तुम्हाला तुमच्या निवडीचे सल्लागार नेमता यावेत म्हणून माझा सल्लागार मंडळाचा राजीनामा मी या पत्राद्वारे देत आहे. गैरसमज नसावा ही विनंती.
मासिकावर एकसुरीपणाचा आरोप आहे. धर्म व श्रद्धा याविरोधी लिखाणच मुख्यत्वे केले जाते असा आक्षेप आहे. तशी टीका करण्याऐवजी मी अन्य विषयांकडेही मासिकाचे सुकाणू जास्त सशक्तपणे वळण्यासाठी मदत करू इच्छितो.
समाजाची मनोधारणा व चालचलणूक जर चांगली व्हावी ही आजचा सुधारकची इच्छा आहे तर माझ्या मते भौतिकता व नैतिकता यांचा आग्रही पाठपुरावा आपण केला पाहिजे.
भौतिकता :
शिवाजीचा समकालीन न्यूटन, गॅलिलिओ. आधीचा कोपर्निकस वगैरेंनी विज्ञानाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आपण आपल्याकडे अजूनही देऊ शकलेलो नाही. न्यूटनीय विज्ञानाला जवरदस्त धक्के बसून नवीन पुंज-भौतिकी झाली त्याला देखील शंभर वर्षे होत आली, पण आपल्या समाजाला त्याची गंधवार्ता नाही.
प्रगत जगाला विज्ञानाच्या प्रतिष्ठेमुळे कण, ऊर्जा, त्यांचे द्वैत-अद्वैत, विश्वाचा सततचा वाढता पसारा यावद्दल इतकी माहिती आहे की खुळचट अंधश्रद्धा व भंपक चालीरीतींपासून तो आपोआपच दूर असतो. जितके ज्ञान अधिक तितका खुलेपणा अधिक. यामुळे दांभिकपणाला थाराच राहत नाही.
आपल्याच मासिकामुळे मला डॉ. मधुकरराव देशपांड्यांच्या विज्ञान-प्रसारा- बद्दल कळले. त्यावर एक प्रदीर्घ लेख अपेक्षित आहे. अनिल अवचटांनी भूगर्भविज्ञान- वाले करमरकर, वनस्पतिशास्त्रज्ञ बाचूळकर यांच्याबद्दल लिहिले. अत्यंत स्फूर्तिदायक अशी ही माहिती जास्त लोकांपर्यंत नेली पाहिजे.
नैतिकता :
समाजात बऱ्याच व्यक्तींना थोडे स्वातंत्र्य व जास्त स्थैर्य पाहिजे असते. काही थोडी माणसे असी असतात की ज्यांना संपूर्ण स्वातंत्र्य हवे असते. बदल्यात संपूर्ण अस्थैर्य आले तरी बेहेत्तर अशी ही माणसे निर्मिक असतात.
ज्या समाजात अशा निर्मिकांची किंमत ओळखली जाते तो आदर्श समाज होय.
परंतु बहुतेक वेळा अशा निर्मिकांवर विविध निर्बंध लादून, त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करून वांडगुळेच फोफावत राहतात. समाजवादी रचनेमुळे हा धोका संभवतो. समाजवादी रचनेमध्ये राजकारणी, वकील, करसल्लागार, उद्योजक, नोकरदार, कामगार सर्वच्या सर्व मंडळी बव्हंशी अनैतिकतेने जगतात. म्हणजे जेवढे निर्मितात त्यापेक्षा जास्त चरतात. परिणामी समाज रसातळाला जातो. ऐवजी व्यक्तिवादाची पाठराखण करण्याने आजच्या निराश, खचलेल्या, लाळघोट्या, बुवाबाजीच्या नादी लागलेल्या तरुणांऐवजी प्रसन्न, धडपडे, विजिगीषु असे जिवंत तरुण समाजाला लाभतील.
धर्म व श्रद्धा जितके झुंडबाज आहेत तितकाच समाजवाददेखील झुंडबाज आहे. झुंड ही विवेकावादाचा शत्रू क्रमांक एक होय.
माझे असे म्हणणे आहे की समाजवादाच्या व व्यक्तिवादाच्या युद्धात आपण उतरले पाहिजे. मला याची जाणीव आहे की आजचे वयस्कर लोक हे समाजवादाच्या मुशीतून घडलेले आहेत व व्यक्तिवाद म्हणजे बाजारू चंगळवाद वगैरे शंका त्यांच्या मनात असतीलच. परंतु या दोन्ही वादांवर जर हिरिरीने बाजू मांडण्यात आली तर खूपच उद्बोधन होणार आहे.
सुरुवात म्हणून मी असे आव्हान देतो की आपल्या कायद्यांपैकी (फौजदारी नव्हे!) किती कायदे नैतिक आहेत हे एखाद्या विधिज्ञाने दाखवावे. भाडेकरू कायदा, कामगार कायदा सर्वच्या सर्व नैतिकतेच्या विरुद्ध आहेत. हलवायाच्या घरावर तुळशी- पत्र ठेवण्याचा त्यात प्रयत्न आहे. कायदेच अनैतिक असल्याने त्यांचा परिणामदेखील बरोवर उलटा झालेला दिसेल. भाडेकरूला संरक्षण द्यायला गेले. आज कुठल्याही माणसाला निवांतपणे चांगली भाड्याची जागा मिळत नाही. कामगारांना संरक्षण द्यायला गेले तर आळशी व नादान कामगार माजून बसल्याने चांगल्या कामगाराची किंमत शून्य झाली. आपण आपल्या कामात प्रावीण्य मिळवावे. नवीन काहीतरी करून दाखवावे असे हुशार कामगारालादेखील वाटत नाही. (उद्योजकांनाच जिथे हुशारीपेक्षा चतुराईने जास्त पैसा मिळतो तिथे हुशार कामगारांची गरजच कुणाला ?)
अमेरिकेत नव्वद टक्के माणसे आपल्या पश्चात आपली संपत्ति मुलांना देण्याऐवजी सेवाभावी संस्थांना दान म्हणून देतात. श्रीमंतांची मुलेदेखील नोकरी करूनच स्वबळावर उच्च शिक्षण घेतात. असे सुनील देशमुखांनी या वेळच्या साधनेत लिहिले आहे. ज्याला आपण समाजवाद समजतो त्याचे उद्दिष्ट यापेक्षा वेगळे असते काय? म्हणजेच व्यक्तिवादाच्या मार्गाने व्यक्तीचे व पर्यायाने समाजाचे कल्याण होऊ शकते व पूर्ण स्वातंत्र्याचा समर्थक व्यक्तिवाद हा जास्त नैतिक आहे.
समाजवाद हा त्यातील अंगभूत दोषांमुळे मरणपंथाला लागल्यावर आपल्या- । कडे कित्येकांनी हे समाजवादाचे जनावर आपणच उडवले अशा शिकारी थाटात लिहाय- बोलायला सुरुवात केली. परंतु त्यातील शरद जोशी, गंगाधर गाडगीळ प्रभृतींमुळे समाजवादाची टिंगल दूर राहिली, व्यक्तिवाद किंवा भांडवलवादच वदनाम होण्याची भीती जास्त आहे. व्यक्तिवाद किंवा भांडवलवाद या नीतीशी संबंधित गोष्टी असल्याने कुत्सितपणाने त्यांचे समर्थन होऊ शकत नाही. खुल्या दिलदार चर्चेनेच होऊ शकते. ती व्हावी ही अपेक्षा.
‘श्री जुगाई’ अखिल ब्राह्मण संस्थेसमोर,
सुरेंद्र देशपांडे
बॉईज टाऊन रोड, नासिक – ४२२००२
दीपरत्न राऊत, मु. पो. नेरी, जिल्हा चन्द्रपूर – ४४२९०४
आ. सु. नियमितपणे प्राप्त होत आहे. आभारी आहे.
काही खुलासा : १. आ. सु. चा टाईप मोठा कशाला? हे केवळ ‘एन्लार्जमेण्ट’ होईल. त्यात जादा आसमंत येणार नाही, आर्थिक खर्च मात्र वाढेल. ही वाढ अकारण आहे. २. आ. सु. हे म्हाताऱ्यांनी म्हाताऱ्यांसाठी चालवलेले निश्चितपणे नाही. आम्ही कोणत्याही अर्थाने म्हातारे नाही. ३. अलीकडे आ. सु. मध्ये विविधता येत आहे असे मला वाटते. ४. मुखपृष्ठ वेधक करण्याची काहीही आवश्यकता नाही. वर्षाचे अंक बांधण्यासाठी हेच चांगले आहे. ५. मराठीतील प्रमुख वैचारिक नियतकालिक-वाचकां- पर्यंत आ. सु. चे नाव गेले तर आ. सु. चा खप आपोआप वाढेल आणि ते आ. सु. च्या प्रकृतीनुसार सुद्धा होईल असे मला वाटते.
आर. आर. पाटील, संपादक- क्रांतिपर्व, वी ४/१४, आयकर सोसा., कोथरुड, पुणे-४११०२९
आ. सु. चा वर्ष १०, अंक १२ (मार्च) मिळाला. आभारी. विविध संदर्भानी नटलेला हा अंक वाचनीय आहे. त्यातील विषयाची आणि संदर्भांची आणखी सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. त्यामुळे मागील अंक वाचण्याचा मोह होतो. कृपा करून जाने फेब्रु. चे अंक पाठविल्यास क्रांतिपर्व-परिवार आपला ऋणी राहील.
लेखकांना विनंती
१. लेखन कागदाच्या दोन्ही बाजूस करायला हरकत नाही. मात्र मोठा समास (मार्जिन) आणि दोन ओळींत भरपूर अंतर असणे सोयीचे होते. २. लेखाची लांबी छापील ५ पाने किंवा सुमारे १५०० शब्द यांपेक्षा मोठी असू नये. ३. लेखाची १ प्रत जवळ ठेवावी. लेख स्वीकारता न आल्यास परत पाठविण्याची व्यवस्था नाही. ४. लेखकाने स्वतःचा संक्षिप्त परिचय द्यावा. त्यात आपले कार्य व प्रसिद्ध लेखन याचा निर्देश असावा.