गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादींबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील, त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले. जुलै-ऑगस्टमध्ये उत्तरभारतात व ऑक्टोबरमध्ये सिक्किम राज्यात महापूर आल्यामुळे व भूस्खलनामुळे शेकडोंनी जीवितहानी झाली, हजारो बेघर झाले. पिकांचे नुकसान झाले व रस्ते, पुलांसारख्या मूलभूत सुविधांची पडझड झाली. दिल्लीच्या काही भागात गंगा व यमुना दुथडी भरून वाहू लागल्या. गेल्या ४५ वर्षांत पोचली नाही त्यापेक्षा जास्त उंची पाण्याच्या पातळीने गाठली व मोठ्या प्रमाणात महापूर आला. ही सर्व भारतातील उदाहरणे हिमनगाएवढीच आहेत.
उष्माघातामुळे मेक्सिको व अमेरिकेत शेकडोंनी मृत पावले असतील. युरोप, चीन व थायलँड ह्या देशांनाही ह्याचा फटका बसला. अमेरिका, जपान, चिली, ब्राझिल, हैटी, स्पेन, चीन, दक्षिण आफ्रिका, आयव्हरी कोस्ट, पाकिस्तान, ग्रीस, लिबिया इत्यादी अनेक देशांतील शहरांच्या जवळपास महापूर व वणवा ह्यांच्या थैमानामुळे हजारोंनी मृत्युमुखी पडले. लाखो लोकाना स्थलांतरित व्हावे लागले. वाढत्या उष्णतेमुळे पिकांची हानी झाली. महापूर, वणवा, वादळी वारे व दुष्काळ जगभर पसरले. १२५ वर्षांत झाली नव्हती त्यापेक्षा जास्त तापमानातवाढ झाली. २०२३ हे तापमानातील उच्चांकाचे वर्ष असेच म्हणावे लागेल. तापमानवाढीची आपण कल्पनाही करू शकणार नाही.
हवामानातील अशा प्रकारचा बदल भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण त्याची वारंवारता, त्याचा आवाका व तीव्रता ह्यांच्यात दिवसे न् दिवस वाढ होत चालली आहे. त्याचे कारण जागतिक तापमान हरितगृह वायूंचे (Green House Gases -GHGs) जमा होण्यामुळे असेल. कर्ब वायू व मिथेन वायूचा सापळा वातावरणातील उष्णतेला पकडून ठेवते. जीवाष्म इंधन जाळणाऱ्या औद्योगिक व इतर आर्थिक उपक्रमांचे, जंगलतोड व ओलसर जमीनीवरील आक्रमण ह्याचे फलित हे विषारी वायू आहेत. ही उष्णता आर्क्टिक महासागर व ग्रीनलँड येथील पुष्कळ बर्फ वितळून टाकते. त्यामुळे वितळलेले काळेशार पाणी व उघडे पडलेले खडक सौर उत्सर्जित किरणांना जास्त प्रमाणात शोषून घेत आहेत. त्यातून पुन्हा जास्त प्रमाणात उष्णता – पुन्हा बर्फ वितळणे – त्यातून जास्त उष्णता… अशाप्रकारे हे चक्र अव्याहतपणे हवामानव्यवस्थेचा एक भाग होऊन जात आहे. पुढील काही दशकांत अजून काही राष्ट्रे, काही शहरे ह्यांना अवकाळी आलेल्या महापुरांचा सामना करावा लागेल. तसेच ह्या उष्णतेच्या लाटेमुळे अनेक जण मृत्युमुखी पडतील. शेतातील पिके जळून खाक होतील. हे सर्व पृथ्वीच्या तापमानातील बदलांमुळे होत राहील.
अनेक वैज्ञानिक, पर्यावरणतज्ज्ञ व संवेदनशील राजकीय नेते इत्यादींना गेल्या दशकभरातील तापमानातील वाढ मुख्यत्वेकरून जीवाष्म इंधनामुळे होत असून त्याचे दुष्परिणाम आता आपण भोगत आहोत, ह्याची जाणीव झाली आहे. ह्या समस्येला उत्तर शोधण्यासाठी एकत्र बसून काही ध्येय-धोरणे सुचविली गेली. संयुक्त राष्ट्र संघानी पुढाकार घेऊन Intergovernmental Panel on Climate Change (आयपीसीसी -IPCC) ह्या नावाच्या समितीची स्थापना केली. ह्या समितीची २८वी वार्षिक बैठक डिसेंबर २०२३मध्ये दुबई येथे समाप्त झाली.
गेली कित्येक वर्षे ही समिती जागतिक GHG संबंधीचे, त्यातही कर्ब वायूसंबंधीचे व त्यामुळे तापमान, जैवविविधता व नागरी जीवनावर होत असलेल्या परिणामांचा तांत्रिक अहवाल प्रसिद्ध करत आली आहे. काही काल्पनिक; परंतु सैद्धांतिकरित्या बरोबर असलेल्या प्रसंगातून जीवाष्म इंधनाच्या वापरामुळे, जंगल व पाणथळ ह्यांच्या विनाशामुळे नेमके काय होत आहे, ह्याबद्दल शासन व इतर संस्थांना समिती मार्गदर्शन करीत आहे. प्रदूषणामुळे व औद्योगिकीकरणाच्या चुकीच्या कल्पनामुळे वातावरणातील GHGत कशी वाढ होत आहे, हे लक्षात आणून देत आहे. ह्या समितीच्या अंदाजाप्रमाणे जागतिक तापमानात २०३०-२०५३ च्या सुमारास औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला असलेल्या तापमानाच्या तुलनेने सरासरी १.५ अंश वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु आताच २०२३ मध्येच १.४५ अंशाने तापमान वाढलेले आहे. आपण आताच धोक्याच्या पातळीजवळ आहोत. ह्यापेक्षा थोडीशी जरी वाढ झाली तर नेमके काय काय होऊ शकते, ह्याची आकडेवारी दिल्यामुळे आयपीसीसीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, हे कळून चुकले आहे. ह्या धोक्याच्या सूचनेमुळे कित्येक राष्ट्रे आपल्या देशातील उद्योगसंस्थांना कर्ब वायूची पातळी खाली आणण्यासाठी दबाव आणत आहेत. एक मात्र खरे की, समितीच्या आग्रहामुळे केवळ पर्यावरण समानतेच्या वायफळ गोष्टी न करता विकसित व अतिविकसित राष्ट्रांकडून एक निधी (loss and damage fund) गोळा करून विकसनशील व अविकसित राष्ट्रांना नुकसानभरपाई करण्यास भाग पाडले जात आहेत. कारण पर्यावरण विनाशात विकसित/अतिविकसित देशांचा वाटा फार मोठा आहे.
आयपीसीसीच्या अहवालात भरपूर माहिती, त्या माहितीचे विश्लेषण व वैज्ञानिकरित्या केलेले भाष्य असल्यामुळे आपल्या Earth-system बद्दलच्या ज्ञानात चांगलीच भर पडते. पर्यावरणतज्ज्ञांचे हजारो पाने असलेले अहवाल जगभरातील वैज्ञानिकांनी लिहिलेले असून जगातील सर्व प्रदेशातील प्रदूषण व पर्यावरणहानी ह्याबद्दलची एकूण एक माहिती त्यात वाचायला मिळते. तरीसुद्धा काही राष्ट्रे पळवाटा शोधतात व आपापल्या वाट्याला निर्दिष्ट केलेला निधी देण्यात टाळाटाळ करतात. काहीतरी निमित्त काढून प्रदूषण कमी करण्याऐवजी त्यात वाढच करतात. निसर्गाला ओरबडून विकासाच्या गप्पा मारतात.
यासंबंधी एक गोष्ट विषदपूर्वक नमूद करावीशी वाटते. गेली तीन दशके आयपीसीसीने प्रयत्न करूनही GHGची पातळी तसूभरही कमी न होता वाढतच राहिली. म्हणूनच कदाचित आयपीसीसीमुळेच ही वाढ झाली, असे म्हणावेसे वाटले असेल. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व विद्युतवाहनांचा वापर ह्यांच्यात लक्षणीयरित्या वाढ होऊनही जागतिक GHG वाढीचा दर कमी होत नाही. हा दर असाच वाढत गेल्यास २१०० पर्यंत तापमान तीन अंशाने वाढेल. जगभरातील अनेकांनी ह्याबद्दल चिंता व्यक्त केली असून कुणीतरी ह्याची नेमकी कारणे शोधून उपाय सुचवावे (To Figure This Out And Fix It), असे म्हणण्याची पाळी येऊन ठेपली आहे. तापमानवाढ कशी थांबविता येईल? परिस्थिती इतकी हाताबाहेर का गेली? वेळीच उपाय का सुचले नाहीत? पाणी, वारा, किरणोत्सर्जन इत्यादी बाबींबद्दलची केमिस्ट्री व डायनॅमिक्स माहीत असूनसुद्धा त्यांची कारणे, त्यांचे एकमेकाशी असलेले संबंध ह्याबद्दल शेकडो, हजारो प्रबंध उपलब्ध असूनसुद्धा आपण कुठे चुकत आहोत? आपण अजूनही का धडपडत आहोत? आपल्याला मार्ग का सापडत नाही? आपली दिशाच तर चुकली नसेल ना?
वरील आलेखांचा अभ्यास करीत असताना हवामानबदलाविषयी जागरूक असलेले सामान्य नागरिक हताश होतील. काहींना असे वाटेल की ही समस्या मानवी प्रयत्नांच्या आवाक्यात नाही. ह्या पृथ्वीचे लचके तोडल्याशिवाय आपण जगूच शकत नाही, असे नैराश्याने म्हणावेसे वाटेल. परंतु ही निराशा, हे वैफल्य मानवी उत्क्रांतीच्या विरोधात जाते. गेल्या तीन लाख वर्षांत (बुद्धिमान माणसाच्या) सुमारे दहा हजार पिढ्या होऊन गेल्या असाव्यात. आताच्या तुलनेत जागतिक हवामानातील चढउतार एवढ्या तीव्रतेने पूर्वी कुठल्याही पिढीला जाणवले नसेल का? गेल्या दहा पिढ्यांनाच (सुमारे तीनशे वर्षे) ह्या समस्येला सामोरे का जावे लागत आहे?
हा बदल असा अचानक झाला आहे का, ह्याचे मुख्य कारण म्हणून काहींना आपल्यातील हाव वाटतो, काहींना आपला स्वार्थ वाटतो. परंतु हे दोन्ही गुणविशेष आपल्या जीवनाचाच भाग असून काहीवेळा ह्या गुणांनी मानवी अस्तित्वाला हातभारच लावलेला आहे, हे विसरता येत नाही. एवढ्या हजारो-लाखो वर्षांनंतर हे गुणविशेष दुर्गुण म्हणून का ओळखले जात आहेत? एवढे त्रासदायक का ठरत आहेत? आपण समस्येचे सुलभीकरण तर करत नाही ना? कुणाला तरी दोष द्यायचे म्हणून राजकीय नेत्यांना व तेल कंपन्यांना दूषण दिले जात नाही ना?
परंतु फक्त ह्यांच्यामुळेच तापमानवाढ होत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कदाचित एक धोरण म्हणून GHG कमी करण्यात ते अपयशी ठरले असतीलही; परंतु व्यक्तिशः आपण त्यांना जबाबदार धरू शकत नाही. त्यांची कृती कायदेशीर असू शकेल वा त्याला काही मर्यादा असू शकतील. आपण जसे आपल्या आधुनिक जीवनव्यवहारासाठी व्यवस्थेवर अवलंबून आहोत; त्याचप्रकारे ते सर्व व्यवस्थेचे बळी आहेत. आपला जीवनव्यवहार खनिज इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. खनिज इंधन हा भांडवलशाहीच्या राजकारणातील एक महत्त्वाचा घटक आहे. राजकीय नेते व कंपन्यांचे मुख्यस्थ बाजारीकरणाच्या तडाख्यात सापडलेले असल्यामुळे, स्पर्धा जिंकायची असल्यास पर्यावरण वा प्रदूषण ह्या (क्षुल्लक) बाबींकडे लक्ष देण्यास वेळ नाही वा त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, अशी मानसिकता विकसित झालेली आहे. रॅट-रेसच्या ह्या जीवघेण्या स्पर्धेत तगून राहायचे असल्यास पर्यावरणीय नैतिकतेला तिलांजली देणेच योग्य ठरेल, असे बहुतेक कार्पोरेट्सच्या मुख्यस्थांना वाटते. व्यवस्थेच्या ह्या गुंतागुंतीतून बाहेर पडणे शक्य होत नसल्यामुळे परिस्थितीशरणतेला पर्याय नाही, असेच आपल्यासारख्या सामान्यांना वाटत आले आहे.
गंमत अशी आहे की एखाद्या समस्येला (बरोबर वा चुकीचे) उत्तर हवे असल्यास ती समस्या कशाप्रकारे मांडावी, ह्याची जाणीव आपल्याला असते. ज्याच्या हातात हातोडा असतो, त्याला सगळ्या समस्या खिळ्यासारखे दिसू लागतात. हातातील हातोड्याने हाणले की समस्या गायब! वा अंधाऱ्या रात्रीत हरवलेल्या पैशाचे पाकीट प्रखर दिव्याखाली शोधणाऱ्याच्या गोष्टीसारखे. मला पाकीट कुठे हरवले हे माहीत नाही, परंतु येथे चांगल्यापैकी उजेड असल्यामुळे ये थे शोधत आहे, असे ह्याचे स्पष्टीकरण. आपण आपल्यासमोर असलेल्या प्रश्नांची मांडणी कशी करतो वा त्यांचे कार्यकारणभाव कसे तपासतो वा त्याची जबाबदारी कशावर तरी ढकलण्याचा कसा प्रयत्न करतो, ह्यावर सर्व काही अवलंबून असते. जागतिक तापमानवाढीबद्दल आपण मुळातच चुकीचे प्रश्न विचारत असल्यामुळे आपण अजूनही अंधारात चाचपडत आहोत. किवा आपण चुकीच्या जागी त्याचा शोध घेत आहोत.
उदाहरणार्थ, सौरमालिकेतील आपले जग काही यांत्रिकी नियमानुसार चालत असून ह्याच अभियांत्रिकीच्या नियमांचा वापर भांडवली व्यवस्थेतील आर्थिक उन्नतीत करत आपल्यासमोरील कुठल्याही समस्येचे उत्तर शोधू शकतो, असे आपल्याला नेहमीच वाटत आले आहे. जागतिक, औद्योगिक अर्थव्यवस्थेतील सर्व समस्या पैशाच्या जोरावर सुटतात, ह्याचा पगडा आपल्यावर आहे; परंतु ह्या संकुचित दृष्टीच्या पलीकडील व्यापक दृष्टिकोनातून Earth’s living systems कडे बघितल्यास एक वेगळेच चित्र उभे राहते. १९७० च्या सुमारास ‘फॅशनेबल’ वाटणाऱ्या मानसिकतेतून ८०-९० च्या दशकात आपण बाहेर पडलो. Earth’s living systems बाजारीकरण वा अर्थशास्त्राच्या नियमानुसार चालत नसून त्याकडे सम्यक व समग्र दृष्टीकोनातून बघायला हवे, ह्याची जाण येण्यासाठी एकविसावे शतक उजाडावे लागले. Earth system समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानापेक्षा सर्वसमावेशक कृतीची गरज असून त्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे लक्षात आले. ज्या विज्ञानाच्या भरवश्यावर आपण ह्यातून बाहेर पडू असे वाटत होते, तेच विज्ञान अगदी मलूल होऊन काहीही करू शकलेले नाही, हे हळूहळू उमगले. सर्व काही पैशातून विकत घेता येत नाही, हाही पाठ आपण शिकलो.
हवामानबदलासंबंधी विचार करणाऱ्यांना मुख्य प्रवाहातील प्रत्येक प्रतिसाद बाजारीकरणातूनच मिळेल, अशी एक भाबडी आशा होती. त्याच चष्म्यातून सर्व संस्था व जागतिक व्यवस्था सर्व समस्यांकडे बघत होत्या. तापमानातील वाढ असो की समुद्रपातळीतील वाढ असो की हवामानातील कर्ब वायूतील वाढ असो, ह्या सर्व समस्यांचे सुलभीकरण करत, कसेतरी ह्या समस्यांवर उत्तरे शोधू, असे म्हणत गंभीरपणे त्यांच्याकडे न बघता आपापले व्यवहार सांभाळत होत्या. सर्व समस्यांकडे स्थानिक पातळीवर बघितले जात होते. परंतु ही जागतिक समस्या असून हवामानव्यवस्थेत काहीतरी मूलभूत बदल होत आहेत, ह्याची कल्पनाच आपल्याला आली नव्हती व अजूनही आलेली नाही. आपण ह्या समस्या सुट्या सुट्या आहेत, असे समजून उत्तरे शोधत होतो. ही केवळ कर्ब वायूतील वाढ नसून संपूर्ण बायोस्फिअरची (biosphere) पातळी खालावलेली आहे, जल व नायट्रोजन चक्राला धक्का बसत आहे, ह्याची कल्पनाच आपल्याला आली नाही. नागरिकतेच्या अस्तित्वाला आवश्यक असलेल्या ग्रहविषयक नऊ घटकांपैकी सहा घटकांची मर्यादा आपण केव्हाच ओलांडली आहे. आपली आताची जीवनशैली संपूर्ण नागरिकतेलाच गिळंकृत करणारी आहे. दिवसे न् दिवस बिघडत असलेली पर्यावरणीय अवस्था व त्यासाठी आपण करत असलेले जुजबी उपाय, ह्या भूमीच्या भविष्याला अंधारात ढकलत आहेत.
आपण जसे जीवन जगत आहोत त्यासाठीची आपली उत्पादनपद्धती व त्या उत्पादनांचे उपभोग घेण्याच्या तऱ्हा ह्यांमध्ये आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे. हाच ह्या समस्येवरील एकमेव उपाय आहे. आता फक्त समस्यांना उपाय शोधण्याचे नाही तर, येऊ घातलेल्या दुर्दशेला थांबविण्याचे प्रयत्न करावे लागतील. समस्यांवर उपाय असू शकतात, परंतु दुर्दशेवर नाही. ही दुर्दशा टाळण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागेल व काही नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. गेली कित्येक दशके Refuse, Reuse, Repair, Recycle हे चार R आपण आपल्या आयुष्यात आणू शकलो नाही. त्याऐवजी वापरा व फेका (use and throw) ह्याची अंमलबजावणी करत आहोत. त्याचप्रमाणे Less stuff, less desire, less comfort, less convenience, Less of everything ह्याबद्दलही विचार करण्याची कुवत हरवून बसलो आहोत.
अर्थात, आपल्या जाणिवांत हे तेव्हाच येईल, जेव्हा आपण दुर्दशेच्या उंबरठ्यावर आहोत, ह्याची मनाशी पक्की गाठ बांधून घेऊ.
संदर्भ : दि वायर