबदारी कोण घेईल? आपल्या शरीरातील अनेक पेशींमध्ये Prostaglandins तयार होत असते. कृत्रिमप्रज्ञेच्या अमर्याद वापराने सर्व शारीरिक प्रक्रिया बदलतील आणि संप्रेरकेनिर्मितीचे कार्य थांबेल किंवा बदलेल. त्यातून नवनवीन आजारही उत्पन्न होतील. त्याला जबाबदार कोण असेल? सर्व संप्रेरके ही प्रथिनांपासून (Peptides, Amino Acids) बनतात. कृत्रिमप्रज्ञेमुळे अन्नसाखळी प्रक्रियेत काय बदल घडतील यावर संशोधन होणे आवश्यक आहे. भविष्यात घडणारे बदलांचे अनुमान कृत्रिमप्रज्ञादर्शक आहे. Polycystic Ovary हा हॉर्मोन असंतुलनाचा (Hormonal Disorder) सर्वसामान्य प्रकार आहे. कृत्रिमप्रज्ञा या अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर उपाय शोधेलही; पण त्यातून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सच्या गोंधळाची जबाबदारी ती घेईल का?
कृत्रिमप्रज्ञेच्या क्रांतीच्या पोटात अधोगती दडलेली आहे असे वाटते.
ही बाजू जेवढी खरी आहे तेवढाच क्रांतिकारक फायदाही कृत्रिमप्रज्ञेमुळे होत आहे. कृत्रिमप्रज्ञा आता सर्व क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहे आणि यशस्वीही होत आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कंबरेला दुखापत होते वा डोक्याला इजा होते किंवा उच्चरक्तदाबामुळे अर्धांगाचा झटका येऊन लकवा येतो तेव्हा त्या व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर नैराश्य येते. अशा संकटात कृत्रिमप्रज्ञा मदतीला धावून येते. आपली चालण्याची वा धावण्याची क्रिया मेंदू व मज्जारज्जूच्या सहाय्याने होत असते. पण वर उल्लेख केलेल्या मेंदू वा मज्जारज्जूच्या दुखापतीमुळे त्यांत विसंवाद निर्माण झाला तर या अर्धांगवायूवर उपचारासाठी आपल्याला मज्जातंतू विशेषज्ञाकडे धाव घ्यावी लागते. आता कृत्रिमप्रज्ञेच्या संशोधनामार्फत डिजिटल पूछ बांधून मेंदू व मज्जारज्जू (Spinal Cord) यांमध्ये सुसंवाद करून पुनर्स्थापित केले जाते. या लकव्यामुळे कधीकधी दोन्ही हात व दोन्ही पाय लुळे पडतात. अशा वेळी कृत्रिमप्रज्ञेचे संशोधन कामी येते. रोगी नैसर्गिकरीत्या आपल्या पायावर उभा राहू शकतो वा चालू शकतो. आपल्या मेंदूवर संरक्षणासाठी तीन आवरणे असतात व तशीच तीन आवरणे मज्जारज्जूवरही आसतात. त्यामुळे मेंदू व मज्जारज्जूमध्ये संदेशवहन होते. पण या आवरणाला दुखापत झाल्यामुळे संदेशवहन बंद होते. परिणामी अर्धांगाचा झटका येतो. एका सेन्सरच्या मज्जारज्जूमध्ये रोपण करून हा संवाद पुनर्स्थापित केला जातो. मेंदू वा मज्जारज्जूच्या पेशी एकदा मृत झाल्या तर त्या पुन्हा निर्माण होत नाहीत. अश्यावेळी हा सेन्सर परमेश्वरासारखा धावून येतो. हा सेन्सर मज्जारज्जूमार्फत आता मेंदूला आज्ञा देऊ लागतो व रोगी हळूहळू पूर्ववत चालू लागतो. पण हे समजण्यासाठी मेंदू, मज्जारज्जूच्या क्लिष्ट व गुंतागुंतीच्या कार्यप्रणालीचा सूक्ष्म अभ्यास असणे आवश्यक आहे. त्या सेन्सरच्या क्षमतेचा, कालमर्यादेचा, शरीरावर होणाऱ्या इतर परिणामांचा अभ्यास होणे जरुरीचे वाटते. आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये होणारे संभाव्य परिणाम अभ्यासावे लागतील.
कृत्रिमप्रज्ञेने अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे आणि ती स्तुत्यही आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक गुंतागुंतीच्या व क्लिष्ट प्रश्नांची त्यामुळे उकल झाली आहे. रुग्णाच्या आपत्कालीन व आकस्मिक परिस्थितीमध्ये औषधोपचार वा शस्त्रक्रियेत कृत्रिमप्रज्ञेच्या मदतीने प्राणही वाचू शकतो. कृत्रिमप्रज्ञा आज आरोग्यसेवेचा एक अविभाज्य भाग झाली आहे. साठवलेल्या डिजिटल विदेचे (माहिती) विश्लेषण करून आज रुग्णाच्या रोगाचे अचूक निदान करता येते. CT Scan, MRI, क्ष-किरण विश्लेषण यांचे परिणाम तात्काळ मिळतात. हा जसा फायदा आहे तसेच कृत्रिमप्रज्ञेचे काही तोटे व मर्यादासुद्धा आहेत. जो रुग्ण कोणत्याही उपचारपद्धतीला प्रतिसाद देत नाही अशा रुग्णावर जर कृत्रिमप्रज्ञेकडे विदा नसेल तर डॉक्टरच्या ज्ञानाचाच उपयोग होतो. सर्व संभाव्य रोगांवर, त्या रोगांच्या उत्परिवर्तनातून (mutation) निर्माण होणाऱ्या नव्या रोगांवर अजून विदा उपलब्ध नाही. कोविडचे ज्वलंत उदाहरण आपण आज पहात आहोत. जर विषाणू उत्परिवर्तनामुळे उद्भवणारे रोगांचे निदान निव्वळ कृत्रिमप्रज्ञेवर अवलंबून ठेवले आणि त्याची विदा अपूर्ण असेल तर दुर्धर प्रसंग ओढवतील. अशावेळी व्यक्तिगत प्रज्ञाच उपयोगी पडेल. अशामुळे कृत्रिमप्रज्ञा हे दुधारी शस्त्र वाटते.
रेडीयम अपार्टमेंट, श्रेयस कॉलनी, गोरेगांव
Ashok Samant I know you from college days, you Re really genius your imaginations and level of thinking is superb
Thank you