सत्योत्तर संहिता

अडवून बसला जो वाट अंधाराची
त्या प्रकाशाला हटकावे कोणीतरी
मतैक्याला धरून बसती जेथे सारे
भेदनीती शिंपडावी तेथे कोणीतरी ||१||

चांगलेच चांगले घडत असेल कुठे
थोडेतरी विष पेरावे तेथे कोणीतरी
अमृताच्या झडत असताना पंगती
मदिरेची महती वर्णावी कोणीतरी ||२||

वाट असेल जर फुलांनी सजलेली
काटे थोडे अंथरावे तेथे कोणीतरी
शोधून सुखाधीन सगळे राजयोगी
दुःखात भिजवावे त्यांना कोणीतरी ||३|| 

सरळ जाणारे रस्त्यात भेटले कुणी
चकवा पेरावा रस्त्यावर कोणीतरी
दिसता कुणी पुजारी सभ्यतेचे कुठे
मूर्खांतच मोजावे तयांना कोणीतरी ||४||

सत्याचीच वाहवा केली जाते जिथे
सत्यापलाप पेरावा तिथे कोणीतरी
शब्दांनी सांधली जाते एकता जिथे
शब्दभ्रम पसरावेत तिथे कोणीतरी ||५||

सामूहिक शहाणीव आढळेल जिथे
“मी”चे पाढे वाचावे तिथे कोणीतरी
नेतृत्व सक्षम दिसून आले जर कुठे
प्रतिमाभंजन मंत्र गावे कोणीतरी ||६||

जयचंदांची होत असेल जर छी-थू
छद्मी जयचंद उभारावे कोणीतरी
सापडला जरी समाजकंटक स्पष्ट
‘तो मी नव्हेच’ सांगे तोच सर्वोपरी ||७||

@खिलीरामभाऊ

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.