काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच.
माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या जाण्याचे दुःख बाजूला राहिले. त्याच्या पार्थिव देहाची विटंबना चालू होती आणि विधींच्या नावाखाली त्याच्या सुपुत्राकडून जे काही प्रकार करून घेतले गेले, ते पाहून उद्वेग वाटला. काही काळापूर्वी आद्य सुधारक आगरकरांचा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या शीर्षकाचा एक निबंध वाचल्याचे आठवले आणि गेल्या दीड शतकात आपल्या धर्मात आणि संस्कृतीत किती फरक झाला ते पाहाण्याची इच्छा झाली आणि तो लेख पुन्हा एकदा वाचला.