जातिसंस्थेला व स्पृश्यास्पृश्यतेला खऱ्या अर्थाने मूठमाती द्यावयाची असेल तर शूद्र-अतिशूद्र ह्यांच्याकडे परंपरेने आलेल्या कष्टकरी व्यवसायांना व श्रमनिष्ठ जीवनाला प्रतिष्ठा व सन्माननीय उत्पन्न मिळवून देणे अगत्याचे आहे. प्रत्येकाला उच्चशिक्षित पांढरपेशा जीवनशैलीत प्रवेश मिळाला तर जन्माधिष्ठित जातपात कदाचित उखडली जाईल, पण शूद्र, अतिशूद्र नव्या स्वरूपात कायमच राहतील. तसेच बहीण-भावंडवृत्ती जर जीवनाची बैठक नसली, तर शोषण, अन्याय, दडपणूक ह्यांना कधीच आळा घालता येणार नाही.