बाबासाहेब आंबेडकर ह्यांची ओळख घटनाकार, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ अशी आहे. परंतु पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून अद्यापही त्यांची तेवढी दखल घेतली गेलेली नाही. आंबेडकरांनी पत्रकारिता पोटभरू किंवा प्रचारकी म्हणून केली नाही, तर समाजोद्धार हाच त्यांचा मुख्य हेतू होता. राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान त्यांना लाभलेले होते. ह्या बाबीकडे ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘प्रबुद्ध भारत’ ह्या नावांनी पाक्षिके चालवली. त्यांपैकी ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन त्यांनी स्वतः न करता सहकार्यांकडून करून घेतले. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ ह्या दोन्हीं पत्रांचे संपादन मात्र त्यांनी स्वत:च केले. संपादन क्षेत्रामध्ये ते स्वतः प्रत्येक ओळीकडे लक्ष देत असत. कारण ‘बहिष्कृत भारत’च्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती. बिन मोली संपादकीय काम करण्यास दलितांतील एकही स्वार्थत्यागी मनुष्य त्यांना लाभला नाही. सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे लोकांचा म्हणावा तितका पाठिंबा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनाच सर्व काम करावे लागले. बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही पत्रे आधारभूत आहेत. त्यांतून त्यांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.
काय करूं आता धरूनिया भीड |
नि:शंक हे तोंड वाजविले |
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण |
सार्थक लाजून नव्हें हित |
‘मूकनायक’च्या सुरुवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या ओळींतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. त्यांनी त्यावेळी खऱ्या अर्थाने समाजाला आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरे, समाजसुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. बाबासाहेबांना समाजसुधारणा मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते माणसाला माणसासारखी वागणूक देण्यासाठीदेखील तयार नव्हते. माणसाचे निसर्गदत्त अधिकार आहेत ते मिळवून देण्याचीसुद्धा त्यांना जाणीव होत नव्हती. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला ‘मूकनायक’च्या रूपाने नवा आवाज मिळाला. बाबासाहेबांची पत्रकारिता आक्रमक तितकीच संयमी होती. त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचे लेख उच्च कोटिचे तत्त्वज्ञान होते. त्यांच्या मते एखादी जात अवनत झाली तर त्या अवनतीचा चट्टा इतर जातींना बसल्याशिवाय राहणार नाही.
पत्रकारितेसाठी तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीचे मुखपत्र म्हणून त्यांनी वृत्तपत्र चालवले नाही तर, एकूण जागतिक घडामोडींचा आढावादेखील त्यातून त्यांनी घेतला आहे. ते उच्चशिक्षणासाठी लंडनला जाताना ‘मूकनायक’ची पूर्ण जबाबदारी त्यांनी ज्ञानदेव घोलप ह्यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून ते बातम्या, लेख, इतर माहिती, स्वतःच पाठवत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे ‘मूकनायक’ बंद झाला. बाबासाहेबांनी पुन्हा पूर्ण जुळवाजुळव करून ‘बहिष्कृत भारत’च्या नावाने ३ एप्रिल १९२७ ला नवीन पाक्षिक सुरू केले. ह्यातून त्यांची पत्रकारिता सर्वार्थाने प्रगल्भ झाल्याचे दिसून येते. त्यांची मजकूरमांडणी अप्रतिम होती. ‘आजकालचे प्रश्न’ नावाने चालू घडामोडींविषयीचे सदर, अग्रलेख, आत्मवृत्त, विचारविनिमय, वर्तमान सार, विविध विचारसंग्रह अशी त्यांची सदरे नियमित सुरू होती. ‘बहिष्कृत भारत’ सुरू झाले त्यावेळी महाड येथील धर्मसंगरालाही सुरुवात झाली होती. त्यामुळे अनुकूल वातावरण निर्माण करण्यात मोलाची भर घातलेली दिसून येते. ह्या पत्रातूनही बाबासाहेबांचे भाषावैभव अत्यंत खुलून दिसते. त्यांच्या प्रत्येक शीर्षकातून त्यांची विद्वत्ता आपल्याला जाणवते. त्यांची शीर्षके, ‘आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या’, ‘खोट्याच्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?’, ‘आपलेपणाची साक्ष दे, नाहीतर पाणी सोड’, ‘गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ’, ‘बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?’, ‘खरे बोल निश्चयात आहे समुच्चयात नाही’ अशा त्यांच्या शीर्षकांखाली त्यांचे लिखाण चालत असे. त्या लेखांमधून ‘बहिष्कृत भारत’ने अक्षरशः रान पेटवले होते.
त्याकाळी बाबासाहेबांना प्रस्थापित वृत्तपत्रकारांशीदेखील तेवढ्याच निकराने झुंज द्यावी लागली. “दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना तुच्छतेने वागविण्यात येते म्हणून तुमच्या अंगाचा संताप होतो. या देशात युरोपियन, युरेशियन लोकांसाठी वेगवेगळे आगगाडीचे डबे राखून ठेवलेले तुम्हांस खपत नाही. एडिंबरो येथील हिंदी लोकांना तिथल्या कित्येक हॉटेल्समध्ये जाऊन गोऱ्या मॅडमांबरोबर नाचण्याची बंदी केली म्हणून तुम्ही आकाशपाताळ एक केले. पण अस्पृश्यतेपायी होणारी मानहानी, आणि उन्नतीच्या मार्गावर होणारी कायमची बंदी, ह्यांच्यापुढे सदरील निर्बंध म्हणजे काहीच नव्हेत, ही गोष्ट तुम्हाला अद्यापि पटत नाही?” असे खडसावून विचारायला बाबासाहेब मागेपुढे पहात नसत. टीकाकारांपुढे बाबासाहेब कधीच झुकले नाहीत. आपल्या विद्वत्तेने, वाक्चातुर्याने, हजरजबाबी स्वभावाने त्यांनी त्यांच्या टीकाकारांना नामोहरम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितिशी सामना करणारी म्हणून त्यांची पत्रकारिता त्यावेळच्या इतर पत्रकारांपेक्षा अतिशय भिन्न स्वरूपाची म्हणावी लागेल. अशिक्षित, दारिद्र्याने पिचलेल्या समाजाचे नेतृत्व करायचे, त्यात स्वतःच्या आर्थिक पायावर भक्कमपणे उभे नसलेले वृत्तपत्र, अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही वृत्तपत्रासाठी केवळ बातम्या किंवा लेख लिहून रकानेच्या रकाने भरण्याचा धंदा त्यांनी केला नाही. त्यातला प्रत्येक शब्द तोलून मापून लोकांपर्यंत जाईल यासाठी ते नेहमीच दक्ष राहिले. सध्याच्या पत्रकारितेने डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. वृत्तपत्र लोकप्रिय होण्यासाठी पत्रकार अनेक नैतिक-अनैतिक मार्गसुद्धा बिनबोभाटपणे चोखाळताना दिसतात. हल्ली तरी वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय झाला असल्याने स्पर्धा वाढली आहे. तडजोडी कराव्या लागतात. अशी मल्लीनाथी करून त्या कृतीचे समर्थनदेखील केले जाते. परंतु साधनसामग्री, तंत्रज्ञान उपलब्ध असूनसुद्धा वृत्तपत्राचा मालक, संपादक, जनतेच्या मनावर कायमची पकड घेऊ शकत नाही हेही तितकेच खरे आहे. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या ५० कोटी जनतेच्या कोणत्याही प्रश्नांपेक्षा क्रिकेट, शेअर निर्देशांक, आणि पुढार्यांच्या प्रसिद्धीला जास्त जागा दिली जाते. कुपोषित बालकांचे नाव न सांगता, पौष्टिक खाद्य कोणते आहे, किंवा कोणता अभिनेता साईबाबांच्या, गणपतीच्या, दर्शनाला अनवाणी गेला, कोणावर खटले चालू आहेत, हे मात्र चवीचवीने सांगितले जाते. दैनिकाचा मालक अथवा संपादक जनतेचा पुढारी असतो. मात्र तो राजकीय नेता किंवा चमचा म्हणूनच वावरताना दिसतो. सर्व प्रश्नांची राजकीय उत्तरे शोधण्याची सवय त्याला लागली असल्याने तो राजकारणात शिरतो तेच पुढारी म्हणून. सत्ता आणि संपत्ती ह्या दोन कारणांपुरते त्याचे पुढारीपण असते. अनेक सामाजिक विषयावर निकराची लढाई देण्याची आवश्यकता असूनही ते विषय त्याच्या गावीही नसतात. त्यामुळे आंबेडकरांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत गरज आहे. ते कोट्यवधी जनतेचे नेते होते. परंतु त्यांनी व्यवसायिक तडजोड कधीच केली नाही. त्यांची कारकीर्द अंतर्मुख व्हायला भाग पाडते.
डॉ. आंबेडकरांचे माध्यमांशी असलेले नाते व्यामिश्र होते. ते संपादक तसेच सल्लागारही होते. त्यांची ही चळवळ गरीब लोकांची चळवळ होती. त्या वर्गातील लोक कूळ वा वेठबिगार म्हणून काम करणारे वंचित होते. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सर्वांत कमी संसाधने बाळगून होता. त्यामुळे अत्यल्प संसाधनांच्या बळावर, किंबहुना पुढे जाऊन जवळजवळ एकट्याच्याच जिवावर त्यांची सर्व पत्रकारिता चाललेली होती. लंडनमधील ‘द टाईम्स’, ऑस्ट्रेलियातील ‘डेली मर्क्युरी’, ‘न्यूयॉर्क टाईम्स’मधील न्यूज ‘अमेरिकन जर्नल’ यांसारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसह काळ्या लोकांनी चालवलेल्या वर्तमानपत्रांनी आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीमध्ये आणि गांधी-आंबेडकर संघर्षामध्ये बराच रस घेतला होता. राज्यघटना निर्मितीमधील आंबेडकरांची भूमिका, संसदेतील त्यांचे युक्तिवाद, सादरीकरण, आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा त्यांनी दिलेला राजीनामा, ह्या घडामोडींकडे जगाचे लक्ष होते. आरंभीच्या वर्षांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी ह्या नियतकालिकाला पाठिंबा दिला होता. “त्यांनी अस्पृश्यांसाठी नवे विचारयुग निर्माण केले. अस्पृश्यांना त्यांच्या अस्तित्वाची व भवितव्याची जाणीव करून देण्याचे साधन म्हणून काम केले”, असे गंगाधर पानतावणे म्हणतात. ‘मूकनायक’चे कार्य संपुष्टात आल्यावर काही वर्षांनी महाड चळवळीला गती प्राप्त झालेली असताना ३ एप्रिल १९२७ रोजी आंबेडकरांनी ‘बहिष्कृत भारत’ ह्या नियतकालिकाच्या रूपाने पुन्हा पत्रकारितेत मुसंडी मारली. १९२८ साली ‘समता’चा उदय झाला आणि ‘बहिष्कृत भारत’ला नवसंजीवनी मिळून २४ नोव्हेंबर १९३० रोजी ‘जनता’ ह्या नावाने ते प्रकाशित होऊ लागले. ‘जनता’ हे दलितांचे सर्वाधिक काळ चाललेले दैनिक ठरले. २५ वर्षे सुरू राहिलेल्या ‘जनता’चे नामकरण १९५६ ‘प्रबुद्ध भारत’ असे करण्यात आले. आंबेडकरांच्या चळवळीला प्राप्त झालेल्या गतीशी सुसंगत असा हा बदल होता. १९६१ सालपर्यंत हे प्रकाशन सुरू राहिले. खऱ्या अर्थाने दलितांचे सर्वाधिक काळ सुरू राहिलेले हे स्वतंत्र प्रसारमाध्यम होते. सर्व पुरोगामी, सवर्ण पत्रकारांचा व संपादकांचा वापर ह्या कार्यामध्ये त्यांनी करून घेतला. अनेक नियतकालिकांचे संपादन वेळोवेळी ब्राह्मण संपादकाच्या हातात होते. ‘बहिष्कृत भारत’ला पुरेसे लेखक मिळत नसल्यामुळे २४/२४ रकाने भरण्याची जबाबदारी संपादकांवर पडायची. ‘प्रबुद्ध भारत’ सुरू होते तोवर त्याचे संपादन यशवंत आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रूपवते, शंकरराव खरात, भास्करराव काद्रेकर ह्यांनी केले.
आंबेडकरांच्या आधी काही मोजकी नियतकालिके अस्पृश्यांच्या रोजच्या जगण्याच्या समस्यांबाबत वार्तांकन करत असत. महात्मा फुले ह्यांनी सत्यशोधक चळवळीतून ‘दीनबंधू’ हे बहुजन वर्तमानपत्र सुरू केले होते. ज्येष्ठ नेते गोपाळबाबा वलंगकर ह्यांना पहिला दलित पत्रकार मानले जाते. ‘दीनबंधू’, ‘दीनमित्र’ व ‘सुधारक’ ह्या नियतकालिकांमध्ये त्यांनी जात व अस्पृश्यतेबद्दल केलेले लेखन पथदर्शी ठरले. ते अतुलनीय विद्वान होते. हिंदूधर्मीय व्यवस्थेची त्यांनी केलेली चिकित्सा ‘विटाळ विध्वंसक’ ह्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाली. ह्या महान नेत्यांनी सामान्य जनतेच्या हक्कांचा, अधिकारांचा कैवार घेण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला. ‘सोमवंशीय मित्र’ हे पहिले दलित वर्तमानपत्र सुरू करण्याचे, संपादनाचे, श्रेय कांबळे ह्यांना जाते. दलित चळवळीतील आणखी मोठे नेते, एम्प्रेस मिलमधील कामगारांचे नेतृत्व केलेले, किसन बनसोडे ह्यांनी छापखाना सुरू केला होता. त्यांनी ‘निराश्रित हिंदू नागरिक’, ‘मजूर पत्रिका’, ‘चोखामेळा’ ही प्रकाशने स्वतःच्या छापखान्यातून प्रकाशित केली.
डॉ.आंबेडकरांच्या ह्या लक्षणीय कामगिरीची १९८७ सालापासून दखल घेतली गेली. त्यांचे पत्रकारी लेखन काव्यात्म आहे. त्यात बरेच वितंडही आहे. विरोधकांना विचारपूर्वक, तोडीस तोड प्रत्युत्तरे दिलेली आहेत. अस्पृश्यांवरील अत्याचार व कल्याणकारी धोरणे ह्यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तिवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो. सामाजिक व राजकीय सुधारणासंबंधित सरकारी धोरणे, राजकीय पक्षांच्या भूमिका, ह्यां संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेले आहे. त्यांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार व तात्त्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणावर दलितांच्या स्वातंत्र्याची व त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्रे छापलेली आहेत. पत्रकारिता हा कायमच दलित चळवळीचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. दलितांच्या नेतृत्वाखालील सामाजिक व राजकीय उपक्रमांना समांतरपणे त्यांची पत्रकारिताही सुरू राहिली. आंबेडकरांच्या काळाप्रमाणे आजही दलितांना छापील माध्यमांमधील पत्रकारिता असाध्य आहे.
आंबेडकरांचे पत्रकारी लेखन मराठीत आहे. ते लेखन आपला राष्ट्रीय ठेवा आहे. त्यामुळे त्यांचे पत्रकारी प्रहार अनेक भाषांमध्ये जनतेसाठी मुक्तपणे उपलब्ध करून द्यायला हवेत. तळागाळातील लोकांसाठी आवाज उठवणारी यंत्रणा म्हणजे पत्रकारिता आहे. ती समाजमनाचा आरसा आहे. त्यामुळे जनतेतील प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर होणे गरजेचे आहे.
खारघर, नवी मुंबई
9653445835
सौ. भारतीजी, आपण या लेखातून डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका नव्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. खरोखरच डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या क्षेत्रात फदार्पण केले, त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे. अर्थिक पाठबळाशिवाय पत्रकारिता करणे सामान्य गोष्ट नाही. पण डाँ. बाबासाहेबांनी त्यांची सर्व बुध्दिमत्ता आपल्या ज्ञातीतिल तळागाळातिल लोकांसाठी उपयोगात आणली असल्याने ते जास्त प्रकाशात येऊ शकले नाहीत. पण त्या़ंच्या ज्ञातिबांधवांनी खरे तर त्यांची प्रतारणाच केली.