‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का? ह्या कुटुंबाचा धर्म कोणता असेल? ह्या कुटुंबाचा देव कोण असेल?
‘Man is an animal that makes bargain’
देव, विश्व, आणि निसर्ग ही तिन्हीं एकाच गोष्टीची नावें आहेत.’बायबलमध्ये म्हटले आहे तसे, देव कुणी वेगळा नाही. असे जाहीरपणे प्रकट केल्याबद्दल, थॉमस आयकनहेड नावाच्या वीस वर्षे वयाच्या तरुणाला अठराव्या शतकात मृत्युदंड दिला होता. देवाच्या नावाने धर्म काय करू शकतो, त्याची ही झलक!
१.
धर्मांच्या उदयामुळे मनुष्याचे कल्याण साधले का? धर्माने मनुष्याला नीतिमान बनवले का? धर्माने मनुष्याला दैववादी केले का? धर्माने मनुष्याला अंधश्रद्ध केले, कीं विवेकी केले? धर्मामुळे मनुष्यात समानता जोपासली गेली कीं विषमता? धर्मामुळे मनुष्याची प्रगती झाली की अधोगती? वास्तवात मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे का? सर्व भेद नष्ट करणारा एकच धर्म शक्य आहे का? ह्या पृथ्वीतलावर सुमारे ७५० कोटी मानवांसाठी एकच धर्म असू शकेल का? असा एक धर्म कोणता असेल? सर्व मानवांचे एक वैश्विक कुटुंब शक्य आहे का? अशा विविध प्रश्नांबाबत ऊहापोह आणि चर्चा करण्याचा मानस आहे. ह्याच्यात माझे असे काहीच नाही. मात्र अशी हमाली करण्यात समाधान लाभते, म्हणून हा प्रपंच.
२.
वास्तव काय आहे?
मानववस्ती करून राहात असलेल्या पृथ्वीचे वय ४५० कोटी वर्षांचे आहे. ह्या पृथ्वीवर ३८० कोटी वर्षांपूर्वी प्रथम जीव निर्माण झाले. साठ लाख वर्षांपूर्वी चिंपाझींची निर्मिती झाली, तर तीन लाख वर्षांपूर्वी अग्निचा शोध लागला. दोन लाख वर्षांपूर्वी होमो सेपिअन्स पूर्वआफ्रिकेत उत्क्रांत झाले. ७० हजार वर्षांपूर्वी होमो सेपिअन्स आफ्रिकेच्या बाहेर पडले. कल्पित भाषेची सुरुवात झाली. बारा हजार वर्षांपूर्वी कृषिविषयक शोध लागले. प्राणी माणसाळले, कायमस्वरूपी वस्त्या उदयास आल्या. पाच हजार वर्षांपूर्वी राज्यव्यवस्था, पैसे आणि धर्म अशा कल्पित व्यवस्था रुजल्या आणि विकसित झाल्या.
३.
धर्माचा इतिहास पाच ते सहा हजार वर्षांच्या अलीकडचा आहे. भूतलावर राहणाऱ्या असंख्य आणि विविध प्राण्यांप्रमाणेच मनुष्य एक प्राणी आहे, असा विचार जडप्राणवादी करत होते. तर, मनुष्य आणि देव ह्यांच्या संबधाचे प्रतिबिंब म्हणजे विश्व असा विचार देववादी करत होते. बायबलच्याच जुन्या करारानुसार देवानेच सहा हजार वर्षांपूर्वी जग निर्माण केले असे म्हणतात. देवानेच दिलेल्या त्या धर्माचे नाव यहुदी. ख्रिस्ती व मुस्लिम हे दोन्हीं धर्म त्याच यहुदी धर्मातून अनुक्रमे सुमारे अडीच हजार व दोन हजार वर्षांपूर्वी उत्क्रांत झाले. अब्राहम हा ह्या धर्माचा अधिपिता. हा इतिहास आहे. पारशी किंवा झोरोस्ट्रियन धर्माचा उदय इ.स.पू. पंधराशे ते इ.स.पू. एक हजार ह्या काळात झरत्रुष्ट नावाच्या प्रेषिताने केला. कालांतराने झोरोस्ट्रियन ह्या पर्शियन साम्राज्याचा तो अधिकृत धर्म बनला. भारतीय संस्कृतीत उदयास आलेला हिन्दू (धर्म की संस्कृती?) धर्म चार वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता आणि मनुस्मृती ह्या ग्रंथांवर आधारित आहेत.
ह्या ग्रंथांच्या आधारे असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवाने प्रथम जग निर्माण केले. त्यानंतर त्याने मनू निर्माण केला, त्यानंतर मानवजात, प्राणिमात्र व इतर सृष्टी निर्माण केली. मनू म्हणजे साक्षात् ब्रह्मदेवाचा पुत्र. ह्याउलट वेदांतील शिकवणीनुसार तप केल्यावर त्याच्यापासून पृथ्वी, वायू आणि आकाश ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर त्यांनी मनुष्याची उत्पत्ती केली. भारतीयांचे मत असे आहे की, जगातील सगळ्यात जुनी मानवी संस्कृती आमची आहे. वास्तवात चीनमधील कँन्फूशियस संस्कृती भारतीय संस्कृतीपेक्षा जुनी आहे. इजिप्शियन संस्कृती प्राचीन आहे. सर्वांत जुना दैवी (मानवी) कायदा हमुराबीचा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. हा हमुराबी इ. स. पू. २१२३ मध्ये गादीवर आला ४२ वर्षे राज्य करून इ.स.पू. २०८१ मध्ये वारला. इ. स. १९०२ मध्ये बाबीलोन येथे ऐतिहासिक शोधासाठी उत्खनन चालू होते. ह्या उत्खननात हमुराबीचा प्रसिद्ध कायदा कोरलेला प्राचीन स्तंभ सापडला. ह्या कायद्यात पुढीलप्रमाणे मजकूर आहे “मानवासाठी सूर्यदेवाने हा कायदा निर्माण केलेला आहे. सूर्यदेवाने हा कायदा हमुराबीच्या स्वाधीन केला. हमुराबी तो कायदा जाहीर करत आहे आणि सर्वांना लागूही करीत आहे. आमचा कायदा ईश्वरीय आहे म्हणून तो पवित्र आणि पूज्य असून शिवाय निर्दोष व अपरिवर्तनीय आहे” हा कायदा मनुष्यनिर्मित आहे. परंतु तो देवनिर्मित आहे अशी समजूत/धारणा/विश्वास देव मानणाऱ्या सर्व धर्मांत आहे.
४.
विज्ञानाने पुराव्यासह हे सिद्ध केले आहे कीं विश्वाची निर्मिती ‘बिग बॅंग’पासून (महास्फोट) झालेली आहे. ख्रिस्ती धर्माने हे तत्त्वतः स्वीकारले आहे आणि असे जाहीर केले आहे कीं, जुन्या करारातील उत्पत्तीचे वर्णन हे प्रतीकात्मक असून वास्तव नाही. ख्रिस्ती धर्म पुरोगामी आहे, हे त्याचेच उदाहरण आहे. मनुष्य ह्या पृथ्वीवर साठ हजार वर्षांपूर्वी उन्नत झाला आहे, हेही आता सर्वोतोपरी मान्य झाले आहे. सुमारे बारा हजार वर्षांपूर्वीच मानवाने शेतीचा शोध लावला, आणि शेतीच्या व्यवसायामुळे मानव नदीकाठावर वस्ती करून टोळी-टोळीने राहू लागला. तोपर्यंत देव किंवा धर्म ही कल्पनाच उदयास आली नव्हती. मग देव-धर्म कल्पना आलीच कुठून? कशी? आणि का?
५.
नदीकाठावर वसाहतीत राहू लागल्यावर आकाशातून पडणारा पाऊस, नदीला येणारे पूर, त्याच आकाशात नियमित होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त, आकाशात पावसाळ्यात चमकणारी वीज, अचानक होणारी वादळे, जन्म व मृत्यू ह्या घटना, ह्या सर्व बाबतीत तो अज्ञानी होता. अज्ञानामुळे कधी काय होईल ही भीती होतीच. मृत्यूनंतर काय? जमिनीत बी पुरल्यावर नवीन अंकुर येतो. त्याप्रमाणेच जमिनीत पुरलेली मृत व्यक्ती पुनरुत्थित होत असेल? अशा विविध व विचित्र कल्पना, आणि घडणाऱ्या घटना घडवून आणणारा कुणीतरी सर्वशक्तिमान असणार, अशी कल्पनाच मानवाने केली. आणि तिथेच देव जन्मास आला. अगदी सुरुवातीपासून बहुतेक संस्कृतीत सूर्याला देवत्व दिलेले दिसते. बहुतेक धर्मांतून निसर्गातल्या प्रक्रियेला देवत्व दिल्याचे दिसते. कालांतराने त्या कल्पनेचा विकास आणि विस्तार प्रत्येक संस्कृतीत होत राहिला. धर्म ही व्यवस्था त्याच सर्वशक्तिमान देवाच्याच नावाने मनुष्याने उदयास आणली आहे. धर्माचा कुठल्याच अलौकिक शक्तीशी संबंध नाही.
वास्तवात देव कल्पनेचा उदय होण्याअगोदरच, देवी कल्पनेचा उदय झाला होता. त्याचा आधार होता, वनस्पतीला जन्म देणारी भूमाता आणि मानवाला जन्म देणारी स्त्री. ह्या गृहीतानुसार विश्वाला जन्म देण्याऱ्या जगन्मातेची, जगदंबेची कल्पना प्राचीन मानवाला सुचली असावी. प्राचीन काळात सूर्य आणि पृथ्वीचे नाते नर-नारी समजले जात होते. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीच्या विकासामुळे देवी कल्पना मागे पडली आणि देव कल्पना स्थिरावली. सहा हजार वर्षांपूर्वी स्वर्ग, नरक व आत्मा अश्या काहीच कल्पना नव्हत्या. उपनिषदे, रामायण, महाभारत, जुना करार, आणि तत्सम पुराणे, व त्यांत वर्णन केलेले दैवी पुरुष, प्रजापती, ब्रह्मा, विष्णू, कृष्णा, मोझेस, अब्राहम, ही एक तर मिथके आहेत किंवा त्या-त्या वेळी निर्माण झालेले महापुरुष असतील. गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर, आदि महापुरुषांनी त्यांच्या शिकवणीने आणि आचरणाने मनुष्याला माणूस बनण्याचे धडे दिले. आज माणसांनी त्यांनाच देव बनवले. त्यांनी शिकवलेली तत्त्वे न पाळता-आचारता, देव म्हणून माणसे त्यांचीच पूजा करतात आणि कर्मकांड म्हणजेच धर्म समजतात. केवळ भव्य राम मंदिर बांधल्याने रामराज्य येईल ही भावना/विचार ही धर्माची शोकांतिकाच आहे. रामराज्य येण्याकरिता रामासारखा सत्तेचा त्याग करून (वनवासात न जाता) लोकांच्या प्रश्नांबाबत कर्म करणे म्हणजे रामाचा धर्म पाळणे आहे. आपल्याला आणि राज्यकर्त्यांना हे समजले आहे का? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
६.
“Religion is regarded by the common people as true, by the wise as false and by the rulers as useful.” – Seneca.
११ सप्टेंबर १८९३ ते २८ सप्टेंबर १८९३ ह्या काळात अमेरिकेत शिकागो शहरी, सर्वधर्मपरिषेद भरली होती. स्वामी विवेकानंद ह्यांना ह्या परिषदेत वक्ता म्हणून निमंत्रण नव्हते. बौद्धधर्म भारतात जन्म घेऊन सहजपणे अनेक देशांत पसरला. मात्र भारतातून तो नाहीसा झाला असा उल्लेख सर्व वक्त्यांच्या भाषणात होता. रोख अर्थात हिन्दू धर्मावर होता. सभेचे अध्यक्ष आल्फ्रेड मॉमरी ह्यांनी सर्वांची भाषणे संपलीत, आता तुम्ही बोला, अशी विवेकानंदांना विनंती केली. विवेकानंद म्हणले, “खरे तर मी वक्ता म्हणून बोलावयास हवे होते. कारण मी स्वत:ला बौद्ध समजतो! येशू ख्रिस्त आणि भगवान बुद्ध ह्यांनी नक्की काय केले, हे आपण लक्षात घ्यावयास हवे. ख्रिस्तांना यहुदी लोकांच्या धर्ममताची ‘ओल्ड टेस्टामेंट’ मधील अपूर्णता दूर करावयाची होती. त्याप्रमाणे बुद्धदेवही हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी आले नव्हते. हिंदू धर्मातील कालबाह्य तत्त्वे, रूढी आणि जातिव्यवस्था त्यांना नाहीशी करावयाची होती. जातिव्यवस्था म्हणजे काही जणांना विशेषाधिकार देणे आणि सर्वप्रकारचे विशेषाधिकार नाहीसे करणे हे नीतीचे म्हणजे सर्व धर्मांचे खरे काम आहे.”
७.
धर्म हे मोठ्या प्रमाणात समाजपरिवर्तनाचे साधन असायला हवे. परंतु आज धर्म समाजात भेदभाव निर्माण करून दुफळी निर्माण करीत आहेत. ही चिंतेची बाबच नाही तर धर्माची शोकांतिकाच आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, “ईश्वरकल्पना नुसती तर्कविसंगतच नाही तर अनीतीला कारणीभूत होणारी आहे. कारण माणसाला ती दुर्बल बनविते व बाहेरून मदतीची याचना करण्यास शिकविते.” तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी १९७२ मध्ये पॅरिसच्या प्राच्य विधापरिषदेत ‘The cosmic state and collective kingship of Vedic Gods’ हा निबंध सादर केला होता. त्यात सांगितले होते की, लौकिक जगामध्ये जशी राजाची सत्ता असते, तसा सृष्टीमध्ये देव एक राजा असतो आणि त्याची सत्ता असते.’
८.
वरील सर्व विचारांचे सार, माणसाने माणसाशी नीतीने व प्रेमाने वागावे. नीतिमान माणूस धार्मिक नसेल मात्र धार्मिक माणूस नीतिमान असेलच असे नाही. धर्माचा उदय मानव नीतिमान व्हावा ह्या हेतूनेच आणि उद्देशानेच झाला आहे. असेच सर्व धर्म संप्रदाय सांगत असतात. म्हणजेच धर्म हे मानवाला नीतिमान करण्याचेच साधन आहे, असेच सर्व धर्म कबूल करतात. मग एवढे धर्म असून मानव नीतिमान का नाही झाला? कारण ह्या सर्व धर्मांत जरी नीतितत्त्वे असली तरी प्रत्येक धर्माचे कर्मकांडांचे नियम आहेत व हे नियम दोन धर्मांत भेदभाव आणि फरक निर्माण करतात. तत्त्व मागे पडते आणि कर्मकांडांत सण आणि उत्सव साजरे होतात. धर्माचे मूळ आधारतत्त्व हवे, जसे ख्रिस्ती धर्माचे तत्त्व प्रेम आणि सेवा आहे, मुस्लिम धर्माचे तत्त्व समता आहे, भारतीय संस्कृतीचे तत्त्व सहिष्णुता आहे. तत्त्वाला नियमाचे बंधन नसावे. माणसाचे ‘सत्व’ कशात आहे? विवेक हेच माणसाचे ‘सत्व’ असले पाहिजे. आध्यात्मिक असणे म्हणजे न्याय-अन्याय ह्यांमधे फरक करण्याची शक्ती म्हणजेच विवेक. जागतिक कीर्तीचे लेखक युवाल नोहा हरारी म्हणतात, “धर्म एक सौदा, तर अध्यात्म एक प्रवास आहे.” “धर्मसत्तेचे उद्दिष्ट सत्यदर्शन नसून आज्ञापालनाची सक्ती आहे”, असे बेनिडिक्टर स्पिनोझा सांगत असे. धर्मभावना मंदिरात, देवळात प्रकट होते, व्यवहारात तिची आवश्यकता मानली जात नाही. ही फार मोठी आणि गंभीर चूक आहे. अशाच अनेक कारणांमुळेच आजपर्यंत खरा धर्म बनला नाही. धर्म जेव्हा विज्ञानाच्या भूमिकेत येईल तेव्हाच खरा धर्म बनेल. आणि उपासनेसकट सगळे भेदभाव काढून टाकणारा मानवतावादी धर्म ह्यापुढे टिकेल. असा विश्वधर्म कधी होईल?
९.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वधर्माविषयी पुढीलप्रमाणे भाष्य करतात. “माझ्या मते समस्त विश्व नैसर्गिक नियमांनी बांधलेले आहे व त्यातील प्रत्येक वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आणि मूल्य आहे. सर्व वस्तुमात्रांत श्रेष्ठ असलेल्या सर्वांचाच योग्य आदर व उपयोग करून, निसर्गनियमांचे सर्वांपेक्षा अधिक उत्तम पालन केले पाहिजे. पृथ्वितलावर स्वत:ला ज्या तऱ्हेने जगावेसे वाटते तसे जीवन इतरांना जगू देण्याची काळजी घेणे हेच निसर्गत: मानवाच्या हिताचे आहे. जेव्हा सर्व मानव ह्या नियमाचा आदर करतील तेव्हा सर्वांचेच जीवन सुखमय होईल, मग ते कोणत्याही देशधर्माचे असोत. विश्वाला एका कुटुंबात सुखासमाधानाच्या कक्षेतून गोवण्याला ही विचारधारा आचरणात आणणे आवश्यक आहे.” हे भाष्य तुकडोजी महाराजांनी जपानमध्ये भरलेल्या विश्वधर्म परिषदेत केले होते. ह्याच परिषदेत १८ राष्ट्रांनी तुकडोजी महाराजांना त्यांचे सल्लागार म्हणून निवडले होते.
१०
५ डिसेंबर १९५६ मध्ये दिल्लीत विज्ञानभवनात आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को परिषदेत अनेक राष्ट्रप्रमुखांसमोर, परिषदेचे अध्यक्ष तत्कालीन लोकसभाध्यक्ष अय्यंगार व उद्घाटक पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, ह्यांच्या उपस्थितीत ‘वसुधैव कुटुंबकम्’ ह्या संकल्पनेविषयी विचार व्यक्त करताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढीलप्रमाणे व्यक्त होतात. ते म्हणाले, “देशातील नेतेच एकत्र येत नाहीत तर इतर समाज कसा येणार? राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये ऐक्य कसे निर्माण होणार? प्रत्येक जण विश्वव्यापी बोलतो, पण प्रत्येकाचा सवता-सुभा अलग! अशाने कसे व्हायचे? मी कोणत्याही जाती, धर्माचा व पंथाचा नाही. मी मानवता हाच माझा धर्म मानतो. आज जगाची अवस्था अत्यंत विस्फोटक आहे. विचारवंत आज घाबरलेल्या मन:स्थितीत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा देखावा करण्यात येत असला, तरी मुळात राष्ट्रे एक दिलाने एकमेकांच्या साहाय्यार्थ संघटित झाली नाहीत असे वाटते. तेव्हा सर्वांनी मिळून जगातील समस्या सोडविण्यासाठी एक दिलाने आणि एक मनाने कर्म करणे आवश्यक आहे. जगाला प्रत्येकाने आपले कुटुंब मानले तर जगात शांती प्रस्थापित होऊ शकते.” आज साठवर्षांपेक्षा जास्त काळ निघून गेला आहे. परंतु परिस्थिती सुधारण्याऐवजी जास्त विस्फोटक झाल्याचे आपण अनुभवत आहोत.
११.
पृथ्वितलावर सर्व मानवजातीचे एक कुटुंब होण्यासाठी सर्व माणसांनी, आपण जरी विविध धर्माचे आणि वेगवेगळ्या देशात राहत असलो, व भिन्न संस्कृतीत वाढलो असलो तरी, आपण सर्व एकाच उत्क्रांतीतून उपजलो आहोत, हे समजून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत ह्या विचाराचे किंवा भावनेचे किंवा धारणेचे व्यवस्थित आकलन प्रत्येक व्यक्तीस होत नाही, तोपर्यंत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर माणूस म्हणून प्रेम करणार नाही/विश्वास ठेवणार नाही. माणसा-माणसांत आत्मभाव निर्माण झाल्याशिवाय कुणी कुणावर उगाच प्रेम करणार नाही. प्रत्येक माणसाने ह्या भावनेचे/विचाराचे पालन केले आणि जगालाच आपले कुटुंब मानले तर जगात शांती-सलोखा प्रस्थापित होऊ शकेल. माणसात हा विचार, ही भावना जशीजशी विकसित होईल, तशीतशी माणसातील जवळीक वाढेल, पर्यायाने ती मंडळी एकत्र येण्यास वाव मिळेल. नेतेमंडळी, धार्मिक असो, राजकीय असो, एकत्र आली तर अनुयायी आपसूकच एकत्र येतील. प्रेम व निरागसपणा उपजत असतो, तर द्वेष स्वार्थी वृतीने शिकवला (cultivate) जातो. सर्व मानवतेचा कल्याणकारी विचार आणि तो कल्याणकारी विचार अंमलात आणण्याकरिता परस्परविश्वास आणि प्रेम निर्माण होणे गरजेचे आहे व द्वेष टाळणे आवश्यक आहे. असे होणे सोपे अजिबात नाही, पण अशक्य मुळीच नाही. कारण प्रेमात आणि विचारात जी शक्ती आहे ती दुसऱ्या कशातही नाही.
१२.
निःशस्त्रीकरण आणि शांतताप्रिय सहअस्तित्वाचा विचार साठ वर्षांपूर्वीच युनोमध्ये मांडण्यात आला होता. परंतु असा विचार मांडणाऱ्या राष्ट्रांनीही गेल्या साठ वर्षांत त्याबाबत काहीच केले नाही. विश्वबंधुत्व/वसुधैव कुटुंबकम्/जागतिक मानवपरिवार हा विचार मांडला जातोय, पण पुढे जात नाही. कारण मानवी विचारसरणीतील संकुचित वृत्ती. जोपर्यंत ही संकुचित वृती लयास जात नाही, आणि सर्वात्मक विशाल वृत्ती विकसित होत नाही, किंवा माणूस विवेकी विचार करत नाही, तोपर्यंत विश्वबंधुत्व किंवा जागतिक कुटुंब हे दिवास्वप्नच ठरेल. ‘मी’ व ‘आम्हीं’ नाही तर ‘आपण’ ह्या पृथ्वितलावरील सर्व मानव, उत्क्रांतीतून विकसित झालेल्या एकाच झाडाच्या विविध फांद्या असून, निरनिराळ्या खंडात विकसित झालेल्या वसाहतीचे घटक आहोत, ही धारणा आणि भावना स्वीकारली तर विश्वकुटुंब नक्कीच साकरता येईल. मी विश्वाचा घटक आहे आणि विश्व माझे आहे, अशी श्रद्धा प्रत्येक माणसात निर्माण होऊन रूजणे ह्यासाठीच आवश्यक आहे.
आधुनिक भारतीय शास्त्रज्ञ मनी भौमिक, आपल्या ‘कोड नेम गॉड’ ह्या पुस्तकात असे अनुमान काढतात की, हा परमेश्वर म्हणजेच एक सर्वव्यापी असलेले वैश्विक जागरूक मन! ते विश्वात सर्व भरून राहिलेले आहे. जॉन व्हीलर ह्या शास्त्रज्ञाच्या मते, माणसाची जागृत विवेकबुद्धी म्हणजेच परमेश्वर! देव, धर्म, देश, संस्कृती व परंपरा ह्या जंजाळात गुंतलेला माणूस हृदयातील ईश्वर (विवेकी विचार/consciousness) हरवल्यासारखा वागत आहे, वर्तणूक करत आहे. आपल्याचमध्ये असणारा हा ईश्वर जर प्रत्येक माणसाने जागृत केला तर, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ह्या विचाराला/ धारणेला/भावनेला चालना मिळू शकते, असे मी समजतो.
१३.
आज संपूर्ण जग आध्यात्मिक पेचप्रसंग अनुभवत आहे. मनुष्याचे मन सैरभैर झालेले आहे. खरे सुख, समाधान आणि शांती ह्यापासून दूर जात तो आभासी आनंद व सुख ह्यांचा पाठलाग करत आहे. आनंद प्रासंगिक असतो, तर सुख-समाधान चिरकाल असू शकते. आणि ह्या दोन्हीं बाबी पुन्हा मानसिक आहेत, हे ध्यानात ठेवणे अगत्याचे आहे.
१४.
वरील सर्व मांडणीचे अवलोकन करता प्राप्त परिस्थितीत काय करता येईल, असा विचार करताना काही दशकांपूर्वी विनोबा भावे ह्यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ यथोचित वाटला, तो पुढीलप्रमाणे:
“आज मानव अशाप्रकारे गांगरला आहे. त्याची हिंसेची श्रद्धा तुटून पडली आहे आणि अहिंसेवर श्रद्धा बसली नाही. जेव्हा त्याची हिंसेवर दृढ श्रद्धा होती तेव्हा माणसाला काही तरी आशा होती. कारण, ती एक श्रद्धा होती आणि ती दृढ होती, म्हणून काहीतरी परिणाम निघत होता. आता हिंसेवर श्रद्धा राहिली नाही. जगात कुणाचीच राहिली नाही. तरीही माणूस शस्त्रास्त्रे वाढवीत आहे. ही एक फार मोठी समस्या आहे. आज आम्हाला पाकिस्तानचे भय आहे, व पाकिस्तानला आमचे भय आहे. आमचे नियोजन हे आमचे राहिलेले नाही.
पाकिस्तान आमचे नियोजन करते आहे. सैन्यावर आम्हीं किती खर्च करावा हे पाकिस्तान ठरवीत आहे. पाकिस्तान म्हणतो की हिंदुस्थानजवळ मोठे सैन्य आहे म्हणून आम्हांला ठेवले पाहिजे. म्हणजे पुढाकार त्यांचाही नाही. जगाची ही जी कोंडी झाली आहे, ती फोडली पाहिजे. हा कुजलेला, सडलेला डाव आहे. गांधीजींच्या निधनानंतर अनेकांनी स्तुतिपर उद्गार काढले, त्यांत ‘मॅक्आर्थर’चे शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तो एक मोठा सेनापती होता. तो म्हणाला, “गांधीजी जे शिकवत होते ते अंमलात आणल्याशिवाय जगाची सुटका नाही. हिंसेवर श्रद्धा राहिली नाही व अहिंसेवर बसली नाही, अशा परिस्थितीत जगाचे नेतृत्व कोण करणार? ज्याची बुद्धी शाबूत राहील तोच नेता होणार. ह्या विज्ञानयुगात जर आपण संकुचित बुद्धी ठेवली, तर जगाचे काही शिल्लकच राहणार नाही हे नक्की आहे.”
१५.
गुरुवर्य रवींद्रनाथ ठाकूर म्हणायचे की लोक ‘वंदे मातरम्’ म्हणतात, पण ‘वंदे भ्रातरम्’ म्हणत नाहीत. पृथ्वीला आपण मानव ‘धरतीमाता’ संबोधतो. त्याचवेळी राष्ट्रा-राष्ट्रांत तिची विभागणी करतो. हे बरोबर आहे का? भाऊ-भाऊ आपसात भांडतील तर आईला बरे वाटेल काय? उत्तर नाही असेल, तर आपण भावाभावांनी प्रेमाने राहायला हवे. श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, पैगंबर, व इतरही सर्व महात्म्यांची शिकवण, मानवाने आपसात लढाई न करता, परस्परांवर प्रेम करून ह्या पृथ्वीचे वतनदार व्हावे आणि येथेच स्वर्गीय राज्य निर्माण करावे, हेच शिकविते. त्यानंतर आलेल्या ज्ञानेश्वर माउली, संत फ्रान्सिस ऑफ असेसी, मार्टिन लुथर, स्वामी विवेकानंद, व महात्मा गांधी, या सर्वांनीसुध्दा तीच शिकवण अनुसरून, मनुष्याला माणूस करण्यासाठी जीवन अर्पित केले आहे. आपण सर्व ह्या महात्म्यांचा गौरव करतो, पूजा करतो, अभिमान बाळगतो पण ती शिकवण अंगीकारण्यात कमी पडतो. एका विचारवंताच्या मते, ‘आपण एकमेकांचा द्वेष करावा इतके धर्माचे अस्तित्व नक्कीच आहे, पण इतके प्रबळ नाही की आपण एकमेकांवर प्रेम करावे.’ प्रत्येक माणसाने प्रेमाने जगायचे ठरवले, आणि तसे वागले तर ह्या पृथ्वीवर सुराज्य येईल. ह्या बाबतीत म. गांधी म्हणतात, ‘Swarajya is not rule of self, but rule on the self.’ जग बदलण्याची सुरुवात स्वत:पासून हवी. विनोबा भावे सांगतात, “जय महाराष्ट्र नाही, जय हिंद नाही, तर ‘जय जगत’ ही भावना हवी.”
आगीचे उत्तर आग नव्हे तर पाणी आहे, म्हणूनच द्वेषाचे उत्तर प्रेमाने देणे ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची पहिली पायरी असू शकते. ‘Hate cannot drive out hate, only love can do that’. ‘Darkness cannot drive out darkness, only light can do that’ said, Martin Luther King Jr. ही पृथ्वी, ही वसुंधरा आपली नाही; तर आपण पृथ्वीचे आहोत, कारण आपली उत्पत्ती पृथ्वीमुळे झाली आहे, हे ध्यानात ठेवा. वास्तवात इतर प्राण्यांप्रमाणेच मानव प्रजातीही पृथ्वीची उत्पत्ती आहे. म्हणजेच आपण सर्व मानव ह्या भूमातेचे सुपुत्र आहोत. ह्या मनुष्याने स्वार्थासाठी आपल्याच मातेची विभागणी/वाटणी केली आहे. आपल्या बुद्धीचा, अकलेचा व मुत्सद्दीपणाचा स्वार्थी वृतीने वापर करून मनुष्य धरतीमातेची वाटणी/विभागणी करत आहे. ही पृथ्वीची विटंबना आहे. जगातील सर्व देश कुठल्याच एका संस्कृतीने, धर्माने किंवा विचाराने कधीच एकत्र आले नव्हते, तेवढे करोनासारख्या एका महामारीने एकत्र बांधले होते. हा अनुभव जमेस धरून मानवतेच्या रक्षणार्थ म्हणजेच जागतिक शांततेसाठी, सर्व राजकीय व धार्मिक जागतिक नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे/संवाद करणे आवश्यक आहे. संघर्षाचे मूळ वर्चस्व गाजविण्याच्या प्रवृत्तीमध्ये आहे, ते टाळले पाहिजे. विश्व शांतीने चालणे, हेच मानवाच्या पूर्णत्वाचे लक्षण होऊ शकते. माणूस आज कधी नव्हता, इतका शक्तिमान झालेला आहे. पण जगातील मनुष्याचे दु:ख कमी झाले आहे का? आपण मानव/मनुष्य/माणूस म्हणून कुठले ध्येय घेऊन पुढील वाटचाल करणार?
१६.
कृषिक्रांती, राजेशाही, धर्मव्यवस्था, धर्मचिकित्सा, औद्योगिक क्रांती, राष्ट्रवाद, हुकूमशाही, लोकशाही, साम्यवाद, भांडवलशाही, संगणक क्रांती, आणि इंटरनेट क्रांती, हे एकामागोमाग मानवाच्या उत्क्रांतीतून आलेले टप्पे आहेत. कृषिविषयक क्रांतीमुळे देव-धर्माची सुरुवात झाली, तर वैज्ञानिक क्रांतीमुळे मानव/माणूसकेंद्रित धर्माची सुरुवात होते आहे. मानवतेनुसार माणसाने त्याच्या आतल्या अनुभवांतून केवळ स्वत:च्याच जीवनाचा अर्थ जाणून घ्यावा असे नाही, तर संपूर्ण विश्वाचा अर्थ जाणून घ्यावा अशीच अपेक्षा आहे. मरणाला अर्थ प्राप्त होण्यासाठी जीवनाचा अर्थ समजून घेणे अगत्याचे आहे. विश्वशांतीसाठी आत्मशांती असणे आवश्यक आहे. तेच मानवता धर्माचे अंतिम ध्येय असेल.
संपर्क : 9673881982
आज-काल कोणताही राष्ट्राच्या शासनाला पाहिजे तसे निर्णय घेण्याची अधिसत्ता म्हणजे sovereignty बरीच कमी झाली आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची बंधने तुमच्या कस्टम ड्युटीवर किंवा निर्यात पूर्व अनुदानावर आली आहेत. आपल्या देशातील उद्योग, उद्योगपती आणि भांडवल अन्य देशांमध्ये पळून जाण्याच्या भीतीमुळे आपल्या कररचनेवर देखील बंधने आली आहेत. बरेच वस्तू निर्मिती उद्योग देखील अनेक देशातील पुरवठा साखळीवर अवलंबून असतात. त्यामध्ये आपण सामील झालो नाही तर आपल्या आयात निर्यातीवर आपोआपच खूप बंधने येतात. आणि आता येऊ घातलेल्या वातावरण बदलाच्या संकटामुळे सर्व देशांनी याबाबतीत सहकार्य नाही केले तर मनुष्य जातच नष्ट होण्याचे संकट दिसत आहे. माझे घर असलेली पृथ्वी जळून जाऊ नये म्हणून सर्व देशांना प्रयत्न करणे आवश्यकच आहे.
अतुलजी, खरे तर आपल्या देशातिल सनातन हिंदू परंपरा वसुधैवकुटु़बम या स़कल्पनेशी मिळती, जुळतीच आहे़. आपल्या देशात बाहेरून आलेले इस्लाम धर्मिय आणि ख्रिश्चन गेली शेकडो, हजारो वर्ष सुखेनैव नांदत आहेत याचे कारण हि़दु़ची सहिष्णुता हेच आहे. जगा आणि जगूद्या ही हिंंदु़ंची मानसिकता आहे. याच्या विपरीत वागणुक देशा बाहेरून आलेल्या इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मियांची आहे. या दोन्ही धर्मियांनी गरीब, अडचणीत असलेल्या, तसेच आदीवासिंचे धर्मांतर करण्याचा सपाटा लावला. इस्लाम धर्मिय तर हिंदुस्थानला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे रचत आहेत. जगातिल अनेक देश विस्तारवादी आहेत. त्या साठी ते शस्त्रास्त्र निर्मिती करत आहेत. परिणामी आपल्या देशालाही स्वसंरक्षणार्थ शस्त्रास्त्र निर्मितीवर खर्च करावा लागत आहे. वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना खरे तर सनातन हिंदुधर्मियांचीच आहे. पण जगातिल बहुतांश देशांच्या विपरित मानसिकतेमुळे ती सत्यात उतरणे शक्य नाही.