श्रद्धा म्हणजे दृढविश्वास. ज्याला अनुकूल पुरावा लागत नाही, प्रतिकूल पुरावा बाधत नाही; तरी तो कायम राहतो. जरासंधासारखा. उदाहरणार्थ, मनुष्य मेल्याने आत्मा मरत नाही. आत्मा अमर आहे असे शास्त्रांनी सांगितले त्या अर्थी ते खरे असलेच पाहिजे. ही श्रद्धा.
पुढे सत्ययुग येणार आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल असे गुरु महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, पण त्यासाठी त्यांनी सांगितले तसे केले पाहिजे. अविश्वास दाखवू नका, विश्वास ठेवा. श्रद्धस्व!
सत्कर्म कोणते? दुष्कर्म कोणते ? योग्य कायह्नअयोग्य काय ? कशाने स्वर्गहह्नकशाने नरक लाभेल ? धर्म काय-अधर्म काय हे सगळे जुन्या जाणत्यांनी सांगून ठेवले आहे. ते वेदांनी जतन केले आहे. बायबलने जपले आहे. कुराणाने कायम ठेवले आहे. त्यांचा अर्थ सांगायला, बुवा-बाबा, पाद्री-धर्मगुरू, मुल्ला-मौलवी, तत्पर आहेत. त्यांचे ऐका. न ऐकाल तर याद राखा. एकदा ताकीद देऊ, पुन्हा न ऐकाल तर तुम्हाला जगायचा हक्क नाही. शिरच्छेद होईल. देहान्त प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायचित्त नाही.
हा न्याय श्रद्धावाद्यांचा आहे. प्राचीन काळी होता. विज्ञानाच्या उदयानंतरही होता, आजही आहे !
भंडारा जिल्ह्यात कुडेगाव येथील रायभान टेंभुर्णे हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या हातून सत्ययुग-निर्मितीचे कार्य पुरे करून घेण्यासाठी शारदा नामक एका मांत्रिक महिलेने त्यांच्याशी दुसरा घरठाव केला. तिच्या अंगात येत असे. त्यावेळी तिचा दरबार भरत असे. तेव्हा ती हिंदी बोले. पीडित भगत-गणाला ती मंतरलेला गंडा, विभूती(राख) देई. काविळीवर औषध देई. त्यासाठी ३०० रु. घेत असे. तिने रायभान टेंभुर्णेसाठी आपला पहिला नवरा सोडला. आपल्या दोन मुली व एक मुलगा ह्यांना सोडले. त्याचे मंगळसूत्र फेकून ती रायभानकडे आली. रायभानला तीन मुलीच. त्याला मुलगा हवा होता. त्यासाठी मोठी २० वर्षांची मुलगी रचना ही बळी देण्यात आली. तिघींचेही मुंडन करण्यात आले. मोठीची हत्या करून अंगणात खड्डा खणून नरबळी गाडण्यात आला. वर माती ढकलूनह्नफुले-माळा, धूप-दीप लावले. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका येऊन गवगवा झाला. गोष्ट पोलिसात गेली. (नागपूर येथील २ सप्टेंबर २००७ च्या लोकमतमध्ये सविस्तर सचित्र वृत्तान्त मुंडन केलेल्या मुलींसह आला आहे. इ-टीव्हीवरही ही दृश्ये दाखविली होती.
हा प्रकार अंधश्रद्धेचा नाही तर कशाचा म्हणायचा?
गेल्या ऑगस्टमध्ये प्रसिद्ध बंगाली लेखिका तस्लिमा नासरीन हैद्राबाद येथे आली होती. तिच्या शोध ह्या कादंबरीचे तेलुगू भाषांतर ‘येलू कुचेळू’ चे प्रकाशन होते. तो प्रकाशन समारंभ उधळून लावण्यात आला. तिला मारझोड झाली ही दृश्ये टीव्हीवर आपण पाहिली. इतकेच नाही तर पुन्हा हैद्राबादेत पाय ठेवला तर मुंडके मारू अशा धमक्या दिल्या गेल्या. त्यात धर्मनिष्ठ अतिरेकी विचाराचे मुल्ला मौलवी होते इतकेच नाही तर विधानसभा व संसदेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी होते.
रीत ? ह्या कादंबरीचा परिचय पूर्वी आ.सु.त येऊन गेला आहे. त्यातील पुरेसा भाग वाचकांच्या सोयीसाठी ‘शोध तस्लिमाचा’ ह्या नावाने ह्या अंकात पुढे दिला आहे. शोध नंतर सहा महिन्यांनी लज्जा आली ती जास्त गाजली. तिच्यावर जो गदारोळ उठला त्यामुळे तस्लिमाला परागंदा होऊन आपला जीव वाचवावा लागला. इस्लाम धर्माची कडक समीक्षा केली, बदनामी केली ह्यामुळे मुल्ला मौलवींचा तिच्यावर राग आहे. धर्मसमीक्षा करू धजणाऱ्यास केवढी किंमत मोजावी लागते त्याचे तस्लिमा हे जिवंत उदाहरण आहे.
धर्मांधांनी पाकिस्तानचे प्रेसिडेण्ट जनरल मुशर्रफ ह्यांनाही धर्मभ्रष्ट आणि क़ाफिर ठरवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तेथे तस्लिमा किस झाड की पत्ती ? श्रद्धाह्रखरी श्रद्धा असा काही भेद असतो की काय ? आणि तो कसा कळतो?
ऑक्टोबर हा नागपूर विदर्भातच नाही तर भारतभर बौद्ध बांधवांना मोठा सणाचा महिना आहे. दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेबांनी समारंभपूर्वक दीक्षा घेऊन ह्न नागपूर येथे धर्मचक्र प्रवर्तन केले. पूर्वास्पृश्य दलित समाजाच्या जीवनात क्रान्ती आणली. बाबासाहेबांनी ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुभाव’ हे नवे त्रिशरण दिले. त्यांनी उद्घोषिलेल्या ह्या नव्या मंत्राची आकाशवाणीवरील ५ मिनिटांच्या भाषणाची मूळ संहिता आमचे मित्र श्री मधुकर कांबळे ह्यांनी आमच्याकडे पाठविली. ती ह्या अंकात छापली आहे.
हे आपले नवे त्रिशरण फ्रेंच राज्यक्रान्तीच्या घोषणेचे अनुकरण नाही तर आपले गुरु भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीचे मर्म आहे असे बाबासाहेब म्हणतात.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेची यंदा सुवर्णजयंती आहे. त्यानिमित्त अविकसित भागातील विद्यापीठाची एक कैफियत प्रा. जयदेव डोळे ह्यांनी मांडली आहे. त्यांच्या त्या लघुलेखाचे पुनर्मुद्रण ह्याच अंकात पाहावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र साहित्याचे संकलन महाराष्ट्र शासनाने केले. त्यातील बऱ्याच खंडांचे संपादन श्री वसंत मून ह्यांनी केले होते. श्री मून हे धडाडीचे राजस्व अधिकारी होते. ते नागपूरकर आहेत. त्यांच्या वस्ती ह्या आत्मवृत्ताचा मोठा रोचक परिचय श्री कांबळे ह्यांनी करून दिला आहे.
रामसेतू प्रकरणाने सारा देश ढवळून निघाला आहे. राम झालाच नाही येथपासून राम ह्या देशाचा प्राण आहे येथपर्यंत वादावादी झाली. ह्यावर तुमच्या सुधारकाचे काय म्हणणे आहे असे मित्र विचारतात. ‘राम’ इतिहासपूर्वकालीन ह्न प्रागैतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे असे म्हटल्यावर त्याच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा मागणे, त्याने इंजीनीअरींगचे शिक्षण कोठे घेतले हे विचारणे एका राजकारण्यालाच शोभते! काही विद्वानांच्या मते रामायणातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीच्या उल्लेखांवरून रामाची वनवासातील रोजनिशी ठरविता येते. नागपूरचे गेल्या पिढीतील थोर संशोधन पंडित, गणिती आणि ज्योतिर्विद्या निपुण विद्वद्ररत्न भाऊजी दफ्तरी ह्यांनी एका लेखात तो ऊहापोह केला आहे. त्यांच्या संशोधनाचे फलित – “The astronomical method and its application to the chronology of ancient India” ह्या ग्रंथात आहे. तो नागपूर विद्यापीठाने प्रसिद्ध केला आहे. जिज्ञासूंना डॉ. दफ्तरी लेखसंग्रह, खंड दुसरा (पृष्ठे ८७ ते १०६) पाहता येईल.
कळावे, लोभ असावा हे विनंती.
आपला प्र. ब. कुळकर्णी