पुस्तक परामर्श -वस्ती

वस्ती या पुस्तकात वसंत मून यांनी नागपूरच्या बर्डी या मध्यवर्ती भागातील बौद्ध धर्मांतराच्या पूर्वीच्या महार लोकांचे जीवन चितारले आहे. हा काळ इ.स. १९३० ते १९५६ दरम्यानचा आहे. पूर्वीच्या महार लोकांची जीवनपद्धती, त्यांचे नागपंचमीसारखे सण, त्यांची सामाजिक एकी, हिंदू धर्माने त्यांच्यावर लादलेल्या अस्पृश्यतेच्या अन्यायाची चीड, त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती व सदैव सतावणारी भूक, नातलगांचे कधी-आहे, कधी-नाही असे सहकार्य आणि ह्या साऱ्यांवर मात करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघर्ष करा व एक व्हा’ हा गुरुमंत्र आणि त्याप्रमाणे वागून शिक्षणाद्वारे ह्या दलदलीतून सुटका हे सारे वसंत मून यांच्या वस्तीत वाचावयास मिळते. वस्ती त यापेक्षा जास्त आहे ते म्हणजे पन्नास-साठ वर्षांअगोदरचा नागपूरच्या महारांचा इतिहास. श्री. वसंत मून यांचे नागपूर शहराबद्दल प्रेम, त्यांनी जेथे शिक्षण घेतले त्या पटवर्धन शाळेचे मास्तर व मॉरिस कॉलेजचे प्रोफेसर्स यांच्या बद्दलचा आदर, नागपूर शहरातले आखाडे, शेजारच्या कामठी (ते कामठी नाव ब्रिटिशांच्या Camp-tea वरून झाले असे सांगतात) येथील महार रेजिमेंट, नागपूरचा कडकडणारा उन्हाळा व मॉनसूनच्या आगमनाची प्रतीक्षा व शेवटी वस्तीसकट साऱ्या महारसमुदायाचे धर्मांतर यांचे वर्णन तीत आहे.
दलित साहित्यामध्ये कविता, नाटक व आत्मचरित्राची बरीच रेलचेल, १९६० पासून सुरू झाली पण फक्त बोटावर मोजण्याएवढ्याच आत्मचरित्रांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे. वस्ती चे इंग्रजीत “”Growing up as Untouchable in India” असे भाषांतर (Gail Omvedt) गेल ओमवेट यांनी केले व त्यास प्रस्तावना अमेरिकन प्रोफेसर डॉ. एलिनॉर झेलियट (Eleanor Zelliot), ज्यांनी दलितांवर अनेक लेख व पुस्तके लिहिली, त्यांनी दिली आहे.
वस्ती त सर्व पंथाचे लोक
वस्ती तील घरे व लोक याबद्दल वसंत मून लिहितातः वस्तीतील बहुतेक घरे मातीची – जुनी, धाबे-कोनाडे असलेली. अनेक घरे विटांची-एकमजली. परंतु सर्वच घरे कौलारू. घराला घर लागून. एका खिडकीतून दुसऱ्या घरातील बायकापोरांना एकमेकांशी बोलता येईल अशी.
वस्ती त सर्व पंथाचे लोक होते. ताजुद्दीन बाबाच्या दर्यावर चादर वाहणारे होते, मोहरमचा ताबूत काढणारे होते, बुवाफरीद करणारे होते, मोहरमच्या सवारीत अंगात येणारे होते. मुसलमानी धर्माशी निगडित असूनही वस्तीतील कुणीही मुसलमान झाले नाही. अट्टबाबा बल्लम वाले हातात बल्लम घेऊन मुस्लिम फकिराप्रमाणे राही, परंतु सर्व सामाजिक कार्यात आघाडीवर. अनेक घरांतून कबीरपंथी होते तर काही घरे वारकरी होती. वस्तीचा एक कोपरा महानुभाव पंथीयाचाही होता.
वस्तीच्या पूर्वेस लांबचलांब एक चाळ ; पलीकडे ब्राह्मण, मारवाडी, बंगाली, मद्रासी यांची संमिश्र वसाहत. धनवटे कोपऱ्यावरील घराजवळून पलीकडे जाणारा आडवा, रेल्वेरुळांना समांतर उत्तर-दक्षिण डांबरी रस्ता. आग्नेयदिशेस महारांचे पूर्वापार चालत आलेले विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर. वस्तीच्या उत्तरेकडून जाणारा रस्ता कोष्टी मोहल्ल्यापासून महारपुयास विभक्त करतो. कोष्टी लोक आखाड्याचे शौकिन. प्रत्येक घरी आखाड्याचा शौक. नागपुरात हिंदु-मुसलमानांचा दंगा असो वा हिंदु-महारांचे भांडण असो, कोष्टी समाज हिंदू समाजाच्या रक्षणासाठी स्वतः सामोरा होतो. काळ कसा बदलतो पहा! जे कोष्टी लोक दलितांच्या राखीव जागेच्या लढ्यात महाराविरुद्ध उभे राहिले व १९४६ साली महारांच्या कत्तली करण्यास सज्ज झाले तेच आज राखीव जागांकरिता मागणी करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामुळे महारांतील अंधविश्वास, देवभोळेपणा व मागासलेपणा कसा लोपला हे वस्तीतील स्थित्यंतरावरून दिसते. १९३० सालापासून जागृतीचे वारे पोचताच महारपुऱ्यातील मातामायचे देऊळ तोडण्यात आले. वस्तीच्या पश्चिमेकडे असलेल्या मातामायच्या देवळात पटकी, हगवण, देवी अशा साथी आल्या की अडाणी स्त्रिया पाणी घेऊन जात. कधी कोंबडे मारीत. मोठी साथ आली की बकरेही मारत. परंतु आता १९३० पासून आंबेडकर बाबाची लाट आली व मातामायला वनवास भोगावा लागला.
आज तिथे निव्वळ दगड पडले आहेत.
भजनाची जागा कव्वालीने घेतली
महार समाजात त्याकाळी भजने मागे पडून कव्वाल्या लोकप्रिय होऊ लागल्या. नागपूर विभागात कव्वाल्यांचे कार्यक्रम महार समाजात खूप होत असत. पावसाळा संपला की, वस्त्या-वस्त्यांत कव्वाल्यांचे कार्यक्रम होत. रात्री अकरा-बारा वाजता कव्वाल्यांचा कार्यक्रम सुरू होई मग तो रात्रभर चाले व सकाळी ७-८ वाजता संपे. ‘दास’ पार्टीचे लोक गातः ये ‘दास’ की आवाज है पीछे न हटेंगे
घुट घुटके खटिया पे अब हम न मरेंगे आजाद करने दलितों को आगे ही बढेंगे
बढकर के फतह पाएंगे, हम पीछे न हटेंगे ।
स्वातंत्र्योत्तर काळात नागोराव कव्वालचा उदय झाला. हा विदर्भात इतका लोकप्रिय होता की नागोरावची कव्वाली म्हटली की हजारो लोक रात्रभर जागून काढीत असत. त्याचा गळा गोड व भारदस्त नि रचनादेखील हृदयास भिडणारी होती. महारांच्या शौर्याबद्दल कुणासही शंका नसावी. शिवाजीच्या सैन्यातदेखील त्यांनी मर्दुमकी दाखवली आहे. याबद्दल तो म्हणतो:
हमारी दास्ताँ मुल्क ए हिंदोस्तान से पूछो
लड़े हम किस तरह शिवाजी बलवान से पूछो !
ह्या गायकीसाठी काव्यरचना करणारा मस्तान नावाचा मुसलमान होता. वस्तीत देखील कव्वालपार्टी होती. वस्तीतील रामाने ती तयार केली होती :
‘यहाँ से वहाँ तक है हुकुमत जयभीमवालों की’ अशी ललकारी तो मारीत असे.
नागपूर भागात आंबेडकरी जलसेही आले. उद्धवचा जलसा संपूर्ण मध्यप्रदेशात प्रसिद्ध होता. नागपूर तेव्हा मध्यप्रदेशची राजधानी होती. या जलशात ‘केशवपन’ आणि ‘धर्मान्तर’ ही नाटके या भागात खूप लोकप्रिय झाली. सोलापूर मराठवाड्याकडे जलशाने सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले. समाज-क्रांतीसाठी महारांनी जलसा चालविला. हे जलसाकार त्या काळी मानवी स्वातंत्र्याला आवश्यक असलेले विचार प्रथमच तालासुरात गात होते. जलशातील कर्णमधुर गाण्यांच्या चालींनी वास्तववादी कथाविषय, विद्रोह आणि मनात ठासून बसणारे संवाद यांनी समाजमनाची पकड घेतली. समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तुंग नेतृत्त्व व दुसरे म्हणजे दलित समाजाने त्याकाळी बाबासाहेबांना अर्पण केलेले अतूट पोलादी ऐक्य ! एके ठिकाणी जलसाकार म्हणतात.
‘संकटी वागलो तत्त्वांनी । भारलो भीमाच्या घोषणांनी ।
धन्य कमाल त्या एकीची, रे एकीची । भारती सुधारणा महारांची ।।
ह्या अभेद्य एकीला तोडण्याचे त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाने जीवतोड प्रयत्न केले पण बाबासाहेब जिवंत असताना या तोडफोडीस फारच थोडे यश मिळाले. महात्मा गांधीचा पुणे करार, त्याकरता लढा व उपोषण, त्यांचे ‘हरिजन सेवक संघ’ या सारखे तात्पुरते फसवे कार्यक्रम व दलित समाजाला खूष करण्यास्तव गांधींनी दिलेले ‘हरिजन’ हे नाव साऱ्या महारांनी नाकारले. हरिजन म्हणजे ज्याला इथे डशश्रश्री (विकलेला माणूस) म्हणतात असा माणूस, असे आंबेडकरीय महार म्हणू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते हरिजन नाव नाकारताना सांगितले आम्हास महारच म्हणा म्हणजे आमची अन्यायाविरुद्ध उठण्याची शक्ती वाढेल. “Tell a slave, he is a slave and he will revolt.” (गुलामाला ड करण्यास तयार होईल). वसंत मून यांनी वस्ती मध्ये असाच एक प्रसंग लिहिला आहे. पटवर्धन शाळेत नववीच्या वर्गात नळसापूरकर मास्तर हरिजन सेवक संघाची स्कॉलरशिप आली आहे व हरिजन मुलांनी स्कॉलरशिप घेण्याकरिता नावे द्यावीत असे सांगतात. एकही गरीब महार मुलगा ती हरिजन स्कॉलरशिप घेण्यास तयार होत नाही. मून व त्यांचे इतर महार मित्र सांगतात “सर, आम्ही हरिजन नाही, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत व हरिजन संघाची स्कॉलरशिप आम्हास नको!
मेलो तरी चालेल पण वाकणार नाही अशी ती वृत्ती! व ह्या बाण्यानेच त्यांना पुढे नेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महारांना एक करण्याकरता ह्यावेळेस महार जातीमध्ये असलेल्या पोटाजाती बंद केल्या. कोकणाकडे-कोकणस्थ व देशस्थ महार तर पान महार, बेले महार पुण्यामुंबईकडे; नागविदर्भाकडे तर महाराच्या सात पोटजाती होत्याः सोमस् (सोमवंशीय), बावने, आंदवण, लाडवन, कोसरे आणि बारके व सालवे. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे त्या नामशेष झाल्या व रोटीबंदीच नव्हे तर बेटीबंदीही उठली. वसंत मून यांनी १९५४ साली एक हस्तलिखित मासिक काढून त्यात पोटजातींच्या भस्मासुरावर एक लेख लिहिला. तो डॉ. बाबासाहेबांना अतिशय आवडला होता.
महार जातीमध्ये लग्नाकरता मुलगी पाहणे हा एक सोहळा होता. वस्ती मध्ये वसंत मून लिहितात :
“मुलगी सुंदर, चारित्र्यवान, असावी ही अपेक्षा तर असे. पण तिला ‘मांडे’ करता यावे अशी बऱ्याच कुटुंबाची मागणी राही.” ‘मांडे’ म्हणजे लंब्यारोट्या बनवणे, ही महार बौद्ध समाजातील नष्टप्राय होत चाललेली एक पाककला आहे. मांडे मातीच्या उपड्या घड्यावरच करण्यात येतात. या घड्याला ‘रान्ने’ हा खास शब्द आहे. रान्यावरील रोट्या ही महार स्त्रियांची पिढीजात कला. १९३८ च्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर नागपूरला आले होते. त्यांचेसाठी मटनाचे जेवणाचा बेत करण्यात आला. भिडे कन्या शाळेत व्यवस्था होती.
आमच्या वस्तीतील महार स्त्रियांनी त्यावेळी मटन आणि मांड्याचे रसाळ जेवण सावरकरांना खाऊ घातले.”
सावरकरांनी मटन खाल्ले की नाही यावर काही वाचक प्रश्न करू शकतात. पण ब्राह्मण पूर्वी गोमांस व इतर प्राण्यांचे मांस खात होते ह्याचे समर्थन कितीतरी इतिहासकारांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या “Untouchable’ या ग्रंथात ब्राह्मणाच्या गोमांसभक्षणाबद्दल पुष्कळ लिहिले आहे. सावरकर पुरोगामी विचाराचे असल्यामुळे त्यांच्या मांसाहारी भोजनाबद्दल काथ्याकूट करणे नको.
धर्मदीक्षेनंतर महारांनी हिंदू देवदेविकांच्या मूर्तीसोबत जुन्या रूढी-परंपराही फेकून दिल्या आणि आज त्यांची लग्ने आता त्रिशरण, पंचशील या बौद्ध पद्धतीने होतात.
शाळा-कॉलेजच्या गुरुजींबद्दल कृतज्ञता
वस्ती त वसंत मून आपल्या पटवर्धन शाळेचे मास्तर आणि मॉरिस कॉलेजच्या प्रोफेसरांवर बऱ्याच कृतज्ञ भावाने लिहितात :
नॉर्मल स्कूलमध्ये वस्तीतील मुलेच नव्हती. मीच तेवढा एक महार. महारपुयातील मुले बुटी म्युनिसिपल प्रायमरी शाळेत जात. माझ्या शाळेत माझ्याव्यतिरिक्त सर्वच ब्राह्मण, मोहनी, थेरगावकर, जोशी, कोल्हटकर, रत्नपारखी अशीच सर्व नावे. तेली, माळी, कुणब्यांची पोरं औषधालाही नव्हती. बहुतेक शिक्षकांवर गांधीवादाचा पगडा होता. महार मुलांबद्दल आत्मीयता होती. ते कधी तुसडेपणाने वागले नाहीत. आज जेव्हा ऐकतो की, अस्पृश्य मुलांना मास्तर व प्रोफेसर मुद्दाम नापास करतात तेव्हा मन अस्वस्थ होते.
मॅट्रिकपर्यन्त आंबेडकरी चळवळीमुळे बुद्धिवाद मनात पक्का रुजला होता. परंतु कॉलेजात लोकहितवादींची शतपत्रे आणि आगरकरांचा आळतेकर संपादित निबंधांचा पहिला भाग यांच्या अभ्यासाने धर्मचिकित्सा अथवा विचारचिकित्सा कशी करावी याचे शिक्षण मिळाले. वि.भि. कोलते आणि मा. गो. देशमुख हे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून एम.ए. पर्यन्त मराठीचे शिक्षक होते.
कोलते हे शिस्तप्रिय होते. वर्गात कोणी गडबड केलेली त्यांना बिलकुल खपत नसे. व अभ्यास न करणाऱ्यांबद्दल त्यांना मुळीच आस्था नसे. चिपळूणकरांचे निबंध शिकवीत असताना चिपळूणकरांच्या फुल्यांवरील टीकेचा ते समाचार घेत. मात्र त्याकाळी फुले वायय कुठेच उपलब्ध नव्हते. त्यामुळे फुल्यांचा मूळ विचार आम्हाला वाचायला मिळत नसे. आगरकरांच्या सुधारणावादी विचारांचा माझ्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. ‘पांचजन्याचा हंगाम’ अथवा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात आमचे प्रेतसंस्कार’ वगैरे आगरकरी निबंध माझ्या विचारांना व भाषाशैलीला एक वळण देत होते असे मून म्हणतात.
गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी यांचे स्थान प्रबोधनाच्या क्षेत्रात मोठे आहे. वयाच्या ऐन पंचविशीत त्यांनी ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून ‘शतपत्रे’ लिहिली व ती १८४८ ते १८५० या काळात प्रसिद्ध झाली. समाजसुधारणेसाठी लोकहितवादींनी या लेखनातून प्रहार केल्याने समाजाच्या नवरचनेबाबत निकोप दिशा ठळक झाल्या. ह्याचा ठसा वसंत मून यांच्यावर विद्यार्थीदशेत पडला, ते पुढे लिहितात :
वामन मल्हार जोशींचा ‘ध्येय हाच देव’ हा निबंध माझ्या मनावर खूप ठसला होता. तसे तर जोशींचे सुशीलेचा देव, इंदू काळे सरला भोळे, वगैरे सर्वच लेखन कुठेतरी आपणास जुळते असे वाटे. “एकादशी’ मध्ये श्री. म. माटे यांचा एक ललित निबंध होता. त्याचे नाव ‘कोंबडा आरवतो’ असे होते. शेजारच्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण द्यायला येणार हे कळल्यावर एका खेड्यातील गरीब अस्पृश्य शेतकऱ्याची काय तारांबळ उडते हे माटे मास्तरांनी खूप सुंदर रेखाटले आहे, असे मून लिहितात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्रजी वाययाच्या संपादनाचे काम श्री वसंत मून यांनी फार चोख रीतीने पार पाडले. अ. इरलरीरहशल आलशवज्ञरी थीळींळपसी रपव डशिशलहशी या ग्रंथांचे सुरुवातीच्या बऱ्याच खंडांचे संपादन त्यांचेच आहे. बाबासाहेबांचे सारे लिखाण इंग्रजीत तेव्हा त्याच्या संपादनासाठी इंग्रजीभाषेचे ज्ञान बरेच असावयास पाहिजे होते. पटवर्धन शाळेत शिकत असताना सहावीच्या देव मास्तरांनी मून यांचे कच्चे इंग्रजी पाहून बरेचदा रागाने म्हटले : “मून, यू कॅनाट पास मॅट्रिक फॉर टेन इअर्स.’ पण ते मनावर न घेता, हसून विसरून जाऊन त्यांनी एम्.ए. केले व बाबासाहेबांच्या लिखाणाचे संपादन मोठ्या विद्वत्तेने केले. पण देव मास्तरांनी मून महार होते म्हणूनच असे शापवाणीचे शब्द वापरले असे नाही. त्या वेळेस मॉरिस कॉलेजमध्ये शिकवणारे इंग्रजीचे प्रोफेसर्स मित्रा आणि गुहा हे देखील रागावले तर साऱ्यांनाच, ब्राह्मण, महार हा भेदभाव न करता, गर्भगळित करून सोडायचे. मित्रा म्हणायचे, “माय डॉग कॅन बार्क बेटर इंग्लिश टॅन यू. यू बेटर गो आऊट अॅण्ड ओपन ए पानठेला.’ हे कुठे अन् प्रो. पी.बी. कुळकर्णी यांनी ‘अक्षरधन’ पुस्तकांत रेखाटलेले प्रेमळ प्रोफेसर्स कुठे ?
धम्मदीक्षाः
१९५० नंतर धर्मांतराचे वारे वाहू लागले. धर्मांतराचा मान नागपूरला मिळावा अशी वामनराव गोडबोल्यांची आणि सर्वांची प्रबळ इच्छा होती व त्यांच्या पुढाकाराने बाबासाहेबांनी १४, ऑक्टोबर १९५६ ही तारीख निश्चित केली आणि नागपूर हे स्थानही नक्की केले. बाबासाहेब धर्मांतराकरिता ऑक्टोबरच्या १० तारखेस नागपूरला येतात व त्यांचा मुक्काम बर्डीवरील शाम हॉटेलात ठेवण्यात येतो.
श्याम हॉटेलच्या समोरच वस्ती (म्हणजे महारपुरा) आहे. सर्व महारपुरा होटेलवर बारीक नजर ठेवून असतो व हॉटेलवर घडणाऱ्या घटनांचे पडसाद वस्तीत उमटत असतात. तेवढ्यात एक अफवा येते की वामनरावाच्या जिवाला धोका आहे मग वस्तीतील पहेलवानांना वामनराव गोडबोलेच्या अंगरक्षकाचे काम, त्यांना नकळत सोपवण्यात येते. धर्मदीक्षेची जागा खूप ओबडधोबड होती तिला समतल करणे, पाणी, संडास आदींच्या सोई करण्याचे काम सदानंद फुलझेले हे रात्रंदिवस करतात व धर्मांतराचे काम सुरळीत पार पडते.
धर्मांतराने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर केले. नागपूर नाग लोकांची वस्ती होती. याच नाग लोकांनी बौद्ध धर्मास भारतात वाढवले होते. धर्मांतराच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी नागपूरची निवड का केली हे सांगताना आपण ह्रआजचे महारयाच नाग लोकांचे वंशज आहोत असे सांगितले होते. वसंत मून यांनी वस्ती त याच नाग वंशाच्या (पूर्वीचे महार व आजचे बौद्ध), लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे.
वस्ती फार वाचनीय आहे. एकदा हे पुस्तक वाचावयास घेतल्यावर खाली ठेवण्याचे भानच राहत नाही.
16802 SHIPSHAW RIVER DR, LEANDER, TEXAS, USA 78641

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.