[ ‘धरामित्र’ ह्या शाश्वत शेती व पर्यावरणाचे काम करणाऱ्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवप्रसंगी दि.2.2.2014 रोजी सेवाग्राम आश्रमात शीर्षकांकित विषयावर दिनानाथ मनोहर ह्यांनी केलेले बीजभाषण. कार्य. संपा. ]
आज सेवाग्रामच्या परिसरात आपल्यासमोर बोलताना, मला कित्येक वर्षांपूर्वी ह्याच परिसरातील पवनारमध्ये घडलेली घटना आठवते आहे. बाहेर श्री जयप्रकाशजीचे आंदोलन सुरू होते, श्रीमती इंदिराजींनी आणिबाणी घोषित केली होती, भारतीय नागरिकांच्या नागरी अधिकारांना मर्यादित करणाऱ्या सरकारचा, जनता आंदोलनांच्या मार्गाने निषेध करत होती. आणि ह्याच काळात विनोबाजींच्या मौन व्रताचा काळ संपत होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्या दिवसाच्या काही दिवस आधीच पंतप्रधान इंदिरा गांधी पवनार आश्रमाला भेट देऊन गेल्या होत्या. सर्वोदयी, गांधीवादी विचारांचे विद्वान, कार्यकर्ते व राजकीय, सामाजिक विचारवंत आणि सामान्य माणसांमध्येही विनोबा मौन सोडल्यावर काय संदेश देतात ? जयप्रकाशजींच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतात की त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात? ह्याबद्दल जाणून ध्यायची उत्सुकता होती. मी सर्वोदयी विचारांचा नव्हतो, पण तरीही इतर सर्वोदयी कार्यकर्त्यांसोबत मीही, विनोबाजी काय सांगतात हे ऐकायला उत्सुकतेपोटी पवनारच्या नदीच्या पात्रात हजर होतो. आता इतक्या वर्षानंतर मी विनोबाजी निश्चित काय म्हणाले, ते शब्दश: उद्धृत करू शकत नाही. पण मथितार्थ असा होता की, खेड्यामध्ये निर्माण होणारे दूध शहरात पाठवू नका, डेअरीत विकू नका. आपल्या घरातच लहान मुलांना पाजा, घरातच वापरा.
त्यानंतर जंगलविहीन, उजाड सह्याद्रीतील, सातपुड्यातील, एकूणच महाराष्ट्रातील आदिवासी जमातींनी शोषित जन आंदोलनाच्या झेंड्याखाली जंगल बचाव, मानव बचाव घोषणा देऊन वनजमिनींचा संघर्ष सुरू केला तेव्हा लक्षात आले, विनोबाजी केवळ दुधाबद्दल बोलत नव्हते, खेड्याच्या परिसरात माळरानांवर, शेतीच्या बांधांवर, टेकड्यांच्या उतारावर, दऱ्याखोऱ्यात, नैसर्गिकपणे उगवणाऱ्या हिरवळीवर, गवतावर, हिरव्या झाडोऱ्यावर जगणाऱ्या गाईंचे दूध खेड्यातच राहू द्या, ह्या म्हणण्यातून, खेड्यातील संसाधनांच्या उपयोगातून मिळणाऱ्या वस्तूंचा लाभ प्रथम त्या परिसरातील माणसांनीच घ्यायला हवा. ह्या संसाधनांचा उपयोग जे जगण्याकरता करतात, त्या माणसांचाच त्यावर पहिला अधिकार आहे, हेच त्यांना सांगायचे होते.
मानव इतर सजीवांपेक्षा वेगळा आहे, त्याचा मेंदू अधिक विकसित आहे, हे आहेच पण त्याच बरोबर सजीव सृष्टीतील मानव असा एकमेव सजीव आहे, जो सतत कचरा तयार करत असतो, हेही त्याचे वैशिष्ट्य आहे. किंबहुना मानव जितका सुधारत चालला आहे तितका तो भोवतालच्या विश्वाला अधिकाधिक प्रदूषित करत चालला आहे. वाढत्या कचऱ्यामुळे आपण नद्या नासवल्या, भूगर्भातले पाणी दूषित केले, ह्या पृथ्वीवर ऑक्सीजनचे प्रमाण वाढवीत नेऊन, ज्यांनी जीवसृष्टी निर्मितीला योग्य वातावरण तयार केले, जे आजही हवेतील सूर्यशक्तीचा उपयोग करून हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखत आहेत, अशा सागरातील सूक्ष्मजंतूंच्याही जिवावर आपण उठलो आहोत. आपल्या कर्तृत्वशक्तीची झेप एवढी आहे की, सूर्यालादेखील त्याची भूमिका बदलायला आपण भाग पाडले आहे. ज्या सूर्यकिरणांमुळे, पृथ्वीभोवती ओझोन वायूचे संरक्षक कवच निर्माण झाले होते, आणि ज्यामुळे सजीवांना घातक अशा किरणांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेशबंदी केली गेली होती, त्या कवचाला भगदाडे पाडून आपण ह्या घातक किरणांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले आहेत. वनस्पतिसृष्टीवर तर मानव अनेक दिशांनी हल्ला करत आहे. वनस्पतीचे आच्छादित क्षेत्र झपाट्याने कमी होत आहेच, पण वनस्पतिसृष्टीला आवश्यक माती आणि पाणी आणि हवा ह्यांनाही आपण विषयुक्त करत आहोत. विशेषतः जी आकारात यायला वर्षानुवर्षे लागतात, त्या सुपीक मातीच्या आपण जिवावरच उठलो आहोत. एकतर अनेकावधी रसायने वापरून तिला निकस करत आहोतच, पण जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे तिच्यावर सिमेंट काँक्रीटचा थर पसरून, तिचा श्वास घुसमटवून तिला मरणाच्या वाटेने नेत आहोत. आणि ह्या कामात केवळ सरकारच नाही, अगदी लहान व्यक्तीही आपला हातभार लावत आहे. ज्या संसाधनांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो त्या संसाधनांवर आपण निर्माण करत असलेल्या कचऱ्याचा, विषारी द्रव्यांचा, वायूंचा परिणाम प्रथम होत आहे हे मान्य करायलाच हवे. आता इतर जी मर्यादित साठा असलेली भूगर्भातील संसाधने आहेत, मग खनिज तेले असोत, कोळसा असो, आयर्न ओअर असो, प्रत्येक जागी, प्रत्येक औद्योगिक कंपनी सगळे नियम धाब्यावर बसवून भोवतालचा परिसर विविध मार्गाने प्रदूषित करत आहेत. माईनिंग क्षेत्रातील वरचे पाणीच काय भूगर्भातील पाणीही प्रदूषित झाले आहे. दरसाल आपले स्टील उत्पादन किती वाढले, ह्याची आकडेवारी उपलब्ध होईल, परंतु ह्यातून प्रदूषण किती झाले, किती विषारी वायू वातावरणात ह्या कंपन्यांनी सोडले आहेत, ह्याची मोजदादही होत नाही.
मी जेव्हा प्रथम धुळे जिल्ह्यातील (आताचा नंदुरबार) शहादा तालुक्यात आलो, तेव्हा तापी नदीला प्रकाशा येथे मिळणाऱ्या गोमाई नदीच्या काठावरील गावांशी माझा संपर्क आला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या, वळणे घेत तापीकडे धावणाऱ्या ह्या नदीचे पाणी पावसाळ्यात दुथडी भरून वाहायचे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी उतरले की, दिवाळीनंतर काठांवरील गावांतील भूधारक शेतकरी हिवाळी ज्वारीचे पीक घेण्यासाठी शेताची मशागत सुरू करायचे. ज्यांच्याकडे शेती नाही, पण पुरेशी मनुष्यशक्ती आहे, ती कुटुंबे नदीत उतरायची. वळणा- वळणावर जमा झालेल्या रेतीच्या पट्ट्यांची आपसात वाटणी व्हायची, आपले क्षेत्र निश्चित झाले की, रेती कोरण्याचे काम सुरू व्हायचे. जमा केलेले शेणखत, प्रकाशाच्या वड्डर लोकांकडून आणलेल्या डुकराच्या विष्ठेचे खत, क्वचित सुपर फॉस्फेट टाकून खरबूज, टरबूज, कलिंगंड, कारली ह्यांच्या बिया टुपल्या जायच्या. बाभळीच्या काटेरी फांद्याचे कुंपण आकार घ्यायचे, दिवसा सावली देणारे एक छप्परही तयार व्हायचे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला कुठेही अडथळा न करता, पाणी अस्वच्छ न होता, नदीचा प्रवाह वाहत राहायचा. ह्या डांगरवाड्यातील माल तयार झाला की, दोघेतिघे जण एकत्र होऊन भाड्याच्या ट्रकमधून इंदोरला विकायला जावे लागे इतके पीक निघायचे. आज परिस्थिती काय आहे? दिवाळी झाली की, गावातल्या निम्म्या झोपड्यांची दारे कुलूपबंद होतात, गावे ओस पडतात, एकट्या नंदुरबारमधून दीड ते दोन लाख लोक गुजरातमध्ये जगायला जातात. ऊसतोडीच्या कामाला.
नंदुरबारपासून सहा सात मैलांवर तापी नदी गुजरातच्या हद्दीत जाण्याच्या आणि उकाई धरणाच्या जलाशयात मिसळण्याआधी, एक वळण घेते. पावसाळ्यात फुगलेले नदीचे पाणी पात्रात परतले, की तेथून रेती काढण्याचे काम गावातील मजूर करायचे. नंदुरबारमधले ठेकेदार ट्रॅक्टर्समध्ये रेती भरून घेऊन जायचे.
आज नंदुरबार जिल्ह्यातील तापीच काय सर्व नद्यानाल्यांतील रेती काढण्याचा ठेका धुळे, नासिक येथील कुठला तरी ठेकेदार घेतो. नदीचे पाणी कमी होण्याचीही गरज नसते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाणी असतानाच तळाची रेती उपसण्याचे काम सुरू होते. पाणी उतरल्यावर नदीच्या पात्रात उतरण्यासाठी ठेकेदाराचे डोझर्स जागोजागी रस्ते तयार करतात. नदीच्या पात्रात रेतीचा कणही राहाणार नाही, अशी काळजी घेऊन तळ खरडून काढतात. आणि ही रेती जाते कुठे ? थेट नाशिकला किंवा त्याही पुढे. मध्यंतरी जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदारांनीच बोंब मारल्यावर अशा रीतीने रेती दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यावर बंधने आली. परिणाम एवढाच झाला की, ओल्या रेतीने भरलेल्या गाड्या ताडपत्रीने नीट झाकल्या जाऊ लागल्या, रेती सहज दिसणार नाही, अशी काळजी घेतली जाऊ लागली. रेती घेऊन जाणाऱ्या महाकाय ट्रक्समधून खाली टपकणाऱ्या पाण्यामुळे कुणाही सामान्यबुद्धीच्या माणसाला ह्यात रेती आहे हे समजते. पण बंधने आणणाऱ्या, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला हे दिसत नाही. ह्या गाड्या कलेक्टर कार्यालयाजवळच टोलनाक्यावर अडवल्या जात असतील, पण तेथे हजर राहून महसूल खात्याला रेतीची ही तस्करी रोखता येत नाही. हे रेतीबाबतच नाही, सातपुड्यात जे काय थोडेफार जंगल शिल्लक आहे, त्यातील चारोळ्या, महुवा, बांबू, साग ही उघडपणे शेजारच्या राज्यात पाठवली जातात. सह्याद्री, सातपुड्याच्या कुशीतील महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे चालले आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यातील ग्रामीण भागात, कमीजास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. परवाच नियतकालिकात बातम्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलामध्ये वाढलेली कुबाभूळची झाडे तोडण्याचा सत्याग्रह होणार आहे. सत्याऐंशी साली पश्चिम घाट बचाव मोहिमेने भूमिका घेतली होती की, कुबाभळीच्या लागवडीमुळे डोंगरउतारावरील हिरवळ नाहीशी होत आहे. आधीच हायवे, एक्स्प्रेस हायवे आणि धरणे ह्यांनी मेंढपाळांची कुरणे आणि त्यांचे वहिवाटीचे रस्तेही नष्ट झाले, आता मेंढपाळांना अधिकार देऊन उपयोग काय आहे ?
महाराष्ट्रातील ग्रामपंचायती तर सोडाच, अनेक नगरपालिका नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवू शकत नाहीत, कित्येक ठिकाणी पाच पाच दिवस नळाला पाणी येत नाही. आणि पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी नव्वद, शंभर मैलांवरून पाईपलाईनने आणलेले पाणी शहरातील टॉयलेटस स्वच्छ ठेवण्याकरता वापरले जाते. ऐन उन्हाळ्यातही आकाशचुंबी इमारती बांधण्यासाठी वापरले जाते. पुण्यामध्ये ऐन उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा पाणी सोडण्याऐवजी एकवेळा सोडले गेले तर बोंबाबोंब होते, नियतकालिकांमधून अग्रलेख लिहिले जातात. विरोधी पक्षाचेच नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलनाची भाषा करू लागतात. मात्र ज्या क्षेत्रातून हे पाणी शहरात पोचते तेथील महिलांना हंडाभर पाणी मिळवण्यासाठी किती मैलांची पायपीट रोज करावी लागते, ह्याबद्दल सोयीस्कर मौन राखले जाते. नंदुरबार जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांची जी अवस्था, तीच महाराष्ट्राची, तीच देशाची. हे असे का होते? आता एकदम जेटने युरोपात जाऊया. हल्ली टुरीझम प्रचंड प्रमाणात वाढला आहे, आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोचणे सहजशक्य झाले आहे, टुरिस्ट म्हणून.
आता एक आठवड्यापूर्वी, स्वित्झर्लंड देशात, द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मिटिंग झाली. ह्या फोरमच्या निमित्ताने ऑक्सफॅमने जगातील वाढत्या गरिबीच्या आणि संसाधनांवरील मालकी व नियंत्रण ह्याच्या संदर्भात जो अहवाल प्रसारित केला, त्यात असे म्हटले आहे की, आज जगातील संपत्ती म्हणजेच संसाधनांची मालकी व संसाधनांवरील नियंत्रण ह्यांचे प्रचंड प्रमाणात काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण झाले आहे. आज जगात अशा 85 सर्वाधिक सधन व्यक्ती आहेत, की ज्यांच्या नियंत्रणात असलेली साधनसंपत्ती, ही जगाच्या निम्म्या लोकसंख्येच्या हातातील एकूण साधनसंपत्तीएवढी आहे. ह्याचा अर्थ काय होतो? आज जगाची लोकसंख्या आहे सातशे चौदा करोड. ह्याच्या निम्मी लोकसंख्या म्हणजे तीनशे सत्तावन्न करोड. तीनशे सत्तावन्न करोड लोकांच्या नियंत्रणात आज जितकी साधन- संपत्ती आहे, तेवढीच साधनसंपत्ती आज जगातील फक्त पंच्याऐंशी व्यक्तींच्या ताब्यात आहे.
तसे म्हटले तर ऑक्सफॅम काही नवीन गोष्ट सांगत नाही. जगातील राजकीय विचारवंतांनी, अर्थशास्त्रज्ञांनी जागतिक पातळीवर संपत्तीचे काही व्यक्तींच्या हातात होणारे केंद्रीकरण लोकशाही व्यवस्थेला अत्यंत मारक आहे, आणि जगामध्ये देशादेशांत लोकशाही टिकून राहायची असेल तर संपत्तीचे, सत्तेचे, संसाधनांचे नियंत्रण मोजक्या व्यक्तींच्या हाती देणाऱ्या ह्या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेला तातडीने लगाम लावणे अत्यावश्यक आहे, असे वारंवार सांगितले आहे.
अत्यंत कटू विनोद हा आहे की, ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध सांभाळणारी अमेरिका, आपले सैनिकी बळ, आपले शस्त्र-अस्त्र बल अधिकाधिक वाढवीत आहे, वेगवेगळ्या देशांच्या भूमीवर जाऊन युद्ध करत आहे, आणि आपण हे सर्व लोकशाही व्यवस्था वाढावी म्हणून करतोय अशी शेखी मिरवत आहे. अमेरिकेतील ज्यांच्या हाती प्रचंड प्रमाणात संपत्ती केंद्रित झाली आहे, अशा धनाढ्य व्यक्तींची संख्या लक्षात घेतली, ह्या व्यक्तींची तेथील अमेरिकन शासनयंत्रणेवरील पकड लक्षात घेतली, तर ही युद्धे लोकशाहीकरता नाहीत, मानवी अधिकाराच्या संरक्षणाकरता नाहीत, धर्माकरतादेखील नाहीत, तर ह्या काही व्यक्तींच्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, लष्करी, बाजारपेठीय अशा सर्व संसाधनांवरील, अमर्याद अधिकारांच्या सीमा अधिकच विस्तृत करण्यासाठी लढवली जात आहेत, ह्याबद्दल
तिळमात्र शंका उरत नाही. ह्या युद्धखोर साम्राज्यवाद्यांशी दीर्घकाल लढा देऊन, ह्या शक्तीला लोकयुद्धाच्या मार्गाने चारी मुंड्या चीत केल्याची देदीप्यमान उदाहरणेही जगात आहेत. पाच दशकांपूर्वी व्हिएतनामसारख्या चिमुकल्या देशाने युएससारख्या बलाढ्य देशाला सागरात ढकलून दिले आहे. भारत देशाच्या पहिल्या पिढीतील राज्यकर्त्यांनीही, नॉन-अलाईनमेंट परराष्ट्रीय धोरण राबवून अमेरिकेच्या प्रभावापासून देशाला अत्यंत नाजुक अशा काळात सुरक्षित राखले. आज त्या साम्राज्यशाहीचे रूप बदलले आहे. आज ही मक्तेदारी केवळ युद्धातूनच विस्तारली जात नाही. काहीशा वेगळ्या रूपातील ही साम्राज्यशाही, काही व्यक्तींच्या हाती एकत्रित होत चाललेल्या आर्थिक सत्तेची ही प्रक्रिया, इतरही अनेक मार्गाने कार्यरत आहे. ह्या वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेऊन, जागतिक पातळीवरील ह्या भयावह वास्तवाने लोकांसमोर कोणती आव्हाने उभी केली आहेत. हे लक्षात येण्याकरता, 1960- 70 मधील जगाच्या राजकीय नकाशाची तुलना आजच्या नकाशाशी करता येईल. परंतु राजकीय, आर्थिक संबंधांतील ह्या बदलांपेक्षा, मानवाचा आपल्या भोवतालाशी, सजीव निर्जीव सृष्टीशी काय नाते होते, आणि ते कसे बदलत गेले, बदलत आहे, तेही पाहणे उद्बोधक ठरेल.
जगात माणसाला त्याच्या भोवतालच्या वास्तवापासून तोडण्याच्या ह्या प्रक्रियेला जी गती येत आहे, तिला कुठून ऊर्जा मिळते ? तिची मुळे कुठे आहेत ? ती प्रक्रिया प्रथमपासूनच सुरू होती का?
जगण्यासाठी कुठल्याही सजीवाची, प्राथमिक गरज आहे अन्न. ही गरज भागवून, आपला जीव सुरक्षित ठेवून, आपली प्रजाती वाढविण्यासाठी जी धडपड हे सजीव करतात, तेच त्यांचे जीवन मानवप्राणी मात्र इतर समस्त सजीवांपेक्षा वेगळा आहे, दोन लाख वर्षांपासून, त्यांच्या जन्मापासूनच इतर सजीवसृष्टीपासून वेगळे, निराळे होण्याची ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे, आणि आज तिला विलक्षण गती प्राप्त झाली आहे. म्हणजे त्याला जगण्यासाठी अन्नाची गरज नाही, असे नाही. पण अन्नाशिवाय मानवाच्या इतर गरजा सातत्याने वाढतच राहिल्या आहेत, त्यांचे महत्त्वही वाढत राहिले आहे. त्यातून असे झाले आहे की, आज भोवतालचे सर्व चराचर विश्व हे जणु आपल्या जगण्याकरताच, आपल्या प्रजातीच्या विस्ताराकरता, विकासाकरताच, आपल्या सोयीकरताच निर्माण झाले आहे, अशा रीतीने त्याचा सामाजिक आणि सामूहिक व्यवहार चालला आहे. आज मानव भोवतालच्या सर्व पृथ्वीलाच संसाधनाचा साठा समजायला लागला आहे.
भोवतालच्या चरचराशी मानवाचे नाते नेहमीच असे नव्हते. ते कसे बदलत गेले, हे समजून घेण्यासाठी आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासाकडे एक धावती नजर टाकू या.
हजारो वर्षांपूर्वी जंगलांच्या आश्रयाने जेव्हा आदिवासी टोळ्या निसर्गाधीन जीवन जगत होत्या, त्यावेळी मानवांनी सभोवतालच्या विश्वात, अन्नपदार्थांचा, जगण्यास उपयोगी पडू शकतील अशा पदार्थांचा, चराचरांचा शोध घ्यावयास सुरुवात केली. वेगळ्या शब्दांत असे म्हणता येईल की, मानवाचा उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे मानवाने भोवतालच्या विश्वातून जगायला उपयोगी पडणाऱ्या अन्नाचा आणि संसाधनाचा सातत्याने घेतलेल्या शोधांचा आलेख आहे. वनमानुष अवस्थेत ज्यावेळी मानवाला शेतीचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा त्याला जगण्यासाठी उपयुक्त वस्तू नेमक्याच होत्या. जंगलातून मिळणारी कंदमुळंफळं, नद्याचे पाणी, थंडी, वारा, उन्हापासून संरक्षणासाठी गुहांचा आश्रय, अग्नी पेटता ठेवण्यासाठी लागणारे इंधन, आणि सहजतेने मारता येण्यासारखे लहान आकाराचे प्राणी, पक्षी. खाद्य मिळवण्यासाठी, सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली हत्यारे तयार करायला लागणारे पदार्थ, ही मानवाची जगण्याची संसाधने होती.
कालांतराने शेतीचा शोध लागल्यावर, मोसमात पिकवलेल्या धान्याचा साठा करून एका जागी राहणे शक्य होऊ लागले. रिकामा वेळ मिळू लागला, आणि माणसाचा माणूस बनण्याकडे प्रवास सुरू झाला. मानवाची उत्क्रांती म्हणजे मानवाची निसर्गाधीनतेतून मुक्ती. माणूस अस्तित्वात आल्यापासून जगणे अधिकाधिक सुखी, सुरक्षित व्हावे यासाठी भोवतालच्या चराचरातील वस्तूंचा, ऊर्जेचा उपयोग करायला शिकत गेला.
ह्याच्या पुढची पायरी म्हणजे नैसर्गिक रीतीने उत्पादित होणारी ही संसाधने, निसर्गनियमांचा उपयोग करून, मानवी प्रयत्नांतून उत्पादित करणे. झाडांची फळे गोळा करून पोटाची भूक भागवताना, त्यावेळच्या स्त्रियांच्या लक्षात आले की, गुहेबाहेर फेकून दिलेल्या बियांतून नवीन झाडे निघतात. त्यातून शेतीचा शोध लागला. जंगल तोडून डोंगर उतारावर बिया फेकून तो शेती करू लागला. त्याच्या लक्षात आले, काही संसाधने अशी आहेत की, जी नव्याने निर्माण होत राहतात, त्यांचे पुनः उत्पादन करता येते. मानवाच्या प्रगतीचा हा एक महत्त्वाचा टप्पा. कारण शेतीच्या शोधामुळे, अन्नधान्याचा साठा करून ठेवण्याचे तंत्र मानवाने आत्मसात केले, त्यातून एकाच जागी स्थिर वस्ती करून राहाणे हे त्याला शक्य झाले. त्यातूनच, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, तिचा विकास सुरू झाला.
ह्या संसाधनांच्या शोधामुळे, त्यांच्या उपयोगांमुळे मानव इतर सजीवांपेक्षा वरचढ झाला. निसर्गनियमांचाच उपयोग करून निसर्गाला लगाम लावू लागला. जेथे निसर्गाचे रूप अक्राळविक्राळ व लहरी होते, असे भूभाग सोडून तो सौम्य हवामान असलेल्या, नियमित निसर्गचक्र असलेल्या क्षेत्रात स्थलांतरित होऊन स्थिरावला. ह्यानंतर त्याचे निसर्गाशीच नव्हे तर आपसातील संबंधही बदलू लागले.
ज्या भागात विशिष्ट संसाधनाची उपलब्धी गरजेपेक्षा अधिक आहे, ती संसाधने गरजूंना देऊन, त्याच्या बदल्यात, आपल्याकडे उपलब्ध नसलेली संसाधने मिळवणे, असा परस्पर व्यवहार मानवी वस्त्यांमध्ये सुरू झाला. इथे मानवी समूहांमध्ये प्राथमिक स्वरूपातील व्यापार सुरू झाला. ह्याच टप्प्यावर संसाधनांची निर्मिती करणारे उत्पादक आणि ही संसाधने दुसऱ्या जागी नेऊन, त्याबदली दुसरी संसाधने घेणारे, संसाधनांची अदलाबदल करणारे, त्यातून लाभ मिळवणारे व्यापारी हा एक वेगळा समाजगट म्हणून आकारास आला.
कालांतराने उत्पादकांपेक्षा व्यापाऱ्यांची ताकद वाढत गेली, उत्पादकाला लागणारा कच्चा मालही व्यापाऱ्यांनी पुरवायला सुरुवात केली, उत्पादकाने तो माल जास्तीतजास्त उत्पादित करावा ह्यासाठी उत्तेजन दिले. त्याची गरज पुरी करणारे उत्पादक तयार व्हावेत, त्याकरता साम, दाम, दंड, भेद ह्यांचाही उपयोग केला. ज्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो, त्यात हेच घडले. जे उत्पादन- व्यवस्थेत नव्हते, पण उत्पादित वस्तूंचा व्यापार करून ज्यांना कमाई होत होती, त्यांनी उत्पादन-व्यवस्थेत ढवळाढवळ करायला सुरुवात केली.
ह्या व्यापारी वर्गाने एकीकडे उत्पादकांना व दुसऱ्या बाजूस गिऱ्हाईकांना वेठीस धरले. ह्या व्यापारी मंडळींची ताकद कुठल्या मर्यादेला पोचली हे आपणा भारतीयांना सांगण्याची जरूर नाही. भारतात व्यापार करायला आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचा जुलुमी कारभार संपवून राणी सरकारने आपला कारभार सुरू केला, म्हणून आपल्या पूर्वजांनी त्यावेळी आनंदोत्सवही साजरा केला. परंतु ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचे धोरण हे ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा फारसे वेगळे नव्हते. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व भारतभर रेल्वेचे जाळे पसरले, आणि दूरपर्यन्त पसरलेल्या वनसंपत्तीपर्यन्त आपले घेणारे हात पोचवले. देशातील दूरदूरच्या दुर्गम भागातील कापूस थेट मँचेस्टरपर्यन्त पोचविण्याची व्यवस्था केली. भारत स्वतंत्र झाल्यावर तोच वारसा पुढे चालू राहिला. येथील सरंजामी शेतीव्यवस्थेतील संसाधने, उपकरणे घडविणाऱ्या उत्पादक कारागीर जाती बाजूलाच राहिल्या आणि व्यापारी जातीतील लोक कारखानदार झाले. त्यांनी शासनयंत्रणेद्वारे जनतेचा पैसा प्रचंड प्रमाणात घशात घालावयास सुरुवात केली. नवनवे उद्योग सुरू करण्याच्या मिषाने सरकारच्या साह्याने लोकांच्या जमिनी मातीमोल भावाने विकत घेतल्या. आज आपण जगातील बलाढ्य राष्ट्राशी अमेरिकेशी दोस्तीचे संबंध निर्माण केले म्हणून आनंद मानणारे अनेकावधी आहोत. पण हे अमेरिकन शासन अखेर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध राखण्याकरता, वाढविण्याकरता राज्यकारभार करते, आणि हे उघडे नागडे वास्तव आहे. आज जागतिकीकरणाच्या नावाखाली, सर्व जगाची बाजारपेठ आपल्या ताब्यात घेणे हेच ज्यांचे उद्दिष्ट आहे, अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचीच ताकद वाढत चालली आहे, हे आपल्याला माहीत आहे.
जगातील सर्वच मानववंशीयांना ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवी ओळख दिली आहे आणि ती आहे ग्राहकाची. आज माणूस म्हणून जगण्याचा अर्थच, बाजारपेठेत जास्तीत जास्त वस्तू खरेदी करण्याची कुवत असलेले गिऱ्हाईक बनणे, असा झाला आहे. आज रिकामा वेळ मिळाल्यावर लोक बागेत जात नाहीत, देवळातही जात नाहीत, खेळांच्या मैदानावरही जात नाहीत, ते मॉल्समध्ये जातात. त्यातून हेच दिसते की आज मानवाचे बाह्यविश्व तर झपाट्याने बदलत आहेच, पण माणसाचे अन्तर्विश्वही बदलू लागले आहे. उत्पादन व्यवस्थेतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे एकूण माणसाला रिकाम्या वेळेची उपलब्धी वाढली आहे. पण माणसांनी ह्या रिकाम्या वेळेचे काय करावे हेदेखील बाजारपेठेने ठरवून टाकले आहे, तेथेदेखील माणसांनी गिऱ्हाईकांची भूमिकाच प्रामाणिकपणे निभावत जावी, असेच त्यांचे प्रयत्न आहेत. आणि दुर्दैवाने हा मानसिकेतील बदल केवळ शहरवासीयांत होत नाही, वेगवेगळ्या मीडियांतून हेच शिकवले जात आहे आणि त्याचा परिणाम दुर्गम अशा खेड्यांतील गरीब कष्टकरी कुटुंबांतील नव्या पिढ्यांवरही होत आहे.
पन्नास वर्षांपूर्वी पूजनीय महात्मा गांधी, आधुनिक संत विनोबाजी ज्याचा आग्रह धरत होते, ते साध्य करण्यासाठी आज वेगळ्याच आह्वानांशी सामना द्यावा लागणार आहे. कारण ह्या मानवी जगाला आपल्या कब्जात घ्यायला निघालेल्या नव्या व्यवस्थेने आपल्याला अंतर्बाह्य बदलायचा अजेंडा घेतला आहे आणि आपण त्या व्यवस्थेचे बळीचे बकरे बनत आहोतच, पण त्याचबरोबर ही व्यवस्था मजबूतही करण्यातही साह्यभूत होत आहोत. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी आपली अवस्था झाली आहे.
आदर्श गि-हाईक बनण्यासाठी व्यक्तीने चंगळवादी जीवनप्रणाली अंगीकारली पाहिजे ही ह्या बाजारपेठेची गरज आहे. त्यानुसार एकीकडे आपण गिऱ्हाईक तर बनतच आहोत, पण दुसऱ्या बाजूला स्वतःला माणूस म्हणून नाही तर क्रयवस्तू म्हणून बाजारात आणत आहोत. पदव्यांचे झगमगते कपडे अंगावर चढवून, अनुभवाचे शिक्के छातीवर मिरवून, आपण आपली बोली लावून बाजारपेठेत उभे राहतो, ते क्रयवस्तू म्हणूनच. आपण देणार असलेल्या सेवेचे मूल्य किती हे ठरविण्याकरता आपण कंपनीशी वाटाघाटी करतो, आणि जे आपली जास्त किंमत देतील, त्यांच्यासाठी काम करतो.
माणसाने आपल्या गरजा सतत वाढवत न्याव्यात हे आजच्या आर्थिक जीवनाचे सूत्र आहे. असे वसंत पळशीकरांनी एके जागी म्हटले आहे. सामान्य माणसाला सतत नवनव्या वस्तू विकत घेण्याचे व्यसन लागावे, जे मनात येईल ते विकत घेण्याची कुवत असणे ही यशस्वी जीवनाची खूण आहे, हे त्याच्या मनावर ठसावे असे प्रयत्न बहुराष्ट्रीय कंपन्या करतातच, परंतु हे तत्वज्ञान आपल्यांपैकी बहुतेकांनी जाणते-अजाणतेपणी स्वीकारले आहे, हे अधिक खेदजनक आहे.
तसे बघितले तर बहुराष्ट्रीय कंपन्या आज आपल्याबाबत जे धोरण राबवताहेत ते आपल्याकरता फार अनोळखी नाही. निसर्गाच्या बाबतीत पूर्वीपासून आपला दृष्टिकोन हाच राहिला आहे. आपल्याला हवे आहे ते त्याच्याकडून घ्यायचे, असेच आपले वर्तन राहिले आहे. जे घेतले ते परत करायचे आपल्याला माहीत नाही. म्हणजे जगातील अर्ध्या जगाचे मालक असलेले ते 85 गबरू आणि आपण सज्जन, सुसंस्कृत सामान्य मध्यमवर्गीय माणूस दोघांचीही मनोभूमिका एकसारखीच आहे. घेणाऱ्याने घेतच राहावे, देणाऱ्यांचे हात नेहमीच दुसऱ्याचे असावेत. देशाकरता त्याग बीग करावा, लष्कराच्या भाकरी भाजाव्यात, प्रसंगी जीव अर्पण करावा, पण आपल्या माणसांनी नाही, दुसऱ्यांनी. आपण रस्ता रुंदीसाठी झाडे तोडायला विरोध करतो, पण सहापदरी, आठपदरी रोड तयार करताना हजारो एकर जमिनीवर सिमेंटची लादी पसरली जाते, त्याबद्दल आपली काही तक्रार नसते. पर्यावरणाच्या नाशाबद्दल आपण बोलतो, जेव्हा आपण शहरातील, आजूबाजूच्या टेकड्यांवरील जंगल उद्ध्वस्त करून टेकड्यावर नियमबाह्य अतिक्रमण हाऊसिंग कॉलनी तयार झाल्या की वर्षातून दीड-दोन महिने सुट्टीत राहण्यासाठी म्हणून आपण तेथे फ्लॅटस घेऊन ठेवतो. किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणूनदेखील अशा फ्लॅटसमध्ये पैसा गुंतवतो आणि रिकाम्या फ्लॅटसची संख्या वाढवतो. स्वत:चा बंगला बांधताना, शक्य झाले तर नियमांना डावलून, नाहीतर नियमांत राहून जास्तीतजास्त बिल्टइन एरीया वाढविण्याचा प्रयत्न आपणही करतो. आपला देशाभिमान कुठे जागृत होईल हेही सांगणे कठीण झाले आहे. मला खात्री आहे की, ऑक्सफॅमने प्रसिद्ध केलेला हा रिपोर्ट वाचल्यावर निदान काही भारतीयांनी तरी ह्या 85 मध्ये आपला भारतीय आहे का ? ह्याचा शोध घेतला असेल. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. जगातील कुप्रसिद्ध गुन्हेगार म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यातील निकाळजे असे अभिमानाने सांगणारे नगरकर मला भेटलेत. जगातील सर्वांत सधन शंभरांमध्ये पूर्वी आपल्या देशाचे जितके लोक होते, त्यांची संख्या तीन चार जणांनी वाढली, हे ऐकले की आपली मान ताठ होते. देशातील बँकांचे किती कोटीचे कर्ज ह्या व्यक्तींनी बुडवले हा प्रश्न आपण विचारणार नाही. भारतातील कोट्यधीशांची संख्या गेल्या वर्षात दुप्पट वा चौपट झालीय, असे ऐकले की आपली छाती फुगते. जसे काही हे सगळे लोक कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊनच करोडपती झालेत. राजकारणी लोकांच्या भ्रष्टाचाराबद्दल आपण नेहमीच बोंब मारत असतो, परंतु नव्या मुंबईसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागातून साधा महसूल अधिकारी दर महिन्याला पोतेभर नोटा घरी नेतो, किंवा नांदेडला बदली झालेल्या इंजिनियरच्या कॉटखाली काही महिन्यांच्या अवधीतच नोटा भरलेल्या ट्रंका सापडतात, आणि आपण चक्कार शब्द काढीत नाही.. हे सर्व पैसे जमिनीच्या खरेदीविक्री व्यवहारातील कमाई होती, हे महत्त्वाचे. आपण भ्रष्टाचाराबद्दल बोलतो पण बहुतेक भ्रष्टाचार ज्याला आपण रिअल इस्टेट म्हणतो, ती संसाधनेच असतात हे आपण लक्षात घेत नाही.
आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने मानव एवढा बलशाली झाला आहे की, निसर्गाचा मालकच जणु काही आहे. नैसर्गिक संसाधने म्हणजे शाश्वत पुरवठा, ह्या समजुतीतून बाहेर येत असलो, तरी निसर्गनिर्मित पदार्थ संपुष्टात आले तर आम्ही नवीन पर्यायी पदार्थ प्रयोगशाळेत तयार करू, असा विचारही जोर धरू लागला आहे.
ह्या अशा गोचीदार वास्तवातून बाहेर पडायला काही न मळलेल्या पाऊलवाटा, काही चोरवाटा तरी शिल्लक राहिल्या आहेत का? ह्या प्रश्नाचे ठामपणे होकारार्थी उत्तर देणे खरे तर फार कठीण आहे. परिस्थितीचे नेमके भान असेल, तर नेमका प्रश्न विचारता येईल. व त्याचे नेमके उत्तरही मिळेल. पण परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की विचार करायला लागले की, मनाला थरकाप सुटतो. अर्थात तशातही काही व्यक्ती ज्या जिद्दीने, अढळ श्रद्धेने, फळाची आशा न धरता काम करीत राहतात, त्यांना आपण सर्वच सलाम करतो. पण हे करताना, क्षितिजावरील काळ्याकुट्ट ढगांकडे कानाडोळा करावा लागतो.
ह्या दाट डोळ्यांना झोंबणाऱ्या, चोहोबाजूंनी आंधारून आलेल्या, सूर्याला क्षीण करून टाकलेल्या धुक्यातून वाट काढायलाच हवी. शक्य तेवढा विरोध
करायलाच हवा. मी फार अशादायी बोललो नाही, ह्याबद्दल मी क्षमा मागत नाही, कारण आपण मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या कष्टाने मिणमिणत्या पणत्या टिकवून ठेवत आहात हे खरे. पण त्याच्या बळावर आभाळात घोंघावणऱ्या चक्रीवादळाकडे दुर्लक्ष करणे मात्र असंभव आहे.
ह्या काहीशी निराशेच्या सुराबद्दल क्षमा मागून, शेवटी मननीय विनोबांची एक कथा आठवतेय, ती सांगतो.
शहाद्यातील भील आदिवासींची हजारो एकर जमिनी गैरमार्गाने, बेकायदेशीरपणे सधन शेतकऱ्यांनी घशात घातल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी कायद्याच्या चौकटीतच, पण आपला न्याय्य अधिकाराच्या व संघटित बळावर ह्या जमिनी मुक्त करण्याची मोहीम शहादा ग्राम स्वराज्य समितीने घेतली व यशस्वीपणे राबवली. तेव्हा सर्वोदय मंडळातील काही लोकांनी विनोबाजींकडे तक्रार केली, ही मंडळी हिंसेचा उपयोग व प्रचार करतात. खरे, खोटे करण्यासाठी एक कमिटीही नेमली गेली. त्यानंतर ग्रामस्वराज्य समितीचा अध्यक्ष म्हणून अंबरसिंगला विनोबांजीसमोर हजर राहण्यास सांगितले गेले. विनोबाजींनी अंबरसिंगची बाजू ऐकून घेतली आणि ते म्हणाले, बाबा शहादा-धडगाव गया था, तब देखा है, हरेक भील के हाथ में डंडा रहता था, आजकल भीलों ने हाथ में डंडा छोड दिया क्या? प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वाट न पहाता, विनोबाजीचे पुढे म्हणाले होते, हात में डंडा तो रखनाही चाहिये.. मग ड्रॅमॅटिक पॉजनंतर म्हणाले, कोई अगर तुम्हारे सरपर डंडा मार रहा है तो डंडे को रोकने के लिये तो हाथ में डंडा रखो.
अवकाश, 32 वागेश्वरी नगर, नंदुरबार- 425412. (मोबा. 9403422627)
जो चष्मा आपण घालतो, जी चौकट वर्गीकरण व मूल्यमापन यासाठी वापरतो त्यावरूनच आपण ज्याला ज्ञान म्हणतो, त्याचा आशय व आकार ठरतो. हे चष्मे आणि चौकटी पूर्वग्रहसापेक्ष असतात. उदा. लिहितावाचता येणारा तो साक्षर, ज्याला ते येत नाही तो निरक्षर. हे वर्णन तटस्थपणे केलेले वर्णन कधी म्हणता येईल ? निव्वळ तांत्रिक अर्थाने निरक्षर असलेला माणूस प्रत्यक्षात सुसंस्कृत व ज्ञानी असू शकतो हे पक्के मान्य असेल तर. पण निरक्षराचे समीकरण अडाणी मागास असंस्कृत यांच्याशी घातले गेले की साराच मामला बिघडतो.
वसंत पळशीकर