पर्यावरणीय ‘दहशतवाद’- वास्तव आणि अपलाप (पूर्वार्ध)

आपल्या देशात पर्यावरणवादी लोकांनी एखाद्या प्रश्नावर नुसती थोडीशी तिखट प्रतिक्रिया दिली तरी तात्काळ त्यांना पर्यावरणीय अतिरेकी, दहशतवादी असे संबोधले जाते. पर्यावरणीय अतिरेक (दहशतवाद नव्हे) काय व कसा, आणि मुख्य म्हणजे कितपत सौम्य/उग्र असतो ते माहीत नसल्यानेच असे विनोद आपल्याकडे मधूनमधून होत रहातात. मोठ्या प्रमाणावर काही थेट, रांगडी कृत्ये करून निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करणारे खरे अतिरेकी इंग्लंड आणि अमेरिकेत सर्वप्रथम निपजले. आजही त्यांचे सर्वाधिक उद्योग तिथे, आणि युरोपमधील अनेक देशात, तसेच ब्राझील, पेरू, अर्जेंटिना अशा दक्षिण अमेरिकेतील देशांतही चालू असतात. २०१० ते २०१९ ह्या कालावधीत त्यांनी जगभरात घातपात, जाळपोळ, मालमत्तांचे नुकसान अशी २५२१ प्रतिबंधित कृत्ये केल्याचे त्यांच्याच वेब-मासिकावर पाहायला मिळते. एफबीआयने प्रसृत केलेल्या माहितीनुसार २००३ ते २०१२ इतक्याच वर्षांत त्यांच्या घातपाती कृत्यांमुळे ३० कोटी डॉलर्स इतक्या किमतीचे, विविध मालमत्तांचे नुकसान झाले होते. तरीही त्यांच्यासाठी इको-टेररिस्ट, म्हणजे ‘पर्यावरणीय दहशतवादी’ ही संज्ञा वापरणे हा खास एफबीआयच्या प्रचारतंत्राचा भाग होता, हे आता जगासमोर आले आहे. ह्या ज्या खर्‍याखुर्‍या पर्यावरणवादी अतिरेक्यांबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्यातीलसुद्धा, अति तुरळक अपवाद वगळता, एकानेही कुणाचा (माणूस/प्राणी) जीव घेतलेला नाही. हा ‘दहशतवाद’ पर्यावरणविनाशी वास्तू, आस्थापना इत्यादींची जाळपोळ, घातपात, वाईट परिस्थितीत जगत असलेले प्राणी हल्ला करून मुक्त करणे, इतपतच मर्यादित आहे. अल-कायदा, तालिबान, इसिस, आदि ‘अभिजात’ दहशतवाद्यांच्या पंक्तीत त्यांना बसवणे म्हणजे पु.ल.देशपांडे ह्यांच्या शब्दात सशाच्या टाळूला ‘गंडस्थळ’ म्हणणे आहे.
भारतात इतक्या टोकाचा पर्यावरणवाद आजवर दिसला नाही, दिसणारही नाही. कारण जगातील सर्वाधिक पर्यावरणीय संघर्ष असलेल्या आपल्या देशात पर्यावरण चळवळ मात्र आजवर बव्हंशी शांतताप्रिय, अत्यंत अहिंसक पद्धतीने चालत आली आहे. गंगा शुद्धीकरणासाठी प्राणांतिक उपोषण करून जीव गमावलेले जी.डी.अग्रवाल आठवा. भारतीय पर्यावरणवाद्यांच्या मूल्यव्यवस्थेत अहिंसा हे सर्वोच्च मूल्य आहे.
कुठल्याही दहशतवादाच्या अभ्यासात त्याच्या उत्पत्तीची कारणे शोधली जातात. बर्‍याच वेळा ती सुस्पष्ट सामोरी येतही नाहीत. पण जगात इतरत्र पर्यावरणीय दहशतवादाची सुरुवात का झाली ह्याचे बर्‍यापैकी समाजशास्त्रीय उत्तर मिळते. पर्यावरण चळवळीचा समग्र अभ्यास करताना ते अभ्यासणेही रोचक ठरते.

कशी, केव्हा झाली सुरुवात?
पर्यावरणीय दहशतवाद दोन विभिन्न प्रकारच्या निसर्गस्नेही कार्यकर्त्यांमध्ये विविध वेळी उफाळला. मुख्यत्वे ‘प्राणीहक्क’ ह्या विषयात काम करणारे हा पहिला प्रकार; आणि समग्र निसर्ग, पर्यावरण ह्यासाठी काम करणारे अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते हा दुसरा. त्यांच्या अतिरेकात काही कृत्ये समान असली तरी, दोघांच्या प्रेरणा मात्र वेगळ्या होत्या.
समग्र पर्यावरणासाठी काम करणार्‍या लोकांमधून टोकाचे अतिरेकी निर्माण होण्याच्या प्रक्रियेची मुळे १९६० सालच्या आसपास रुजलेली दिसतात. ह्या काळात अमेरिकेतील अधिकाधिक लोकांना पर्यावरण प्रश्नांची सत्यता पटली होती. मूलस्रोत ओरबाडून मिळणारी समृद्धी चुकीची असते, ही जाणीव तिथे रुजली होती. ह्या जनजागृतीमुळे अनेक उपयुक्त, पर्यावरणरक्षा करणारे उपक्रम चालू झाले. १९६२ ला राचेल कार्सनचे सायलंट स्प्रिंग नावाचे पुस्तक आले. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत अमेरिकी ग्राहक चळवळी मानवी गरजा आणि जीवनाची उच्च गुणवत्ता ह्यांच्याशी सुसंगत अशा निसर्गसमृद्ध पर्यावरणाची मागणी जोर लावून करू लागल्या होत्या. अशा पुष्कळ चळवळींचा गलबला असूनही त्यांच्या कृतीतून अपेक्षित परिणाम साधला जात असल्याचे दिसत नव्हते. परिणामी, अशा चळवळींमधील अनेक लोक निसर्ग-संरक्षणासाठी अधिक मूलगामी, आमूलाग्र उपायांची मागणी करू लागले. १९७९ सालचा अमेरिकी जंगलखात्याची ३.६ कोटी एकर वने व्यावसायिक उद्देशांनी तोडण्याचा निर्णय ही अखेरची ठिणगी ठरली. हा निर्णय म्हणजे सनदशीर मार्गांनी लढणार्‍या पर्यावरणवाद्यांना फार मोठा झटका होता. वनखात्याची असंवेदनशीलता तर ह्यातून दिसलीच, पण पारंपरिक पर्यावरण चळवळ अशा नुकसांनीचा विरोध करून इतका मोठा विनाश थांबवू शकत नाही, किंवा मोठ्या कंपन्या, आंतर्राष्ट्रीय बाबूशाही ह्यांच्याशी साटेलोटे असल्याने हा विनाश थांबवण्याची अशा चळवळीला कदाचित इच्छाच नाही, हे अप्रिय सत्य सामोरे आले. नैसर्गिक पर्यावरण जपण्याबाबतची बेफिकिरी (निर्णायकरीत्या) संपवू पाहत असणाऱ्या अनेक समूहांची निर्मिती ह्यातूनच झाली. त्यासाठीचे मार्ग कायदेशीर नसले तरी, त्याचा त्यांना विधिनिषेध असणार नव्हता. ही धारणा पुढील काही वर्षांत पक्की झाली.
अशा समूहांमधील सर्वांत प्रबळ समूह ‘अर्थ लिबरेशन फ्रंट’ (ई.एल.एफ.), इंग्लंडमध्ये आधीच्या ‘अर्थ फर्स्ट!’ नावाच्या संघटनेतून उदयाला आला. (त्यांच्या मते) अनैतिक आणि स्वार्थी मानवी उपक्रमांमुळे नाश पावलेल्या सृष्टिव्यवस्था तडजोडीविना पुनरुज्जीवित करणे हे ह्या समूहाचे प्रमुख उद्दिष्ट होते. फक्त ‘डीप इकॉलॉजी’च्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यानेच हे शक्य होईल असा त्यांचा विश्वास होता. आणि ही धारणा थेट, धडक कृतीने प्रत्यक्षात आणणे हा त्यांचा कार्यक्रम होता. ई.एल.एफने त्यामुळेच, लाकूडकटाई गिरण्या, जनुकीय बदल व संशोधन करणार्‍या संशोधनसंस्था, बांधकामकंपन्या, मोटारविक्रेते, ऊर्जानिर्मिती आणि वितरणकेंद्रे, तसेच अन्यायी भांडवली आस्थापनांवर थेट घातपाती हल्ले चढवणे चालू केले. त्यांचे आणखी एक उद्दिष्ट भांडवलदारी व्यवस्था नष्ट करणे आणि संपूर्ण समाजजीवनात ‘नफा’ ही कृतीला प्रेरक घटना न रहाणे असेही होते, हे इथे नमूद करणे आवश्यक आहे. ई.एल.एफ हे एक प्रातिनिधिक उदाहरण. असे अन्य छोटे-मोठे समूहदेखील हळूहळू फोफावत गेले.
ॲनिमल लिबरेशन फ्रंट हा प्राणीहक्क संघटनांमधून निर्माण झालेल्या अतिरेकी संघटनांमधील सर्वांत मोठा समूह होता. रॉनी ली ने त्याची स्थापना १९७६ मध्ये केली. माणसांकडून प्राण्यांचे होणारे शोषण, छळ थांबवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. मांसउत्पादक, अन्नउत्पादक, औषधनिर्माण कंपन्या, फरउत्पादक, प्राणी-आधारित उद्योग आणि अर्थातच संशोधन संस्थांवर मूलतः ह्यांचे हल्ले होते. सुरुवातीच्या काळात ह्यांचा भर मुख्यत्वे किरकोळ घातपात करण्यावर होता. प्राण्यांची सोडवणूक, कुलुपे लावली असतील तर त्यात चिकट द्रव सोडणे, प्राण्यांचा छळ ज्याद्वारे होत असेल अशी उपकरणे निकामी करणे, खिडक्यांवर निषेधात्मक मजकूर रंगवणे किंवा खिडक्या फोडणे असे उद्योग ते करत होते. १९८० नंतर मात्र वित्तपिपासू उद्योग बधत नाहीत हे कळल्यावर त्यांनी जाळपोळ करून आर्थिक नुकसान करणे, प्रज्ज्वलक बॉम्ब अथवा साधने एखाद्या ठिकाणी ठेवून स्फोट घडवून आणणे, प्रयोगशाळांमधील उपकरणांचे नुकसान घडवून आणणे, खाटकांच्या दुकानांचे नुकसान करणे असे प्रकार सुरू केले. त्यांचा मूलतत्त्ववाद १९८०च्या दशकाच्या मध्यावर चांगलाच वाढला. त्यांनी लोकांवर थेट हल्ले सुरू केले. ह्यात धमकावण्या, त्रास देणे, किरकोळ मारहाण आणि व्यक्तींवर हल्ले आणि अगदी अपवादात्मक परिस्थितीत प्राणिशोषक कंपन्यांमध्ये कामाला असणार्‍या लोकांच्या घरात स्फोटके पेरणे, अशा उद्योगांचा समावेश होता.
मनुष्य हा पृथ्वीवरील एकमेवाद्वितीय आणि सर्वश्रेष्ठ जीव आहे, ह्या मानवकेंद्री युक्तिवादाचा विरोध हीच ई.एल.एफ आणि ॲनिमल लिबरेशन फ्रंट ह्या दोन्हीं मूलतत्त्ववादी गटांची तात्त्विक बैठक आहे. मागील शतकातील वैज्ञानिक, विचारवंत आल्डो लेओपोल्डच्या एका वाक्याशी ह्या मांडणीचा मेळ बसवला तर, ह्या उग्रवादात भले-बुरे कशाला समजतात ते नीट उमगते. ते वाक्य म्हणजे, “समग्र निसर्गाचे सौंदर्य, एकात्मकता आणि स्थैर्य जपू पहात असेल ती गोष्ट चांगली; पहात नसेल, ती वाईट.”

विविध तंत्रे आणि युक्त्या:
समग्र पर्यावरणवादी अतिरेकी सृष्टिव्यवस्थेचे संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी वापरतात ती हिंसा काहीशी अप्रत्यक्ष असते. संबंधित घटकांचे नुकसान इथवर येऊन ती बरेचदा थांबते. प्राणिहक्क अतिरेकी मात्र अप्रत्यक्ष हिंसेबरोबरच विशिष्ट माणसांना लक्ष्य करणारे हिंसक मार्ग अवलंबू शकतात.

घातपाताची तंत्रे: दोन्ही पंथ वापरतात ते तंत्र म्हणजे माकडचाळे, उर्फ मंकी रेंचिंग. ह्यात अनेक पद्धती आहेत. बांधकाम चालू असलेल्या पर्यटकनिवासांना आगी लावणे, ट्री स्पायकिंग, म्हणजे तोडल्या जाऊ शकणार्‍या मोठ्या वृक्षाच्या खोडात धातूची सळई घालून ठेवणे, ज्यामुळे यांत्रिक करवत सळईला अडकून फाटते आणि कापणार्‍या माणसाला जखमी करते. यंत्रे आणि उपकरणे ह्यांची नासधूस करणे, बिल-बोर्ड्स आडवे करणे, स्कीइंग वाटांवरील मार्गदर्शक चिह्ने काढून टाकणे, वीजवाहक तारा काढून टाकणे, बंदिवासातून प्राणी सोडवणे, प्रयोगशाळा उद्ध्वस्त करून त्यांना आगी लावणे, प्राणिहत्येसाठी वापरली जाणारी साधने उद्ध्वस्त करणे, खाटकांची दुकाने फोडणे हे सर्व प्रकार पाहायला मिळतात.

जाळपोळ: पर्यावरणीय घातपाताचे हे सर्वांत दृश्य तंत्र. वाईल स्की रिसॉर्ट, कोलोरॅडो ह्या जागेला १९ ऑक्टोबर १९९८ रोजी आग लावली गेली. लिंक्स ह्या प्राण्याचा अधिवास त्या रिसॉर्टच्या जमिनींखाली नष्ट होत असल्याने हे पाऊल उचलले गेले. ह्या आगीत एक रेस्तराँ, चार निवासी हॉटेल इमारती, आणि तीन खुर्च्या उचलणार्‍या यंत्रणा पूर्णपणे जाळून १.२ कोटी डॉलर्स इतके नुकसान झाले. दुसरी एक अशीच मोठी आग सॅन दिएगो इथे ऑगस्ट २००३ मध्ये लावली गेली. त्यात एक निवासी संकुल आणि एक क्रेन पूर्णपणे भस्मसात होऊन असेच कोटींमध्ये नुकसान झाले. सर्वांत मोठी जाळपोळ गणली जाणारी आग म्हणजे १६ एप्रिल १९८७ रोजी डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या पशुरोगनिदानकेंद्राला लावली गेली. ए.एल.एफने जबाबदारी स्वीकारलेला आणखी एक गुन्हा म्हणजे जर्मनीतील फॉक्स टेरियर असोसिएशन इमारतीला त्यांनी लावलेली आग (डिसेंबर २०१५). त्याआधी जून महिन्यात त्यांनी तिथूनच बंदिवासातील कित्येक कोल्हे सोडवले होते.

माणसांवर थेट हल्ले: छोटे, परंतु अधिक हिंसक असे काही अतिरेकी समूह प्राणिहक्क अतिरेक्यांमधे आहेत. ते घातपात वगैरे करत नाहीत. संबंधितांवर थेट हल्लेच करतात. ह्यामधील समूह म्हणजे अॲनिमल राइट्स, मिलिशिया (A.R.M.) आणि जस्टिस डिपार्टमेंट (JM). ह्या दोन्ही संघटना २०२१ मध्ये काहीशा मागे पडून दुसर्‍या दोन आल्या आहेत.
A.R.M प्रणित हल्ले एकेकटे, एकल असत. त्यांचा प्राथमिक हेतू प्राण्यांना त्रास देणार्‍या लोकांना दहशत बसावी, इतकाच असतो. ह्या समूहाने आपले पहिले कृत्य ३० नोव्हेंबर १९८२ रोजी इंग्लंडमध्ये चार प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यालयांकडे स्फोटके पाठवणे हे केले. तीन उघडली गेली नाहीत. एक मात्र कर्मचार्‍याला किरकोळ जखमा देऊन गेले.
त्यांची आणखी एक ‘कृती’ रोचक आहे. आपल्या चॉकलेटमुळे दात सडत नाहीत ना ह्याचे प्रयोग मार्स ही चॉकलेट कंपनी माकडांवर करीत होती. चाॅकलेट हे माकडांचे नैसर्गिक अन्न नाही. त्यामुळे माकडांना ह्या प्रयोगाचा त्रास होत होता. आम्ही त्या चॉकलेटांमधे विष कालवले आहे असा गौप्यस्फोट A.R.M ने केल्यामुळे मार्स कंपनीला एक संपूर्ण बॅच परत मागवावी लागून तीन दशलक्ष पौंड इतका तोटा झाला. नंतर A.R.M ने आम्ही असे काही कालवले नव्हते, पण प्राण्यांना त्रास देणार्‍या कंपनीला नुकसान भोगायला लावणे हाच आमचा उद्देश होता, असे जाहीर केले. १९९२ नंतर A.R.M अधिकाधिक हिंसक होत गेली. ह्यात अनेक ठिकाणी प्रज्ज्वलक बॉम्ब पाठवणे, ठार मारण्याच्या धमक्या देणे, विषप्रयोग, जीवाणूंचे मिसळणे, असे प्रकार त्यांनी मुख्यत्वे फर धंद्यातील लोकांविरुद्ध, तसेच जिवंत प्राण्यांवर शस्त्रकिया किंवा प्रयोग करून त्यांना यातना देणार्‍या लोकांविरुद्ध केल्याचे दिसते. स्वीडनमध्ये अगदी काल-आजपर्यन्त ह्यांचे कार्यकर्ते क्रियाशील असल्याचे दिसते.

इतर तंत्रे: जस्टिस डिपार्टमेंट (JM) ची तंत्रे साधारण A.R.M सारखीच आहेत. मारहाण, ब्लॅकमेलिंग, आणि कमी नुकसानकारक बॉम्ब हल्ले. शिकार अथवा हौशी मासेमारी करणार्‍या लोकांना पोस्टाने बॉम्ब पाठवून त्यांचे उद्योग सुरू झाले. दुर्दैवाने ते बॉम्ब वाटफोर्ड इथल्या सॉर्टिंग ऑफिसमध्येच फुटले.
१९९६ मध्ये लेदर उद्योगाच्या प्रतिनिधींवर त्यांनी एचआयव्हीबाधित रक्ताने भरलेली ब्लेड घेऊन हल्ले चढवले. हे तंत्र त्यांनी अनेक वेळा विविधप्रकारे वापरले. एप्रिल १९८९ मधे अमेरिकेतील जेएमने टक्सन, ॲरिझोना विद्यापीठावर छापा-सदृश हल्ला चढवला. १२०० प्राण्यांची सुटका केली, आणि आग लावून आणि नासधूस करून २५०,००० डॉलर्सचे नुकसान केले. नंतर जारी केलेल्या पत्रकात त्यांनी ह्या घटनेचे वर्णन “एकल, छळ झालेले प्राणी सोडवणे, त्यांच्या प्रति करुणा आणि दया ह्यासाठी, तसेच विज्ञान-वैद्यकीय उद्योगांचे भरकटलेले, मानवविरोधी, पृथ्वीविरोधी नफेखोर, जिवंत प्राण्यांना त्रास देणारे संशोधन थांबवण्यासाठी टाकलेले पाऊल”, असे केले होते.

उलट बाजूच्या लॉबीची कृष्णकृत्ये:
आतापर्यंतच्या विवेचनात पर्यावरण प्रश्न सोडवण्यासाठी अवलंबिलेले अतिरेकी कुठवर पोहोचू शकतात, ते आपण पाहिले; पण मालमत्ता विकासक, शिकारी, एसयूव्ही वापरकर्ते, खाण माफिया, मुक्त बाजारपेठेचे समर्थक, आणि धार्मिक उन्मादी कट्टर मूलतत्त्ववादी सच्च्या पर्यावरणवाद्यांविरुद्ध किती नृशंस कृत्ये करू शकतात, ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हे खरे पर्यावरण गुन्हेगार ‘वाईझ युझ मूव्हमेंट’ अशा गोंडस नावाखाली एक तथाकथित चळवळ चालवतात. पर्यावरणातील अतिरेकी सोडाच, अत्यंत अहिंसक मार्गाने, बुलडोझरखाली झोपून आपला मूक निषेध व्यक्त करणार्‍या कार्यकर्त्यांवर ह्या लॉबीने फार मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, दमदाटी, दहशत, जाळपोळ, बलात्कार आणि खूनदेखील, इतके सर्व अत्याचार केले आहेत, करत असतात. त्यामुळे खरे दहशतवादी कोण, असा प्रश्न स्वाभाविक उपस्थित होतो. असा दहशतवाद ऐन भरात होता तेव्हा, शासनव्यवस्थांची एकूणच पर्यावरणस्नेही लोकांबद्दल काय धारणा होती, तीही लक्षात घेणे गरजेचे ठरते. रीगन ह्यांचे अंतर्गत बाबींसाठीचे सचिव जेम्स वॅट बरळले होते, “पर्यावरणवाद्यांचा त्रास ज्यूरी बॉक्सद्वारे थांबला नाही, किंवा बॅलट बॉक्स (मतपेटी)द्वारे थांबत नसेल, तर कार्ट्रीज् बॉक्स (बंदुकीच्या गोळ्यांची पेटी) तो निश्चितच थांबवू शकेल”. ह्या वाक्यातून पर्यावरणविनाशी लोकांनी केलेल्या अत्यंत हिंसक कारवायांशी भांडवली शासनाची घट्ट मैत्री अधोरेखित होते.

दहशतवाद शब्दाच्या प्रचलित अर्थात हे सर्व बसते का?
ब्रोन टेलर, क्रिस्टोफर हार्मोन ह्या समाजशास्त्रज्ञांच्या मते प्राणी अथवा निसर्ग वाचवणे, ह्या मर्यादित उद्देशाने केलेल्या उठाठेवींना सरसकट दहशतवाद म्हणता येणार नाही. कारण ह्या कृत्यांचा उद्देश समाजरचना उलथून टाकणे अथवा ती नष्ट करणे असा व्यापक नसतो; तर समाजातील एका छोट्या अन्यायी वर्गाला (जिवंत प्राण्यांचा छळ करणारे, प्राणिविनाशी उद्योग चालवणारे, इत्यादी) त्यांच्या दुष्कृत्यांपासून परावृत्त करणे, इतक्या मर्यादित उद्देशापुरताच हा अतिरेक असतो.

एक ‘सरकारमान्य’ अतिरेकी -पॉल वॉटसन
शार्क, व्हेल आणि अन्य सागरी वन्यजीवांना पॉल वॅटसन देवदूतासमान आहेत. ह्या सागरी जीवांची तस्करी करणाऱ्यांसाठी तर तो एक धडकी भरवणारा ‘इको-टेररिस्ट’ आहे. www.seashepherd.org ह्या त्याच्या विना नफा संघटनेची जहाजे जगभरातल्या समुद्रांमध्ये गस्त घालत असतात. समुद्री जीवनाचे तस्कर आणि त्यांची जहाजे ह्यांना ती थेट धडक देऊन जलसमाधी देऊन संपवतात. (सदर संकेतस्थळावर आपण त्यातील अनेक धडकांचे प्रत्यक्ष चित्रीकरण पाहू शकतो). आजवर कैक लाख सागरी जीव पॉलच्या कृतिकार्यक्रमामुळे वाचले आहेत. १९७०मध्ये स्थापन झालेल्या ‘ग्रीन पीस’ ह्या पर्यावरणसमूहाचा पॉल हा सहसंस्थापक; पण पुढे संघटनेची उद्दिष्टे ‘मवाळ’ झाली असे वाटल्याने तो बाहेर पडला. त्याने ‘सी शेफर्ड’ काढली. २००७मध्ये, उत्क्रांतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गॅलापॅगॉस बेटांच्या सुरक्षेची जबाबदारी इक्वेडोर सरकारने त्याच्यावर टाकली. त्यानंतरच्या एकाच महिन्यात ९२,००० समुद्री काकड्या आणि १९,००० शार्कचे कल्ले त्याने जप्त करून दाखवले. सुमारे ३५ मैल परिसरातील अवैध सागरी उचापती संपूर्ण थांबवून दाखवल्या.

नजीकच्या भविष्यातील धोके:
१९८०-९० च्या दशकांपेक्षा आता अशा टोकाच्या कृत्यांची संख्या आणि त्यांना मिळणारा पाठिंबा, एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढताना दिसत नाही. ह्याचे एक कारण म्हणजे त्या दशकातल्यापेक्षा निसर्ग-पर्यावरण विषयांमध्ये सामान्य नागरिक, शासनव्यवस्था हे सर्वच घटक अधिक जागरूक होऊन त्यानुसार काही कामे होऊ लागली आहेत. कायदेही पूर्वीपेक्षा अधिक निसर्गसंरक्षक झाले आहेत.
भविष्यातील खरा धोका वेगळाच आहे. आजवर हे सर्व पर्यावरण-अतिरेकी उच्च मूल्यांनी प्रेरित, शिक्षित होते. निसर्ग–प्राणिमात्र ह्यांचे भले व्हावे ह्यापलीकडे त्यांना काही उद्दिष्टे नव्हती. पण जागतिक स्तरावर पुढील काळात हवामानबदलामुळे एक वेगळाच धोका संभवतो. हवामानबदलाशी निगडित दोन प्रकारचा दहशतवाद होऊ शकतो. पहिला, म्हणजे पर्यावरणरक्षणासाठी आग्रही लोक आपले मूलस्रोत राखण्यासाठी अथवा धोरणात्मक बदल करून घेण्यासाठी अशा मार्गांचा अवलंब करू शकतात; आणि दुसरा, म्हणजे काही गट युद्धजन्य गोष्टींद्वारे पर्यावरणाचे, मूलस्रोतांचे नुकसान घडवून आणून आपली संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. नायजेरियात बोको हराम संघटनेने आपल्या भरतीसाठी नैसर्गिक संसाधंनांवर ताण आणून लोकांचे जगणे मुश्किल केल्याने नाइलाजाने लोक ‘बोको’मध्ये भरती झाले होते. पुढील काळातील पर्यावरण-अतिरेकीही पारंपरिक नसतील, तसेच उच्च मूल्यांनी प्रेरित असतीलच असेही नाही. हाच सर्वांत मोठा धोका आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.