स्नेह.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःसाठी काही संकल्प आखायचे आणि पुढे वर्षभरात त्यातील किती पूर्ण होतात, किती अपूर्ण राहतात ह्याचा हिशोब मांडल्यावर अनुषंगाने आनंदी वा दुःखी व्हायचे, हे आपल्यापैकी अनेकांसोबत वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात झाले असतेच!
ह्या संकल्पांमध्ये एक नागरिक ह्या नात्याने आपण किती आणि कुठले संकल्प करतो, ह्याचाही विचार असायला हवा. विवेकाने केलेले असे संकल्प आपल्या सगळ्यांना पूर्णत्वाला नेता आले असते तर, आज आपल्या देशाच्या प्रगतीला काही वेगळी दिशा नक्कीच मिळाली असती. पण, नागरिकत्वाची आपली कर्तव्ये पार पाडण्याचे साधे, सोपे यत्नदेखील आपण करीत नाही आहोत. भोवतालची सामाजिक, आर्थिक विषमता आणि त्यामुळे होणारे शोषण बघता हे अधोरेखितच होते.
माणूस म्हणून जगायचे तर, आपल्या सभोवतालाप्रति, आपल्या समाजाप्रति, आपल्या परिसराप्रति आपण संवेदनशील राहायला हवे, हा अत्यंत मूलभूत विचार आपल्या संवेदनांतून हरवत तर चालला नाही ना, हे आपल्याला म्हणूनच सतत तपासत राहायला हवे.
त्या अनुषंगानेच ‘आजचा सुधारक’च्या ह्या अंकात पर्यावरणाची हानी, लैंगिकतेकडे बघण्याची समाजाची दृष्टी, स्त्री चळवळींचे सामाजिक बदलांतील योगदान व त्यातील त्रुटी, लोकशाहीवर उठलेली प्रश्नचिह्ने अशा विविध विषयांवरील लेख प्रकाशित करतो आहोत. ह्या विषयांवर आपले विचार उत्स्फुर्तपणे आणि आपुलकीने पाठवणार्या सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार.
अंकातील लेखांवरील आपले अभिप्राय वाचकांनी आमच्यापर्यंत पोहोचवावे, हा आग्रह. तसेच, ‘सुधारक’ हे वेबपोर्टल अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलण्यात आपणां सर्वांचे सहकार्य मिळावे ही विनंतीवजा अपेक्षा.
समन्वयक,
आजचा सुधारक
मी माझा छोटेखानी लेख पाठविला होता. तो प्रसिद्ध झाला नाही याबद्दल मला वाईट वाटले.
राघवेंद्र मण्णूर
डोंबिवली
.
प्रिय राघवेन्द्र ह्यांस
सस्नेह.
आपला छोटेखानी लेख मिळाला होता. निवडणूक काळात लोकांना दिल्या जाणाऱ्या आश्वासनांविषयी (रेवड्यांविषयी) तुम्ही तुमचे विचार त्यात मांडले; पण ते फारच अल्प शब्दांत होते. नियतकालिकातील लेखांकडून वाचकांच्या थोड्या वेगळ्या अपेक्षा असतात.
आपल्याला हे कळवले असते तर, कदाचित आपण लेखाचा विस्तार वाढवून दिला असता. परंतु अंक-प्रकाशनाच्या इतर काही कामांच्या व्यस्ततेत ते राहून गेले. त्यासाठी क्षमस्व.
आपण ह्यापुढे संपर्कात राहूया. ‘आजचा सुधारक’चा पुढचा अंक एप्रिल २०२५ मध्ये प्रकाशित होईल. त्यावेळी लेखांविषयीचे आवाहन आपल्याला पाठवूच. आपला सहयोग मिळत राहील, ही अपेक्षा.
पुन्हा एकदा क्षमस्व आणि ह्यावेळी दिलेल्या सहयोगाबद्दल आभार.
आपण ‘आजचा सुधारक’चे सदस्यत्व घेतले नसल्यास कृपया https://www.sudharak.in/subscribe/ येथे जाऊन आपला ईमेल आयडी नोंदवून ठेवा. आमच्यातर्फे अंकाविषयीच्या माहितीच्या ईमेल्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील.
– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक
नमस्कार,
तुम्ही अतिशय महत्वाचे सामाजिक कार्य करीत आहात. या कार्याला मदत म्हणून मी छोटीशी आर्थिक साहाय्य करू इच्छितो. कृपया कळवावे.
सुरेश पिंगळे
+919822081000
नमस्कार सुरेश,
आपण दाखवलेल्या स्नेहाबद्दल आम्ही ऋणी आहोत.
आपण व्यक्त केलेल्या विषयाविषयी मी आपल्याशी व्यक्तिगत संपर्क करते.
– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा आणि निर्भय माध्यमांचा लोप होत असताना, ‘आजचा सुधारक’ विवेकी आणि धर्मनिरपेक्ष विचारांसाठी आशेचा किरण आहे. विवेकशील विचारांना प्रोत्साहन देणे, तसंच लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवणे यासाठी अशा मुक्त आणि निर्भय व्यासपीठांची आज अधिकाधिक गरज आहे.