पंतप्रधानांच्या सभेचा लेखाजोखा

दिनांक: २८ फेब्रुवारी २०२४.
मुक्काम पोस्ट- डोरली, जिल्हा- यवतमाळ

भाग:१
प्रचंड मानवी तासांचा अपव्यय

सभेला सकाळी नऊ वाजल्यापासून बायका आणून सोडायला सुरुवात झाली होती. माहूर, अकोला, नांदेड अशा दूरदूरच्या महिला सकाळी सहा वाजताच घराबाहेर पडल्या होत्या. जिथे बस पोहोचत नाही अशा आडवळणाच्या गावातील महिला बसस्टॉपपर्यंत पायी आल्या होत्या.‌ वेगवेगळ्या गावांमधून एसटी बसेस भरून महिला आणल्या गेल्या. एसटी बसमध्ये त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय केली होती. प्रत्यक्ष सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली.

सकाळपासून तिथे लावलेल्या सीसीटीव्ही पडद्यांवर फक्त समोर बसलेल्या प्रेक्षक महिलांची चित्रे फिरत होती. दुसरे काहीही नाही. स्टेजच्या बाजूला स्थानिक कलावंतांचा गाण्याचा कार्यक्रम चालू होता. या गाण्यांची निवड कोणी केली होती माहीत नाही. चमत्कार म्हणजे “लखाबाय पोतराज आलाया भेटीला….” हे गाणं ऐकल्यावर मी थक्क झाले. मराठी भाषेत स्त्री-शक्तीचा जागर करणारी अनेक उत्तमोत्तम गाणी असताना अत्यंत अभिरुचीहीन गाण्यांची लयलूट चालू होती. मोदींना यायला उशीर होणार हे संयोजकांना नक्कीच माहीत असणार.

सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असे नऊ तास तिथे लाखो बायका उपस्थित होत्या. या महिलांना:

१: प्रेरणादायक चित्रपट दाखवता आले असते.
२: उत्तम दर्जाची मराठी नाटके दाखवता आली असती.
३: खुद्द बचतगटामध्ये अनेक महिला कलावंत आहेत. त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी थोडा वेळ तरी संधी देता आली असती.
४: बचत गटाचे महत्त्व सांगणारी गाणी किंवा डॉक्युमेंटरीज दाखवता आल्या असत्या.
५: हिवरेबाजार येथील करोडपती महिलांच्या मुलाखती दाखवत्या आल्या असत्या.
६: आरोग्य आणि शिक्षणाचे महत्त्व सांगता आले असते.
७: मध्ये चहाचा ब्रेक द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. कारण तिथे चहाच उपलब्ध नव्हता.
(व्हॉट्सअपवर पाठवलेल्या संदेशात “चहा मिळेल” असा स्पष्ट उल्लेख असताना चहा कुठेच दिसला नाही.)
८: ग्रामीण भागातील महिलांना सलग आठ-नऊ तास अशी फुरसत आयुष्यात कधीच मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविण्याची ही दुर्मिळ संधी होती. त्यांना नव्या जगाचे ज्ञान देण्यासाठी काही वैज्ञानिक कार्यक्रम दाखवता आले असते.
९: अगदी भाजपचाच प्रचार करायचा होता तर नितीन गडकरी यांच्या खुमासदार मुलाखती दाखवल्या असत्या तरी उपस्थित महिलांना काव्य-शास्त्र-विनोदाचा आनंद काय असतो ते तरी समजले असते.

पण असे काहीच घडले नाही. सलग नऊ तास अत्यंत दर्जाहीन बडबड ऐकावी लागली. मोदीजी येण्यापूर्वी स्थानिक नेत्यांनी रटाळ भाषणे केली. सूत्रसंचालक महिला पुन्हा पुन्हा तीच तांत्रिक माहिती रट्टा मारल्यासारखी वाचून दाखवत होत्या. वातावरण पूर्णपणे निरस, कंटाळवाणे आणि उष्ण होते. सभेसाठी जशा खुर्च्या भाड्याने आणल्या होत्या तशाच महिलाही आणल्या होत्या असे वाटत होते.
कल्पकतेचा संपूर्ण अभाव असलेला कार्यक्रम झाला. भारतीय जनता पक्षाने एवढ्या मोठ्या सभेवरून माघारी जाताना एखादे उपयोगी मूल्य किंवा तेजस्वी विचार घेऊन जाण्याची एकही संधी या बायकांना मिळू दिली नाही.

भाग: २
पर्यावरणाची हानी करणाऱ्या सिंगल युज प्लास्टिकचा बेसुमार वापर

उपस्थित लाखो महिलांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून हजारो क्रेट पाणी आणून ठेवले होते. ग्रामीण भागातल्या महिला, ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी टँकरने पाणी भरले आहे, डोक्यावरून हंडे वाहिले आहेत त्यांना पिण्यासाठी थंडगार मिनरल वॉटर आयते हातात देण्यात आले. इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे हे लवकरच बायकांच्या लक्षात आले. त्यांनी एक बाटली घ्यायची जेवढी तहान आहे तेवढे पाणी प्यायचे आणि उरलेली बाटली तिथेच फेकून द्यायची, पुन्हा तहान लागल्यानंतर नवीन बाटली आणायची हे उद्योग केले.

लाखो बाटल्यांचा कचरा दुसऱ्या दिवशी उचलावा लागला. याऐवजी थंड पाण्याचे टँकर ठेवून बायकांना घरून आपापला ग्लास आणायला सांगता आले असते आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळता आला असता.

ग्रामीण भागातल्या महिलांना सप्ताहाला जाताना घरून ताट-पेला न्यायची सवय असते.

थर्माकोलच्या बाऊलमधून मसालेभात देण्यात येत होता. त्याचेही या मूर्ख बायकांनी असेच केले. हावऱ्यासारखे बाऊल घेतले आणि न खाल्ले गेलेले असंख्य भाताचे बाऊल्स परिसरात फेकून दिले. फुकट रेशन मिळाल्यामुळे ग्रामीण जनतेला अन्नाची किंमत उरलेली नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या सिंगल युज प्लास्टिकचा असा उद्धट वापर करण्याचा राज्यकर्त्यांना मुळीच अधिकार नाही.

बचतगटामुळे महिला समृद्ध झाल्या पण शहाण्या झाल्या नाहीत.

भाग : ३
बेसुमार कार्बन उत्सर्जन

वेगवेगळ्या ठिकाणावरून सभेसाठी महिला आणल्या गेल्या. दोन हजाराच्या आसपास एसटी बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या. एक बस भरणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये दिले जात होते, असे तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले. बसमध्ये पेयजलाची सोय होती. याशिवाय असंख्य दुचाकी आणि चारचाकी गाड्या येणे साहजिक होते. ज्या लोकांना भाषण ऐकायला यायचे आहे ते लोक स्वेच्छेने आलेच असते. ज्यांना यायचेच नव्हते त्यांच्यासाठी गाड्या पाठवण्याची आणि त्यांना बळजबरीने आणण्याची राज्यकर्त्यांना का गरज पडावी?

मोदीजी समाजात आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या नेत्याच्या सभेसाठीसुद्धा माणसे उचलून आणावी लागतात ही शोकांतिका आहे.

या सगळ्या वाहनांनी कालचा वायूप्रदूषणाचा इंडेक्स प्रचंड वर नेला होता.

भाग :४
रटाळ भाषणांची गर्दी

पंतप्रधान वगळता एक देवेंद्र फडणवीस सोडले तर कुणीही मुद्देसूद बोलले नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजात उर्जा होती आणि चिठ्ठीवर न पाहता त्यांनी अतिशय अचूक भाषण केले. एकही शब्द इकडचा तिकडे जाऊ दिला नाही. मुख्यमंत्री महोदयांनी कागदावर लिहिलेले भाषण त्यांच्या निरस शैलीत वाचून दाखवले. अजित दादा पवार यांच्या बोलण्यात अजिबात दम नव्हता. देवेंद्र फडणवीस अत्यंत कमी वेळात, अत्यंत योग्य शब्दांत, मोजके बोलून बाजूला झाले. महिला मोदीजींना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत हे त्यांना माहीत होते. बाकी स्थानिक लोकांची भाषणे इतकी बकवास होती की ज्यांना मुद्द्याला धरून बोलता येत नाही असे लोक स्टेजवर का पाठवले असावेत?

भाग : ५
मोदींच्या भाषणाला टाईम मॅनेजमेंटचे गालबोट!

मोदी हे उच्चांकी लोकप्रियता असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत याचा काल पुन:प्रत्यय आला. खरंतर ते काल काहीच वेगळे बोलले नाहीत. त्यांची रोजचीच ठरलेली वाक्ये ते बोलले. सुरुवात मराठीत केली. स्थानिक स्वाभिमानाच्या प्रतिकांची नावे घेतली.

त्यांच्या लोकप्रियतेमुळे बायका भाषण ऐकण्यास उत्सुक होत्या. परंतु वेळ टळून गेल्यामुळे भाषण सुरू असतानाच त्या उठून मंडपाबाहेर जात होत्या. मोदींचे भाषण सुरू असताना ८०% मंडप मोकळा झाला. त्यांच्या भाषणाच्या शेवटी मंडपात जेमतेम दहा टक्के लोक उरले होते.

कालच्या सभेला सकाळी नऊ वाजल्यापासून महिला यायला सुरुवात झाली होती. यातल्या बहुतांश महिला ग्रामीण भागातील कष्टकरी महिला होत्या. बचतगटाच्या महिलांसाठीच हा कार्यक्रम असल्यामुळे निम्न आर्थिक स्तरातील महिलांची गर्दी होणे साहजिक होते.
सभेची वेळ दुपारी एकची दिली होती. प्रत्यक्ष सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. दूर गावावरून आलेल्या महिला कंटाळून गेल्या होत्या. त्यांना घरी परतण्याची ओढ लागली होती. त्यांना आणण्यासाठी एसटी बसेसची वाहनव्यवस्था केली होती. त्यामुळे जोपर्यंत ड्रायव्हर गाडी काढत नाही तोपर्यंत त्या माघारी जाऊ शकत नव्हत्या. आणि सभा संपल्याशिवाय ड्रायव्हर गाडी काढणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या नाईलाजाने अडकून पडल्या होत्या‌

संध्याकाळी सहा वाजता मोदी आल्याचे जाहीर झाले. बायका खुर्च्यांवर उभ्या राहून प्रवेशद्वाराकडे पाहू लागल्या. पण पंतप्रधानांनी स्टेजच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. ते आल्याचे पडद्यावर दिसताक्षणी उपस्थित लाखो महिलांनी टाळ्यांचा इतका मोठा कडकडाट केला की अंगावर शहारा आला. सकाळपासून सभामंडपात निर्जीव वातावरण पसरले होते ते एकदम ताजेतवाने झाले. बायकांच्या टाळ्या थांबायला तयार नव्हत्या. जय श्रीराम, मोदी मोदी, आणि इतर अनेक चित्कार यांनी वातावरण एकदम ऊर्जावान झाले होते. मोदी आजही सामान्य महिलांमध्ये किती लोकप्रिय आहेत याचा दोन-तीन क्षणात अंदाज आला.

पण पहिल्या पाच मिनिटातच हा बहर ओसरला. रटाळ भाषणे सुरू झाल्याक्षणी बायका उठून मंडपाबाहेर निघाल्या. दिवसभर मंडपात बसून कंटाळलेल्या बायका मोदींचे भाषण सुरू होण्याची वाटही न पाहता उठून चालू लागल्या.

मोदींचे भाषण सुरू झाले, त्यावेळेसही बायकांचे मोठ-मोठे लोंढे मंडपाबाहेर पडत होते. मोदींच्या भाषणात कुणाला कसलाच रस उरलेला दिसत नव्हता.

संध्याकाळचा घरचा स्वयंपाक, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि घरी वाट पाहणारी लेकरे यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्या पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच उठून चालू लागल्या.

भाग:६
निवडणूक निकालाचा अंदाज

सभेची एकूण यशस्विता लक्षात घेता पुढील पाच वर्षे पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता ८० ते ९० टक्के आहे असे उपस्थित जाणकारांचे म्हणणे पडले. पण एकंदरीत लोकांच्या बोलण्याचा रागरंग पाहता काहीसे तसेच वाटत आहे.
(इथे सभेची यशस्विता म्हणजे गर्दी असा अर्थ घ्यावा.)

भाग: ७
सभांसाठी मार्गदर्शक सूचना

२०२४ च्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. इथून पुढे प्रचारसभांना सुरुवात होईल आणि जोर येईल. त्या सर्व प्रचारसभांसाठी काही मार्गदर्शक सूचना:

१. सभेची भरपूर जाहिरात करावी. वृत्तपत्रातून बातम्या द्याव्यात, रेडिओवरून सभेची जाहिरात करावी. परंतु गर्दी जमवण्यासाठी गाड्या अजिबात पाठवू नयेत.
२. जाहीर सभा घेण्यासाठी पर्यावरणाची इतकी हानी करावी लागत असेल तर सर्व पक्षांनी आपापले स्वतंत्र यूट्युब चॅनल काढून त्यावरून जाहीर सभा घ्याव्यात.
३. जाहीर सभेच्या ठिकाणी थंड पाण्याचे टँकर्स उभे करावेत आणि लोकांनी सभेला येताना आपापल्या घरून ग्लास-फुलपात्री घेऊन यावेत असे सांगावे. म्हणजे सिंगल युज प्लास्टिकचा बोजा वाढणार नाही.
४. अन्न मोठ-मोठ्या पातेल्यात शिजवून ठेवावे. ग्रामीण भागातील लोक आपापल्या घरून ताटल्या-वाट्या घेऊन येतील, जेवतील आणि आपल्या ताटल्या माघारी घेऊन जातील. पर्यावरणासाठी घातक असलेले थर्मोकोल अजिबात वापरू नये.
५. सभेचा जो मुख्य वक्ता आहे, त्यानेच फक्त बोलावे. मुख्य वक्त्याची ओळख करून देण्याची गरज नसते. समाज त्याला (आतून बाहेरून) चांगला ओळखत असतो.
६. नवीन नेतृत्वाला जास्तीत जास्त संधी द्यावी. ज्यांच्याकडे वक्तृत्वशैली नाही त्यांना मुळीच तोंड उघडू देऊ नये. त्यांची कंटाळवाणी बडबड ऐकण्यात अनेक मानवविकास विनाकारण वाया जातात. फुळुक वरणात बुडी मारली तरी डाळ सापडत नाही असे त्यांचे भाषण असते. त्यांच्या बडबडीतून हाताला काहीच लागत नाही.
७. आपापल्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या अडचणी विचाराव्यात आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. लोकांच्या समस्या दूर केल्या तर निवडून येण्यासाठी प्रचार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही.
८. पर्यावरणप्रेमींनी, सुशिक्षितांनी आणि कलावंतांनी सिंगल युज प्लॅस्टिकला विरोध करण्यासाठी वरील ३ आणि ४ क्रमांकाच्या मुद्द्यांचा सर्वत्र प्रसार करावा.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ता, यवतमाळ

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.