लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे. सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा असनदशीर मार्गांचा अवलंब करणे योग्य होते. म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.. असनदशीर मार्ग
दुसरी गोष्ट ही की, जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला जो भयसूचक संदेश आहे तो पाळणे. ज्यांनी आयुष्यभर मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत. या बाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओ’ कोनेल याने मार्मिकपणे म्हटले आहे की “स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.” (या) भयसूचक संदेशाची जरूरी इतर कोणत्याही देशापेक्षा हिन्दुस्थान देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, हिन्दु- स्थानच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमाहात्म्य ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालत नसते. एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा दाखविली तर ती त्या राजकीय विचारप्रणालीला अधोगतीस नेईल आणि त्या राजकीय पंथात सर्वाधिकारी सत्ता प्रस्थापित करील:
तिसरी गोष्ट ही की, सामाजिक लोकशाहीचा आधार असेल तरच राजकीय लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(घटना-समितीच्या समारोपाचे ऐतिहासिक भाषण : २५/११/१९४९.)