गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची

संगीताचा नवरा एका कंपनीत नोकरी करतो. त्याची कंपनी घरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. कंपनीत जाऊन परत यायला आपल्या बाईकमध्ये त्याला रोज साधारण अर्धा लीटर पेट्रोल टाकावे लागते. म्हणजे रोजचे जवळपास चाळीस रुपये खर्च होतात. महिन्याचे साधारण एक हजार रुपये. दहा-बारा हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या संगीताच्या नवऱ्याला प्रवासाचे हे हजार रुपये परवडत नाहीत, पण त्याशिवाय तो कामावर जाऊच शकणार नाही. नाईलाज आहे.

संगीतासुद्धा कामाला जाते, पण ती कुठल्या कंपनीत नोकरीला नाही. रोज सकाळी तीन-चार ऑफिसेसमध्ये साफसफाईचे काम ती करते. डॉक्टरांचे क्लिनिक, सीए साहेबांचे ऑफिस, कोचिंग क्लासेस, अश्या ठिकाणी तिला सकाळी दहा वाजेपर्यंत काम संपवावे लागते. काल दिवसभर साठलेला कचरा फेकणे, झाडून-पुसून ऑफिस स्वच्छ करणे, टेबल आणि खिडक्यांच्या काचा रोज साफ करणे, असे साधारणपणे काम असते. दुपारच्या वेळेत एका पाळणाघराची सफाई आणि संध्याकाळी एक-दोन कामे उरकून संगीता घरी येते.
संगीता काम करीत असलेले पाळणाघर तिच्या घरापासून सगळ्यात लांब म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर आहे. पण वेगवेगळ्या ऑफिसच्या वेगवेगळ्या बिल्डींग्स एकमेकींपासून लांब-लांब आहेत. हिशोबच केला तर दिवसभरात संगीतालासुद्धा पंधरा-वीस किलोमीटरचा प्रवास पडतो.

पण संगीताकडे स्वतःची गाडी नाही. बसमध्ये एकदा बसले की दहा रुपयांचे तिकीट काढावे लागते. दिवसातून पाच-सहा वेळा चढ-उतार करून पन्नास-साठ रूपये खर्च करणे तिला शक्य नाही. सगळीकडची कामे धरून तिचे महिन्याचे उत्पन्न सहा-सात हजारांच्या आतच आहे.

कधीतरी खूपच दमायला झाले तर संगीता बसस्टॉपवर जाऊन थांबते. स्टॉपसमोर लावलेल्या मोठ्ठ्या होर्डिंगवरील एक आई आपल्या मुलाला हॉर्लिक्स घालून दुधाचा ग्लास देताना तिला दिसते. किंवा किंडरजॉय चॉकलेटसाठी हट्ट करणारा मुलगा आणि कौतुकाने त्याला किंडरजॉय घेऊन देणारी आई दिसते. मग संगीता पुन्हा चालत-चालत घरी जायला निघते. बसतिकीटाच्या वाचवलेल्या दहा रुपयांची इवलीशी कॅडबरी मुलासाठी आठवणीने घेऊन जाते.

नेहा एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करते. नेहाचा नवरा एका बँकेत जॉब करतो. नेहाची कंपनी आणि तिच्या नवऱ्याची बँक घरापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरांवर आहेत. नेहाकडे स्वतःची स्कूटी आहे आणि तिच्या नवऱ्याकडे बाईक आहे.

नेहाचा नवरा रोज बँकेत बाईक घेऊन जातो. त्याच्या बाईकचे ॲव्हरेज चांगले आहे. नेहाची कंपनी छोटी आहे, त्यामुळे कॅब वगैरे न्यायला येत नाही. स्कूटीचे ॲव्हरेज कमी असल्यामुळे ती परवडत नाही. नेहाला दोनदा बस बदलून ऑफिसला जावे लागते.

येताना कधी-कधी नेहाचा नवरा तिला पिक-अप करतो, पण त्याच्या सोयीनुसार! बहुतेक वेळेला त्याला बँक बंद झाल्यावर मित्रांसोबत पार्टीला ‘जावे लागते’. आवडत नसतानाही नेहाला बसचा प्रवास करावा लागतो. दोन बस बदलल्यामुळे तिकीटाचे पैसेसुद्धा, स्कूटीच्या खर्चापेक्षा तुलनेने कमी पण तसे जास्तच खर्च होतात.

महिन्याच्या जमा-खर्चाचा हिशोब मांडला की नेहा आणि तिच्या नवऱ्याची नेहमी भांडणे होतात. नेहाचा पगार तिच्या नवऱ्याच्या पगारापेक्षा कमी असूनसुद्धा तिचा रोजचा बसतिकीटांचा खर्च त्याच्या बाईकच्या पेट्रोल खर्चापेक्षा जास्त होतो. यावरून तिचा नवरा कधी चेष्टेत तर कधी रागाने तिला बोलतो. होम-लोनचे हप्ते सुरू असल्याने नेहाला जॉब सोडणेसुद्धा शक्य नाही.

यावर नेहानेच एक उपाय शोधून काढला आहे. ऑफिसपासून घराच्या उलट्या दिशेने अर्धा-एक किलोमीटर चालत गेले की एक मोठा चौक लागतो. तिथून तिच्या घराच्या दिशेने जाणारी थेट बस मिळू शकते. आता ऑफिसच्या दारातून बस पकडून नंतर घराकडे जाणारी दुसरी बस बदलण्याऐवजी, नेहा रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक किलोमीटर चालत जाते. चालण्याचा आणि स्टॉपवर बसची वाट बघण्याचा तासभर वेळ जास्त जातो खरा, पण दोनऐवजी एकाच बसचे तिकीट काढावे लागते. असे करून महिन्याचा प्रवासखर्च तिने निम्म्यावर आणून ठेवला आहे. आयता व्यायाम होतो, ह्याचे समाधानही आहेच.

दोघांचा मिळून महिन्याचा प्रवासखर्च कमी झाला म्हणून नेहाचा नवरा खूष आहे. ह्याच महिन्यात त्याचे प्रमोशनसुद्धा होऊ घातले आहे. आपण वरची पोस्ट घ्यायला लायक आहोत हे इम्प्रेशन व्यवस्थापकांवर पाडण्यासाठी त्याने कार घ्यायचे ठरवले आहे. कार लोनसाठी अप्लायसुद्धा केले आहे. नेहा तसाही बसच्या तिकिटांवर खर्च करत असते, म्हणून तिची ‘पडून राहिलेली’ स्कूटी विकून कारच्या डाऊन पेमेंटची तयारी तिचा नवरा करतोय.

रचनाच्या कॉलेजचा ग्रुप नाट्यस्पर्धेत उतरतोय. तालमीला कॉलेजजवळ जागा मिळत नाही, म्हणून एका ग्रुप मेम्बरच्या सोसायटीत गच्चीवर तालमी करायचे ठरले आहे. पण ती सोसायटी शहरापासून थोडी लांब आहे. रचनाच्या घरापासून तर कॉलेज दहा किलोमीटर आणि तालमीचे ठिकाण तिथून पुढे दहा किलोमीटर.

घरून नाटकात काम करायला विरोध नाही, पण बसने प्रवास करायचा म्हणजे अजून पैसे खर्च होणार. कॉलेज संपल्यावर कुणाच्या तरी गाडीवर बसून जायचा विचार केला. पण बाकीचे सगळे तिकडच्याच भागात राहणारे. त्यामुळं तालमीनंतर एकटीलाच बसने परत येणे भाग पडणार!

कॉलेजचे अजून एक वर्ष बाकी आहे. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट वगैरेसाठी जास्त पैसे खर्च होणारच आहेत. शिवाय वर्षभर वह्या-पुस्तके, सहली, गॅदरिंग, काही ना काही खर्च असतातच. धाकटा भाऊ दहावीत आहे. त्याच्या कॉलेजसाठी पुन्हा खर्च वाढणारच. आत्ता महिना-दीड महिन्यासाठी फक्त बसभाड्याचे जादा हजार रुपये आपल्याला कसे परवडतील?

रचनाने नाटकात काम करायला नकार दिलाय. त्याऐवजी कॉलेजजवळच्या एका कॉम्प्युटर इन्स्टिट्युटमध्ये अर्ध-वेळ कामासाठी ती इंटरव्ह्यू देऊन आली आहे. पुढच्या वर्षी नाटकात भाग घ्यायचा असेल तर बस भाड्यापुरते तरी पैसे आपल्या स्वत:च्या पर्समधे असावेत असा विचार तिने केला आहे.

बसच्या तिकीटांचा खर्च परवडत नाही म्हणून बायका काही किलोमीटर रोज चालत जातात, किंवा बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च होतील म्हणून त्यांना काही संधी सोडाव्या लागतात, यावर संगीताच्या नवऱ्याचा, नेहाच्या नवऱ्याचा, रचनाच्या मित्रांचा विश्वास नाही. संगीता, नेहा, आणि रचना त्यांना ही गोष्ट समजावण्याच्या किंवा पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाहीत.

बसच्या रोजच्या प्रवासाला पैसे पडणार नसतील तर आपले किती कष्ट वाचतील किंवा आपल्याला कुठल्या संधी मिळू शकतील, यावर संगीता, नेहा, आणि रचना विचार करतायत. बायकांचा रोजचा बसचा प्रवास हा मुद्दा पुढच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येऊ शकेल का, हा विचार मात्र अजून त्या तिघींपैकी कुणाच्याही डोक्यात आलेला दिसत नाही.

संपर्क : ९८२२४०१२४६

अभिप्राय 2

  • Why is the option of using a bicycle to workplace or college not considered anywhere in the discussion?
    Covering six to eight km one way doesn’t take over thirty minutes by a bicycle.
    I know of several girl students happily using bicycle to go to school at taluka place eleven km from a village.

  • महिला ह्या काटकसरी असतात हे दिसून आले.
    सरकारने यासाठी बस सेवा अधिक बळकट करावी व सर्व ठिकाणी बस सुविधा द्यावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.