वन्यजीव आणि शेतीप्रश्न 

आपल्या महाराष्ट्र राज्यात मागच्या पाच-सात वर्षांमध्ये वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये होणाऱ्या नुकसानाचा संघर्ष तीव्र झालेला पाहायला मिळतो आहे. गावकट्ट्यावर रोजच “आज अमुक एका शेतकऱ्याचे नुकसान झाले” असे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळते. वन्यजीवामुळे झालेल्या नुकसानाच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या गावामधील प्रत्येकच शेतकऱ्याच्या आहेत. मी ज्या गावात राहतो त्या गावची एक अल्पभूधारक शेतकरी महिला आहे. ती एकल महिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात काकाचे निधन झाले. आणि फक्त दोन एकर शेतीच्या भरवशावर ती तीन मुलांचा सांभाळ करत आहे. एके दिवशी शेतीत झालेले नुकसान पाहून ती घरी आली आणि मोठा आकांत करून रडायला लागली. दोन एकर शेतीमध्ये सोयाबीन पेरला होता. त्यातला अर्धा एक एकर उगवलेला सोयाबीन डुक्कर आणि नीलगायींनी खाल्ला होता.

दुसरे उदाहरण, गावातले एक किशोर भाऊ आहेत. त्यांनी तीन एकरांवर संत्र्याची लागवड केली. वर्षभर रात्र-रात्र जागरण करून संत्र्याची रोपे जगवली होती. ह्यावर्षी एके रात्री मोठा पाऊस आला आणि त्यामुळे शेतात राखण करायला जाणे झाले नाही. नेमकी ही संधी साधून नीलगायींचा मोठा कळप शेतात घुसला आणि फांद्यांसकट संत्र्याची रोपे खाल्ली. किशोर भाऊने कर्ज काढून लावलेली ही रोपे आता पूर्ण वाया गेली आहेत. किशोर भाऊने शेवटी निराश होऊन शेती विकायला काढली आहे. 

शासन एकीकडे फळबागाची लागवड करा म्हणते पण शेतीत झालेले पिकांचे नुकसान – त्याची भरपाई काही शेतकऱ्यांना व्यवस्थित देत नाही. शासनाने काही वर्षांपूर्वी ‘जलयुक्त शिवार’ योजना काढली होती. तशीच, मागेल त्याला शेतकुंपण, अर्थात् ‘कुंपणयुक्त शिवार’ योजना काढायला पाहिजे, असे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे. हा लेख लिहिण्याआधी मी फील्डवर जाऊन पिंजर गाव परिसरातल्या निवडक शेतकऱ्यांच्या शेतीची परिस्थिती पाहिली. या भागात  प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात राखणीसाठी तयार केलेल्या खोपड्याच खोपड्या दिसल्या. 

पुढे पिंजर गावाला राहणारा रिझवान शेख नावाचा शेतकरी मला शेतात भेटला. आमच्या चर्चेच्या ओघात रिझवान भाई म्हणाला “पीक लहान असताना ते खाल्ले किंवा करपले तर फार काही वाटत नाही, परंतु ते पीक मोठे होऊन पिकामध्ये बिया भरल्यानतंर जेव्हा वन्यप्राणी ते पीक खातात, तेव्हा खूप दुःख होते आणि कमालीची निराशा येते. आम्ही त्या पिकाला पोटाच्या मुलासारखे वाढवलेले असते हो.” पुढे रिझवान भाई म्हणाले, “आजच्या परिस्थितीला बायका-मुलांसाठी घर बांधणे महत्त्वाचे नाही. वन्यप्राण्यांपासून शेती वाचवण्यासाठी पहिले शेतात खोपडी बांधावी लागते.” अशी परिस्थिती वन्यप्राण्यांमुळे सध्या निर्माण झाली आहे. रिझवानसारख्या अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीच्या गोष्टी आपल्याला येत्या काळात ऐकायला मिळतील. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानाच्या प्रश्नावर सरकार, आणि वनविभाग ज्या पद्धतीने दुर्लक्ष करत आहेत त्यातून उघड होते की, त्यांना मानव समाजात अन्न उत्पादन करून पूर्ण जगाला पोषण देणाऱ्या ह्या महत्त्वाच्या घटकाच्या हिताची कदर नाही. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात, “अन्नसाखळीच्या शिखराला असणारे शिकारी प्राणी-पक्षी गेल्या अर्धशतकात मोठ्या प्रमाणात दुर्मिळ होत चालले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रात माकड, काळवीट, हत्ती, नीलगाय आणि डुकरांमुळे शेतकऱ्याच्या नुकसानीच्या घटना होत आहेत”. त्यामुळे नीलगाय आणि डुकरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक मोठ्या तज्ज्ञ लोकांकडून त्यांच्या शिकारीसाठीचे समर्थन केले जात आहे.

तिसरी महत्त्वाची गोष्ट; वनविभागाने जंगल संरक्षणाच्या नावाखाली पश्चिम वऱ्हाडातले मोठे कुरणक्षेत्र ताब्यात घेतले. तिथे साग लागवडलेली. साग, गुलमोहर, शिसमसारखी झाडे प्राण्यांच्या खाण्यायोग्य नाहीत. पर्याय म्हणून वन्यप्राणी गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसत आहेत. नव्या सरकारने वन्यजीवांमुळे होणाऱ्या येत्या काळातला हा मोठा संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी त्वरित करायला पाहिजे.

अक्षरभूमी शाळा, झेप संस्था

अभिप्राय 3

  • खूप छान आहे , साध्यःच्य या गोष्टी कडे शाशनाचे लक्ष नाही , आणि शेतकऱ्यांची आधीच खूप होत असलेली अवहेलना सुरूच राहणार. तरुण शेतकर्यांनी संघटीत होऊन प्रश्न सोडवायला हवे . तुझ्या प्रयत्नांना यश येवो .

  • प्राणी असलेल्या जंगलाचे व्यवस्थापन करताना जंगलाच्या काही भागांमध्ये मुद्दामहून जंगल तोडून किंवा जाळून तेथे गवत वाढू द्यावे लागते. म्हणजे मग त्यावर शाकाहारी प्राणी वाढतात आणि मग त्यांच्या शिकारीवर जगणारे मांसाहारी प्राणी पण जगू शकतात. पण सर्वच जंगलभर मोठी झाडे आली तर शाकाहारी प्राण्यांचे प्राण्यांची वाढ होऊ शकत नाही आणि मग मांसाहारी प्राणी पण जंगलाबाहेर येऊन शिकार करू लागतात आणि शाकाहारी प्राणी पण माणसांच्या शेतीवर चरू लागतात. त्याशिवाय कोणत्याही जंगलामध्ये किती प्राणी राहू शकतात याची कमाल मर्यादा गाठल्यानंतर सर्वच प्राणी बाहेर येऊ लागतात. त्यामुळे त्यांची शिकार करणे हे आवश्यक काम आहे. गेली निदान 50 हजार वर्षे माणूस हा टॉप प्रेडेटर सर्वोच्च शिकारी म्हणून काम करत आहे. त्याने एकदम आपले काम सोडून दिल्यास या सर्वच वनस्पती आणि प्राणी सृष्टी मधील समतोल नष्ट होतो.

  • साहेबरावजी, आपण उपस्थित केलेला मुद्दा जरी वास्तव असला तरी तो गेल्या दहा वर्षात उद्भवलेला नाही. आज माझे वय चौय्राएंशी आहे. मला आठवते मी दहा एक वर्षांचा असताना एकोणिसशे साठच्या दशकात माझ्या गांवा नजिकच्या जंगलात कोळसा करण्यासाठी अतोनात जंगल तोड झालेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आमच्या घराच्या अंगणातून पटेरी ढाण्यावाघ जाताना पाहिलेला आहे. कांग्रेस सरकारच्या काळात वृक्षारोपण कार्यक्रम राबवले गेले आहेत. पण सार्वत्रिक भ्रष्टाचारामुळे नोकरशहांनी झाडाच्या फांद्या जमिनीत रोवून त्याचे फाटो काढल्याची वृत्त प्रकाशित झालेली कदाचित आपणास आठवतिल.
    दुष्काळ आणि अतिवृष्टीची समस्या तशी इतिहास काळापासूनच आहे आपल्या देशात. विद्यमान सरकार आपल्यापरीने शेतकय्रांना मदत करतच असते. उलट भ्रष्टाचारी नोकरशहांवर विश्वास नसल्याने मोदीजिंनी ती मदत परस्पर शेतकय्रांच्या खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली आहे.(सरकार बदलले तरी नोकरशहा तेच असतात. त्यामुळे पूर्विइतक्या नसल्या तरी भ्रष्टाचाराची प्रकरणं मधून मधून उद्भवतच असतात.) पर्यावरण रक्षणासाठी विद्यमान सरकारने राबवलेल्या योजनांमुळे वाघांची संख्या वाढत आहे. पण ज़ंगलं वाढायला आवधी लागणारच. का़ंग्रेस सरकारच्या काळात वृक्षारोपणाच्या नांवाखाली गुलमोहर आणि निलगिरीच्या झाडांची लागवड केली गेलीत, जी पर्यावरणाला मारक असतात. श्री. सुभाष आठले यांनी सुचवलेला उपाय अमलात आणला तर वन्य जीवांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.