जर कुणी स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असेल तर त्याने मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचाही पुरस्कार केला पाहिजे, जर कोणी मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचा पुरस्कार करीत असेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील हक्काचा, त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या स्वतःच्या सुखलोलुपतेचाही पुरस्कार केला पाहिजे, ह्याचाच अर्थ असा की त्याने अशा हक्कांना संरक्षण व त्यांची हमी देणारी राज्यव्यवस्था म्हणजेच भांडवलवादाची राजकीय आर्थिक व्यवस्था हिचाच पुरस्कार केला पाहिजे.
– आयन रँड
निरंकुश अर्थव्यवहार ह्याचा अर्थ, सर्व गोष्टी शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय, नैसर्गिक क्रमाने घडणे. लोकांची भरभराट झाली, तर ठीकच. अन्यथा जर त्यांची उपासमार झाली, त्यांना राहायला निवारा मिळाला नाही, औषधे खरेदी करण्यासाठी जर त्यांच्याजवळ पैसे नसतील तर त्याचा दोष त्यांच्याकडेच जातो. ती काही समाजाची जबाबदारी नाही. आपण लोकांना शासनावर अवलंबून ठेवायला नको. ते त्यांच्यासाठी चांगले नाही असा त्यांचा युक्तिवाद आहे. परावलंबनापेक्षा भूक बरी. परावलंबनापेक्षा आजारपण बरे.
– अमेरिकन इतिहासकार हॉवर्ड झिन
आयन रँड निरंकुशी भांडवलवादाची कट्टर पुरस्कर्ती होती. लाझ फेअर ह्या फ्रेंच वाक्प्रचाराचा अर्थ त्याला मोकळे सोडा किंवा दुसऱ्या शब्दांत उद्योगधंद्यांची राष्ट्रापासून फारकत असा होतो. धर्मनिरपेक्षतावाद जसा धर्माची राष्ट्रापासून फारकत करतो, तसाच काहीसा ह्याचा अर्थ आहे. तत्त्वज्ञानामध्ये ह्या दोन्हीचा उद्देश सर्वांसाठी समानता व न्याय हाच मानला आहे. परंतु प्रत्यक्षात ते जे काही साध्य करतात, त्या अगदीच वेगळ्या गोष्टी आहेत. ह्या मुद्द्याकडे आपण नंतर वळू. सर्वप्रथम लाझेझ फेअर भांडवलवादाचे तत्त्व काय ते पाहू.
निरंकुश भांडवलवादाच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला आहे की त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुवतीनुसार संपत्ती कमावण्याचे, अधिक उत्पादन करून भरभराटीला येण्याचे आणि आपल्या कल्पनेप्रमाणे सुख प्राप्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. असे सुख प्राप्त करण्यासाठी तिला स्वार्थी असावे लागते. आयन रँडने लोकांना स्वार्थी होण्यास उद्युक्त केले. तिच्या दृष्टीने स्वार्थीपणा म्हणजे श्रद्धा किंवा लहरी ह्यांना बळी न पडता विवेकाचा अंगीकार करणे. कष्ट करून आपले आयुष्य उत्पादनशील व समृद्ध घडविणे. सर्वोच्च नैतिक मूल्य म्हणून स्वतःच्या व्यक्तिगत सुखाची आकांक्षा ठेवणे, इतरांशीही माणसांप्रमाणे व्यवहार करणे, मूल्यासाठी मूल्य असा व्यवहार करणे.
येथे स्वार्थी असणे ह्याचा तात्त्विक दृष्ट्या अर्थ इतरांचे दमन करणे असा नाही. त्याचप्रमाणे तो निःस्वार्थीपणा किंवा परार्थवाद देखील नाही. आयन रँड परार्थवादाची कट्टर विरोधक आहे. ती त्याच्याकडे एका सामूहिक गूढवादाचा भाग म्हणून पाहते. पुढील परिच्छेदात परार्थवादाला असलेल्या तिच्या विरोधाची कारणमीमांसा तिच्याच शब्दांत दिली आहे.
परार्थवादाचे तत्त्व किंवा नैतिक दृष्ट्या त्याचा संकेत असा की माणसाला स्वतःसाठी जगण्याचा हक्क नाही. परोपकार हेच त्याच्या अस्तित्वाचे समर्थन होऊ शकते. आत्मविलोप हेच सर्वोच्च नैतिक कर्तव्य, गुण आणि मूल्य आहे. परार्थवादाची, दयाळूपणा, सदिच्छा व इतरांच्या हक्काविषयी असलेला आदरभाव ह्यांच्याशी गल्लत होऊ नये. ही सर्व कारणे नसून परिणाम आहेत, ज्यांना परार्थवाद अशक्यकोटीत नेऊन टाकतो. त्याचे किमान आधारतत्त्व म्हणजे स्वार्थत्याग, ज्याचे अर्थ आत्मदहन, आत्मपरित्याग, स्वतःला नकार देणे, स्वविनाश असे होतात, किंवा दुसऱ्या शब्दांत तेथे सर्व वाईट गोष्टींचे मूळ किंवा प्रमाण म्हणजे स्व आणि त्याचा विलोप म्हणजे साक्षात चांगुलपण.
समुदायासाठी आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग करण्यावर तिने रानटीपणाची आज अवशिष्ट असलेली मानसिकता ह्या शब्दांत टीका केली आहे. त्या परिस्थितीत व्यक्तीचा स्वार्थ हा टोळीच्या तथाकथित भल्यासाठी सोडून देणे क्षम्य ठरू शकेल. परंतु एखादी व्यक्ती जेवढा जास्त त्याग करील, तेवढीच जास्त ती परतफेडीची अपेक्षा धरील. समाजातील सर्वाधिक बुद्धिवान, उत्पादनशील माणसांना समाजातील अनुत्पादक लोकांसाठी त्याग करावा लागतो आणि तसे न करता त्यांनी त्यांच्या श्रमाची फळे जर स्वतःजवळच ठेवली, तर त्यांना स्वार्थी ही उपाधी लावली जाते. संपत्ती ही व्यक्तिगत श्रम आणि बुद्धिमत्ता ह्यांच्या जोरावर कमावली जाते. संपत्तीचे पुनर्वितरण करण्याचा कोणताही प्रयत्न हा त्यागाचेच पुनर्वितरण करण्यामध्ये समापित होतो असे त्यांचे आग्रहपूर्वक प्रतिपादन आहे. ह्याच कारणावरून आयन रँड ह्यांनी कुठल्याही प्रकारे संपत्तीचे पुनर्वितरण करण्याला किंवा कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला तीव्र विरोध केला आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेवर शासनाचे नियंत्रण मग ते कोणत्याही गटाने, कितीही प्रमाणात ठेवलेले असो – हे राज्यवादावर म्हणजे माणसाचे आयुष्य हे राज्यास समर्पित असते ह्या तत्त्वावर आधारलेले असते.
निरंकुश भांडवलवादी बाजारपेठ ही पूर्णपणे मागणी व पुरवठा ह्या तत्त्वावर चालत असते. मग अश्या परिस्थितीत राज्याची भूमिका काय असते? तर ती शारीरिक बळापासून माणसांच्या व्यक्तिगत हक्कांचे (मालमत्ता हक्कांसहित) संरक्षण करणाऱ्या पोलिसाची भूमिका आहे. स्वतंत्र अर्थव्यवस्थेत शासन हे माणसाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नियंत्रण, नियमन, विधिदमन किंवा हस्तक्षेप करीत नाही. निरंकुश भांडवलदारी अर्थव्यवस्थेचा परिणाम एकाधिकारशाही किंवा तात्पुरती मंदी ह्यांमध्ये होतो का असाही प्रश्न विचारला जातो. आयन रँड ह्यावर असे उत्तर देतात की अशी दुरिते केवळ जेव्हा राष्ट्र त्यामध्ये हस्तक्षेप करून स्पर्धा टाळते, तेव्हाच घडून येतात. कोणतीही मिश्र अर्थव्यवस्था ही शेवटी फॅसिस्ट होते. ती अधिकाधिक सत्ता ग्रहण करते आणि व्यक्तिगत अधिकारांचे दमन केले जाते. असे त्यांचे म्हणणे आहे.
आयन रँडच्या निरंकुश भांडवलशाहीची तत्त्वे थोडक्यात ही अशी आहेत. आता ती प्रत्यक्षात कशी काम करतात ते पाहू. ह्या लेखाच्या सुरुवातीला मी निरंकुश भांडवलवाद आणि धर्मनिरपेक्षता ह्यांची तात्त्विक पातळीवरून जी तुलना केली, ती प्रत्यक्षात उतरताना मात्र त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक होतो. तो असा की धर्मनिरपेक्षता जमेल तशी अंमलात आणतानाही धार्मिक अल्पसंख्यांकांचे संरक्षण केले जाते. निरंकुश भांडवलवाद मात्र कोणत्याही प्रमाणात अंमलात आणला तरी तो उच्च सामाजिक व आर्थिक स्थिती असलेल्या धनवान आणि समृद्ध लोकांनाच झुकते माप देतो. तत्त्वतः जेव्हा आपण सर्वांना समान संधी देण्याविषयी बोलतो, तेव्हा ती संधी घेण्यासाठी ते सर्वजण समान बिंदूपासून सुरुवात करीत आहेत ह्याची खात्री करून घ्यावी लागते, अन्यथा त्याने केवळ तफावतीच वाढत जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटनासमितीत दिलेल्या एका भाषणात असे उद्गार काढले होते,
दि. 26 जानेवारी 1950 रोजी आपण अंतर्विरोधाच्या नव्या जगात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्यामध्ये समता असेल आणि सामाजिक व आर्थिक बाबतींत आपल्यात विषमता असेल. राजकारणात आपण एक माणूस एक मत आणि एक मत एक मूल्य मान्य करू. आपल्या सामाजिक व आर्थिक आयुष्यांत मात्र आपल्या सामाजिक-आर्थिक रचनेमुळे आपण एक माणूस एक मूल्य हे तत्त्व नाकारीत आहोत. किती काळपर्यंत आपण अंतर्विरोधाचे आयुष्य जगणार आहोत, किती काळपर्यंत आपण आपल्या आयुष्यात समानता टाळणार आहोत? जर आपण दीर्घकाळपर्यंत ते टाळत राहिलो तर त्यातून आपण आपली राजकीय लोकशाहीच संकटात ढकलणार नाही का? अशा रीतीने, नवोदित भारतवर्षातील सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्याकरता राष्ट्राने सुधारणात्मक उपाय अंगीकारण्याची गरज संविधानामध्ये अधोरेखित केली होती.
राष्ट्रीय अर्थव्यवस्था उभारण्याकरता राष्ट्राची भूमिकादेखील महत्त्वाची मानली गेली होती.
इ.स. 1944 मध्ये अग्रगण्य उद्योजकांच्या एका गटाने भारतासाठी एक आर्थिक विकास योजना तयार केली. (जी बाँबे प्लान ह्या नावाने सुपरिचित होती). त्याने खाजगी उद्योग व मालकीहक्क ह्यांच्यावर आधारलेली विद्यमान आर्थिक संघटना राष्ट्रीय उत्पन्नाचे समाधानकारक वितरण करण्यास असमर्थ ठरली आहे ह्यावर शिक्कामोर्तब केले. उत्पन्नातील विषमता दूर करण्यास फक्त राष्ट्रच सहाय्य करू शकते. परंतु उत्पादन वाढविण्यासाठीही राष्ट्रच आवश्यक होते. ऊर्जा, वाहतूक, पायाभूत सुविधा ह्यांच्यासारख्या क्षेत्रांमध्ये खुद्द भारतीय भांडवलदारांनाच सरकारी एकाधिकारशाहीची गरज वाटत होती. औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात तर, राष्ट्राने समाजाच्या हितासाठी आवश्यक तेवढा हस्तक्षेप व नियंत्रण ठेवावे असे म्हटले जात असे. मोठ्या प्रमाणावरील आर्थिक नियोजनासाठी राष्ट्राचे सकारात्मक तसेच प्रतिबंधात्मक कार्यक्रम वाढवणे आवश्यक आहेत, असा युक्तिवाद केंद्रीभूत आर्थिक नियोजनासाठी करण्यात आला होता. ‘ह्याचा अर्थ राष्ट्र सर्व आर्थिक व्यवहारात कायम हस्तक्षेप करेल असा होत नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत हस्तक्षेप करेल, एवढाच होतो’ म्हणूनच, १९९० मध्ये जेव्हा बाजारपेठ खुली होण्यास सुरुवात झाली तेव्हा, त्याचा काही भाग नाइलाजातून आलेला असला तरी अनेक भारतीय उद्योग ह्या संधीचा फायदा घेऊ शकले.
अमेरिकेसहित अनेक देशांनी भांडवलशाही आणि कल्याणकारी राष्ट्र ह्या दोन्ही संकल्पना एकाच वेळेस राबविण्यास सुरुवात केली, परंतु त्यापैकी फारच थोड्या राष्ट्रांमध्ये आयन रँडने काळजी व्यक्त केल्याप्रमाणे खरोखर व्यक्तिगत हक्क नामशेष झाले. उलट ती व्यवस्था शोषित-वंचितांना अधिक चांगले राहणीमान देण्यासाठी सहाय्यभूत ठरली.
भांडवलवादाचा व्यक्तिकेंद्रित पैलू
अमेरिकन संविधानाचे शिल्पकार जेम्स मॅडिसन ह्यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की,
माणसे जर देवदूतच असती, तर त्यांना शासनाची गरजच पडली नसती. देवदूतांना जर माणसांचे शासन करावे लागले असते तर शासनावर बाह्य किंवा आंतरिक नियंत्रणाची गरजच पडली नसती. माणसांनी माणसांवर प्रशासन करणारे सरकार तयार करताना सर्वात मोठी अडचण हीच असते, की तुम्हाला शासनाला सर्व शासित लोकांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करावे लागते तर त्याच्या पुढच्या टप्प्यावर त्याला आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास भाग पाडू शकते.
प्रत्यक्षात मात्र मानव हे देवदूत नसतात तसेच सर्व माणसेदेखील पूर्ण वेळ विवेकवादी नसतात. भारतातही सर्व लोक अनेक योजना, बंधने घालूनही बरीच विषमता अजून शिल्लक आहे. अमेरिकेत भांडवलवाद असतानाही तीच परिस्थिती आहे. येथे विषमता कमी करणे ह्याचा अर्थ विशेषाधिकारी लोकांना खाली आणणे नसून विशेषाधिकार नसलेल्यांची, वंचितांची उन्नती करणे, असा आहे. वंचितांना जर शासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही तर त्यातून येणारी अगतिकतेची भावना त्यांना हिंसेकडे नेल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्याकडील माओवाद्याने भारलेल्या प्रदेशांत हेच घडत आहे.
भांडवलवादाने जनसामान्यांचे जीवनमान सुधारले आहेच, तांत्रिक प्रगतीनेही आपल्या जीवनास कुठे ना कुठे स्पर्श केला आहे. उत्पादकतेसाठी स्वार्थीपणा करण्यासाठी किंवा बुद्धिमत्तेतून निर्माण झालेल्या भांडवलाची गुंतवणूक करून ते अधिक वाढवण्यासाठी कष्ट घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु ह्या प्रक्रियेचा परिणाम इतरांचे बळी घेण्यात किंवा निसर्गाला अपाय करण्यात होऊ नये. आपल्या धरणांमुळे जर लोकांचे विस्थापन होणार असेल तर त्यांना त्याची भरपाई देणे आपले कर्तव्य आहे. आपल्या खाणींमुळे जर आपल्या पारिस्थितीचे घोर नुकसान होत असेल, तर त्यासाठी पर्यावरण-सेही तंत्रज्ञान अंगीकारणे आणि जीवाश्म इंधने जर वैश्विक तपमानात वाढ करीत असतील तर पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोतांकडे वळणे हे आपले कर्तव्य आहे. ह्यानेच आपल्या स्वार्थी हितसंबंधांची पूर्तताही होणार आहे, कारण आपण जर आपल्या पद्धती सुधारल्या नाहीत, तर आपल्या वंशाचा -हास होण्यास वेळ लागणार नाही. जगभरचे शास्त्रज्ञ घसा फोडून आपल्याला हाच इशारा देत आहेत. आयन रँडला ज्याची चिंता भेडसावत होती, त्या प्रगतीची वाटचाल थांबविण्याची, किंवा धनवानांकडून पैसा जप्त करण्याची किंवा व्यक्तिगत हक्कांचे दमन करण्याची खरे तर काहीच गरज नाही. आपल्याला फक्त, वंचितांना प्रगतीच्या आणि त्यांच्या क्षमता वापरून संपत्ती निर्माण करण्याच्या वाटचालीत सहभागी करून घेण्यात आल्याचीच खातरजमा करून घ्यायची आहे.
सी ४०४ पॅरामाउंट मधुबन सोसायटी
साईनगर, लेन नं. १ खंडोबा मंदिराजवळ कात्रज-कोंढवा रोड, पुणे