नाते कुंपणावरचे

ॲलन ट्यूरिंग संगणन आणि कृत्रिम बुद्धिमतेचा जनक मानला जातो. दुसरे महायुद्ध जिंकण्यात त्याचा मोठा वाटा मानला जातो. १९५२ साली, त्याच्या घरी चोरी झाली. रिवाजाप्रमाणे पोलीस आले. तपासादरम्यान ॲलन ट्यूरिंगचे त्याच्या मित्राशी शारीरिक संबंध असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खटला भरला. ट्यूरिंग दोषी मानला गेला आणि त्याला शिक्षेचे दोन पर्याय देण्यात आले – दोन वर्षे कारावास किंवा रासायनिक पद्धतीने कॅस्ट्रेशन. ॲलनने दुसरा पर्याय निवडला. पण त्यानंतरही पोलिसांचा ससेमिरा त्याला चुकवता आला नाही. जागतिक किर्तीचा वैज्ञानिक असलेला ॲलन ट्यूरिंग ही अवहेलना आणि मानहानी सहन करू शकला नाही आणि सायनाईड ठेवलेले सफरचंद खाऊन त्याने आत्महत्या केली. अनेक लोकांना ॲपल कंपनीचा सफरचंदाचा लोगो ॲलन ट्यूरिंगला समर्पित असल्याचे आजही वाटते. लिओनार्दो दा विंची, ऑस्कर वाइल्ड, किंग एडवर्ड-२, हार्वे मिल्क, मोरिन कोल्क्युहॉन अशा अनेक समलैंगिक प्रतिभावंत, प्रभावी माणसांना समाजाने, न्यायव्यवस्थेने पीडित केले आणि त्यातच काहींचा मृत्यू झाला. 

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, समलैंगिक संबंधांना मान्यता नव्हती तोपर्यंत, अनेक लोक बळी गेले. चेटूक करणारे किंवा भूतबाधा झाली असे समजून जिवंत मारले गेले. कित्येकांना ब्लॅकमेलिंग, कुचंबणा, कट-कारस्थानांचा सामना करावा लागला – आजही करावा लागतो आहे. जगातील वंचितांचा, शोषितांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आपल्या अंतःस्थ जाणिवांशी झुंज देत जगाला आणि जगण्याला सामोरे जाणाऱ्या एलजीबीटी+ समूहाचा रक्तरंजित अध्याय त्यात नक्कीच असेल. 

एलजीबीटी+ हा समुदाय म्हणजे फक्त लेस्बियन, गे लोकांचा समुदाय नाही तर, प्लस या चिह्नात अनेक लैंगिक ओळखींचा समावेश होतो. जन्मतः मनुष्याची जी लैंगिक ओळख असते त्याला ‘सेक्स’ म्हणतात. व्यक्ती जन्माने स्त्री किंवा पुरुष असली तरी, तिला स्वतःला आतून आपली लैंगिक ओळख काय वाटते, त्याला ‘जेंडर आयडेंटिटी’ अर्थात् लैंगिक ओळख म्हणतात. एखाद्या व्यक्तीला समलिंगी किंवा भिन्नलिंगी किंवा दोन्ही व्यक्तींबद्दल आकर्षण वाटते, त्याला त्या व्यक्तीची सेक्च्युएलिटी किंवा सेक्च्युअल ओरिएंटेशन अर्थात् लैंगिक अभिमुखता म्हणतात. व्यक्तीची लैंगिक ओळख अनेक प्रकारची असू शकते व कालपरत्वे तिच्यात बदलही होऊ शकतो. उदाहरणार्थ,  कोणाला जन्मतः असलेली लैंगिक ओळख हीच तिची लैंगिक ओळख, असे आज वाटत असले तरी, उद्या तिला ती उभयलिंगी असल्याचे वाटू शकते. विकिपीडियाने दिलेल्या यादीत ११० प्रकारच्या लैंगिक ओळखी नमूद केल्या आहेत आणि ह्यात भर पडतेच आहे.

एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल आकर्षण वाटत असेल, पण काही वर्षांनी तिला तसे वाटणार नाही, असेही होऊ शकते. म्हणून लैंगिक ओळख व लैंगिक आकर्षण हे स्थिर नसते तर, प्रवाही असते. मानवी मन हे अतिशय क्लिष्ट आणि सतत बदलणारे आहे हे मान्य असेल तर, लैंगिकता ही गोष्टपण जटिल आणि प्रवाही असणारच हे सहज मान्य होईल. होमोफोबिक म्हणजे ज्यांना समलैंगिक लोकांबद्दल घृणा आहे त्या व्यक्तींनी आणि समाजाने एलजीबीटी+ वर बरेच अत्याचार केले आहेत आणि आजही पृथ्वीवरचे सर्व समाज, समूह कमीअधिक प्रमाणात होमोफोबिक आहेत. हिटलरने ज्यू धर्मीयांसोबतच समलैंगिक व्यक्तींवरपण अनन्वित अत्याचार केले आणि त्यांना मारून टाकले. अनेक समलैंगिक नेत्यांना आणि व्यक्तींना समलैंगिकतेचा पुरस्कार केला म्हणून होमोफोबिक व्यक्तींनी मारून टाकले. १८५५ ते १९६९ ह्या काळात ४५००० समलैंगिक व्यक्तींचा युरोपात छळ झाला. २१ व्या शतकातील भारतीयांना समलैंगिक व्यक्तींची मानसिकता समजून घ्यावी लागेल; नाहीतर, त्यांच्याबद्दलची घृणा हिंसेत परावर्तित होईल. समाजात बहुतांश व्यक्तींना आपले शरीर आपले असणे नुसते मान्यच नसते, तर आवडतेसुद्धा. पण ज्यांना आपली लैंगिक ओळख आपल्या शरीरापेक्षा वेगळी वाटत असते, त्यांना काय वाटत असेल? उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती पुरुष म्हणून जन्माला आली आणि तिला जन्माने मिळालेले पुरुषाचे शरीर नको असून स्त्रीचे शरीर हवे आहे असे वाटते. अर्थात्, जे मिळाले आहे ते नको आहे आणि जे हवे आहे ते मिळणार नाहीये, अशी त्रिशंकूची अवस्था किती भयानक असेल! त्या व्यक्तीची होणारी कुचंबणा आपण समजू शकतो का? मुलगा मुलीसारखे वागतो हे त्या मुलाला कळण्याआधी समाजाला कळते. शाळेतील मित्र, नातेवाईक, आई-वडील आपापल्या परीने त्याला यथेच्छ त्रास देतात आणि आपल्यासोबतच असे का होते आहे, हे त्याला कळत नाही.

पलक ही ट्रान्सजेंडर स्त्री, पुरुष म्हणून चेतन या नावाने जन्माला आली. चेतन लहान असतानाच वडिलांना त्याच्यात दोष आहे असे वाटले. पाचव्या वर्षापासून चेतनला मारझोड करून, प्रसंगी पट्ट्याने मारून “मुलासारखे वाग”, असे सांगितले गेले; पण मुलासारखे वागणे चेतनच्या आवाक्याबाहेरचे होते. चेतन पाचव्या वर्गात गेल्यावर त्याच्या वडिलांनी घरासमोरच्या मैदानात ताडपत्रीचा तात्पुरता निवारा बांधून दिला आणि “आता तू वेगळा रहा”, असे बजावले. दोन वेळचे जेवणसुद्धा दिले नाही. लोकांच्या घरची धुणी-भांडी करून चेतनने तीन वर्षे काढली. चौदा वर्षांचा झाल्यावर पलक नावाने तो किन्नरांच्या समूहात दिल्ली येथे राहू लागला. पलकने मुंबईत डान्सबारमध्ये बारबालाचे काम केले. सोळाव्या वर्षी तिने कचरापेटीत टाकून दिलेल्या मुलीला दत्तक घेतले. मुंबईत कामाठीपुऱ्यातील वेश्यावस्तीत मुलीला मोठे करायचे नाही म्हणून पलक बंगलोरमध्ये चांगल्या वस्तीत फ्लॅट घेऊन राहू लागली आणि तिथे तिने जिम सुरू केला. आज पलकची मुलगी उच्चशिक्षण घेते आहे. “वडिलांचे आडनाव लावणार नाही”, असा शब्द पलकने वडिलांना दिला होता, तो ती आजही पाळते. वडील वारले तरी ती सावत्र आईला पैसे पाठवते. पलकच्या मनात मारणाऱ्या वडिलांबद्दल, सोडून गेलेल्या आईबद्दल, छळ करणाऱ्या सावत्र आईबद्दल किल्मिष नाही. मुंबईहून एक वृद्ध देवदासी मैत्रीण पलकच्या मुलीला सांभाळायला तिच्यासोबत आली. या तिघींनी एकमेकींना खूप माया लावली. पलकने तिचा स्वतःचा परिवार बनवला, ह्यात ती समाधानी आहे. ती एक ट्रांसजेंडर आहे, ह्याबद्दल ती देवाची आभारी आहे. ती म्हणते, “माझ्यात एक स्त्री आणि एक पुरुष असे दोन्ही वास करतात. दोघांचे मन, विचार करण्याची पद्धत मला अवगत आहे. त्यामुळे मी परिपूर्ण आहे. पुढचा जन्म मला ट्रांसजेंडरचा मिळावा, अशी माझी इच्छा आहे.” पलकचे बोलणे ऐकल्यावर आपण अपूर्ण आहोत, असे मला वाटून गेले.

नातेवाईकांकडून होणारा छळ हा एलजीबीटी+ समुदायातील व्यक्तींसाठी सगळ्यात जीवघेणा असतो. जे जन्माला येतानाचे लिंग आहे तीच त्या व्यक्तीची लैंगिक ओळख असावी, असा आग्रह कुटुंबीय धरतात आणि लहानपणापासूनच या व्यक्तींची ससेहोलपट सुरू होते. कधीकधी तर नातेवाईक फारच खालच्या थराला जातात. उपाशी ठेवणे, मारझोड, अगदी घराबाहेर काढणे इथपर्यंत मजल जाते आणि नात्यांवरचा विश्वासच जणू उडून जातो. 

भारतातील अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर, दुती चंद या महिला खेळाडूने ती लेस्बियन असल्याचे मीडियासमोर जाहीर केले. दुतीची बहीण तिची लैंगिक ओळख मीडियासमोर जाहीर करेन अशी धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळत असे. ह्या जाचाला कंटाळून दुतीने हे पाऊल उचलले. जेव्हा घरच्यांकडून अशी फसवेगिरी होते तेव्हा नात्यांमधल्या निष्ठेवर अगदी कोवळ्या वयातच प्रश्नचिह्न निर्माण होते. हे मानसिक आघात सहन करणे उमलत्या वयात शक्य नसते. आई-वडील ज्या मुलांना नाकारतात, त्या मुलांच्या मनात आयुष्यभर नात्यांबद्दल असुरक्षितता निर्माण होते. पालकांचाही दोष नसतो कारण आपले मूल आहे तसे स्वीकारणे तर सोपे नसतेच, शिवाय समाज आपल्या मुलाला स्वीकारणार नाही आणि त्याचे भविष्य कसे असेल ह्या चिंतेने पालक ग्रस्त असतात. मग मुलाला किंवा मुलीला अंतर्बाह्य बदलण्याची केविलवाणी धडपड सुरू होते आणि त्यात त्यांची ससेहोलपट होते. हे सगळे टाळायचे असेल तर, पालकांनी आपल्या पाल्याची लैंगिक ओळख वेगळी असल्याचे लक्षात आल्याबरोबर एखाद्या पालकांच्या गटात सामील व्हावे. मूल बदलावे म्हणून नाही तर, त्याला समजून घेऊन मदतीचा हात देता यावा आणि मूल आहे तसे त्याचा स्वीकार करता यावा म्हणून. 

अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर ह्यांना त्यांच्या मुलीने, शामलीने किशोरवयात असताना ती समलैंगिक असल्याचे सांगितले. शामलीने त्यांना महितीपर पुस्तके वाचायला दिली. तिची मनोवस्था, तिच्या भावना व्यक्त केल्या. पण तरीही आपण कुठेतरी अंधारात ठेचकाळत चाललो आहोत, असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी एलजीबीटी+ मुले असलेल्या पालकांचा ‘स्वीकार’ नावाचा एक गट सुरू केला. आता आधाराला त्यांच्यासारखेच इतर पालक होते. ते एकमेकांना साथ देत आपल्या पाल्यांबरोबर वाटचाल करायला समर्थ होत होते.

जेव्हा आपण एलजीबीटी+ समुदायाच्या नातेसंबंधांचा सखोल विचार करतो, तेव्हा या नातेसंबंधांमधले वेगळेपण आणि गुंतागुंत आपल्याला जाणवते. परिवार, नातेवाईक म्हटले की एक पठडीतले चित्र आपल्या डोळ्यांसमोर तरळते. नवरा-बायको, त्यांची मुले, त्यांचे पालक आणि इतर नातेवाईक. पण एलजीबीटी+ समुदायात असे नातेसंबंध आढळत नाहीत. पावसाचे चुकार थेंब पन्हाळीतून निसटून वळचणीखालच्या भिंतीवर उमटावेत आणि घरंगळत धार व्हावी तसे काहीसे या नातेसंबंधांचे असते.

पराग हा एलजीबीटी+ समूहाचा नेता आणि कार्यकर्ता एका मुलासोबत दहा वर्षे नातेसंबंधात होता. त्याच्या मित्राच्या घरच्यांनी लग्नासाठी इतका तगादा लावला की शेवटी त्याला मान तुकवावी लागली. परागशी संबंध तोडताना अर्थातच हमरातुमरी झाली. “तू मला मूल देऊ शकणार नाही”, असे अपमानजनक शब्द वापरून त्याने ते नाते तोडले. पराग आतून तुटला. त्याचे म्हणणे की तो मुलाला जन्म देऊ शकणार नाही, हे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि बहरले तेव्हा त्याच्या मित्राला माहिती नव्हते का? आज पराग नवा मित्र शोधतोय, पण त्याचे सूर कोणाशी जुळत नाहीयेत. प्रेमातली जखम भरून निघाली नाही, हे तर कारण आहेच; पण जे पुरुष त्याच्या आयुष्यात येतात ते नात्याप्रति निष्ठावान नसतात. काहीजण तर नवीन प्रकारचे प्रेम करून बघावे म्हणूनही त्याला नादी लावण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, परागला आता दूध आणि ताकातला फरक कळायला लागला आहे. परागने त्याच्यावर आणि एलजीबीटी+ समूहावर ओढवलेले जितके प्रसंग सांगितले, ते सगळे फारच धक्कादायक होते. या समूहातील व्यक्ती पुरुषांच्या वॉशरूमपासून ते पोलीसस्टेशनपर्यंत कुठेही सुरक्षित नाहीत, असे त्याचे म्हणणे आहे. तो ‘गे’ आहे म्हणून त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अशाप्रकारे या समुदयातील व्यक्ती समाजव्यवस्थेत तऱ्हेतऱ्हेने प्रताडित केल्या जातात.

एलजीबीटी+ समूहाचे नातेसंबंध हे तात्पुरते, जरा हटके आणि इतर सामाजिक नात्यांपेक्षा वेगळे असतात ह्याचे कारण समूहाशी नाही तर समाजाशी जोडले गेले आहे. एलजीबीटी+ समूहातील नात्याला समाजाची परवानगी नाही. अशी नाती लांछनास्पद समजली जातात. जोडीदार भेटतात, प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्या घरच्यांकडून विरोध आणि लगीनघाई सुरू होते. कुटुंबीय दुधात लिंबू पिळण्याचे काम करतात. शेवटी दूध नासतेच. बरेचदा या समूहातील व्यक्तींचे लहानपण त्यांच्या लैंगिक ओळखीमुळे होरपळलेले असते. लहानपणी झालेली व्यक्तित्वाची पडझड तरुण वयात सक्षमपणे निर्णय घेण्यास बाधक ठरते. तरुण वयात अनुरूप जोडीदार मिळाला तरी, ह्या व्यक्ती समाज आणि कुटुंबाच्या दबावाखाली झुकतात. भुसभुशीत रेताड जमिनीत चांगले पीक निघत नाही तशी ह्यांची नाती अकाली करपतात. वर्ष-दोन वर्षे, चार वर्षे ही नाती टिकतात आणि मग निरोपसमारंभ होतो. त्यानंतर अजून एका नवीन नात्याकडे वाटचाल सुरू होते. अशातच काही जणांचे लग्न लावून दिले जाते आणि दोन जीव त्यांच्या पोराबाळांसकट बळी जातात. 

पलकच्या कुटुंबाचे उदाहरण घेऊ. पलक एक ट्रान्सजेंडर, कचरापेटीत टाकून दिलेली तिची दत्तक मुलगी, मुलीचा सांभाळ करणारी देवदासी वृद्धा असे एकत्र राहणारे एक विचित्र कुटूंब. हे कुटूंब पलकने स्वबळावर, हुशारीने, जिद्दीने आणि हिमतीने मिळवले, उभे केले. बाहेरच्या जगाने पोरके केले म्हणून या तिघी एकमेकींना जरा जास्तच घट्ट बिलगल्या. आता पलकने एक गे माणसाशी लग्न करायचे ठरवले आहे. चाळीशीतल्या नितांत सुंदर पलकच्या टपोऱ्या डोळ्यातले संसार करण्याचे स्वप्न अजूनही टवटवीत आहे – एवढे घाव, अपमान सोसूनसुद्धा. एलजीबीटी+ समुदायातील व्यक्तींशी बोलले असता पलकएवढे भाग्यवान आपण नाही, असे ते कबूल करतात. लग्न करून संसार थाटणे, मूल दत्तक घेणे ह्यासाठी खूप मोठी कायदेशीर लढाई आणि मग समाजाशी लढा देणे बाकी आहे. 

आपल्या देशात कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य आहे. लग्न करण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारे लोक इथे राहतात. आयुष्यभर प्रेम करता येईल असा जोडीदार हवा असणे, ही भावनिक गरज आहे आणि लग्नाला जर कायद्याची आणि समाजाची मान्यता नसेल तर “इस प्यार को मैं क्या नाम दूं?” असा पेच प्रेमीयुगुलांसमोर उभा राहतो. मेनका गुरुस्वामी ह्या वकिलाने कलम ३७७ हटवण्यासाठी सुप्रीमकोर्टात अपील केले आणि २०१८ मध्ये कलम ३७७ हटवले गेले. एका भाषणात मेनका गुरुस्वामीने काही मूलभूत प्रश्न उभे केले. त्या म्हणतात की, जर एखादी एलजीबीटी+ व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत राहते तर, तिला आपल्या जोडीदाराचा विमा उतरवता येईल का? घर घेताना, पॉलिसी घेताना, बँकेत खाते उघडताना जोडीदाराला नॉमिनी दाखवता येईल का? त्यासाठी रक्ताचा नातेवाईक किंवा वैवाहिक जोडीदारच लागतो. म्हणून लग्नाला, मूल दत्तक घेण्याला कायदेशीर मान्यता मिळणे हा एक आवश्यक टप्पा आहे, जो अजून गाठायचा आहे. 

आपल्या देशात डेटिंग सहजमान्य नाही. समाज आणि पोलिसांच्या करड्या नजरेच्या पहाऱ्याखाली प्रेमी कोमेजतात. अश्या स्थितीत एलजीबीटी+ च्या अधिकारांवर गदा येते. प्रेमात फक्त लैंगिक संबंध महत्त्वाचे नसतात तर जोडीदारासोबत निवांत क्षण घालवणेसुद्धा आवश्यक असते. घरी किंवा बाहेर हा मोकळा अवकाश या समुदायातील व्यक्तींना मिळत नाही. आयुष्यभरासाठी जोडीदारासोबत राहणे हे स्वप्नच राहते, वास्तवात येत नाही. मग  काही व्यक्तींना नैराश्य ग्रासते, काही व्यसनाधीन होतात, तर काही थेट आत्महत्येचा पर्याय निवडताना दिसतात. प्रेमाचा अंतिम टप्पा लग्न समजला जातो. तिशीच्या आत लग्न, पस्तिशीत मूल, चाळीशीत घर, पंचेचाळिशीत सेव्हिंग्ज, निवृत्तीपर्यंत नातवंडे हा भारतीय दांपत्याचा आदर्श प्रवास मानला जातो. आजच्या घडीला एलजीबीटी+ समुदायातील व्यक्तींच्या आयुष्यात हे टप्पे येणे अशक्य आहे. त्यामुळे ह्या व्यक्तींच्या आयुष्यात एक तुटलेपण, निराशा येते. तरीही सगळे आपापल्या परीने उपाय काढत असतात. 

अमिनाला कोणाची तरी पत्नी व्हायचे आहे, पण ते शक्य नाही. मग ती प्रत्येकाला पती म्हणते. कोणी तिला टोकले तर म्हणते, “मुझे वाइफ बनना अच्छा लगता है. दो पल के लिए सच में मान लेती हूं कि मैं किसी की पत्नी हूं.” अमिनाचे म्हणणे आहे की जर एका व्यक्तीला दोन मुले असू शकतात तर दोन पती का असू शकत नाहीत? आपल्या सर्व मुलांवर पालक सारखेच प्रेम करतात ना? आपल्या आयुष्यात आपण कितीतरी लोकांचा आदर करतो, कितीतरी मित्र बनवतो, तर मग आपण अनेक व्यक्तींवर प्रेम का करू शकत नाही? ह्या प्रश्नाचे नैतिक उत्तर देता येईल; पण तर्कसंगत उत्तर देता येईल का? गणितात इन्फिनिटीचा सिद्धांत आहे तसे, मानवी मनातही इनफायनाईट भावनांचे भंडार आहे. “प्रेम हे प्रेम असते, प्रेमाला लिंग नसते”, असे अमिना म्हणते.

पराग जेव्हा मला पहिल्यांदा भेटला तेव्हा माझ्या साडीचे खूप कौतुक करीत होता. त्याचा मित्रपरिवार अनिमिष नेत्रांनी मला दाद देत होता. मी मंद स्मित देत हे कौतुक स्वीकारले. एलजीबीटी+ समूहाच्या भडक राहण्याबद्दल जेव्हा मी त्याला विचारले, तेव्हा तो एकदम उसळून म्हणाला, “तुम्ही किती सुंदर मुलायम साडी नेसली आहे! गुलाबी-जांभळ्या साडीवर बांबूचे हिरवे वन किती सुंदर दिसते आहे! बांबूची पानेदेखील ब्रशच्या फटकाऱ्यांसारखी किती कोवळी! काय अप्रतिम ब्लॉकप्रिंट आहे! मला पण वाटते अशी साडी नेसावी, कुंकू-लिपस्टिक लावावे, पण मला माझ्या इच्छा दडपून टाकाव्या लागतात. हवे तसे राहण्याचे, वागण्याचे स्वातंत्र्य आम्हाला नाकारले गेले आहे. जेव्हा आमचा मोर्चा निघतो आणि बंडखोरीचे पाऊल आम्ही उचलतो, तेव्हा आम्ही आमच्या भावनांना वाट मोकळी करून देत असतो. भडक रंग वापरून जणू आमच्या चिरडून टाकलेल्या इच्छाच आम्ही मुक्तपणे व्यक्त करतो, आमची सगळी भडास काढतो. काही चूक आहे का त्यात?”

समाजाने नाकारले असले तरी बाजारपेठेने एलजीबीटी+ समुदायातला ग्राहक नेमका हेरला आहे. व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे, ब्लॅक फ्रायडेसारखे सणावारांचे पेव पाश्चात्य बाजारपेठांमधूनच फुटले आहे. व्यावसायिकांनी मोठ्या कल्पकतेने भावनांचे बाजारीकरण करून ग्राहकांच्या खिशाला हात घातला आहे. तद्वतच, पाश्चात्य औषधी कंपन्यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेवर करोडो डॉलर्सचे संशोधन करून ती बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकाच्या खिशाला परवडेल ती शस्त्रक्रिया ग्राहक करून घेऊ शकतो. ज्याची फारशी ऐपत नाही, तो नॅनो कार घेतो आणि श्रीमंत मनुष्य बीएमडब्ल्यू घेतो तसेच काहीसे. लिंगबदल करायचा असेल तर तो जोडीदारासाठी करू नये, स्वतःसाठी करावा. ह्या नातेसंबंधात जोडीदार फार काळ सोबत करेलच असे नाही, त्यामुळे त्याच्यासाठी एवढी महागडी वेळखाऊ ट्रीटमेंट करणे सयुक्तिक नाही. तसेच जोडीदाराचे तुमच्यावर प्रेम असेल तर तो तुम्हाला आहे तसेच स्वीकारेल. म्हणून आतून इच्छा असेल तरच लिंगबदलाला सामोरे जावे, असा विजयभाई ह्या एलजीबीटी+ समूदायातील ज्येष्ठ नेत्याचा सल्ला आहे.

वि.का.राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ या पुस्तकात असे नमूद केले आहे की सभ्यतेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मातृसत्ताक संस्कृती होती. मुलांचा बाप माहिती नसल्यामुळे आईच्याच नावाने मुले ओळखली जात. स्त्री-पुरुष संबंधांना कोणतेही नाव किंवा बंधन नव्हते. हळूहळू ह्या नात्यांना आपण कुंपण घालत गेलो आणि नात्यांमधील वाहतेपण हरवत गेले. माणूस स्वतःला वेगळे समजत असला तरी तो मुळात एक प्राणीच आहे आणि त्याच्या सहजप्रवृत्तींना तो समूळ नष्ट करू शकत नाही. आपण सुसंस्कृत होऊन फक्त पाच-सात हजार वर्षे उलटली आहेत. आपल्या अंतःस्थ प्रेरणा आपण सहजासहजी झुगारून देऊ शकत नाही तर, त्यांचा स्वीकार करणे अनिवार्य आहे. या स्वीकारानंतरच कुंपणातली नाती अधिक मोकळी, समृद्ध होतील आणि कुंपणाबाहेरची नाती सहज रुजतील.

(नोट – मराठी भाषेत पर्यायी शब्द नसल्यामुळे LGBT+ समुदायातील व्यक्तींसाठी इंग्रजी शब्द वापरले आहेत. या लेखातील सर्व घटना व पात्र खरी आहेत, मात्र त्यांची नावे बदलली आहेत. सारथी ट्रस्ट, नागपूर येथील मित्रपरिवाराच्या सहकार्यामुळे हा लेख शक्य झाला, हे विशेष नमूद करावेसे वाटते.)

————————————————

(भावांजली – डॉ. रश्मी पारसकर सोवनी ह्यांनी हा लेख आमच्याकडे पाठवला, त्यानंतर चारच दिवसांत अल्पश्या आजाराने त्यांचे निधन झाले. आमच्या मित्रपरिवारातील एकाचे असे अचानक निघून जाणे आमच्यासाठी अतिशय धक्कादायक होते. घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांना बोलके करून त्यांना कायद्याची मदत व मानसिक आधार देऊ पाहणारा वी 4 चेंज नावाचा आधारगट त्यांनी सुरू केला होता. एलजीबीटी+ समूहासोबतही त्यांचे काम सुरू होते.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.