गतानुगतिक निबद्धता आणि ‘असहमती’च्या निमित्ताने

१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि १९५० साली भारतीय संविधान अंमलात आले. भारतीय समाजाला नवसमाज निर्मितीच्या दृष्टीने एक नवे भान या दोनही घटनांनी बहाल केले. याच भानातून देश एक राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. याच पार्श्वभूमीवर नंतरच्या काळात देशाने स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता. पण, कोणाला माहीत होते या देशाचा पुढील इतिहास कसा लिहिला जाणार आहे ते? स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानंतरचा एकूणच कालखंड हा देशाच्या पुढच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला! 

– १ –

१९७४ साली मे महिन्यात देशातील रेल्वे कामगारांचा वीस दिवसाचा संप झाला होता. त्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये गुजरातच्या अहमदाबाद – बडोदामध्ये एका छोट्या कारणासाठी विद्यार्थ्यांचा संप पुकारला गेला. चार महिने चाललेल्या या आंदोलनात १०० हून अधिक बळी गेले. या घटनेला राजकीय वळण मिळाले आणि तेथील काँग्रेससरकारचा बळी गेला. हे शमते, न शमते तोच तिकडे बिहारमध्ये ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’च्या नावे एक दुसरेच आंदोलन उभे राहिले. त्यावेळी संन्यासात गेलेल्या जयप्रकाश नारायण यांना या आंदोलनात ओढले गेले; आणि या आंदोलनाभोवती तत्कालीन सर्वच विरोधी पक्ष केंद्राच्या विरोधात एकवटले. एक अराजकसदृश्य अशी स्थिती संपूर्ण देशात तयार होत गेली. या आंदोलनाने (विशेषतः) संपूर्ण उत्तरभारत प्रभावित झालेला होता. या अराजकसदृश्य परिस्थितीला सामोरे जाताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. या आणीबाणीसोबतच त्यांनी वीस कलमी कार्यक्रमही जाहीर केला होता. त्याचे दृश्य परिणाम तसे चांगलेच होते, परंतु उत्तरभारतात कुटुंबकल्याण कार्यक्रमात काही ठिकाणी अतिरेक झाला; आणि दिल्लीतील तुर्कमान गेट प्रकरणामुळे वातावरण भयंकर तापायला लागले. त्याचा उपयोग तत्कालीन विरोधी पक्षाने खुबीने करून घेतला. विरोधी पक्षाचे अनेक बडे नेते तुरुंगात होते. २१ महिन्यांनी आणीबाणी उठल्यानंतर या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्याही! या सर्व घडामोडींमध्ये देशातील एक शक्ती सामील होती. ती म्हणजे आजच्या भाजपचा पूर्वावतार जनसंघ. या शक्तीला तोपर्यंत भारतीय राजकारणात तसा फार मोठा अवकाश नव्हता. पण त्या शक्तीने या सर्व परिस्थितीचा स्वतःसाठी मोठ्या कौशल्याने वापर करून घेतला; आणि आपली शक्ती वाढवत नेली.

या संपूर्ण कालखंडाचा देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला व साहित्य यांवर नक्कीच परिणाम झाला. १९७४ ते १९७८-८० या दरम्यानच्या काळात अनेक लेखकांनी/कलावंतांनी साहित्य व कलेची निर्मिती केली. मग त्यात नाटक असेल, कथा असेल, कादंबरी, कविता असेल, वा कोणत्याही साहित्यप्रकारांतील लेखन असेल, ते पुढे आले. काही दिग्गज कवी, लेखक, कलावंतांनी त्यावेळी आणीबाणीचा तीव्र विरोध केला. पण त्यानंतरच्या कालखंडात मात्र मग ते कुठेच दिसले नाहीत.

– २ –

अशा पार्श्वभूमीवर अशोक नामदेव पळवेकर १९८० च्या दरम्यान मराठी नियतकालिकांच्या आणि वर्तमानपत्रांच्या साहित्यपुरवण्यांमधून कविता लिहू लागले होते. आजच्या घडीला त्यांच्या कवितालेखनाला साडेचार दशकांचा कालखंड झाला आहे. एखाद्या कवीने साडेचार दशकात आपल्या कविता पुस्तक स्वरुपात येऊ न देणे हा वाचकांवर एकप्रकारे झालेला अन्यायच आहे. नियतकालिकांतून आणि वृत्तपत्रांतून येणाऱ्या त्यांच्या कवितांनी त्यांची निश्चित अशी एक ओळख मात्र तयार होत गेली. ते गंभीर प्रकृतीने सातत्याने लिहीत राहिले. या काळात त्यांनी केवळ कवितालेखनच केले असे नसून वैचारिक लेखनसुद्धा तेवढ्याच समर्थपणे ते करीत राहिले. आपल्या सभोवतालाबद्दलची त्यांची भूमिका ते त्यातून सातत्याने मांडत गेले.

– ३ –

अशोक नामदेव पळवेकर यांची कविता नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर यांच्या कविकुळाशी नाते सांगणारी आहे. त्यांची कविता ही केवळ सभोवतालात घडणाऱ्या घटनांची प्रतिक्रिया नाही, तर ती या देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विश्वात घडणाऱ्या घटनांच्या मूळाशी कोणते मूलतत्त्व आहे याचा नेमकेपणाने शोध घेणारी आणि त्यावर विवेकशील भाष्य करणारी कृती आहे! त्यामुळेच अशोक नामदेव पळवेकर हे आपल्या सभोवतालातील घटनांकडे केवळच तटस्थपणे पाहत नाहीत, तर त्या घटनांमागील व घटितांतील निहीत तत्त्वे नेमकेपणाने त्यांच्या कवितेतून आपल्यासमोर मांडतात. एक वैचारिक तत्त्वव्यूह ते आपणांसमोर ठेवतात. हे वैचारिक तत्त्वव्यूह म्हणजे बुद्धापासून, कबीरापासून सुरू झालेला आणि थेट महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार यांच्यासह त्यांच्या विचारांचा येथील फॅसिस्ट विचारांशी असलेला संघर्ष अगदी स्पष्टपणे अधोरेखित करते. अर्थात्, हे करताना ते कोणत्याही प्रकारची भीडमूर्वत न बाळगता सर्वप्रकारची जोखीम पत्करून एक वास्तव, एक सत्य पुढे आणतात. ज्या काळात फॅसिस्ट प्रवृत्तीच्या सत्ताधारी लोकांकडून असत्य हेच सत्य म्हणून जाहीर केले जाते आणि सत्याची ओळखच पुसली जाते त्या काळात!

एवढेच नव्हे, तर जगभरातील आपले वैचारिक सहप्रवासी असणाऱ्यांची आपल्या येथील समतेच्या लढ्यासाठी कशी गरज आहे, तेही त्यांच्या कवितेतून पुढे येते. ‘फिडेल, तू मरू शकत नाहीस!’, ‘बर्ट्रोल्ड ब्रेख्त : एक संवाद’, ‘काल, पाब्लो मला भेटला!’ यांसारख्या कवितांमधून ती बाब आपल्या लक्षात येते. म्हणूनच ‘फिडेल…’ या कवितेत-

भांडवलशाहीच्या
अंकित भाडोत्रींनी
कितीही केली ना कोल्हेकुई
तुझ्याविरोधात
तरीही, तुझ्या केसाला ते लावू शकत नाहीत धक्का…
आजही आणि उद्याही…!’

हा जागतिक पातळीवरील बंधुभाव एका विश्वासासह ते आपल्या मनात सहज बाळगू शकतात. तसेच ‘कलावंताला त्याची भूमिका असलीच पाहिजे’, हा आग्रह कविवर्य नारायण सुर्व्यांनीसुद्धा एका ठिकाणी व्यक्त केला आहे. कवी अशोक नामदेव पळवेकर हेसुद्धा ती भूमिका स्वीकारतात आणि ब्रेख्तशी संवाद करताना कवितेच्या शेवटी सज्जड इशाराच देतात –

तुम्ही कुणीही असा :
कवी-लेखक-कलावंत
किंवा धनाढ्य किंवा मध्यम
किंवा सामान्य माणूस
तुम्हाला, तुमची राजकीय भूमिका असलीच पाहिजे!’

कारण राजकीय सत्ताकेंद्राचा प्रभाव आपल्या समाजातील संपूर्ण लोकजीवनावर पडत असतो. ही जाणीव या कवितेतून मांडली जाते. आजच्या राजकीय संधिकालात समतेचा (समरसतेचा नव्हे) जयघोष करणाऱ्यांनी अशी राजकीय भूमिका घेणे किती आवश्यक आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. याच मालिकेतील ‘काल, पाब्लो मला भेटला!’ या कवितेत जनतेच्या कवीला हुकूमशाही प्रवृत्तीचा सत्ताधीश कसा वचकून असतो हे सांगताना एक सत्य अधोरेखित केले जाते. पाब्लो या जनतेच्या कवीला मारण्यासाठी हुकूमशाहाने पाठवलेल्या भाडोत्री मारेकऱ्यांच्या संदर्भात तो स्वतः कथन करतो –

तेव्हा,
मी म्हणालो त्यांना-
मीच तो, नेफ्ताली रिकार्दो रेईस बासोल्तॉ
ऊर्फ पाब्लो नेरुदा!
ते पुस्तक.. हां तेच.. ते आहे :
माझ्या कवितेचे पुस्तक ‘Heights of Macchu Picchu’
ते घ्या इकडे..
त्यात : मी जपून ठेवल्या आहेत-
माझ्या बंदुका.. माझा तोफखाना.. माझी हत्यारं..!
आणि, वाचू लागलो माझी एकेक कविता..
त्यांच्यासमोर.
हे ऐकताच, ते क्षणभर भांबावले..
म्हणाले : ‘वेडा दिसतोय हा!’
आणि, मला तसेच सोडून, ते तिथून पळून गेले..
भाडोत्रीच ते
त्यांना काय कळणार
कविता-बिविता?
तेव्हा, तुमचा देश काय- आमचा देश काय,
सगळीकडे सारखेच..!
काल,
पाब्लो मला भेटला तेव्हाची गोष्ट..’

या अशा कवितांनी जगभरातील फॅसिस्ट प्रवृत्ती आणि जनकल्याणाची भूमिका घेणारे लोक, कवी-लेखक-कलावंत यांच्या विरोधी भावनेतील विश्वबंधुत्वाचे आपले नाते अधिक उजागर होते. हे नाते असे असणे आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे हे सांगायलाच पाहिजे, असे अजिबात नाही. जगभरातील उजव्या शक्ती अधिकाधिक प्रबळ होत आहेत. ब्राझिल असेल किंवा एकच एक स्वतःला कोतवाल समजणारा अमेरिका असेल, त्याच्या माजी अध्यक्षाचे अलिकडचे वक्तव्य आठवून पाहा. हे चित्र स्पष्ट होईल.

आपल्याही देशात तीच भाषा उजव्या शक्तींकडून केली जात आहे. ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या कवितेत त्या भाषेचा सर्वांगीण प्रत्यय येतो. हा डेंजर वारा भयंकर अशा चक्रीवादळात कधी रुपांतरीत होईल, हे सांगता येत नाही. म्हणूनच कवी अशोक नामदेव पळवेकर जनतेला इशारा देताना –

एक अनामिक अंधार
पसरत चालला आहे आपल्या सभोवताल, झपाट्याने’ 

हे भयसूचक वास्तव आपल्या संवादचर्चेत आणतात. कवीला हे भयसूचन का द्यावेसे वाटत असेल? ते समजून घेण्याची गरज आहे. (खरेतर, अरुण कोलटकर आणि अशोक पळवेकर या दोन्ही कवींच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या एकाच शीर्षकाच्या कवितांचा तौलनिक अभ्यास सहज शक्य आहे.) पळवेकरांच्या कवितेतील ‘डेंजर वारा’ समजून घेताना याच कवितासंग्रहातील ‘ॲडाल्फ हिटलरची चरित्रकथा’ ही कविता जरूर वाचली पाहिजे. या कवितेतील शेवटची ओळ स्पष्ट इशारा देते – 

हिटलर, लोकशाही मार्गानेच सत्तेत आला होता;
आणि बनला होता हुकूमशहा!’ 

या ठिकाणी लोकशाही सत्ताकव्यवस्थेला असलेला धोका या डेंजर वाऱ्याच्या एकूणच लहरींतून सहज जाणवणारा आहे. 

अशोक नामदेव पळवेकर यांच्या ‘असहमतीचे रंग’ या संग्रहात लोककल्याणकारी व्यवस्थेला मुळापासून धक्का पोहोचवणाऱ्या अशा धोक्याच्या सूचना देणाऱ्या अनेक जागा आहेत. त्या सर्व जागा आपल्याला फॅसिस्ट प्रवृत्ती आणि भांडवलदारी वृत्ती यांच्यातील अभद्र युतीचे स्वरूप उलगडून दाखवतात.

– ४ –

या कवितांमधून कवी अशोक नामदेव पळवेकर यांनी या देशाच्या नकाशावर आधी जे घडले व तूर्तास जे घडू पाहात आहे त्याचा एक ‘एक्स-रे’च आपल्यासमोर ठेवलेला आहे. आजचा काळ हा आपल्या सामाजिक, आर्थिक समतेसाठी व श्रमणसंस्कृतीच्या अस्तित्वासाठी निकराने लढण्याचा काळ आहे. यासोबतच या देशातील सर्व शोषित घटक एक होऊन फॅसिस्ट प्रवृत्तीच्या सत्तेला शेवटचा धक्का देण्याचीही गरज आहे. विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, खाणे-पिणे, कुठे राहाणे या सर्वच गोष्टींच्या स्वातंत्र्याचा कडेलोट होईल का? अशी भीती दर्शवणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला सतत घडताना दिसत आहेत. कारण आपल्या असहमतीचा अवकाश नाकारला जातो आहे. खरेतर, असहमती ही आपल्या स्वातंत्र्याची द्योतक असते. परंतु तिचाच अवकाश संपुष्टात आणला जातो आहे. याचा अर्थ आपले स्वातंत्र्य धोक्यात आले आहे! हे वास्तव भयंकर आहे. ज्या देशामध्ये जगातील एक उत्तम संविधान मनुस्मृतीच्या समर्थकांकडून दिवसाढवळ्या जाळले जाते, तरीही आम्ही काही करू शकत नाही. सत्तेचे त्यांना अभय असते. तसेच संसद ही आपल्या लोकशाहीचे, सर्वधर्मभावाचे, निष्पक्षतेचे एक उत्तम प्रतीक आहे. परंतु उपलब्ध लोकशाही यंत्रणांचा सत्तेच्या आश्रयाने गैरवापर करून तिला निष्प्रभ केले जात आहे. ही स्थिती विचार करणाऱ्या माणसाला अधिक अस्वस्थ करणारी आहे. आपल्या सत्तेचा दुरुपयोग एका विशिष्ट धर्मावलंबनासाठी व भांडवलदारांच्या हितसंवर्धनासाठी बेमुर्वतखोरपणे केला जातो; आणि आपल्याला हे केवळ असहाय्यपणे पाहावे लागते, ही दडपशाही आणि हुकूमशाहीचीच तर नांदी नव्हे, तर काय आहे?

– ५ –

अशावेळी मित्रवर्य अशोक नामदेव पळवेकर यांचा काव्यसंग्रह मराठी काव्यविश्वात, साहित्यविश्वात दाखल होणे ही निश्चितच ऐतिहासिक घटना आहे, हे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. जात-धर्म-पंथ-लिंगभाव या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक सर्वव्यापक जाणीव या काव्यसंग्रहातून अत्यंत प्रगल्भपणे अभिव्यक्त झाली आहे. खरेतर, ही कविता म्हणजे सामान्यातील सामान्य माणसाच्या जगण्याच्या पसाऱ्यातील सामाजिक, आर्थिक दु:ख जाणिवेच्या कवितेचे एक समकालीन प्रारूपच आहे. तसेच, आंबेडकरवादी कवितेचा आशयपोत नेमका कसा असावा याचे हा काव्यसंग्रह एक नवे प्रारूप आहे.

‘असहमतीचे रंग’ या काव्यसंग्रहाला साहित्यप्रांतातील अनेक प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच प्रसिद्ध कवी व अनुवादक डॉ. युवराज सोनटक्के, बेंगलुरु यांनी या कवितासंग्रहाचा ‘असहमति के रंग’ या शीर्षकाने हिंदी भाषेत अनुवाद केला आहे, तोही प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे साहित्यप्रांतात या कवितेची जोरदार चर्चा होईल, याबद्दल मला खात्री आहे.

अभिप्राय 2

  • नेहमीप्रमाणेच प्रस्तुत अंक सुंदर आहे. वैचारिक मांडणीची संपन्नता हे ‘आजचा सुधारक’चे वैशिष्ट्य आहे. आपल्या सभोवतालचे वास्तव आणि विचार क्षेत्रातील चिंतनाची दिशा या अंकातून स्पष्ट होते. धन्यवाद!

    प्रभू राजगडकर यांचे मनःपूर्वक आभार!

  • प्रभू राजगडकरजी, या त्रैमासिकाच्या मनोभूमिकेला साजेसा असाच आपला लेख आहे. एका कवीच्या आडून आपण विद्यमान सरकारचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशा लेखांनी भारतीय जनतेचा बुध्दिभ्रंश होऊ शकत नाही, हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने सिध्द केले आहे. विपक्षियांनी असत्याचा आधार घेऊन मतदारांचा बुध्दीभ्रंश करण्याचा प्रयत्न करूनही सुजाण मतदारांनी मोदीजिंना तिसय्रांदा पंतप्रधापदी विराजमान केले आहे.
    आपल्या देशात स्वातंत्र्य प्राप्ती नंतर निर्विवाद बहूमताने एकपक्षिय कांग्रेसचे सरकार आले होते. त्या काळात विरोधी पक्ष अभावानेच अस्तित्वात होते. पण त्या काळात कोण्या तथाकथित बुध्दीवाद्याने एकपक्षीय हुकूम शाहीची ओरड मी माझ्या चौय्रांऐशीच्या वयात ऐकली नव्हती. त्या सरकारने आपल्या पाशवी बहूमताचा फायदा उठवून राज्यघटनेच्या सर्वधर्म समभाव या तत्वाला मुरड घालून मुसलमानांना अल्पसंख्याक ठरवून लाभ बहाल केले. राज्यघटनेत हिंदू विरोधी कलमं घुसडली. पण कोणी बोंबाबोंब केल्याचे मला अठवत नाही. पण आज कित्येक दशकांनंतर दोन हजार चौदा साली भाजपचे निर्विवाद बहूमतांचे एकपक्षिय सरकार आल्यावर आपण हिंदू तथाकथित बुध्दिवाद्यांनी ओरड चालू केली आहे, याचेच नवल वाटते. पण मोदीजिंनी निर्विवाद बहूमत मिळुनही सत्तेवर येताच ‘ सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ‘ अशी घोषणा करुन त्या प्रमाणे कारभार केला आहे. मुस्लिम स्त्रियांवरील तीन तलाकची टांगती तलवार दूर केली, पायाभूत विकासाला प्राधान्य देऊन संपूर्ण देशात विकास केला. पण तरीही गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम स्त्रियांनी त्यांच्यावर अन्याय करणाय्रा मुल्ला, मौलविंच्या सुचनां प्रमाणे मतदान केले. पण सुबुध्द भारतीय मतदारांनी मोदीजिंना तिय्रांदा पंतप्रधानपदी आणले हे देशाचे भाग्यच म्हणावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.