वैज्ञानिक अभ्यासपद्धती

रूढ अर्थाने प्रयोग आणि/किंवा निरीक्षणावर आधारित केलेला अभ्यास हा वैज्ञानिक अभ्यास म्हणता येईल. अशा अभ्यासात एक शिस्त असावी लागते. निरीक्षणे घेणारा वा प्रयोग करणारा हा कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रामाणिकपणे व तटस्थ राहून निरीक्षणे घेणारा असावा ही अशा अभ्यासाची पूर्व अट आहे. तरीदेखील या निरीक्षणांकडे कायम कठोर संशयवृत्तीने (scepticism) बघितल्या जाते; कारण मानवी आकलन आणि दृष्टिकोण हे बहुदा पूर्वग्रहयुक्त असतात. याहून महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे घेतलेली निरीक्षणे वा प्रयोगातील अनुभव यांच्या नोंदी इतरांना समजतील अश्या रीतीने ठेवाव्यात जेणेकरून दुसऱ्या अभ्यासकाला कामाची पुनरावृत्ती करून पूर्वी घेतलेल्या निरीक्षणाची वा अनुभवाची सत्यासत्यता तपासून पाहता येईल.

विज्ञानाची ही पद्धत केवळ भौतिक व सजीवांच्या जैविक पातळीवरील अभ्यासासाठी तर लागू आहेच; याव्यतिरिक्त ही पद्धत माणसामाणसातील अनेक व्यवहार – सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादींना देखील लागू करता येईल. तेव्हा वरील पद्धतीने केलेल्या या मानवी व्यवहारांच्या अभ्यासाला वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अभ्यास म्हणता येईल.

अभ्यासाचे विषय: 

वैज्ञानिक अभ्यासाचे दोन प्रकारचे विषय संभवतात :

(अ) निसर्गात आढळणाऱ्या एखाद्या घटनेचे/तथ्याचे स्पष्टीकरण शोधणे. उदा. कोरोना हा संसर्गजन्य रोग कशामुळे व कसा होतो?
(ब) अस्तित्वात नसलेली एखादी बाब निर्माण करण्यासाठी अभ्यास करणे. उदा. कोरोना या रोगावर औषध वा लस निर्माण करण्यासाठी अभ्यास करणे. 

या अभ्यासपद्धतीचा व इतर वैयक्तिक व सामाजिक बाबी उदाहरणार्थ नैतिकता, श्रद्धा, भावना इत्यादी गोष्टींचा सरळ संबंध जरी दिसत नसला तरी असा संबंध येतो तो अभ्यासाच्या इष्टतेसंबंधाने. उदाहरण घ्यायचे झाल्यास, आज आयुर्विज्ञानात असे अनेक प्रयोग आहेत की ज्यांच्याबाबत नैतिक-भावनिक-सामाजिक वगैरे प्रश्न उभे राहू शकतात. मानवी व्यवहारांचा अभ्यास करताना तर असे प्रश्न येतातच. तेंव्हा या पैलूंचा विचार व्हावा असे अनेकांना वाटते. आण्विक अभ्यास किंवा मूलभूत महागड्या वैज्ञानिक संशोधनात तसेच अवकाशसंशोधनात कितपत भाग घ्यावा हे आर्थिक तसेच राजकीय निर्णय असतात. या सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून त्या अभ्यासाच्या किंवा प्रयोगाच्या आवश्यकतेवर त्या समाजानेच विवेकपूर्ण निवाडा द्यायचा असतो, अभ्यासाचे अग्रक्रम ठरवायचे असतात. इथे ज्ञानासाठी ज्ञान की मानवासाठी ज्ञान हा वाद होऊ शकतो. पण या वादात न पडता मानवासाठी ज्ञान हे तूर्तास मान्य करून असे वाटते की वैज्ञानिक अभ्यासात विषय निवडताना सामाजिक बाबींचा (यात श्रद्धा, भावना आल्या), समाजाच्या गरजांचा, त्यांच्या आशा-आकांक्षाचा संबंध असायलाच हवा. पण एकदा विषय ठरल्यावर प्रत्यक्ष अभ्यासाची पद्धत मात्र वैज्ञानिकच असावी.

वैज्ञानिक अभ्यासाची पद्धती व अवाका:

एखाद्या विषयाशी निगडीत बाबींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावयाचा असल्यास त्या संबंधाने माहिती/निरीक्षणे गोळा झाल्यावर त्या तथ्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी काही एक संभाव्य गृहीतक (उदाहरण – चौकट पहा) धरून सुरुवात होते. मग हा अभ्यास खालील टप्याप्रमाणे पुढे जातो : 

१. असलेल्या माहितीच्या आधारे संभाव्य गृहीतक मांडणे

२. गरज वाटत असल्यास अधिक प्रयोग करणे आणि/किंवा निरीक्षणे घेणे

२. निरीक्षणे इतरांना समजतील अशा पद्धतीने नोंदविणे

३. समोर येणाऱ्या तथ्यांचे वर्गीकरण करणे

४. सामान्यीकरण 

 

५. निष्कर्ष : 

क) स्पष्टीकरण पूर्णपणे मान्य होण्यासारखे वाटल्याने गृहीतक मान्य करणे व भाकीत करणे, अधिक प्रयोग/निरीक्षणे घेऊन भाकीत तसेच मूळ गृहीतक तपासत राहणे 

अथवा

ख) स्पष्टीकरण पूर्णपणे मान्य होण्यासारखे नसल्याने गृहीतकात बदल करून टप्पा २ पासून पुन्हा वरील टप्प्यांची पुनरावृत्ती करणे

अथवा

ग) स्पष्टीकरण मान्य होण्यासारखे नसल्याने गृहीतक नाकारून पर्यायी गृहीतक मांडणे व पुन्हा टप्पा २ पासून पुनरावृत्ती करणे. 

प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात मोजमाप केले जाते किंवा न हाताळता येण्याजोग्या वस्तू जसे की ग्रह-तारे यावरही केले जाते. तसेच मोठ्या संख्येतील गणना उदा. लोकसंख्या/वनस्पतींची संख्या यांसारख्या बाबीदेखील नोंदवाव्या लागतात. मोजमापांसाठी अनेकदा विशेष वैज्ञानिक उपकरणांची आवश्यकता असते.

वैज्ञानिक मोजमाप नोंदवताना सामान्यत: तक्त्यात/सारणीबद्ध पद्धतीने, आलेख काढून किंवा संलग्नित वस्तूंना दर्शवून नोंदविली जातात. तसेच ती सांख्यिकी पद्धतीने हाताळून मांडावी लागतात, ज्यामध्ये त्या अभ्यासासंबंधित स्वतंत्र गुणधर्मासोबतचे (independent variables) संबंध आणि वेगवेगळ्या निरीक्षणांचे सहसंबंध (corelations) दाखविले जातात. 

वैज्ञानिक तटस्थता:

अश्या पद्धतीने अभ्यास करताना अभ्यासकाच्या नैतिकतेच्या कल्पना, श्रद्धा, भावना व सामाजिक दृष्टिकोण या बाबींचा अभ्यासाच्या पद्धतीवर व काढण्यात येणाऱ्या निष्कर्षांवर परिणाम होता कामा नये. या बाबींचा प्रभाव अभ्यास करावा किंवा करू नये या निर्णयाबाबत जरूर असावा. मात्र त्यापुढे जाऊन अभ्यासाच्या दरम्यान कोणत्याही टप्प्यावर या बाबींना मुळीच स्थान न देता अभ्यासकाची भूमिका तटस्थ असावी.

वैज्ञानिक अभ्यासात यशापयश:

एखादी इच्छित स्थिती साध्य करण्यासाठी केलेला प्रयोग किंवा एखाद्या गृहीतकाच्या किंवा सिद्धांताची तपासणी करण्याच्या हेतूने केलेला प्रयोग हा मूळ उद्दिष्टांच्या दृष्टीने हवे ते परिणाम न दाखवणारा असू शकतो. मग तो यशस्वी किंवा अयशस्वी समजायचा का? वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रमाणिकपणे केलेला कुठलाही प्रयोग हा यशस्वी किंवा अयशस्वी असा नसतो. कारण प्रयोगाचे/अभ्यासाचे महत्त्व तो अभ्यास होताना मिळालेल्या अनुभवात किंवा निरीक्षणात असते. जर अपेक्षित अनुभव/निरीक्षणे मिळाली नाही तर अश्यावेळी एकतर ही निरीक्षणे पुन्हा तपासावी लागतात किंवा निरीक्षणांची पद्धत बदलावी लागते. किंवा दुसरे महत्त्वाचे, गृहीतकावर प्रश्नचिन्ह लागून त्यावर पुनर्विचार करावा लागतो.

फसला म्हणून समजल्या गेलेल्या प्रयोगांची निरीक्षणे ही विज्ञानाच्या वाटचालीत खूप महत्त्वाची ठरू शकतात. किंबहुना कधी कधी तर ती पूर्णपणे नवीन विचार करावयास पथदर्शकदेखील ठरलेली आहेत. अशा निरीक्षणात/अनुभवात पुढील अभ्यासाचे अंकुर असतात. विज्ञानाचा इतिहास बघितल्यास अशा फसलेल्या प्रयोगाच्या निरीक्षणातून विज्ञानाची नवीन दालने उघडून विज्ञानाने प्रचंड झेप घेतल्याचे दाखले आहेत. याचे सुंदर उदाहरण म्हणजे १८८७ साली मायकलसन व मोर्ले या अमेरिकन वैज्ञानिकांच्या उद्दिष्ट न साधलेल्या प्रयोगाचे आहे. अंतराळात त्याकाळी कल्पिलेल्या ‘इथर’ या माध्यमातून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग त्यांना मोजावयाचा होता. पण अनेक वेळेला व पृथ्वीवर अनेक ठिकाणी प्रयोग करूनदेखील त्यांच्या प्राथमिक अंदाजाच्या आसपासदेखील त्यांना उत्तर मिळाले नाही व त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्या अर्थाने हा प्रयोग अयशस्वी झाला. पण या प्रयोगातील निरीक्षणातूनच आईन्स्टाईन यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांताला पुरावा मिळाला. निष्कर्ष असा की निरीक्षणे घेणे व ती खुलेपणाने प्रामाणिकपणे प्रकाशित करणे महत्त्वाचे. प्रयोग फसला हे ठरवणे अवैज्ञानिकपणा आहे. सोयीस्कर अशीच निरीक्षणे नोंदवून गैरसोयीच्या निरीक्षणाकडे दुर्लक्ष करणे व त्यात फेरफार करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात आहे व वैज्ञानिक प्रगतीला मारक आहे. प्रयोग करीत असताना त्या क्षेत्रातील इतर वैज्ञानिकांशी विचारविनिमय करणे खरी वैज्ञानिक संस्कृती आहे. तसेच प्रयोग पूर्ण करूनच लोकांना त्याची माहिती देणे व प्रकाशित करणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.

निरीक्षणाच्या मर्यादा व निष्कर्षातील संभाव्य चूक : 

वैज्ञानिक निरीक्षणे घेण्याच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब म्हणजे निरीक्षणाच्या साधनांच्या मर्यादा. या मर्यादांमुळे निरीक्षणात अपरिहार्यपणे काही चूक अंतर्भूत असते. उदाहरणार्थ, समजा मोजपट्टीवरील सर्वात कमी अंतराच्या खुणा १ मि.मी.वर आहेत. त्यामुळे या मोजपट्टीने १ मि.मी.पेक्षा कमी अंतर मोजता येणार नाही. म्हणजे या मोजपट्टीने मोजताना कितीही काळजीपूर्वक अंतर मोजले तरी कमाल १ मि.मी.एवढी चूक होऊ शकते. या मर्यादेपायी शेवटच्या निष्कर्षातील होणाऱ्या संभाव्य चुकीचा अंदाज घ्यावा लागतो. निरीक्षणांची साधने जसजशी अधिक विकसित होऊन त्यात अचूकता (accuracy and precision) वाढत जाते तसतशी निरीक्षणे पुनःपुन्हा घेऊन निष्कर्ष तपासत जाऊन प्रसंगी निरीक्षणांची पद्धत, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण किंवा गृहीतक यांचादेखील पुनर्विचार करावा लागतो. दुसऱ्या प्रकारची चूक व्यापक प्रमाणावर विदा गोळा करताना किंवा नमूना घेण्यात होऊ शकते. उदा. एखाद्या रोगाची विशिष्ट लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची संख्या मोजण्यात चूक होण्याची दाट शक्यता असते. मोठ्या संख्येत असणाऱ्या वस्तूंना लागू असणारी माहिती नोंदवायची असल्यास त्या वस्तूंचा नमूना निवडावा लागतो. एक तर नमून्यातील वस्तूंची संख्या ही प्रत्यक्ष संख्येपेक्षा बरीच लहान असते. त्यामुळे अशा निरीक्षणांवरून काढलेल्या निष्कर्षात चूक अंतर्भूत असते. या संभाव्य चुकीचा अंदाज सांख्यिकी पद्धतीने काढून निष्कर्ष प्रकाशित करताना संभाव्य चुकीचा अंदाजदेखील सोबत द्यायला हवा. हा अंदाज निरीक्षणाची तसेच निष्कर्षाची विश्वासार्हता दर्शवतो. म्हणून निरीक्षणाच्या आधारे मिळालेल्या निष्कर्षासोबत संभाव्य चुकीचा अंदाज तेवढाच महत्त्वाचा ठरतो. 

विज्ञानशाखांचा विकास :

वैज्ञानिक अभ्यासात निष्कर्ष काढणे म्हणजे समोर आलेल्या निष्पत्तीचे कारण समजून घेणे. हे कारणदेखील त्या अगोदरच्या क्रियेची निष्पत्ती असू शकते. अशा प्रकारे कार्यकारण (causality) परंपरेची एक साखळी निर्माण होते. या कार्यकारण साखळीत मागे जात जात एका टप्प्यावर कारण उलगडत नाही आणि ही साखळी तिथे थांबते. अश्यावेळी कार्यकारण साखळीच्या पहिल्या टप्प्यावर काही एक गृहीतक कारण म्हणून गृहीत धरावे लागते. उदाहरणार्थ, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे किंवा चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे याचे कारण म्हणून न्यूटनने १६८७ मध्ये गुरुत्वाकर्षण हे गृहीतक मांडले. 

विज्ञानाच्या विकासात अनेकदा कार्यकारण साखळीतील एका टप्प्यावर असा सिद्धांत समोर येतो की यापूर्वी मानले गेलेले एखादे गृहीतक हे गृहीतक न राहता ते परिणाम म्हणून सिद्ध करता येते. उदारणार्थ, आईन्स्टाइनने १९१५ साली मांडलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धांतानुसार (General Theory of Relativity) पदार्थ व उर्जेच्या अस्तित्वामुळे त्यांच्या भोवतीचा अवकाश-काळ हा वक्र होतो व त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा अनुभव येतो. म्हणजे आता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत हे गृहीतक न राहता तो व्यापक सापेक्षता सिद्धांताचे फलित आहे.

एखाद्या गृहीतकाला मान्यता मिळून त्याला बळकटी तेंव्हा मिळते जेंव्हा त्यापासून काढलेले भाकीत हे निरीक्षणातून खरे ठरते. व्यापक सापेक्षता सिद्धांतानुसार असा निष्कर्ष निघतो की सूर्याच्या वस्तुमानाने त्या भोवतीचा अवकाश-काळ हा वक्र होतो. त्यामुळे प्रकाश सूर्याच्या जवळून जाताना वक्र मार्गाने प्रवास करतो. आणि आश्चर्य म्हणजे १९१९ या वर्षी एडिंगटन यांनी खग्रास ग्रहणात घेतलेल्या निरीक्षणात प्रकाश सूर्याजवळून जाताना त्याचा मार्ग वक्र होत असल्याने त्याच्या मागील तारे दिसू लागले. या निरीक्षणाने या सिद्धांताला बळकटी मिळाली.

पुढे जाऊन निरीक्षणांच्या साधनांचा विकास होऊन त्यांच्या मर्यादा कमी होतात व निरीक्षणातील तपशील वाढतात तसेच अचूकता वाढते. वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षणे घेतली जाऊन वेगळ्या निष्पत्ती समोर येतात. या नवीन निरीक्षणाच्या प्रकाशात ही गृहीतके एक तर बळकट तरी होतात किंवा चुकीची ठरवून बदलावी लागतात. उदाहरणार्थ अणूच्या रचनेच्या बाबतीत जसे जसे प्रयोग होत गेले तश्या तश्या वेगळ्या निष्पत्ती समोर येत गेल्या व गृहीतके खूपदा बदलावी लागली. 

वैज्ञानिकांच्या दृष्टीने यशाचा क्षण म्हणजे एखादे गृहीतक हे गृहीतक न राहता ते दुसऱ्या कार्यकारण साखळीशी जुळणे म्हणजेच ते गृहीतक न राहता कार्यकारण साखळीतील एक कडी बनणे हे होय.

ज्ञानशाखांचा विकास होताना एकापेक्षा अधिक ज्ञानशाखा एकमेकींसोबत जोडल्या जातात. इथे ‘जीवांच्या उत्क्रांतीच्या’ सिद्धांताचे उदाहरण देता येईल. पृथ्वीवरील सजीवांमधील विविधता, जीव त्यांच्या पर्यावरणाशी कसे जुळवून घेतात इत्यादी बाबींचे स्पष्टीकरण ‘जीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत’ या गृहीतकाने दिले. परंतु अनुवांशिकशास्त्र (Genetics) या ज्ञानशाखेचा विकास झाल्यावर उत्क्रांतीचा सिद्धांत व अनुवांशिकता या दोघांच्या संयोगातून ‘आधुनिक उत्क्रांती सिद्धांत’ अस्तित्वात आला व यात जीवरसायनशास्त्र (Biochemistry) व रेणुकीय जीवशास्त्र (Molecular Biology) या ज्ञानशाखांतील अनेक अंगांचा अंतर्भाव झाला.

अशाप्रकारे ज्ञानशाखेतील गृहीतके कमी होऊ लागतात व ती शाखा अधिक परिपक्व होत जाते. अश्या रीतीने कार्यकारणभावाच्या या साखळ्या इतर शाखेतील कार्यकारण साखळ्यांशी जुळतात व विज्ञानाच्या दोन शाखेतील भिंत नष्ट होते.

विज्ञानाच्या एकाच शाखेत कार्यकारणभावाच्या वेगवेगळ्या साखळ्या तयार होतात व त्या प्रत्येकीसाठी शेवटी एक गृहीतक हे लागतेच. अशाप्रकारे विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत अशा गृहीतकांचा एक संच तयार होतो. जेवढी या गृहीतकांची संख्या जास्त तेवडे विकासाचे आव्हान मोठे.

सतत होणाऱ्या निरीक्षणातून गृहीतके सतत तपासात जाणे, त्यांच्यात बदल करणे व या साखळ्यांचा विस्तार करत जाणे ही विज्ञानाची वाटचाल होय. 

पोथीनिष्ठेला विरोध:

मुख्य मुद्दा असा की वैज्ञानिक निरीक्षणात प्रामाणिकपणा असल्याने नवीन निरीक्षणे ही मान्य केल्या गेलेल्या कार्यकारण साखळीला सुसंगत नसतील म्हणजे त्याआधारे त्यांचे स्पष्टीकरण देता येत नसेल तर, म्हणजेच ही निरीक्षणे जुन्या कार्यकारण साखळीला छेद देत असतील तर निरीक्षणांवर प्रश्नचिन्ह न लागता ते प्रश्नचिन्ह मान्य केल्या गेलेल्या कार्यकारण साखळीवर व त्यामागील गृहीतकावर लागते. याचा अर्थ आपण कारणपरंपरा समजून घेण्यात गफलत तरी केली असावी किंवा आपले गृहीतक चुकीचे असावे. म्हणजे पोथीनिष्ठेच्या अगदी उलट आपला आधार हा निरीक्षणे व तथ्ये असतात. गृहीतके ही मान्यवर व्यक्तीने सुचविलेली असल्याने ती अपरिवर्तनीय आहेत व खरीच आहेत असे मुळीच होत नाही. किंबहुना गृहीतके ही कायम तपासाच्या पिंजऱ्यात असतात. या अर्थाने वैज्ञानिक ज्ञान हे परिवर्तनीय वा बदलणारे आहे असे आपण म्हणू या. 

पण मग विज्ञानातील सर्व ज्ञान हे बदलणारे आहे का? हो आणि नाही देखील. एक तर निरीक्षणांच्या साधनांची मर्यादा लक्षात घेऊन आपण निरीक्षणांना आधार मानतो व त्यामुळे निरीक्षणांच्या साधनांची अचूकता जशी जशी वाढत जाते तशी तशी निरीक्षणे बदलतात व ते बदल मान्य होतात व त्यानुषंगाने गरज वाटल्यास गृहीतकेदेखील बदलावी लागतात. त्याचबरोबर दुसरे असे की कार्यकारण साखळी तपासण्यासाठी आपण ज्या तर्काधारित पद्धतीचा उपयोग करतो ती पद्धत कायम राहते. याचे कारण ती पद्धती केवळ तर्कावर आधारलेली असते. उदाहरण म्हणून पुढील प्रमेय घेऊ – ‘दोनदा नाही असणे म्हणजे होय असणे’, अशी तर्काधारित विश्लेषण पद्धत न बदलणारी आहे. 

लोकांचे ज्ञान विरुद्ध अकादमीक विज्ञान:

सरतेशेवटी आपण लोकांचे त्यांच्या भोवती असलेल्या परिसराचे ज्ञान विरुद्ध प्रस्थापित ज्ञानशाखातील मान्य असलेले ज्ञान याचादेखील विचार करायला हवा. सर्वसामान्यपणे विविध जनसमुदायांचे त्यांच्या परंपरेतून/अनुभवातून आलेल्या ज्ञानाकडे प्रस्थापित विज्ञानशाखेतील लोक दुर्लक्ष करतात. त्यांचे ज्ञान हे वैज्ञानिक नसून अंधश्रद्धेवर आधारलेले आहे असा प्रस्थापितांमध्ये समज असतो. पण इथे आपण हे लक्षात घ्यायला हवे की काही लोकसमूह, उदाहरणार्थ वनात राहणारे आदिवासी, मच्छीमार किंवा वैदू इत्यादींच्या जगण्याचा आधारच मुळी निसर्गातील संसाधने असतात व या संसाधनाचा त्यांनी पिढ्यानुपिढ्या उपभोग घेतलेला असतो. तेव्हा त्यांचे या संसाधनांच्या अनुभवावर आधारित ज्ञान प्रथमदर्शनीच चूक किंवा अंधश्रद्धेवर आधारित आहे असे कसे समजता येईल?

इथे मुद्दा असा की कुठलाही प्रयोग हा प्रयोगशाळेत झाला किंवा वैज्ञानिकांनी केला तरच त्याला वैज्ञानिक प्रयोग समजायचा का? एखादा अनुभव/निरीक्षण हे सामान्य माणसाने म्हणजे प्रस्थापित वैज्ञानिक नसलेल्या व्यक्तीने डोळसपणे घेतला असेल तरी त्याला आपण कमी दर्जाचे ठरवायचे का? 

प्राध्यापक माधव गाडगीळ यांच्यासारख्या मान्यताप्राप्त वैज्ञानिकांनी जैवविविधता व लोकांचे ज्ञान यावर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांच्या मते लोकांचे निसर्गज्ञान हे वैज्ञानिक परिभाषेत मांडलेले नसेल, पण त्यांची खूपशी निरीक्षणे ही विज्ञानपुस्तकातील निरीक्षणांपेक्षा अधिक विस्तृत व तपशिलात असलेली आढळतात. आपला दृष्टिकोण खऱ्या अर्थाने वैज्ञानिक असेल तर त्यांचे ज्ञान हे सरसकट टाकाऊ म्हणण्याचा अवैज्ञानिक प्रकार करण्याऐवजी त्यांच्या या ज्ञानाला वैज्ञानिक कसोट्या लावून व तपासून ते बरोबर असल्यास त्याला अनुभवजन्य ज्ञान (experiential knowledge) म्हणून मान्यता द्यायला हवी. केवळ हे लोक रूढ अर्थाने शिक्षित नाहीत म्हणून त्यांना व त्यांच्या ज्ञानाला कमी लेखू नये. त्यांचे सर्वच समज व माहिती ही वैज्ञानिक आहे असे इथे मुळेच सुचवायचे नाही. परंतु वैज्ञानिक पद्धतीने त्यांचे ज्ञान तपासून ते योग्य असल्यास त्याला मान्यता देणे हे आमच्या ज्ञानात भर घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. तसेच त्यांच्या ज्ञानाचे श्रेय त्यांना मिळवून देणे हेदेखील आवश्यक आहे.

अभिप्राय 2

  • वेचक आणि सुटसुटित शब्दात लिहिलेला लेख. या पद्धतीचे पालन मात्र विद्यापिठीय संशोधनात अत्यल्प होते असा मला अनुभव आहे. सामान्यपणे शौध निबंधाच्या आराखड्यात गृहितकाचा अभाव असतो. अनेकदा तर विद्यार्थी विषय विचारतात. वास्तवात एखाद्या विषयाच्या अभ्यासानंतर पडलेले प्रश्न हे गृहितक असतात. आता विषय विचारणे म्हणजे त्या विषयासंबंधी संशोधनेच्छुला काही प्रश्नच पडले नाही असा अर्थ होते. आशा आहे हा लेख वाचून या प्रवृत्तीला आळा बसेल.

  • अतिशय सुंदर लेख.
    ( एक सूचना :
    ” प्रयोग करीत असताना त्या क्षेत्रातील इतर वैज्ञानिकांशी विचारविनिमय करणे खरी वैज्ञानिक संस्कृती आहे. तसेच प्रयोग पूर्ण करूनच लोकांना त्याची माहिती देणे व प्रकाशित करणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.”
    या विधानाच्या शेवटी ‘ नाही ‘ ऐवजी ‘ आहे ‘ असा शब्द असायला पाहिजे होता का ? )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.