कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, जागतिक बावळट मंचाची स्थापना एकदाची झाली आहे! मागील महिन्यात मुक्काम पोस्ट गावडेवाडी येथे झालेल्या एका साध्या समारंभात विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. ह्याच कार्यक्रमात बावळट मंचाचा जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला. त्याबद्दल सांगण्यापूर्वी हे नमूद करणे आवश्यक आहे कीm ह्या निवेदनातील नावे व घटना काल्पनिक असून त्यांचे प्रत्यक्ष व्यक्तींशी आणि घटनांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, असे बावळट मंडळींतर्फे कळविण्यात आले आहे. ह्या संघटनेचे नेतृत्व करण्यास कुणीच पुढे न आल्याने हे निवेदन ‘लेखक-अनामिक’ म्हणूनच प्रकाशित करीत आहोत.
या मंचाचे प्रयोजन हे बावळट माणसांनी एकमेकांना ओळखून आधार देणे एवढेच आहे. त्यातून कोणतेही कार्य घडवण्याचा हेतू नाही. जगभर आपल्यासारखेच बावळट पसरलेले आहेत ह्याचे फक्त सात्विक समाधान घ्यायचे असेल, तर ह्या मंचास जॉईन करावे.
बावळट महासंघातील लोकांनी कुठलीही कृती स्वतःहून करू नये:
ठेविले अनंते तैसेचि रहावे,
उगा देऊ नये त्रास लोकां।
प्रथमतः “भारतात स्थापन झालेल्या ह्या संस्थेला जागतिक कसे काय म्हणता?”, हा स्वाभाविक प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु ह्यामध्ये इतर पाश्चात्य व पौर्वात्य देशातील बावळट सामील झाल्याने त्याला जागतिक दर्जा प्राप्त झाला. ह्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील बावळट शिरोमणी श्री. टॉम हक्सली, इंग्लंड येथील श्री. डिक इब्सेन आणि ऑस्ट्रेलियातील श्री. हॅरी ऑर्वेल हे उपस्थित होते. एखादा जरी अमेरिकन सामील झाला तर त्या संघटनेस जागतिक म्हणता येईल, असा अमेरिकेतील अलिखित नियम असल्याने हे सोप्पे झाले. बावळट गोऱ्या माणसांचे व्हॅलिडेशन मिळाल्याने संघटनेस चार-चांद लागले, असे एकजण खासगीत सांगत होता. ह्यावर काही मंडळींनी असा आक्षेप घेतला की जर बावळटांमध्ये काहीजण “मोर इक्वल दॅन अदर्स” असल्यास ते बावळट म्हणून गणले जाणार नाहीत. टॉम, डिक व हॅरी ह्यांच्या कानावर हा संवाद गेल्यावर त्यांनीदेखील आम्हाला विशेष दर्जा दिला जाऊ नये अशी विनंती केली. आपला विशुद्ध बावळटपणा सिद्ध करायची ह्यापेक्षा दुसरी कोणती संधी त्यांच्याकडे असणार होती?
काही मंडळींच्या मते पाश्चात्य देशात सर्व लोक उपजतच स्मार्ट असतात, तिकडे बावळट नसतातच. किंबहुना ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ह्याला समानार्थी एकही शब्द अंतर्भूत नाहीये, हेही निदर्शनास आणून देण्यात आले. परंतु युरोपात राहून आलेल्या काही (बावळट) मंडळींनी ह्यावर तिथले लोक कशाकशाच्या रांगेत उभे असतात किंवा रेड सिग्नल कधीच तोडत काय नाहीत, एकमार्गी रस्त्यावर उलटे जात नाहीत, वाटेत पादचारी आल्यास एकजात सगळे जागच्याजागी गाडी थांबवतात, अशी उदाहरणे देऊन तिथेही बावळट जमात अस्तित्वात असल्याचे सांगितले. ह्या नियमाप्रमाणे तर अख्खी अमेरिकाच कशी बावळट आहे, असा दावा करण्यापर्यंतही काही लोकांची मजल गेली. भारतातील बावळट लोक अमेरिकेत जाऊन आले आहेत हे ऐकल्यावर काही लोकांनी छद्मी हास्य केले.
बावळट मंडळी ‘आपण’ आणि ‘ते’ असा भेद करत नसल्याने सर्व जाती, धर्म, राज्य, राष्ट्र, भाषा एवढेच नव्हे तर, अगदी उच्च आर्थिक स्तरातील बावळटांचापण ह्यात समावेश होतो. ह्या मंचामध्ये काही लखपती आणि करोडपती लोकांनीही आपली मेम्बर-नोंदणी केली आहे, म्हणजे बघा. उद्घाटन कार्यक्रमात वक्त्यांचे संतुलन राखणेसाठी स्वतःला बावळट न मानणाऱ्या काही (अर्थात स्मार्ट) लोकांनाही आमंत्रण होते. त्यांनी अत्यंत चटकदारपणे भाषणे करून रंगत आणली. इतर सर्व मात्र अगदी बावळटासारखे बोलले.
ह्या मंचाची ग्लोबल वेबसाईटही निघणार आहे. त्या वेबसाईटचे नाव मराठीतील नावावरून “बावळट डॉट कॉम” किंवा “युनायटेड बावळट्स” असे ठेवण्याचे प्रपोजल काही मंडळींनी मांडले. बावळट शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाला न्याय देईल असा प्रतिशब्द इतर कुठल्याच भाषेत अस्तित्वात नाहिये, असे कारण त्यासाठी देण्यात आले. सध्यातरी इतर कुठल्या भाषिकांनी चॅलेंज न केल्याने उद्घाटक यजमानांच्या विनंतीवरून अभिजात भाषेतीलच नाव ठेवण्यात येईल असे वाटते. अर्थात मराठी माणूस युद्धात जिंकला तरी तहात हरतोच. त्यामुळे आपल्या वेबसाईटलादेखील सुखाने बावळट.कॉम नाव देता येईल, ह्याची गॅरंटी नाही.
बावळट मंडळींनी संघटना काढून झुंडशाही अथवा दबावगट सुरू करणे (बावळट असूनही) कितपत योग्य आहे, ह्यावरही बैठकीत बराच खल झाला. परंतु असे पुढे काही घडणार नाही ह्यावर एकमत झाले. काही बावळट लोक जाहीरपणे आपण तसे आहोत हे सांगून मंच जॉईन करू शकत नसल्याने, त्यांना प्रोत्साहन म्हणून खालीलप्रमाणे प्रासादिक काव्य-आवाहनही रचण्यात आले आहे:
बावळटांनो आता – व्हा शूर,
क्षणाचसाठी बदला नूर,
करा जॉईन आपला मंच,
जमेल तसा करूया संच,
झालात एकदाचे मेम्बर जरी,
खुशाल लोळा आपुल्या घरी …इत्यादी
या मंचात सामील होणेसाठी इच्छूक बावळटांना खालील सोप्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. हे नियम आधीच पाळत असणाऱ्या सर्वांना बावळट महासंघात मुक्त प्रवेश मिळेल:
- रेड सिग्नलवर उभे असल्यास मागून हॉर्न वाजवणाऱ्या माणसास पुढे जाण्यासाठी आणि सिग्नल तोडण्यासाठी जागा करून देणे.
- एकमार्गी रस्त्यावर उलट्या आलेल्या गाड्यांना जागा देणे, जेणेकरून ट्रॅफिक वाढणार नाही. चालत असताना गाड्या फुटपाथवर आल्यास, आपण रस्त्यावर उतरून जागा करून देणे.
- कुठल्याही रांगेत उभे असताना कुणीही मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यास घुसू द्यावे, मागील लोक ओरडल्यास ते आधीच नंबर लावून गेले होते, असे सांगावे.
- समोरचा माणूस आपल्याला फसवत असल्यास, ते आपल्याला कळूनसुद्धा जाणवून न देणे, ज्यामुळे त्याच्या/तिच्या मनाला इजा होईल.
- रेल्वेमध्ये सीटवरून भांडण झाल्यास बायकोला (असल्यास) ते करू देणे व आपण बाजूला उभे राहून ‘मम’ म्हणणे. थोड्यावेळाने प्रतिस्पर्धी नवऱ्याबरोबर (असल्यास) पुढील स्टेशनवर एकत्र चहा पिणे. ह्या जागी बावळट स्त्री असेल तर तो नियम पुढील सुधारणेत घेतला जाईल (बावळट मंचात स्त्रियांसाठी ३० टक्के अलिखित रिझर्व्हेशन असूनही त्यांचा टक्का वाढत नाहीये).
- कुणी नेत्याने वा पक्षाने एखादा सिनेमा, पेंटिंग, वस्तू, कला, कपडे इतकेच नव्हें तर एखादा माणूसही “बॉयकॉट करा” असा आदेश दिल्यास, प्रश्न न विचारता मुकाट्याने बॉयकॉट करणे. “बॉयकॉट पीछे मूड” म्हणाले की थांबविणे.
- आज अमुक जयंती, ढमुक मयंती, अलाण्याचा प्रकट दिन, फलाण्याचा-समाधी दिन असे लोकांचे स्टेटस बघून आपणही काही देणे-घेणे नसले तरी तसे व्हॉट्सअप स्टेटस लावणे.
- स्मार्ट कामे केल्यास मेम्बरशिप रद्द केली जाईल, ह्याची नोंद घ्यावी.
वरील सर्व तपशील वाचून बावळटांसाठी एवढे कडक नियम का, ते शिथिल असावेत असा विचार तुमच्या मनात आल्यास, बावळट म्हणण्यास आपण पात्र आहोत का?, हाही विचार करावा. ही जागतिक संघटना असल्याने, इतर ठिकाणचे लोकल रुल्सही वाढविले जातील. जसजसे मेंबर्स येतील आणि नवीन बावळटपणाच्या शक्यता वा व्हरायटीज् आणतील, तशी ह्या नियमांत भर घातली जाईल. ते सर्व नवीन नियम पाळणेही बंधनकारक राहील.
ह्याशिवाय इतरही बरीच आचारसंहिता डिस्कस करण्यात आली. ह्यात काही करावयाच्या गोष्टींपेक्षा न करावयाच्या गोष्टीच जास्त आहेत. बावळट लोकांनी प्रश्न न विचारण्याचे धोरण कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण महापालिकांच्या झाल्या नाहीत, ह्याचा अर्थ विधानसभा मतदारसंघात लोकशाही आणि महापालिका वॉर्डमध्ये हुकुमशाही आहे का?, असे विचारू नये. जिथे ज्यांचे राज्य असेल त्याप्रमाणे वागावे. आपल्या भागातील दादा कोण आहे त्याप्रमाणे सलाम ठोकून कामास लागावे.
मृतवत झालेल्या सामाजिक चळवळींबद्दल बावळटांनी वैषम्य वाटून घेऊ नये. उदारीकरणानंतर फिरलेल्या कॉर्पोरेट वरवंट्यात भरडलेले विद्वान गप्प का आहेत? किंवा त्यांना गप्प केलं गेलंय का? वैज्ञानिक प्रगतीने आपला समाज प्रगल्भ झालाय की अधिक उथळ?, असले निरर्थक प्रश्न विचारू नयेत. मार्केट फोर्सेसच्या नावाखाली जे आपल्या अंगावर आणि मनावर रोज अव्याहत आदळतंय त्याचा आनंदाने पॉझिटिवली स्वीकार करावा. ही पोकळ पॉझिटिव्हिटी केवळ वांझोटिव्हिटी असली तरी त्यापुढे कमरेत वाकून घट्ट उभे राहावे.
व्हॉट्सअप विद्यापीठातून डावे, उजवे, मधले, उभे, आडवे, तिरपे असे सर्व आपापल्या नॅरेटिव्ह्जचा भडीमार करीत असल्यास तुम्हाला कुणाचे खरे आणि कुणाचे खोटे ठरविणे अवघड जाते का? नैतिकता बाजूला ठेवून कुणाची साईड घ्यायची हे तुमचे ठरलेले नसते का? व्हॉटअबाऊटरीला तुम्ही बळी पडता ना? मग तुम्ही बावळटच असाल. अश्या माणसांनी सर्वांत शेवटी अर्थात लेटेस्ट जे कानावर पडते/वाचनात येते ते सत्य मानून चालावे. सत्य तसेही अंतिम नसतेच आणि ते कायम सोयीप्रमाणे बदलत असते. सत्याचा विजय शेवटी होतो; पण काळ अव्याहत असल्याने तो शेवट काही केल्या येत नाही, हे ध्यानात ठेवावे.
ज्वालाग्राही टँकरने पेट घेऊन त्याची आग पसरल्याने गाड्या जळून, अवाढव्य कंटेनर वा होर्डिंग चालत्या गाडीवर पडून चेंगरल्याने, भूकबळीने, वैफल्यातून आत्महत्या करावी लागल्याने, पूल पडल्याने किंवा बोटीच्या धडकेने समुद्रात बुडून माणसांना मृत्यू मिळाल्यास देशाच्या प्रगतीत हे छोटे छोटे प्राणत्याग करावेच लागतात, हे लक्षात ठेवावे. त्या सर्व हुतात्म्यांना आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर श्रद्धांजली वाहून आपले पुढचे रुटीन नेहेमीप्रमाणे सुरू ठेवावे. आपल्या देशाचे महत्त्व कळण्यासाठी परदेशात जावे लागते, स्वदेशीचे गोडवे गाण्यासाठी तर परदेशी नागरिकत्व मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. बावळट माणसाने तिथे बसून ज्ञान पाजळणाऱ्या लोकांना नेहेमी सलाम ठोकावा.
रोज वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चमको अँकर्स, इन्फ्लुएन्सर्स व रंगीबेरंगी बाबांचे उपदेश शिरसावंद्य मानावे, जमेल तसे त्यांना डोक्यावर घेऊन नाचवावे. त्यांचे विचार उद्धृत करावेत. बावळट माणसांना स्मार्ट करणे हा मंचाचा उद्देश नसून फक्त बावळट म्हणून त्यांना जागृत करणे एवढाच आहे. बावळट माणसाने आपापल्या जाती-धर्माच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करावे.
तिथे सांगतील ते प्रवचन मुकाट ऐकावे. वाद घालणे अपने बस की बात नही है. उगीच वादाच्या फंदात न पडता दुसऱ्यांना ते करू द्यावे.
बावळट माणूस हा झुरळासारखा असतो. ज्याप्रमाणे जगाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत झुरळे टिकून राहणार आहेत तसा, बावळट माणूसही चिवटपणे टिकून राहतो. त्यासाठी “वाकेन पण मोडणार नाही”, हे धोरण स्वीकारावे.
आपण वरील गोष्टी पाळत असाल तर आपले जागतिक बावळट मंचात स्वागत आहे! आता एकदा वेबसाईटचे नाव पक्के होऊन ती तयार झाली की आपण ऑनलाईन नोंदणी जरूर करावी. आम्ही वाट पाहात आहोत असे आवाहन मंचातर्फे करण्यात आले. 💐💐💐
निवेदन क्रमांक २ – ताजा कलम : बावळट.कॉम वेबसाईट नुकतीच लाँच झाली. रजिस्ट्रेशन पेजवर प्रमाणाबाहेर लोकांनी उड्या टाकल्याने गर्दी होऊन वेबसाईट क्रॅश झाली. पहिल्याच दिवशी जगभरातून दोन कोटी लोकांची नोंदणी झाली होती; परंतु कित्येक लाख लोक ती अजून करू शकलेले नाहीत. मंचाला लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिल्यावर (मतपेटीकडे डोळा ठेवून) काही महाभागांनी बहु-देशीय बावळट जनता पक्षाची स्थापना केली आहे. एका अमेरिकन उद्योगपतीने फंडिंगही डिक्लेअर केले आहे. मंचाच्या उद्देश्याला लागलेल्या ह्या बट्ट्यामुळे टॉम, डिक व हॅरी ह्यांनी मंच बंद करीत असल्याची घोषणा आपापल्या देशातून केली. त्याला भारतासकट इतर देशातील बावळटांनी अनुमोदन दिले. पायावर नीट उभे राहण्यापूर्वीच बावळट मंच बरखास्त झाल्याने काही विरोधकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मंचावरील सर्व बावळट आता पुन्हा आपल्या कोशात गेले आहेत. मुंग्यांच्या रांगेप्रमाणे शिस्तीत एकी करायचा प्रयत्न करणाऱ्या बावळटांवर आता इतस्ततः अस्ताव्यस्त आणि सैरभैर भटकणारी झुरळे होणे पुन्हा नशिबी आले आहे. बावळटांचा एक मेटामॉर्फोसिस होता होता राहिला!
अप्रतीम लेख
लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे
मस्त, खुशखुशीत!
लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे
वाह रोहित,
मंच आवडला, त्या वरची मच मच तर अजून भारी, एकदम झकास मंचिंग झाले! आणि ह्या लिखाणासाठीचा मंच पण चांगला मिळालाय!
धन्यवाद विजय दादा
अहाहा.. मजा आली. हसायला लावून चिमटे काढण्याची शैली अप्रतिम !! गो रोगो !!
धन्यवाद मंगेश
बावळट जनता पार्टी हे नाव वाचून एक अनामिक उत्साह शरीरात संचारला होता. फूल, शस्त्र, अवयव यावर आधारित पक्ष चिन्ह पण ठरवावे असा विचार सुरु करणार तेवढ्यात बरखास्तीची ओळ वाचली आणि काळजाचा ठावच चुकला. निराशेच्या काळोखात आता कोणती बरी आशा ठेवावी पामराने ?
धन्यवाद अभिजित