लोकशाहीच्या जिवावर बेतले होते तेव्हा

२०२४ च्या जानेवारी महिन्यात एका दुपारी आमच्याच आसपास राहणारे पांढरपेशे स्त्री-पुरुष भगवे नेसून एखाद्या टोळीसारखे अक्षता वाटत दारात येऊन उभे राहिले. त्यांनी देऊ केलेल्या अक्षता नाकारायची इच्छा असूनही मी हात पुढे केला तेव्हा, मला स्वतःचीच शरम वाटली. ते दारावर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’चे स्टिकर चिकटवून, झेंडा देऊन निघून गेले. त्या अक्षता टाकून देताना, ते स्टीकर खरवडताना आणि झेंडा गुंडाळून अडगळीत टाकताना हात थरथरत होते. ‘उद्या हे लोक आपल्याला वाळीत तर टाकणार नाहीत ना?’ याची विशेष फिकीर नव्हती, कारण ते आधीच झाले होते. पाचसात व्हॉट्सॲप ग्रुप्सवर चालणारे मोदीसहस्रनामपठण असह्य होऊन तिथून एक्झिट घेतली होतीच. भीती होती ती हल्ल्याची. येता-जाता कोणी आपल्याला हनुमानचालिसा म्हणायला लावेल आणि नाही आला तर मारहाण करील अशी भीतीही वाटून गेली. रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी ही तारीखही अशी निवडली होती की हळूहळू प्रजासत्ताक दिनाऐवजी ‘प्राणप्रतिष्ठा दिना’ची सुट्टी जाहीर होते की काय अशी भीती वाटायला लागली होती. मी तर माझ्या एका कट्टर, हिंदू सभासद-प्रबळ ग्रुपवर ‘हे असेच चालू राहिले तर लवकरच आपल्या घरातल्या स्त्रिया घुंघट घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडल्यास त्यांना शिक्षा करण्यासाठी, हातात लाठ्या घेतलेले तथाकथित संस्कृतिरक्षक गुंड गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरताना दिसतील’ असे विधान केले तर, त्याबद्दल पुष्कळच गदारोळ झाला. माझ्या उपरोल्लिखित भित्या कोणाला कदाचित हास्यास्पद वाटतील, पण त्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी माझ्या दोघा मुस्लिम सहकाऱ्यांनी ‘प्रकृतीचे कारण’ सांगून रजा घेतल्या खऱ्या. त्यांनी नंतर खाजगीत कबूल केले की दंगली होतील किंवा काहीतरी त्रास दिला जाईल ही भीती त्यांना त्यादिवशी वाटत होती. जन्माने हिंदू असलेल्या मला जर एवढी भीती वाटली तर अन्यधर्मियांना काय वाटत असेल ‘राम’ जाणे!

हे दहशतीचे पर्व फक्त जानेवारी २०२४ पुरते मर्यादित नाही, तर गेली दहा वर्षे चालू आहे. २०१४ च्या सत्तापालटाद्वारे एका विद्वान अर्थतज्ज्ञाला नाकारून भारतीय जनतेने आपल्या पायावर जो धोंडा मारून घेतला होता तो किती मोठा होता याची कल्पना करणेसुद्धा अशक्य आहे. त्यात धादांत खोटेपणा आणि डोळ्यात धूळफेक करून जनतेची दिशाभूल करण्याचा मक्ता घेतलेली प्रसारमाध्यमे तगली आणि बाकीच्यांना गळचेपी करून आयुष्यातून उठवून देशोधडीला लावले. विरोधकांना नुसत्या पोकळ धमक्याच नाही, तर खून करून वाटेतून बाजूला केले गेले किंवा ‘अर्बन नक्षलचा’ शिक्का मारून अमानुष अवस्थेत तुरुंगात डांबून ठेवले. हे सगळे बघून ‘मला इथे असुरक्षित वाटते’ असे म्हणणाऱ्यांना पाकिस्तानला पाठवण्याचा हक्क सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी स्वतःला प्राप्त करून घेतला होता. ई.डी., सी.बी.आय., निवडणूक आयोग यांना घरगडी बनवले. इतकेच नाही, तर न्यायसंस्थेलाही धाकात ठेवून ‘नरो वा कुंजरो वा’चा जप करण्यास भाग पाडले. भारतात फॅसिझम बेफाम उधळलेल्या पशूप्रमाणे समोर येईल ते पायदळी तुडवत निघाले होते. आपले राजकीय आदर्श पुतीन यांच्याप्रमाणे आपणही आजन्म (निदान २०४७ पर्यन्ततरी) या देशावर सार्वभौम सत्ता गाजवावी अशी महत्त्वाकांक्षा मोदीजींच्या मनात उद्भवली.

हे सगळे चालू असताना एक फार मोठी खंत ही होती की आजवर ज्यांना सुशिक्षित आणि विचारी समजत होतो त्यातले बहुसंख्य लोक या विकृत विचारसरणीचे समर्थक निघाले. मनुवाद, हिटलरशाही, वर्णद्वेष, धर्मद्वेष, जात-पात, विकृत देशप्रेम हे सगळे रोग पुन्हा एकदा उफाळून वर आले आणि ते संस्कृतीच्या नावाखाली वणव्यासारखे पसरले. दशकानुदशकांची मैत्री किंवा नातेसंबंध ‘मोदी समर्थक की मोदी विरोधक?’ या एका निकषावर तुटून त्यांचे तुकडे झाले. भारताची एका निधर्मी-लोकशाही राष्ट्राची प्रतिमा प्रचंड प्रमाणावर डागाळली आणि या सगळ्याला तथाकथित सुशिक्षित वर्ग टाळ्या पिटून प्रोत्साहन देत होता. भा.ज.पा.ने ट्रॉलिंग हा किळसावाणा प्रकार व्यावसायिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणात वापरला. त्यामुळे किती ‘विरोधकांचे’ मानसिक खच्चीकरण झाले असेल आणि कितींनी राजकारणच काय हे जग सोडले असेल कोण जाणे! 

या अंधाऱ्या रात्रीचा निदान आपल्या आयुष्याततरी शेवट होणार नाही ही खात्री पटू लागली असतानाच एक आशेचा किरण दिसू लागला. तो म्हणजे २०२४ सालच्या लोकसभा निवडणुका. त्याही किती प्रमाणात पारदर्शक होतील याबद्दल शंका असली, तरी निदान झाल्या हेही नसे थोडके. कदाचित निवडणूक आयोगाला ताटाखालचे मांजर बनवले असल्यामुळे चारशे पार जाऊन बेलगाम एकाधिकारशाही सहजपणे प्रस्थापित करता येईल अश्या उन्मादात सत्ताधारी पक्ष होतात पण शेवटच्या महिन्याभरात देशाची ग्रहदशा अशी काही पालटली की दहा वर्षे व्हेंटिलेटरवर निपचीत पडलेल्या लोकशाहीने डोळे उघडून एक श्वास घेतला.

लोकशाहीच्या या पुनरुज्जीवनाचे पहिले श्रेय ‘भोळ्या भाबड्या’ जनतेला द्यावे लागेल. राज्यकर्त्यांच्या गर्जना, वल्गना आणि पोकळ आश्वासने यांवर विश्वास ठेवण्यास ज्यांनी नकार दिला आणि त्यांना फक्त आणि फक्त आपल्या खुर्च्यांची फिकीर असते हे सत्य ज्यांनी ओळखले त्या सामान्यजनांना सलाम. स्वत:ची उपजीविकाच नाही तर जीवही धोक्यात घालून ‘बादशहा नागडा आहे’ हे सत्य सगळ्या जगाला ओरडून सांगणाऱ्या पत्रकारांना आणि राजकीय विश्लेषकांना लवून मुजरा आणि अजूनही ज्यांचे डोळे उघडले नाहीत त्या भक्तजनांना ‘गेट वेल सून’.

अभिप्राय 5

  • ‘ ये पब्लिक है ,सब जानती है ‘ या गाण्यात तथ्य आहे हे आणीबाणीनंतर समजले आणि वक्तसे दिन और रात हे गाणे केवळ कविकल्पना नव्हे हे देखील हळूहळू कळेल .

  • आपण व्यक्तीश: काय करू शकतो
    मी असे गृहीत धरून चालतो की आजचा सुधारक च्या वाचकांपैकी बरेचसे हे भारताच्या टॉप टेन पर्सेंट मध्ये मोडतात, म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न 1,65000/- पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ते दरवर्षी आहे ना काही दानधर्म करत असावेत.
    त्यांना माझी अशी विनंती किंवा सूचना आहे की स्वतंत्र बाण्याचे पत्रकार (की ज्यांना शासनाकडून जाहिराती मिळत नाहीत) आणि आपल्या पसंतीचा राजकीय पक्ष यांना दरवर्षी काही ना काही देणगी द्यावी. पक्षांना मोठ्या देणगीदारांच्या वर फार अवलंबून राहावे लागणार नाही.

  • सुनील सुळे यांचा लेख अप्रतिम होता. सुशिक्षित आणि सूज्ञ भारतीयांच्या गेल्या काही काळातील भावना अतिशय समर्पकपणे या लेखात व्यक्त झाल्या आहेत.

  • सुनिलजी, आपला लेख वाचून ‘ काविळ झालेल्याला सर्व जगच पिवळे दिसते ‘ या म्हणीची प्रचिती आली. करोना काळात आणि करोना काळानंतरही संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था म़ंदावलेली असूनही मोदीजिंनी आपले राष्र्टिय उत्पादन सात टक्क्यापेक्षा जास्त ठेवलेले आहे. संपूर्ण जगातिल राष्ट्रप्रमूख मोदीजिंची वाखाणणी करत असताना सत्तेपासून वंचित झालेले विपक्षिय आणि आपल्यासारखे नकारात्मक विचार करणारे तथाकथित बुध्दीम़ंत लोक मोदीजिंच्या नावाने खडे फोडत आहेत. आपणच आपल्या लेखात म्हटल्या प्रमाणे विपक्षियांची इव्हीएम बद्दलची शंका किती अनाठाई होती, ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले. दोन हजार चौदासाली सत्तेवर येताच मोदीजिंनी ‘ सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ‘ ही आपली घोषणा गेल्या दहा वर्षात खरी करुन दाखवली म्हणूनच विपक्षियांनी सत्तेवर आल्यावर मोदीजी राज्यघटनेची पायमल्ली करतिल, आरक्षण बंद होईल वगैरे खोटा प्रचार करून भारतिय जनतेचा बुध्दीभ्रंश केला तरीही सुज्ञ मतदारांनी मोदीजिंना पुन्हा पंतप्रधान केले हे आपल्या देशाचे भाग्यच म्हणावे लागेल. आहो सुनीलजी हिंदू आणि भारतिय जनतेला फुटीचा शाप असल्यामुळेच आपण शेकडो, हजारो वर्ष यवनांच्या आणि ब्रिटिशांच्या गुलाम गिरीत होतो. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही सत्तेवर आलेल्या कांग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्षत्याच्या ढोंगाखाली मुस्लीम समाजाचाच अनुनय केला. कांग्रेस सरकारच्या काळातच आपल्या राज्यघटनेची पायमल्ली करून आपल्या देशावर आणिबाणी लादली होती, याचा आपणास विसर पडलेला दिसतो. हिंदू कधीही हिंसक नव्हते आणि नाहीतही. का़ंग्रेस सरकारच्या काळातच हिंदू दहशतवादाची आवई उठवली गेली होती. पण आपल्या देशात लोकशाही जिव़ंत असल्यामुळेच विपक्षियांनी खोटा प्रचार करुनही मतदारांनी मोदीजिंना पुन्हा सत्तेवर आणले हे देशाचे भाग्यच म्हणावे लागेल.

  • मी आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगात गेलो होतो. एवढेच सांगू शकतो की आजची परिस्थिती आणि तेव्हांची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तुम्ही राममंदिराच्या अक्षता नाकारल्या असत्या तर तुमचे “सर तन से जुदा” झाले असते असे अजिबात नाही. नाकारणारे लोक सुखानं जगत आहेत. तीच गोष्ट ईव्हीएम ची. ईव्हीएम मुळे सरकार पाडता किंवा निवडून आणता येत नाहीत. त्याला इतर अनेक कारणे आहेत.

    भारतीय लोकशाही आणीबाणीचा अपवाद सोडला तर अडखळत चालू होती आणि चालू रहाणार आहे.

    लोकशाहीला खतरा, संविधान धोक्यात वगैरे भाकडकथा पसरवण्यात अर्थ नाही. टीका करण्याजोग्या इतर अनेक गोष्टी आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.