आजचा सुधारकात माझे मित्र डॉ. किशोर महाबळ यांनी ‘१३ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर मार्मिक लेख लिहिला. त्यानंतर इंडिया टुडे या (मूळ पाक्षिकातून आता साप्ताहिक झालेल्या) प्रकाशनाने निवृत्तिपूर्वी दोनच दिवस आधी दिलेल्या खास मुलाखतीच्या आधारे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर एक विशेष लेख लिहिला. त्याही पूर्वी महिलावर्ग आणि महाराष्ट्र प्रदेश यांचा एकसमयावच्छेदेकरून उद्धार करण्याच्या उदात्त उद्देशाने जेव्हा सौभाग्यवती प्रतिभा देवीसिंग पाटील (शेखावत) यांचा नामोल्लेख करण्यात आला तेव्हाच या नियतकालिकाने ‘चिंत्य निवड’ अशा आशयाचा लेख छापला होता. आता आठवड्यापूर्वीच्या (८.८च्या) अंकात या साप्ताहिकातच आलेल्या पूर्वीच्या डझनभर राष्ट्रपतींच्या कार्याच्या मूल्यमापनाच्या अंशतः आधारे हा मजकूर व ह्या आठवणी लिहीत आहे.
आधी थोडे आकडेह्रआणि वर्गवारी हह्न १९५२ पासून पुढील ५५ वर्षांमध्ये आले-गेलेले १३ राष्ट्रपती आपल्या या प्रचंड देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांतून आणि पंथोपपंथांतून आले हे लक्षणीय आहे. प्रथम राष्ट्रपती भारतातून आद्य सम्राट् घडवणाऱ्या मगध (आताचा बिहार) प्रदेशातले होते (ते दोन वेळा त्या पदावर राहिले). क्रमाने तिसरे पण व्यक्तिशः दुसरे, चौथे व सहावे (मजेदार क्रम!) हे दक्षिणेतील सर्वांत मोठ्या (आंध्र) प्रदेशातील. तिसरे उत्तर भारतीय तर पाचवे सुदूर पूर्वेतील अहोमिया (आसामी), सातवे पुन्हा उत्तरेतून, आठवे आणि बारावे तमिळभाषी, नववे मध्य-भारतीय (भोपाळचे) आणि दहावे केरळीय होते. पंथोपपंथाचा विचार केल्यास पहिले कायस्थ, दुसरे ब्राह्मण, तिसरे इस्लामी, चौथे खम्मा, पाचवे पुन्हा मुस्लिम, सहावे रेड्डी, सातवे सिक्ख, आठवे व नववेही ब्राह्मण, दहावे दलित आणि अकरावे पुन्हा मुसलमान, (पण रामेश्वरचे) अशी विभागणी आहे. आतापर्यंत ‘इन हार्नेस’ म्हणजे अधिकारपदावरच प्राण सोडणारे दोघेही योगायोगाने महंमदीय होते हे लक्षणीय. मुख्यतः व्यक्तिगत परिचयांतून जाणवलेले त्यांचे स्वभावविशेष व काहीसे मूल्यांकन करण्यापूर्वी आणखी एका दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. या डझनापैकी अर्धे उमेदवार उपराष्ट्रपतिपदावरून चढले आहेत व माझ्यावर लोभ करणारे आमच्या काशी (हिन्दू विश्व विद्यालय) कुलगुरु डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णांपासूनच हा सिलसिला सुरू झाला, (तेसुद्धा २ डाव उ.रा.प.होते!). नंतरचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जाकिर हुसेन, मजूर पुढारी (बहुप्रसू) श्री वराहगिरि वेंकट गिरी, मद्रासचे पूर्व (यशस्वी) उद्योगमंत्री श्री व्यंकटरामन्, पूर्वीच्या इवल्याशा (‘क’वर्ग) भोपाळ राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरदयाळ शर्मा, विदेशसेवेतून उचलले गेलेले श्री नारायणन् हे सर्व (राष्ट्रपतींपैकी अर्धे) उपराष्ट्रपतिपद भूषवल्यानंतरच राष्ट्रप्रमुख (सर्वोच्च सेनादलप्रमुख इत्यादि) झाले. (या मुद्द्याकडे आतापर्यंत विवेचकांचे पुरेसे लक्ष गेले नाही.) योगायोगाने या दशकांतील अनेकांचा परिचय, संपर्क व लोभही मला मिळू शकला हा आतापर्यंतच्या सत्याहत्तरीतला एक विलक्षण सुखद अनुभव व अहोभाग्य आहे असे मला प्रारंभीच नम्रपणे नमूद केले पाहिजे.
पाटण्याकडचे मेधावी विद्यार्थी व बहुश्रुत विद्वान्, गांधी झपाटलेले, तरी पंडित नेहरू-ग्रस्त नसलेले डॉ. राजेंद्रप्रसाद उर्फ ‘बाबूजी’, यांची दृष्टभेट होण्यापूर्वीच बनारसला दर्शन-एम.ए.-विद्यार्थिकाळात मी बिहारच्या सखोल दौऱ्यांत ‘सदाकत’ आश्रमाला भेट दिली होती. (संस्कृतव्याप्त असल्यामुळे ‘सदा+कताई’ करणारा आश्रम हा अर्थ चुकीचा असून ‘सदाक़त’ म्हणजे ‘सत्याचा’ आश्रम हे मला तिथे कळले!) बाबूजींचा जयजयकार ऐकत ऐकतच परतलो होतो.
पुढे संविधानातील भाषाविषयक तरतुदीच्या पूर्वतयारीला (लाहोरहून नागपूरला निर्वासित झालेले) डॉ. रघुवीर समग्र ‘सरस्वती-विहारा’सह आम्हाला नवी दिल्लीतल्या ‘क्वीन्सवे’ (आता राजपथ) वरील आपल्या बंगल्यात घेऊन गेले व घटनासमितीचे खास प्रवेशपत्र देववून इतर सदस्यांचे मतपरिवर्तन करीत असताना साहजिकच अध्यक्षांची गाठ पडली ह्न व रोजच होत राहिली, १४.९.४९ ला देवनागरीत हिंदी ही अधिकृत भाषा मंजूर होईपर्यंत बाबूजी व पू. बाबासाहेब नित्य भेटायचे.
पण या भेटीगाठीत मोजके, जुजबी, कामापुरतेच बोलणे व्हायचे. घसट अशी पैदा झाली नाही. पुढे माझ्या भारत शासनाच्या पहिल्या नेमणुकीत, शिक्षा मंत्रालयाच्या ‘हिंदी निदेशालया’त रसायनाची शब्दावली बनवताना तज्ज्ञसमितीचे सभापती बिहारचेच डॉ. फूलदेव सहाय वर्मा असल्याचे आढळले. त्यांनी विचारले “भई काटे, आप अपने बाबूजी से मिलते जी, कहाँ मैं अदनासा टेक्निकल रिसर्च असिस्टंट, सबसे कम वेतनपर सबसे अल्पाय, शब्द गढाऊ और कहां वे विश्वके सबसे बड़े प्रासाद में सबसे बड़े गणराज्य के कर्ताधर्ता?’ ते हसून म्हणाले, “मैं वहीं ठहरता हूँ।, परसों नाश्तेपर आओ, मिलवा दूंगा।” अशा खास वशिल्याने मी पहिल्यांदा ‘राजेंद्र’ दरबारांत रुजू झालो आणि मग भेटीगाठी होत राहिल्या. (विक्षिप्त वार्ताकार श्री. पु.ना.ओकांच्या पंचवर्षीय पुत्राप्रमाणे मीही त्यांच्याशी पुष्कळदा संस्कृतात बोलत असे). पुढे लोकसभेच्या नवनिर्मित रिसर्च रेफरन्स’ शाखेत पहिलाच संशोधन अधिकारी म्हणून लागल्यावर (दुसरे माझे मित्र विधानतज्ज्ञ श्री सुभाष कश्यप) तर आणखी अनेक अवसर येत राहिले.
इंडिया टुडेच्या संक्षिप्त टिप्पणीत ‘पंडित नेहरू से गहरे मतभेद, फिर भी दुबारा राष्ट्रपति’ असा मार्मिक उल्लेख आहे. एकदा संसदभवनात पंडितजींनी ‘तातडीच्या कामात’ कै. दादासाहेब मावळंकरांना पाचारण केले. असता सभाध्यक्षांनी त्यांना लोकसभा-चालरीत सांगितली तेव्हा (लागलीच दिलगिरी दर्शवून) नेहरूंनी स्वतः त्यांच्या कक्षात प्रवेश केला. असा प्रकार वारंवार होत असे. संविधानातसुद्धा ‘कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स’ म्हणजे मंत्रिमंडळांच्या सल्ला-सूचनेवरून राष्ट्रपतीने कार्य करावे असे असता, पंडितजी पुष्कळदा ‘एक’मताने अनेक निर्णय घेऊ पाहत. विशेषेकरूनह्नआणि अत्यंत दुर्दैवानेहहिंदू समाजात कायमचे व हितकारी परिवर्तन घडवण्यासाठी जे ‘हिंदू कोड बिल’ बाबासाहेब (टप्प्याटप्प्याने का होईना) आणू पहात होते त्या सबंध लाभकारक प्रक्रियेवर ‘राजर्षि’, ‘गरवी-गुजराती’ अशा ‘भूत’बाधित सनातन्यांशी बाबूजींनी जवळीक केल्यामुळे अनेक खटके उडाले व परिणामतः देशाचे व बहुसंख्य समाजाचेह्नअर्थात् हिंदूंचेह्ननुकसानच झाले. व्यक्तिशः निगर्वी असूनही वेळोवेळी उफाळणाऱ्या हठधर्मितेमुळे ही हानी झाली.
प्रथम-राष्ट्रपति या नात्याने नवे पायंडे पाडताना डॉ. ज्ञानवती दरबार या भारदस्त नावाच्या महिलेला भवनाची ‘महिला स्वागतिका’ अशा काहीशा पदावर नियुक्ती केल्यामुळे तीही गोष्ट दिल्लीतल्या दरबारी कुचाळक्यांचा विषय झाली. (त्यांचा व यांचा पत्रव्यवहारही प्रकाशित झाला असे ऐकतो.) आमची अंतिम व्यक्तिगत भेट मी लेखापरीक्षा सेवेच्या रेल्वे’ हिशेब प्रशिक्षणासाठी ५५ साली पुन्हा दिल्लीला आलो असता झाली, तेव्हा असे जाणवले की राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती (अर्थात राज्यसभापती) यांचा असावा तसा (म्हणजे आदर्श स्थितीत अपेक्षित) ताळमेळ होत नसावा. विशेषतः पं. नेहरूंचे आडमुठे भाषाधोरण, देशाबाहेरील प्रतिमाचिंता, अतिरिक्त रूसधार्जिणेपणा अशा काही व्यक्तिवैशिष्ट्यांमुळे जे काम करण्यासाठी मला पहिल्यांदा मुळात लोकसेवा आयोगाने निवडले व मौलाना शिक्षणमंत्र्यांनी नेमले त्या कामाचीही गती फार संथ व चिंतनीय होती हह्न आणि राष्ट्रपती बाबूजींनाही ही गोष्ट खटकत होती.
अजूनही इंग्रजीचा वरचष्मा आहेच, हे त्यांच्या आत्म्यालाही डांचत असेल!
क्रमाने तिसरे पण नामाने दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक अचाट, अफाट, अफलातून व्यक्तिमत्त्व होते. शताब्दिसमयी विशेष खटपट करून नागपूरच्या आंध्र असोसिएशनमध्ये मी ज्यांचे भाषण करविले (डॉ. राघवनच्या जोडीने) ते महापंडित डॉ.नी.र.व-हाडपांडे ह्यांनीच. अगदी प्रथम त्यांनीच त्यांचा परिचय आम्हाला घडवला. १९४१-४६ या माझ्या मॉरिस-छात्रकाळात मशारनिल्हे महापंडित त्या महाविद्यालयाच्या व्यायामशाळेत (!) आम्हाला दृश्यमान व श्रवमान झाले. त्यांच्या अत्युच्च व खास तेलगू हेलांत बोललेल्या आंग्लभाषेचे पुरेसे आकलन झालेच नाही पण संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे मथितार्थ नक्कीच समजला.
पुढे नागपूरहून पाच वर्षांत सहा वर्षांचा अभ्यास संपवून काशी हिंदु विश्वविद्यालयामध्ये संस्कृत आचार्य या पदवीसाठी प्रयास करण्यास गेलो असता (बंगाली) राजकारणामुळे विशेषवृत्ती (फेलोशिप) न मिळाल्याने दर्शन एम.ए. कडे वळलो. महामना मदन मोहन मालवीयांनंतर कुलगुरुनिवासात डॉ. स. राधाकृष्ण (माझ्या पदवीपत्रावर अशीच सही आहे) यांचे दर्शन घेतले. दोन खरोखरीच महान पुरुषांना लागोपाठ भेटून धन्य धन्य वाटले. दोन वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमात मधूनमधून तत्त्वज्ञान विभागात ते डोकावत असत. पाहुणे आल्यावर (त्यांच्यासह) ज्ञानामृत पाजत आणि एकंदरीतच ‘कुलगुरु आपले गुरुही आहेत असे जाणवे.
तिथला एकच कठीण प्रसंग वर्जून नंतर राजकीय कामगिरीकडे वळतो. मालवीयजी निवर्तल्याबरोबर बी.एच.यू.मधील हिंदी ‘लॉबी’ने विद्यापीठ ‘कोर्टा’त एक अजब ठराव पारित केला. वर्तमान कुलगुरु आल्यापासून सर्व विभागात ज्येष्ठ पदांवर दाक्षिणात्यांचा भरणा केला जात आहे. म्हणून डॉ. राधाकृष्ण यांना ताबडतोब हटवावे असा तो प्रस्ताव होता. (वस्तुतः नेहमीच्या उ. भारतीय भ्रमान्वये मराठी-भाषिकांनाही तिथचे सर्व ‘दक्षिणी’च मानायचेगह्नपण तो आताचा विषय नाही.)
साहजिकच सर्वपल्लीजी संतापले. १९४२ च्या अत्यंत बिकटप्रसंगी (विश्व विद्यालयात बॉम्ब वगैरे बनवल्यामुळे) ब्रिटिश सैनिकी तोफांद्वारे विद्यापीठ उद्ध्वस्त होण्यापासून (थेट विलायतेत वशिला लावून) हवाचवण्याचे जे महत्कार्य डॉ.राधाकृष्णांनी केले होते ते पूर्णतः विसरले गेले! तावातावाने “मी आत्ताच निघालो’ अशा रुद्रावतारांतील कुलगरुजींना विभागाध्यक्ष डॉ. भिखनलाल आत्रेय, मी व इतर विद्यार्थ्यांनी (माझे सहाध्यायी नारायणशास्त्री द्रविड वगैरे) अक्षरशः पाय धरून पटवून, दिले की अशा रीतीने ते काशीवास सोडून जाऊ शकत नाहीत. अखिल भारतीय ‘फिलॉसॉफिकल काँग्रेस’चे अधिवेशन काशीला बोलावून त्यांची अध्यक्षता भूषवून मगच त्यांनी पदत्याग करावा. सुदैवाने ते सर्व सुरळीतपणे घडून आले. (अप्पासाहेब उर्फ ना.सी.फडक्यांचा आचरटपणा, धूम्रपानाचा, सोडल्यास) आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
इंडिया टुडेचे रीडिंग आहे ‘पद को बौद्धिक आभा प्रदान की. राजनीतिक व्यवस्था से भी मिला सम्मान’. सर्व पाच कसोट्यांवर विधानमर्यादा, स्वतंत्रता, इमानदारी, कद (इंग्रजी stature) नई पहल, सर्वाधिक (संपादकमतैक्याने) श्रेय प्राप्त करून एकूण साऱ्या अकरा पदस्थांपैकी सर्वोच्च स्थान इंडिया टुडे ने माझ्या या गुरु-कुलगुरूंना दिले आहे.
उपराष्ट्रपती होण्यापूर्वी पं.नेहरूंच्या आवडत्या राष्ट्रप्रमुखाच्या सदरेवर यांना राजदूत म्हणून पाठवण्यात आले होते. (पंडितजीची सख्खी बहीण फारशी सफल न होऊ शकल्यामुळे!) अर्थात सर्वबृहत्तम सोविएत साम्राज्याचे सर्वेसर्वा योसिप वास्सालियोनोविच जुगाश्विली ऊर्फ स्टॅलिन या (लाखो देशबांधवाचे शिरकाण करवणाऱ्या) क्रूरकर्मा, हडेलहप्पी, अतिकठोर प्रशासकाचे राज्य त्यांनी जवळून पाहिले. त्यांचे ‘चालणे, बोलणे, सलगी करणे’ (रामदासी वळणात) इतके प्रभावी ठरले की स्टॅलिनची पत्नी निर्वतल्यानंतर एकटे राधाकृष्णच त्याचे गाल थोपटून गाल थोपटून (कदाचित गुच्चा ही घेऊन!) सहानुभूतीने सांत्वन करू शकले. युगोस्लावियात गेल्यावर त्यांनी तिथल्या विघटनवादी भूस्थितीवर (ग्राऊंड रिअॅलिटी) विदारक व्याख्या केली. हह्न पण ते सर्व येथे लिहायला वेळ व जागाही नाही. उपराष्ट्रपती असतानाही त्यांच्या पूर्वीच्या संकेताप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञान अध्यापनाच्या फेऱ्या चालू होत्याच. मे. अब्दुल कलामप्रमाणेच त्यांनी स्वाध्यायप्रवचन कधी सोडले नाही.
भारतीय राजकारणात सर्वांत प्रभावी दखलही राधाकृष्णांनाच घ्यावी लागली. त्याचा खास किस्सा काही मोजक्यांनाच माहिती आहे. श्री. पोट्टी श्रीरामुल नावाचे आंध्र नेते स्वराज्य मिळून पाच वर्षे होऊन सुद्धा भाषावार प्रांतरचना, विशेषतः मद्रास इलाख्यातून आंध्रभाषिकांची सुटका होत नाही म्हणून १९५२ मध्ये अन्नसत्याग्रहाला बसले. पूर्ण २ महिने उलटून गेल्यावरही त्यांच्या मागणीला कोणी भीक घालीना. अखेर डिसें. ५२ मध्ये ते ‘देवांना प्रिय’ झाले, म्हणजे दगावलेच! [एक छोटी नोंद, सेवाग्रामचे भंसाळी देखील ७३ दिवस उपवासावर होते पण तगले.]
तरीही भारताचे भाग्यविधाते मूग गिळून बसले. शेवटी आमच्या बाणेदार कुलगुरूंनीच पंतप्रधान व इतर मंत्र्यांना निर्वाणीची धमकी दिली की ‘आत्ता, अतिशीघ्र या हुतात्म्याची दखल घेऊन जर मद्रास प्रेसिडेन्सीमधील तेलुगूभाषी प्रदेश ताबडतोब वेगळा करण्यात आला नाही, तर मी कायमचा विलायतेत स्थायिक होईन आणि ऑक्सफोर्डमध्येच शिकवत राहीन.’
अखेर, लाजे-शरमेस्तव कश्मीरी (व इतर) हटवाद्यांनी हार मानली आणि १९५३ च्या गांधी जयंतीला (२.१०.५३) आंध्राचा उदय झाला. नवी दिल्लीच्या हैद्राबाद हाऊसमध्ये सतरंज्या-पत्रावळीवर जोरदार पंगत सजली (अस्मादिकांसह) तीन उपराष्ट्रपतींच्या सुनांनी वाढप केले. स्वतः राधाकृष्णांनी समाचार घेतला (मला म्हणाले इथे कसे काय ?’ तर मी सांगितले ‘सर आता मी अखिल भारतीय सेवेत आलो आहे व माझे प्रशिक्षण आंध्र ए.जी.तच होणार आहे!) तोपर्यंत हैद्राबाद मात्र संलग्न नव्हते.
राजदूत असतांनाच्या काळात जरी रशिया-युगोस्लाव्हियामध्ये राधाकृष्ण राहिले तरी चीनच्या ड्रॅगनबद्दल ते नेहमीच सावध होते. विदेशमंत्री कै. व्ही. के. कृष्ण मेनन (ज्यांचे टाइम मुखपृष्ठावर पिवळ्या सर्पासारखे चित्र आले होते) यांच्या गतिविधींवर डोळ्यात तेल घालून पाहायला पाहिजे असेच त्यांचे मत होते. अखेर चीनचे दगाबाज आक्रमण झाल्यानंतर (तेव्हा मी महाराष्ट्र विधानमंडळात सचिव होतो) सर्वांचेच धाबे दणाणले. पंडित नेहरू एकदम खचून गेले. भुवनेश्वरच्या जाहीर सभेत हल्लागुल्ला झाला (दि.२७ मे ६४ ला त्यांच्या हृदयाने राम म्हटला) कै. इंदिरा गांधींवरही भुवनेश्वरलाच दगडफेक झाली!)
व्यक्तिशः माझ्या मते अत्यंत आदर्श अशी जर कुठली ‘राष्ट्रपति-पंतप्रधान’ अशी दुक्कल भारतात झाली असेल तर ती सर्वपल्ली राधाकृष्ण आणि लालबहादूर शास्त्री’ हीच होती. अत्यंत साधे आणि म्हणूनच आदर्श असे प्रधानमंत्री लालबहादूर (व पत्नी ललितादेवी) आणि अधिकतम आदर्शवादी तत्त्वज्ञचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या समन्वयानेच पहिल्यांदा भारतीय सैन्याने सीमेबाहेर जाऊन लाहोरच्या खंदकवजा ‘इच्छोगिल’ कालव्यावर धडक मारली (पेशव्यांनी अटकेपार झेलमवर कूच केल्याप्रमाणे) नागपुरात शास्त्रीजींचा नागरी सत्कार व त्यांचे प्रांजळ भाषण केवळ अविस्मरणीय!
शिक्षण-सुधारणा, विशेषतः उच्चशिक्षण सुधारणा क्षेत्रांत ‘राधाकृष्ण आयोगाचा’ अहवाल पथप्रदर्शक होता पण आपले (कुठलेही!) केंद्र सरकारचे घोडे अहवाल अंमलबजावणीत जसे नित्य पेंड खाते, तसेच याही अहवालाचे झाले. वस्तुतः प्रथम मंत्रिमंडळरचनेच्या वेळीच भारतीय राष्ट्रीय महासभेचे पूर्व अध्यक्ष व नामांकित राष्ट्रीय मुस्लिम मौलाना आझाद यांनी उपराष्ट्रपती व्हावे आणि डॉ. राधाकृष्ण हेच शिक्षणमंत्री व्हावेत असे अनेकांचे मत होते पण उपराष्ट्रपती हे (राज्यसभा नियंत्रक असूनही) केवळ शोभापद आहे (तसे पाहिले तर आख्खी ‘राज्यसभा’देखील ‘बांडगूळ’च आहे असेही म्हणतात.) आणि धोरण किंवा कर्तृत्व बजावण्यात काही वाव नाही या (रास्त) समजातून थोडेसे आकांडतांडव करून मौलानांनी मंत्रिपदच बळकावले, (केंद्रसेवेतील ते माझे पहिलेच मंत्री होते) त्यामुळे १४ सूत्री हिंदी विकास योजना, गृहमंत्रालयाची हिंदी-अंमल-योजना आणि कृषिमंत्रालयाची कृषिसुधारणेसाठी हिंदी परिपत्रकयोजना या सर्व थंडावल्या याची खंत राधाकृष्णांना होती पण ते तत्त्वानुसारी असल्यामुळे त्यांनी जास्त खळखळ किंवा जाहीर (असौजन्यदर्शक) वाच्यता केली नाही हा त्यांचा सोशिकपणा होता. इंडिया टुडेने त्यांना अत्यंत उचितपणे शीर्षस्थ राष्ट्रपती मानले.
प्रस्तुत लेखात शेवटचे विचारणीय राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसैन हेही शिक्षाविद्, दिल्लीच्या जामिया मिलियाचे जणू बहिश्चर प्राणच होते. दि. २.१.५२ पासून संसदसचिवालयात रुजू होईपर्यंत अत्यंत ज्ञानेच्छू, चौकस व जिज्ञासू असा एक वैदर्भीय विद्वान या नात्याने ज्या अनेक स्थूलसूक्ष्म बाबी माझ्या बारीक नजरेला आल्या त्यात एक अजब गोष्ट म्हणजे सबंध शिक्षणमंत्रालयात एकही आय.ए.एस. अधिकारी नव्हता! सचिव हुमायूं कबीर (जे पुढे मंत्री झाले) हे बंगाली कवि व तत्त्वचिंतक, कश्मीरी सैयदैन, डॉ. अश्फाक हुसेन, इत्यादिक. सर्व इस्लामी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांनी प्रोत्साहित अलीगढचे पहिले मुस्लिम विद्यापीठ, दिल्लीची जामिया मिल्लिया इस्लामिया (पुढे मानित विद्यापीठ), हैद्राबादचे निजामाने प्रतिष्ठिलेले उस्मानिया विद्यापीठ (जिथे सर्वप्रथम आंग्लेतर भारतीय भाषेत म्हणजे उर्दूत-पदवीक्षम परिभाषा व पुस्तके निघाली) ही सर्व एका अर्थी दिशादर्शक प्रगती पुष्कळशी डॉ. हुसेनमुळे झाली असावी असे मानता येईल. (त्यांचे बंधू सय्यद हुसैन यांनी अलाहाबादच्या आनंद किंवा स्वराज्य भवनात जो बेबंदपणा केला तो वेगळाच विषय). परिवारातल्या नवीन युवा/युवतींनी विधर्मीशी विवाह करायचे म्हटल्यास दुसऱ्या पक्षाने धर्मांतर केलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे, असे म्हणतात. पण हे खरेच की इंडिया टुडे ने नोंदल्याप्रमाणे ‘सिंडिकेट के खिलाफ इंदिरा की पहल- ‘सुंदर संतुलन’ हे मूल्यमापन सहज पटण्यासारखे आहे. योगायोगाने तेव्हा ‘सिंडिकेट’मध्ये काही धर्मनिष्ठ लोकही होते (टंडन, मुन्शी वगैरे) व त्यांनाही काबूत करण्यात हा मोहरा भारताच्या तत्कालीन मर्दानी महाशासिकेला गवसला.
दुर्दैवाने या पहिल्या मुस्लिम राष्ट्रप्रमुखाने ‘गद्दीनशीन बादशाह अल्ला का प्यारा होने का ही’ पहिलाच प्रसंग पैदा केला. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना काही घोर रोग होता असे आठवत नाही. पण अचानक पदस्थित राष्ट्रपतीचा देहपात व्हावा हा पहिला प्रकार (आणि ऐन आणीबाणीच्या अंतकाळी दुसऱ्याही इस्लामी राष्ट्रपतीने राम म्हणावा अशी आतावेरी अंतिम दुर्घटनाही घडली!) घडून आला तेव्हा प्रोटोकॉल म्हणजे औचित्य-आचार-चर्चामध्ये अनेक अडचणी उपस्थित झाल्या. (नागपूरकरांचा ‘वैदर्भीय संगीतवैभव’ हा यशवंत देवप्रणीत गायक वादक स्वरसाधकांचा मुंबई मेळावा अचानक रद्द करावा लागल्यामुळे फारच घोर हिरमोड झाला!)
डॉ. हुसैन पुष्कळदा मंत्रालयांत भेटायचे. आमच्या रडतखडत चाललेल्या केंद्रीय हिन्दी निदेशालया’च्या शास्त्रीय परिभाषा विभागात त्यांना आस्था होती (पण ओढ नव्हती!) त्याचबरोबर (दुसऱ्या मुस्लिम राष्ट्रपतींना होती तशी) मिरवण्याचीही हौस नव्हती. इंडिया टुडेच्या ‘सुंदर संतुलन’ या मल्लिनाथीशी मी सहमत आहे. याअर्थी की आधीच्या दोघा बहुविद्वान राष्ट्रपतींप्रमाणेच जाकिर मजकूरांनीही शिक्षण विषयात खूप रस घेतला. आत्ता आत्ता (याच आठवड्यात) थोडी थोडकी नव्हे तर ३० केंद्रीय विद्यापीठे स्थापण्याची जी घोषणा झाली अशा अनेक योजना (त्याकाळी फार दुर्घट!) त्यांच्या मनांत होत्या. जगते वाचते तर कदाचित् अंमलबजावणीसाठीही यत्न करते!
सध्या या पहिल्या तीनही (की ४) राष्ट्रप्रमुखांच्या कारकीर्दीचा (व स्वयंसंपर्काचा) आढावा घेताना असेच म्हणावेसे वाटते की पाश्चात्त्य (विशेषतः विलायती म्हणजे इंग्रजाळलेली) लोकशाहीच्या या प्रथम भाषीय अवतरणामध्ये बाबूजी, राधाकृष्ण गारुजी आणि मियाँजी ही त्रिपुटी एकंदरीत भारताला लाभकारीच झाली.
लेखक (१० व्या वर्षी अकरावीची व १५ व्या वर्षी सतरावी (म्हणजे एम.ए.) परीक्षा पास करणारे) श्री कुमार काटे ५ वर्षे परिभाषा -निर्मिति, संसदसेवा आणि ३५ वर्षे भारतीय लेखापरीक्षा सेवेत (IAAS) होते.] फोन क्र. (०७१२) २२४६५० (पी.पी.)