भारतीय उपखंडातील वर्णव्यवस्था हा कायम चर्चेचा विषय आहे. बहुतेक वेळा हे वाद अपुऱ्या माहितीवर आधारित असतात. वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था ह्यांपैकी आधी काय निर्माण झाले ह्या संबंधी ब्रिटिश कालात अनेक वाद झाले. सर्व पाश्चात्त्य विद्वानांचे मत होते की आधी चातुर्वर्ण्य होते व त्याच्या विभाजनातून जाती निर्माण झाल्या. ह्या सिद्धान्ताला फक्त इरावती कर्वे ह्यांनी विरोध केला. त्यांनी दाखवून दिले की वर्णव्यवस्था ही तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या विविध ज्ञातींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. ह्या जाती कश्या अस्तित्वात आल्या ह्यासंबंधी विविध अंदाज बांधण्यात आले. पण पन्नास वर्षांपूर्वी आमचे प्राचीन इतिहासाचे ज्ञान अपुरे असल्यामुळे ज्ञातिसंस्थेचा उद्गम व विकास निश्चित सांगणे कठीण होते. आज मात्र उत्खननाद्वारा जगाच्या इतिहासातील अनेक कोडी सुटत असताना त्याची माहिती करून घेऊन मगच आपले मत बनविणे योग्य होईल. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जातिव्यवस्थेचे विवेचन पुढे देत आहे.
१९३० साली म. गांधींनी अस्पृश्यता टाळा असा संदेश जेव्हा दिला तेव्हा सनातन्यांचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटले व म्हणाले की ही ईश्वरनिर्मित गोष्ट आहे, वैदिक वाययात आहे. ती टाळा म्हणणे पाप आहे. तेव्हा या बाबतीत उभय पक्षांत चर्चा झाली. महात्माजींनी आपले प्रतिनिधी म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांना नियुक्त केले. त्यांनी आवाहन केले की महाराष्ट्रातील कोणत्या अस्पृश्य जमातींचा वेदवाययात उल्लेख येतो ते दाखवावे. तेव्हा एकाही जातीचा (भंगीसुद्धा) उल्लेख प्राचीन (बुद्धपूर्व) वाययात सापडला नाही. अर्थात महात्माजींनी आपला कार्यक्रम चालू ठेवला. पण ह्या अनुल्लेखाचा अर्थ काय ह्याबाबतीत एकाही विद्वानाला विचार करावासा वाटला नाही. Caste, Class and Religion वर लिहिणाऱ्या श्री घुर्ये ह्यांसारख्या संशोधकानेही हा प्रश्न अनुत्तरित ठेवला आहे, म्हणूनच शूद्र हे कोण होते ह्याचा शोध डॉ. आंबेडकरांना घ्यावासा वाटला. मंडल आयोगाने आरक्षण देताना काही जाती ठरावीक प्रदेशातच का आहेत. महार समाज महाराष्ट्राबाहेर का नाही, मग आरक्षणाला प्रादेशिक मर्यादा हव्यात का ह्यासंबंधी काहीच विचार केलेला दिसत नाही. असा विचार वनवासी बांधवांच्या बाबतीत आरंभापासून आहे. त्यांचे आरक्षण त्यांच्या मूळ आदिवासी पट्ट्यांपुरते सीमित असते.
महाराष्ट्र आणि दक्षिण भारत ह्यांमधील अठरापगड जातींचा उगम कसा झाला हे जाणून घ्यावयाचे असल्यास आपणास प्राचीन इतिहासात अवगाहन करावे लागेल. बरेचसे प्राचीन कालखंड आधुनिक शास्त्रांच्या आधारे निश्चित झाले आहेत. त्यानुसार मानव ह्या भूतलावर केव्हापासून वावरू लागला, तो जंगली अवस्थेत किती काळ होता, शेती कधी सुरू झाली, नगरे कशी वसली हे सर्व शास्त्रीय आधारावर निश्चित करता येते. ह्यासाठी ग्रहताऱ्यांचाही उपयोग होतो. जसे शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये कृत्तिका नक्षत्र पूर्व दिशेला सूर्याबरोबर उगवते असा उल्लेख त्या ग्रंथाचा काळ इ.स. पूर्व ३१०१ असावा हे निश्चित होते. व त्याआधी झालेले भारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्णाचा कालही नेमका ठरतो. अशा पुराव्यावरून भारतीय समाजाची प्राचीनता समजते तसेच त्यामध्ये बाहेरून आलेले परकीय समाज केव्हा मिसळले हेही निश्चित सांगता येते. ह्यासाठी संपूर्ण मानवजातीचाच या भूतलावरील उद्गम व विकास अभ्यासणे आवश्यक ठरते.
दोन लाख वर्षांपासून ताठ कण्याचा (Homo Erectus) मानवप्राणी या भूतलावर वावरत असून त्याने हजारो वर्षे, वादळे, हिमपात, भूकंप आदि संकटांना तोंड देत काढली आहेत. आजपासून १२००० वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपले आणि तोवर गुहेत लपलेला मानव सर्वत्र वावरू लागला. भारतात तो सरस्वतीकिनारी वाढला, त्याने यज्ञ केले, ऋग्वेदाची रचना केली आणि शांततेत जगू लागला. कॉकेशस पर्वतामधले लोक अफगाणिस्थानच्या उत्तरेस मध्य आशियामध्ये पशुपालन करीत भटके जीवन जगू लागले. भूमध्यसागरतिरी ग्रीस, इजिप्तसारखे देश बनले. थोडक्यात आमचे नागरजीवन ५-६ हजार वर्षांइतकेच जुने आहे. वेदवाययात, यजुर्वेदात आढळणाऱ्या कलियुगाला ४ लक्ष वर्षे झाली त्यापूर्वी द्वापारयुग होते त्याकाळात राम, कृष्ण, परशुराम झाले ह्या केवळ कविकल्पना ठरतात. हे सर्व महापुरुष इ.स.पूर्व ३५०० च्या सुमारास श्रीराम, ३१०१ मध्ये श्रीकृष्ण व असेच इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास परशुराम/राम जामदग्न्य होऊन गेले व त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे त्यांची अवतारात गणना झाली असे मानावे लागते. परशुराम, नारद हे चिरंजीव आहेत ही कल्पना नाट्यप्रयोगापुरती सीमित ठेवावी. प्रत्यक्षात ते अशक्य आहे.
मध्य आशियामध्ये भटके जीवन जगणाऱ्या शकांनी (सीथियन) जमेल तेव्हा भोवताली आक्रमण केले. भटकताना नाना त-हेची खनिजे मिळाल्यामुळे त्यांची शस्त्रे अद्ययावत् असत. अश्वारोहणात ते पटाईत होते. त्यांनी इ.स.पूर्व १५०० मध्ये तुर्कस्थानात हिट्राइट नावाने राज्य स्थापन करून इजिप्तचा पराभव केला. पुढे ते फोनेशियन व्यापारी म्हणून जगभर पसरले. त्यांची एक शाखा सेल्टिक ह्या नावाने युरोपमध्ये इ.स.पू. ६०० मध्ये इंग्लंडपर्यंत पसरली. त्याच सुमारास त्यांनी इराण जिंकला पण येथे त्यांचा अंदाज चुकला. इराणी एकत्र आले व त्यांनी शकांचा पराभव करून आपले साम्राज्य स्थापन केले. पराभूत शक पेशावरजवळ स्वात नदीच्या खोऱ्यात स्थिरावले त्याची नोंद इराणी शिलालेखांत आहे.
भारतात पश्चिमेकडून आलेल्या आक्रमकांमध्ये शक, यवन, पल्हव, चीन होते असे वर्णन मनुस्मृतीमध्ये आहे. ह्यांपैकी शक वंशीय सर्वांत प्रथम इ.स.पू.१००० ते ६०० ह्या काळात हळूहळू भारतात पसरत होते. भ. बुद्ध हा शाक्यमुनी होता. तक्षशिलेच्या ज्ञानपीठामुळे हा शकसमाज सुसंस्कृत झाला. त्यांच्यामध्ये चातुर्वर्ण्य होते. त्यांच्यानंतर यवन म्हणजे ग्रीक इ.स.पू. ३३० मध्ये सिकंदर बरोबर आले. इराणी पल्हव/पार्थियन इ.स.पू.२५० व चीन म्हणजे कुशाण इ.स.पू.१०० मध्ये आक्रमक म्हणून आले. शकांचे अधिक वर्णन भविष्यपुराणात आहे. इराणकडून पराभूत झाल्यानंतर ह्या शकगणांना स्वस्थ बसवेना. ह्या वेळेस उत्तरभारत १६ गणराज्यांत विभागला होता. नर्मदेच्या दक्षिणेस घनदाट दंडकारण्य होते. नागरी वसती नव्हती. अरण्यातून जंगली हत्ती उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम वाटचाल करीत. त्यामुळे पडलेल्या पायवाटांचा उपयोग प्रवासासाठी होई. त्यांचा उपयोग करून शकगण दक्षिणेकडे सरकू लागले. वैनगंगातीरी नागपूर ते चंद्रपूर परिसरात त्यांनी दक्षिणेतले अश्मक नावाचे पहिले जनपद स्थापन केले. त्यांच्याबरोबर उत्तरेतील सोळा गणराज्यातील विविध धंदे करणारे समूह दक्षिणेत आले. त्यांच्या चालीरीतीत एकवाक्यता नव्हती.
शकगणांचे जगभर आढळणारे वैशिष्ट्य म्हणजे मृतांचे काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करून केलेले दफन. ह्या समाध्यांमध्ये मृताच्या आत्म्याच्या परलोकप्रवासासाठी उपयुक्त अनेक वस्तू ठेवीत. त्यांच्या अभ्यासावरून आपणास त्यांची माहिती मिळते. अशा शेकडो समाध्या नागपूर परिसरात आहेत. त्यांच्या वाटचालीच्या खुणा मध्यप्रदेशातील गुहांमध्ये चित्ररूपाने दिसतात. अधिक माहितीसाठी वाचा India Through the Ages हा प्रस्तुत लेखकाचा ग्रंथ.
ह्या काळात उत्तर भारतात मातृसत्ताक पद्धती होती. सातवाहन, मेघवाहन ह्या सर्व राजांची नावे शिलालेखात मातेचे नाव घेऊन नोंदली आहेत. इतरेजनही आईचे नाव आधी लिहितात. उत्तरेत जाती फारश्या नव्हत्या. मृच्छकटिक नाटकात चारुदत्त हा ब्राह्मण वसंतसेना ह्या वारांगनेशी विवाह करतो, त्याचा नोकरही तोच कित्ता गिरवतो. ह्यावरून जातिभेद सौम्य होते असे दिसते. ब्राह्मण असूनही चारुदत्त सार्थवाहाचा व्यवसाय करू शकतो ह्यावरून धंद्यावरही फारसे निर्बंध दिसत नाहीत. अशा मुक्त परिस्थितीतले अनेक समाज शकांबरोबर दक्षिणेत उतरले व पुढे आंध्र कर्नाटक ते केरळपर्यंत पोहोचले. पश्चिमेस माहूर, अंबेजोगाई, नाशिक ते कल्याणपर्यंत त्यांचा प्रवास झाला व रोमशी नुकत्याच सुरू झालेल्या व्यापारावर त्यांनी ताबा मिळवला.
इ.स.पूर्व ६०० पासून लोखंड गाळण्याची प्रक्रिया माहिती झाल्यानंतर लोह अस्त्रे, शस्त्रे, नांगर, कु-हाडी, विळे, कोयते अशा नाना आयुधांचा वापर करून शकांनी ३०० वर्षांत दक्षिणदिग्विजय मिळविला. सर्वत्र वसाहती स्थापन झाल्या व उत्तरेतून आलेले विविध कारागीर समाज प्रगती करू लागले. वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यामुळे त्यांचे गट वेगळेच राहिले.
मातुलकन्यापरिणयाची चाल आजही दक्षिणेत अस्तित्वात आहे. ह्यामुळे एका स्त्रीच्या माध्यमातून अनेक कुटुंबे रक्ताच्या नात्याने एकमेकांशी जोडली जात. त्यांचा व्यवसाय एकच असल्यामुळे एक स्वतंत्र समूह तयार होई. त्याला मूळ गावातील देवतांची आठवण असे. अशा कुटुंबाचा समूह एक जात म्हणून ओळखला जाऊ लागला. कुंभार समाज दहा पोटजातींत विभागला आहे कारण ते दहा वेगवेगळ्या ठिकाणाहून दक्षिणेत आले आहेत. हे इरावती कर्वे ह्यांनी दाखवून दिले आहे. थोडक्यात आजच्या दक्षिण भारतातल्या जाती ह्या मातृसत्ताक पद्धतीचा आविष्कार आहेत व त्या इ.स.पू.३०० च्या अगोदर तयार झाल्या आहेत.
ह्याच काळात उत्तरेतील परिस्थितीत प्रचंड फरक पडला होता. सरहद्दीवर लोह-अस्त्रांनी सज्ज आक्रमक उभे असताना देशात जैन व बौद्ध धर्म अहिंसेचा प्रचार करीत होते. त्यामुळे आधीच सोळा गणराज्यांत विभागला गेलेला क्षत्रिय वर्ग समाजरक्षणाबद्दल अधिकच उदासीन झाला. सिंधुपलीकडचा प्रदेश इराणी सम्राटांना सहज घेता आला. ह्या परिस्थितीवर मात करणारे तत्त्वज्ञान हिंदू समाजाने निर्माण केले. गीतेचा दुसरा अध्याय जरी भारतीय युद्धकालात कृष्णाने सांगितला असला तरी बाकीचा भाग इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास रचला असावा हे लो. टिळकांनी दाखवून दिले आहे. दहाव्या अध्यायातील सर्वशक्तिमान ईश्वराची कल्पना व त्याचे चराचरात अस्तित्व हिंदू धर्मास नवे बळ देऊन गेली. ह्या मागे तक्षशिलेच्या ब्राह्मणवर्गाचा वाटा महत्त्वाचा होता.
ह्याच ईश्वरकल्पनेचा पुढे झरतुष्टाने अवलंब केला व त्याला सैतानाची जोड दिली. ही जोडी पुढे सर्वत्र स्वीकारली गेली आहे. हिंदुधर्मात सैतान नाही. त्याच्या प्रभावाखाली आहेत असे म्हणून निरपराध लोकांना ठार मारणे नाही, आतंकवादी नाहीत. ह्याउलट हिंदू तत्त्वज्ञानाने केनोपनिषदात सांगितल्याप्रमाणे ईश्वरतत्त्वाचे, प्रतिनिधी स्वरूप यक्षमूर्तीची निर्मिती करून तिची सर्वत्र पूजा सुरू केली व समाज एकसंध केला. गणेशदेवता यक्षच आहे.
शकवंशीयांच्या जारणमारण पूजा, अंत्यसंस्कार आदि सर्व विधींचा समावेश असलेले, व्रात्यस्तोमासारखे परकीयांना हिंदूधर्मात घेणारे अथर्ववेदासारखे तत्त्वज्ञान सांगितले. समाजाच्या दैनंदिन जीवनास शिस्त लावणारे अश्वलायन गृह्यसूत्र निर्माण झाले. ह्या सर्व वाययाचा उपयोग समाज संघटित करण्यात झाला व पुढे जेव्हा सिकंदरचे आक्रमण झाले तेव्हा त्याला सर्वत्र प्रतिकार झाला.
शक आक्रमक भटके, रानटी, नरभक्षक होते पण ग्रीक समाज सुसंस्कृत नागर व्यवस्थेचा प्रतिनिधी होता. त्यांचा संघटित क्षत्रियवर्ग हिंदू समाजावर प्रभाव पाडून गेला व हिंदू समाजात पितृसत्ताक पद्धतीबद्दल आकर्षण निर्माण झाले. पाणिनीच्या वाययात गोत्र शब्द गोट या अर्थी वापरला गेला आहे. त्याला पूर्वजांचे प्रतीक म्हणून वापरणे नंतर आले. ह्यानंतर स्त्रीकेंद्रित मातृसत्ताक पद्धती पुरुषकेंद्रित पितृसत्ताक पद्धतीत बदलली. चातुर्वर्ण्याचे तत्त्वज्ञान (४.१३) गीतेने सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व जातींचे वर्गीकरण मनुस्मृतीने केले. कुटुंबांना गोत्र दिले गेले व विवाह शक्यतोवर वेगळ्या गोत्रात व्हावा असा प्रयत्न सुरू झाला. आजच्या जेनेटिक्सच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था अतिशय उपकारक, गुणसूत्रे सबल करणारी ठरली व पुढे हजार वर्षे एक सामर्थ्यसंपन्न समाज निर्माण होत राहिला. त्यांतल्या जाती हा मातृसत्ताक पद्धतीचा आविष्कार आहे तर वर्णव्यवस्था पितृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार करते हे टीकाकारांनी लक्षात घ्यावे.
स-१५, भरतनगर, नागपूर ४४० ०३३.