देवानारचा डोंगर आणि फर्झाना
पुस्तक परिचय
लेखिका – सौम्या रॉय
भाषांतर – छाया दातार
पाने – २३०
किंमत – २९० रुपये
‘देवनारचा डोंगर आणि फर्झाना’ हे एक विलक्षण पुस्तक आहे. ही एक भयकथा आहे, पण ही काल्पनिक नाही, तर वास्तव आहे आणि हे वास्तव जळजळीत आहे.
देवनार हा मुंबईतलाच विभाग आहे. मध्य-मुंबईपासून अगदी जवळ असलेला. पण सुखवस्तू मुंबईकराला देवनार म्हणजे देवनार कत्तलखाना आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड ह्या दोनच गोष्टींची थोडीफार माहिती असते, आणि ती पण पेपरमध्ये अधूनमधून येणाऱ्या तुरळक बातम्या वाचून. अश्या स्थितीत देवनार डम्पिंग ग्राऊंड, तिथे वाढत जाणारे कचऱ्याचे ढीग आणि त्यावर जगणारी शेकडो माणसे ह्यांच्याबद्दल, तिथल्या वस्तीला वारंवार भेट देऊन लिहिलेले हे पुस्तक एका अधोविश्वाची अटळपणे शोकान्ताकडे जाणारी कहाणी आपल्यासमोर उलगडते.
ही कहाणी देवनारच्या कचऱ्याच्या डोंगराची आहे आणि त्याचबरोबर त्या कचऱ्यावर जगणाऱ्या दोन मुस्लिम कुटुंबांची, विशेषतः फर्झाना ह्या मुलीची आहे. देवनारचा हा कचऱ्याचा डोंगर काय आहे? १८९८ साली मुंबईत प्लेगने थैमान घातले. तेव्हा मुंबईतील कचरा मुंबईबाहेर न्यावा असे ठरले. त्यानुसार त्यावेळेच्या मुंबईपासून खूप लांब असलेल्या देवनार नावाच्या समुद्राजवळच्या गावातील ८३३ एकर जागा अर्देशीर कामा ह्या गृहस्थाकडून विकत घेण्यात आली. १८९९ च्या जून महिन्यापासून मुंबईतील कचऱ्याने भरलेल्या २५ डब्यांच्या दोन मालगाड्या येथे दिवसातून दोन वेळा येऊन कचरा टाकू लागल्या. कचरा समुद्रात जाऊ नये म्हणून समुद्राच्या बाजूने बांध घालण्यात आला. रेलगाड्या जुन्या झाल्या तेव्हा म्युनिसिपालटीने ट्रॅक्टर, ट्रेलर, गाढवे ह्यांच्या साह्याने कचरा वाहून न्यायला सुरुवात केली. देवनार डम्पिंग ग्राऊंड हळूहळू भरू लागले. आज ही जागा अठरा-अठरा मजली उंच अशा कचऱ्याच्या डोंगरांनी भरलेली आहे. दररोज जवळजवळ साडेपाच हजार टन कचरा, सहाशे टन गाळ आणि पंचवीस टन बायोमेडिकल कचरा येथे टाकला जातो. मार्च ते जून ह्या कालावधीत म्युनिसिपालटीच्या साफसफाई मोहिमेमुळे गाळाचे प्रमाण दर दिवशी नऊ हजार टन एवढे वाढते. मुंबईकरांनी वापरून फेकून दिलेल्या नाना प्रकारच्या असंख्य वस्तू ह्या कचऱ्यात असतात. प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे पाउचेस, प्लास्टिकचे छोटे-मोठे बॉक्सेस, प्लास्टिकची खेळणी, मोडके-तोडके फर्निचर, वायर्स, पर्सेस, चपला, बूट हा एक प्रकारचा कचरा. खूप वापरलेले, चिंध्या झालेले कपडे, पडदे, न वापरलेले कपड्यांचे तुकडे हा दुसऱ्या प्रकारचा कचरा. घरांमधून आणि हॉटेलांमधून येणारा शिळ्यापाक्या आणि टाकून दिलेल्या अन्नाचा, भाज्यांचा, चिकन, मटन, माशांचा भयानक दुर्गंध येणारा हा तिसऱ्या प्रकारचा कचरा. काचेच्या बाटल्या, सुया, सिरींजेस असा हातापायांना जखमा करणारा चौथ्या प्रकारचा कचरा. असे नाना प्रकार. एकदा फर्झानाला काचेची एक बरणी सापडली. बरणी उघडली तर तिला त्यात अनेक छोटे-छोटे हात, पाय, अंगठे, आणि छोटी गुळगुळीत डोकी तरंगताना दिसली. फर्झानाने आत हात घालून एका मुलीचे शरीर बाहेर काढले. अगदी छोटेसे, तिच्या पंजापेक्षा किंचित मोठे असे ते होते. फर्झानाने जेव्हा ते शरीर पूर्णपणे बाहेर काढले तेव्हा तिला दिसले की त्या शरीराच्या पोटाला आणखी दोन मुलांची शरीरे चिकटलेली आहेत. म्हणजे तो टाकून दिलेला गर्भ एका तिळ्याचा होता. तर असाही कचरा त्या डोंगरांवर येत असतो. कचऱ्याचा ट्रक आला की त्याच्यामागून कचरा उचलण्यासाठी हातातील आकडा सांभाळत कचरावेचक धावत सुटतात. कारण प्रत्येकाला जास्तीत जास्त किंमती असा कचरा मिळवायचा असतो. पण एका जागी फार वेळ थांबता येत नाही. कारण कचरा सपाट करण्यासाठी बुलडोझर फिरत असतो, त्याचे भान ठेवावे लागते. हे झाले कचरावेचकांचे जग. टोकाची गरिबी, घाण, दुर्गंधी, आजार, अपघाती मृत्यू, ड्रग्ज, मारामाऱ्या ह्यांचे जग.
ह्या जगाला लागून दुसरे जग आहे. ते चकचकीत, स्वच्छ, गगनचुंबी इमारती, मॉल ह्यांचे आहे. तिथल्या लोकांना ह्या कचऱ्याचा, घाणीचा, दुर्गंधीचा, वारंवार लागणाऱ्या आगींचा भयंकर त्रास होतो. ते कोर्टात जातात. न्यायाधीश, वकील कायद्याच्या भाषेत एकमेकांशी बोलतात. वस्ती हटवा, कचऱ्याचे ढीग हलवा असे आदेश कोर्ट वारंवार देते. मग ह्यांच्या झोपड्या तोडल्या जातात. सुरक्षारक्षक येतात आणि कचरावेचकांना दंडुक्याने मारून दूरवर पिटाळतात. ह्या बाहेरच्या जगाची आतल्या जगाला दहशत आणि भिती वाटते. ह्या दोन जागांमधील ताण ह्या कहाणीत सतत जाणवत राहतो.
अशा ह्या कचऱ्याच्या डोंगरांचा आणि सौम्या रॉय ह्यांचा संबंध कसा आला? सौम्या रॉय ह्या पत्रकार आहेत. गरीबातल्या गरीब लोकांना छोट्या व्यवसायांसाठी छोटी कर्जे देणारी त्यांची संस्था आहे. त्यांच्याकडे कर्ज मागायला विठाबाई कांबळे ह्या बाई आल्या. फार जुन्या काळापासून त्या तिथल्या कचरावेचक होत्या. हळूहळू ह्या वस्तीतील इतर कचरावेचक त्यांच्याकडे कर्जासाठी येऊ लागले. त्यातून ह्या वस्तीबद्दल रॉय ह्यांचे कुतूहल जागे झाले आणि त्यांनी ह्या वस्तीला भेट द्यायला सुरुवात केली. २०१३ साली ह्या वस्तीत त्यांनी पाहिले पाऊल टाकले आणि पुढची आठ वर्षे त्या ह्या वस्तीला भेट देत राहिल्या. त्या वस्तीतील फर्झाना ही मुलगी ह्या कहाणीतील प्रमुख पात्र आहे.
फर्झाना ही हैदर आणि शकीमून ह्या जोडप्याची चार नंबरची मुलगी. रॉय त्या वस्तीत जायला लागल्या तेव्हा फर्झाना पंधरा वर्षांची होती. त्यानंतरचा तिचा जीवनप्रवास ह्या कहाणीत येतो आणि त्याबरोबर येथील कचरावेचकांचे जीवन उलगडत जाते. फर्झाना उंच, काळीसावळी, काटक होती, बंडखोर होती, जीवनोत्साहाने भरलेली होती. कचऱ्याच्या डोंगरांवर जाण्याची तिला विलक्षण ओढ होती. दिवसा नेहमीच आणि अनेकदा रात्रीसुद्धा ती त्या डोंगरांवर जाई. डोंगरांवर जाणे, कचरा वेचणे हेच तिचे जीवन होते. आणि एक दिवस ह्या ओढाताणापायीच तिचा भयंकर अपघात झाला. तिच्या शरीराचा चोळामोळा झाला. अनेक दिवस तिला हॉस्पिटलमध्ये काढावे लागले. पण त्या दिवसांमध्ये फर्झानावर मूक, हळूवार प्रेम करणारा, त्या वस्तीतला नदीम रोज तिथे येऊन तिची काळजी घेऊ लागला. त्यांचे प्रेम तिथे फुलले. भयानक गरिबी, चोळामोळा होऊन कुरूप झालेले शरीर ह्या साऱ्यावर मात करणारे नदीमचे फर्झानावरचे प्रेम, हा ह्या कहाणीतला सर्वांत उत्कट भाग आहे.
तपशील आणि आकडेवारी देऊनही त्याच्या पलीकडे जाणारे हे पुस्तक आहे. कचरावेचकांच्या जीवनाचे, त्यांच्या भावभावना, श्रद्धा-अंधश्रद्धा, नातीगोती ह्या साऱ्याचे जिवंत चित्रण ह्या पुस्तकात येते. पर्यावरण आणि ह्या कचऱ्यावर जगणारी माणसे ह्यांच्याविषयी आस्था जागवणारी ही कहाणी आहे. सौम्या रॉय ह्यांच्या माऊन्टन टेल्स ह्या पुस्तकाचे भाषांतर करून मराठी वाचकांना ते उपलब्ध करून देण्याची मोठी कामगिरी छाया दातार ह्यांनी केली आहे. भाषांतरावरून आणखी एक हात त्यांनी फिरवला असता तर, ते अधिक चांगले झाले असते. पुस्तकाचे मुखपृष्ठ मनोविकास प्रकाशनाच्या दर्जाला साजेसे, अर्थपूर्ण आणि उत्तम आहे.