आवाहन

स्नेह.

गेल्या शतकांत उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान ह्यांत उल्लेखनीय प्रगती झाली. नवनवीन उत्पादने आणि बाजारात त्यांची उपलब्धता ह्यावर लक्ष अधिक केन्द्रित होऊन त्यासाठी आजही प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जातो आहे. तंत्रज्ञानातील प्रगती किमान रोजचे जगणे सोपे करेल अशी साहजिक अपेक्षा होती. सोयीची अनेक नवी उपकरणे आपल्याकडे आलीदेखील; पण रोजच्या जगण्यातील विवंचना कमी झाल्या नाहीत. दैनंदिन जीवनाशी निगडीत कितीतरी समस्या आजही जशाच्या तशा आहेत. नव्या साधनांमुळे ज्यांची शारीरिक श्रमाची कामे कमी झाली असा वर्ग अतिशय छोटा आहे. त्यामुळे जीवनमान सुधारले असे म्हणण्याइतकी परिस्थिती आपल्या देशाततरी अद्याप नाही.

महागाई, रोजगार, तोकडी आरोग्यसेवा आणि पंगू झालेली शिक्षणव्यवस्था ह्या समस्या आजही आपल्याला भेडसावत आहेत. नव्या समस्यांसाठी नव्या उपाययोजना शोधाव्या लागतील हे समजण्यासारखे असते. पण अजूनही आपल्याला जुन्या प्रश्नांसाठीदेखील उत्तरे शोधावी लागणार आहेत का? तसे असेल, तर त्या प्रयत्नांची दिशा काय असावी? ह्या प्रश्नांसाठी सुरू झालेल्या चळवळींची, उपाययोजनांची आजची स्थिती काय आहे? याचा आढावा घ्यायला हवा.

राजकीय पातळीवरही अनेक घडामोडी सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांत भरघोस मताधिक्याने जागा जिंकून महायुतीचे सरकार बनले. सत्ताधाऱ्यांनी डाव कसा साधला, विरोधकांचे कुठे चुकले, बंडखोर उमेदवारांची किती किंमत चुकवली गेली, ईव्हीएमबद्दलचा विरोधकांचा आरोप खरा आहे की ती पोकळ बोंब आहे, जिंकणाऱ्या पक्षाला कोणत्या आश्वासनांचा फायदा मिळाला ह्यावर निकालानंतर काथ्याकूट होतच असतो. त्यापैकी ‘लाडकी बहीण’, ‘शेतकरी सन्मान’सारख्या योजनांना रेवडी-खिरापती असे संबोधले जाते आहे. पण कल्याणकारी राज्याकडून अपेक्षित असलेली मोफत आरोग्यसेवा, मोफत शिक्षणसारख्या योजना किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम रेवडीहून वेगळे कसे आहे, ते समजून घ्यायला हवे. रेवडी म्हटल्या जाणाऱ्या योजना आणि सामाजिक हिताच्या योजनांमधील फरक काय, ह्याविषयी बोलले गेले पाहिजे.

असे अनेक महत्त्वाचे विषय ‘आजचा सुधारक’मधून पुढे आणायचे आहेत. संबंधित तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी, विचारकांनी, संवादकांनी आपल्या आवडीच्या, अभ्यासाच्या, अनुभवाच्या अश्या कुठल्याही विषयावर लिहून आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात २५ डिसेंबर २०२४ पर्यंत aajacha.sudharak@gmail.com अथवा +91 9372204641 वर पोहोचावे ही अपेक्षा. शब्दमर्यादा नाही.

 
समन्वयक,
आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.