ब्राईट्स सोसायटीच्या दशकपूर्तीला नास्तिक परिषदेच्या निमित्ताने जमलेले आपले माननीय प्रमुख पाहुणे जावेद अख्तरजी, मंचावरील आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व नास्तिक मुक्तचिंतक मित्र-मैत्रिणींनो.
सर्वप्रथम, या पुरस्कारासाठी माझी निवड केली यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. अतिशय प्रांजळपणे सांगायचं तर हा पुरस्कार प्राप्त करण्याची पात्रता माझी आहे की नाही हे मला अजिबात माहीत नाही. पण तरीही अतिशय विनम्रपणे याचा स्वीकार करते. मंचावर उपस्थित जावेद अख्तर सर एक शायर किंवा स्क्रीन-प्ले-रायटर म्हणून आपणा सर्वांना अवगत आहेत. मी नास्तिक झाल्यापासून रॅशनॅलिटीसाठी त्यांना फॉलो करते आणि रॅशनॅलिटीसाठी भारतातले म्हणावे असे एक आयडॉल कदाचित तेच असतील. त्यांच्या हातून मला हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी ‘ड्रीम कम्स ट्रू मोमेंट’ आहे आणि आता माझं मनोगत ऐकायचं ही तुमच्यासाठी ‘नाईटमेअर मोमेंट’ आहे. तेव्हा आता मला थोडं सहन करा.
कालपासून आपण विचारांची बरीच घुसळण केली, नास्तिक्याबद्दल बरेच विचारमंथन केले. राजकीय, सामाजिक, सगळ्या पैलूंनी. तर माझा नास्तिकतेचा प्रवास तसा अलीकडचा आहे. म्हणजे सात-आठ वर्षे झाली असतील. तुम्ही इथे जमलेले सगळे बऱ्यापैकी मुरलेले नास्तिक आहात असं मला वाटतं. त्यामुळे माझे काही ताजे अनुभव आहेत किंवा विचार आहेत ते मी तुमच्याशी शेअर करते.
जनमानसात एक साधारण असा समज आहे की, नास्तिक म्हणजे देवाला नाकारणारे. पण नास्तिकता ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त व्यापक किंवा खोल आहे. त्याचा बुद्धिप्रामाण्यवादाचा किंवा विवेकवादाचा जो पैलू आहे तो अजून सगळ्यांना तेवढा ज्ञात नाही. आणि तो आपण कुठेतरी पोहोचवला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण बुद्धिप्रामाण्यवादाने आणि विवेकनिष्ठेने विचार करायला सुरुवात करतो, स्वतःला आणि परिस्थितीला समजून घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा देव नाकारणे हे अतिशय ओघानी आलेलं पहिलं स्थानक असतं. म्हणजे बाय-प्रॉडक्ट असतं असं आपण म्हणू शकतो. पण तिथेच आपला प्रवास संपत नाही. तर तिथून आपला खरा प्रवास सुरू होतो. म्हणजे आताशी कुठे आपण परमेश्वरावर मात केलेली असते. यापुढे आपल्याला कितीतरी अधिक महत्त्वाचे आणि गंभीर विषय आपल्या बुद्धिप्रामाण्याच्या कक्षेमध्ये आणायचे असतात. तर हे आपण कुठेतरी नास्तिक मंच म्हणून व्यवस्थित पोहोचविले पाहिजे.
आज राजकीय पैलूंवर बरीच चर्चा झाली. इथे उपस्थित सर्व मान्यवर, तुषार गांधी सर, ॲडवोकेट असीम सरोदे सर, कुमार केतकर सर, विश्वंभर चौधरी सर, हे लोक आज काय करत आहेत असं जर बघितलं तर कळतं की एक गोदी मीडिया आणि व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीच्या संगमाने अतिशय भडक, बटबटीत, हिंसक आणि घातक, खोटा असा अपप्रचार जो घरा-घरापर्यंत पोहोचवला जातो आहे, त्याचा पोटतिडिकीने लोकप्रतिवाद करण्याचा प्रयत्न हे सगळे करीत आहेत. हा असा अपप्रचार करणं आपल्या देशात इतकं सहज, सोपं का होतं? तर आलेली माहिती बुद्धिप्रामाण्याने पडताळून पाहण्याची सवय किंवा असं ट्रेनिंग आपल्या देशात लोकांना नाही.
पहिल्यापासून भक्तिमार्गाचा आणि अध्यात्माचा किंवा धर्माचा पगडा असल्यामुळे ग्रंथप्रामाण्य किंवा गोष्टी न पडताळता, ‘अमुक कुणी सांगितलं आहे नं, मग ते बरोबरच असणार’ अशा पद्धतीनं त्या विचारांचे गुलाम होण्याची आपल्याला सवय पडली आहे; त्यामुळे कदाचित हे शक्य होत असावं. मग आपण पाहतो, ऐकतोच की, गणपती हा प्लास्टिक सर्जरीचा नमुना आहे किंवा शेणामुळे कोरोनापासून संरक्षण मिळतं. तर ही अशी अतिशय हास्यास्पद वाटणारी विधानं. ही आपल्याला हास्यास्पद वाटत होती, पण आता अभ्यासक्रमातून डार्विन गायब होण्यात त्याची परिणती झाली आहे. ह्याचे गांभीर्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
एक असाही युक्तिवाद केला जातो की धर्म किंवा श्रद्धा ही माझी वैयक्तिक बाब आहे. त्याच्यामध्ये कुणाला काही आक्षेप असायचं काय कारण? वैयक्तिक बाब आहे हे खरं आहे, पण असं होतं की जेव्हा डीजे, लाऊडस्पीकर, मंडप, वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होतं तेव्हा ते सामाजिक, सार्वजनिक जागेचं आणि समाजाचं होतं. मग ती तुमची वैयक्तिक बाब कशी राहते? उपासनास्थळी किंवा प्रार्थनास्थळी जाऊन हवी तशी उपासना करू शकण्याचं स्वातंत्र्य संविधानानं सगळ्यांना दिलं आहेच की. तसंच त्याची चिकित्सा करण्याचंसुद्धा स्वातंत्र्य दिलं आहे. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोण वृद्धिंगत करावा असंही संविधानात म्हटलं आहे. संविधानाचे रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःसुद्धा ‘रीडल्स इन हिंदुइजम’, ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ असे ग्रंथ लिहून धर्माची चिकित्सा केलेली आहे. मग आपण ती का न करावी असा प्रश्न आहे.
मला असं वाटतं की या धर्मवादामुळे आणि आध्यात्मिक पगड्यामुळे एक खूप मोठं नुकसान आपल्या समाजात जे झालं, ते स्त्रियांचं झालं आहे. म्हणजे प्रत्येकच धर्माने स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर जिवंत बाईला नवऱ्याबरोबर चितेत ढकलून मारून टाकणं किंवा केशवपन अशा अनेक अमानुष चालीरीती या समाजात कित्येक वर्षे जिवंत राहिल्या आहेत. त्या प्रथा कायद्याने बंद पाडण्यासाठी समाजसुधारकांनी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा धर्ममार्तंडांनी त्या त्या वेळी त्यांचा विरोधच केलेला आहे. तर स्त्रीमध्ये हे जे एक कायमचं गौणत्व आलंय, त्याचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे. काल लोकेश शेवडे सर जो मुद्दा मांडत होते की बहुसंख्याकवादात आपली भूमिका काय असली पाहिजे? अल्पसंख्याकवादाच्या काही प्रथांच्या बाबतीत वगैरे. तर त्या मुद्द्याशी मी सहमत आहे. पण मला आज एक स्त्री म्हणून त्या सगळ्या स्त्रियांशी संवाद करावासा वाटतो किंवा त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की जेव्हा तुम्ही म्हणता की, ‘धिस इज माय चॉईस’ किंवा ‘धिस इज हर चॉईस’, मग तो बुरखा असेल, हिजाब असेल, घुंगरू असेल, करवाचौथ असेल किंवा वटसावित्री असेल, तर मग चॉईस म्हणत नेमकं काय मिरवतोय आपण? म्हणजे मुळातच धर्मांनी जे बंधनकारक करून ठेवलंय त्याला तुम्ही निवड म्हणून कसं मिरवू शकता? एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही कटाक्षाने करायचं टाळता तेव्हा ती निवड असं आपण म्हणू शकतो. येथे स्त्रियांनी आत्मपरीक्षण करायला हवं, असं मला वाटतं.
आणि श्रद्धा – याबाबतीत काय बोलायचं? ज्यावेळेस जावेद सरांनी आपल्याला ‘फेथ’ची व्याख्या सांगितली की, एनी बिलीफ दॅट इज डिव्हॉइड ऑफ रीझन, रॅशनल, एव्हिडन्स, विटनेस, लॉजिक इज फेथ. आणि मग ते म्हणाले की, दिस इज द सेम केस विथ स्टुपिडिटी. अंधश्रद्धेबद्दलचं त्यांनी हे अतिशय तीक्ष्ण विवेचन करून दाखवलं आहे. श्रद्धेच्या संदर्भात आणखी एक सुविचार मला आठवतोय, तो य. न. वालावलकरांचा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये फरक काय असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या शब्दापेक्षा दोन अक्षरे जास्त आहेत, एवढाच. एवढं मार्मिक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर ह्यावरून आता श्रद्धा काय आहे आणि काय नाही याची आपण एकदा चिकित्सा करावी आणि एक स्त्री म्हणून तर निश्चितच करावी, असं मला वाटतं. मनोगताच्या शेवटी हरिवंशराय बच्चन लिखित मधुशाला ह्या माझ्या आवडत्या कवितेतील चार ओळी फक्त उद्धृत करते आणि मनोगताचा शेवट करते.
“धर्मग्रंथ सब जला चुकी है, जिसके अंदर की ज्वाला
मंदिर, मस्जिद, गिरजे सबको तोड चुका जो मतवाला,
पंडित, मोमीन, पादरियों के फंदो को जो काट चुका
कर सकती है आज उसीका, स्वागत मेरी मधुशाला “
ह्या भाषणाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देव नाकारणे हे विवेकवादाचे बाय-प्रॉडक्ट
याच्यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.
ज्योतीबेटी, या तुझ्या विवेचनात तूं श्रध्दा आणि अंधश्रद्धा या दोन संकल्पनांत गल्लत केली आहेस. श्रध्दा ही डोळस असते आणि अंधश्रद्धा त्या संकल्पनेतच म्हटल्याप्रमाणे अंधळीच असते. आपला हिंदू सनातन धर्म हा खरेतर धर्म नसून ती भारतियांची जीवनशैली आहे; जी आज अनेक देशातही आत्मसात केली जाताना दिसत आहे. सतीची चाल, केशवपन या गोष्टी खरेतर सनातन धर्मात नव्ह त्याच. त्या कांही लोकांनी धर्माच्या नांवाने चालू केल्या होत्या; आणि आपला धर्म कुराण, बायबल सारखा पोथीनिष्ठ नसल्यामुळे त्या प्रथांचा त्याग करण्यांत आला आहे. तूं म्हटल्याप्रमाणे सनातन हिंदू धर्माने कधीही आपल्या धर्माचा प्रचार केल्याचा दाखला इतिहासात नाही. त्यामुळे तूं म्हटले आहेस तसा खोटा अपप्रचार हिंदू धर्माने कधीही केलेला नाही. डार्विनच्या सिध्दांतावर आपले दशावतार आधारलेले आहेत. त्यामुळे डारविनला आपण संपवलेलेच नाही. त्यामुळे नास्तिकते बद्दलचे विचार उथळ वाटतात. आणि स्रियांबद्दल म्हणशील, तर आपली कुटुंबपद्धती, जी जगात वाखाणली जाते; ती आपल्या देशांतिल सुजाण क्रियांमुळेच टिकलेली आहे, हे नाकारुन चालणार नाही.