डिसेंबर २०२२ पासून जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजेच एआयची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. त्याला कारण आहे कृत्रिमप्रज्ञेचा नवा अवतार. यंत्रमानव हा तसा जुना प्रकार आहे. त्यावर अनेक चित्रपटही आले. मायक्रो चिपमधील प्रोग्रामिंगनुसार आधीच देऊन ठेवलेल्या सूचनांप्रमाणे ठरलेली कामे करणारा यंत्रमानव आपण पाहिलेला आहे. पण प्रोग्रामिंगमध्ये दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळी परिस्थिती उद्भवली तर विचार करून वेगळा निर्णय घेत त्याची कार्यवाही करणारा परिपूर्ण यंत्रमानव अद्याप बनलेला नाही. यंत्रमानव बनवणे हे प्रकरण खर्चिक आहे. सध्या सुरू असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा यंत्रमानवापेक्षा फारच वेगळी आहे. मानवी मन, त्यातील भावभावना, संगीत, चित्रकला, साहित्य प्रसवण्याची मानवी मेंदूची सर्जनशीलता याची बरोबरी करणारा यंत्रमानव बनवणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावर शास्त्रज्ञांनी मानवी मेंदू जे करू शकणार नाही ते करून दाखवण्याकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोर्चा वळवल्याचे दिसत आहे.
इंटरनेटच्या व्यापक वापरामुळे ग्राहकांच्या विशिष्ट सवयींपासून ते त्यांच्या इतर शारीरिक ठेवणीची जी अफाट माहिती इंटरनेट आधारित कार्यक्रम व सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे गोळा झालेली आहे, ती या नव्या स्वरूपातल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया असावा.
चॅटजीपीटी नावाचे ॲप जी सेवा आज पुरवत आहे त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केली आहे. माणसाच्या मेंदूला जे लिखाण वाचायला कदाचित एक वर्ष लागेल असे लिखाण क्षणात समजावून घेऊन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे चॅटजीपीटीद्वारे मिळवली जात आहेत. हे ॲप एखाद्या व्यक्तीप्रमाणे समोरच्या माणसाशी संवाद साधते. विशिष्ट व्यक्तीशी पूर्वी साधलेल्या संवादाचा संदर्भ लक्षात ठेवते. तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर निबंध लिहून देते. परिस्थितीचे वर्णन केल्याप्रमाणे तुम्हाला पत्र लिहून देऊ शकते.
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे काही लाख ह्रदयरोगी रुग्णांच्या तसेच ह्रदयरोग नसलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांतील रक्तवाहिन्यांचा आणि दृष्टिपटलाचा अभ्यास करून ठेवल्यावर तुमच्या डोळ्यातील रक्तवाहिन्या व दृष्टिपटल तपासून तुम्हाला ह्रदयरोग असण्याची कितपत शक्यता आहे हे सांगता येऊ शकते. गाण्याच्या चालीनुसार संगीत बनवले जाऊ शकते. आपल्याला हवे तसे चित्र काढून मिळू शकते. हा वापर आधीच सुरू झाला आहे असे समजते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अशा वापरामुळे ग्राहकसेवा पुरवणाऱ्या आस्थापनांमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माणसांची गरज उरणार नाही. कंपनीचे ग्राहक काय काय संभाव्य प्रश्न विचारू शकतात हे व त्याची उत्तरे आधीच नक्की करून ठेवली तर माणसांची गरजच काय?
कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुन्हेगारी स्वरूपाचा वापर होऊ शकतो. हिटलरचे विचार साने गुरुजींच्या आवाजात, साने गुरुजींसारखीच दिसणारी व्यक्ती बोलते आहे असे व्हिडीओ पुढील काळात समोर आले तर आश्चर्य वाटायला नको. महात्मा गांधी, साने गुरुजी आणि अशाच इतर मानवतावादी व्यक्तिमत्वांचे वेगळेच व्यक्तिचित्रण नव्या पिढीसमोर ठेवायचे काम कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे होऊ शकते. हा विषय अफाट आहे. पुढील काळात यामुळे माणसाचे जगणे बदलणार आहे. पारंपरिक मूल्यांना धक्के बसणार आहेत. नैतिकतेचे नवे प्रश्न निर्माण होतील. माझ्यासारख्याला या विषयात आणखी अभ्यास करण्याची गरज जाणवत आहे. हा विषय टाळून आता कुणालाही पुढे जाता येणार नाही हे इतर काहीजणांप्रमाणे माझ्याही लक्षात आले आहे.
नजीकच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ठरावीक साच्यातील कामे करणाऱ्या, थोडक्यात निव्वळ सांगकाम्या लोकांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे. काही नव्या स्वरूपातील रोजगार निर्माण होण्याचीही शक्यता आहे. ते रोजगार मिळवायचे तर काही विशिष्ट आणि नवी कौशल्ये तुमच्याजवळ असावी लागतील. मानवी मेंदूची जी सर्जनशीलता आहे, कल्पकता आहे त्यातून नवनिर्मिती होऊ शकते. तिला कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजतरी पर्याय होऊ शकत नाही. माणसाला खाण्यासाठी लागणारे धनधान्य मातीतून पिकते त्यालाही काही पर्याय आजतरी नाही. पण मातीतून एका दाण्याचे हजार दाणे बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी आणि खात्रीची बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साहायक होऊ शकते. इतर क्षेत्रातही असे सकारात्मक बदल होऊ शकतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला किती मोकळे रान द्यायचे, कुठल्या क्षेत्रात ते वापरायचे आणि कुठल्या क्षेत्रात वापरायचे नाही याची चर्चा जगभर सुरू आहे. अर्थात त्याचा वापर पूर्णपणे थांबवणे कुणालाही शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या मायावी जगात टिकून रहाण्यासाठी आपण काय काय तयारी करावी हा विचार तरुणाईनं करणे गरजेचे आहे. पण आजच्या बहुसंख्य तरुणाईला हा विषय माहीत तरी असेल का? संध्याकाळी कुणीतरी कुणाचा तरी फोटो स्टेटसला ठेवणारे आणि त्याच्या विरोधात दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दगड हातात घेऊन रस्त्यावर उतरणारे हे दोघेही या नव्या आव्हानाचा मुकाबला करू शकतील का? त्यांनी दगड हातात घ्यावेत व कुणाच्या तरी विरोधात सतत विष पेरत राहावे म्हणून डोके चालवणारे मात्र स्वतः सुरक्षित राहत या नव्या जगात सुखाने जगण्याचे नियोजन करत आहेत. एकीकडे बहुजनांच्या पोरांना दंगलीत उतरवून, त्यांचे करिअर बर्बाद करून दंगल घडवणारे मेंदू सामाजिक सलोखा संपवत आहेत. आणि त्यांची मुले मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता कवेत घ्यायला, आपले जीवन सुखकारक बनवायला परदेशाचा रस्ता धरत आहेत. बहुजनांच्या पोरांनी ही खेळी ओळखली पाहिजे.
तरुण मित्रांनी हातातला दगड आता खाली टाकायला हवा. हा नेहमीचा हिंदू-मुसलमान खेळ सोडायला हवा. चुका करणाऱ्या व्यक्ती सर्वच समाजात असू शकतात. जी व्यक्ती चुकली तिला ती चुकली असे स्पष्ट सांगूया. व्यक्तीला सुधरवण्याचा प्रयत्न करूया. तिची चूक मोठी असेल तर कायद्याच्या यंत्रणेने आपले काम करावे हा आग्रह धरूया. पण साध्या साध्या गोष्टीवरून एखाद्या संपूर्ण समाजाला दोष देणे थांबवूया. विशिष्ट समाजाबद्दल विष पेरणे थांबवूया. इकडच्या आणि तिकडच्याही आपल्या पूर्वजांनी सतत विचार करत, नव्याचा ध्यास घेत मानवी उत्क्रांतीचा प्रवास इथवर आणला आहे. त्यातून माणसाचे जगणे समृद्ध झाले आहे. आपण आपल्या प्रयत्नांमधून त्यात भर घालणे अपेक्षित आहे. ते करायचे तर आपल्यातले जे आपणच तयार केलेले भेद आहेत ते विसरावे लागतील. धर्म, भाषा, प्रांत याच्या चक्रव्यूहात अडकून पडू नये. अपघाताने मिळालेल्या धर्माचा, जातीचा अहंकार आपल्यातल्या कल्पकतेला, नवनिर्माणाला मारून टाकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात टिकून रहायचे असेल तर यापुढे आपल्याला निखळ माणूस म्हणूनच विचार करावा लागेल.
पूर्वप्रसिद्धी – प्रजापत्र बहुरंग, जून २०२३
18 जून 2023पूर्वप्रसिद्धी – प्रजापत्र बहुरंग
श्री. सुभाषजी आपण आपल्या लेखात सुरुवातीच्या परिच्छेदात कृत्रिम बुध्दिमत्तेसंबधात चर्चा केलेली आहे, त्यांतिल मुद्दे या अंकातील इतर लेखातही आले आहेत. पण आपण शेवटच्या दोन परिच्छेदात आपल्या देशातिल तरुणांना दिलेला इशारा व हिंदू-मुस्लीम वाद यासंबंधात केलेल्या विवेचनाची सांगड कृत्रिम बुध्दीमत्तेशी घालताना नीट स्पष्टीकरण केलेले नसल्याने एकदम मूळ विषयाला कलाटणी दिल्यासारखे वाटते. तरुणांचा या संबंधात नक्कीच गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आगोदरच हा विषय गहन असून बहुतांश तरुणाई या विषयात अनभिज्ञ आहे. आपणच तसा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्या संबंधात नीट स्पष्टीकरण होणे गरजेचे होते असे मला वाटते.