नास्तिकतेचा प्रवास करावा लागला नाही
नमस्कार.
आज या सगळ्यांची मनोगतं ऐकली. मागे मी एका दुसऱ्या मेळाव्याला गेले होते, भगतसिंग विचारांच्या. तिथंही अनेक जणांचा नास्तिकतेचा प्रवास मी ऐकला. तेव्हा मला माझ्या नशिबातून आलेलं वेगळेपण असं जाणवलं की, मला हा प्रवास कधी करावाच लागला नाही.
मी आजी-आजोबांकडे वाढले, माझ्या आईच्या आई-वडिलांकडे! ते त्या काळामध्येसुद्धा कट्टर नास्तिक होते. माझ्या आजी-आजोबांच्या घरामध्ये देव्हारा नव्हता. माझी आजी कुठलेही उपवास करत नसे आणि विशेष म्हणजे ती माझ्या आजोबांना त्या काळामध्येदेखील ‘ए अप्पा’ अशी नावाने हाक मारत असे. त्या काळामध्ये हा विचार केवढा बंडखोर होता. माझा मामा आणि माझी आई आजोबांना ‘ए अप्पा’ अशीच हाक मारायचे. अर्थात, वडिलांनासुद्धा ‘ए’ म्हणणाऱ्या घरामध्ये मी वाढले. त्यामुळे माझा प्रवास उलटा झाला. मी नास्तिक आहे, आजूबाजूचं जगसुद्धा माझ्यासारखंच आहे आणि जगातले फार थोडे लोक आस्तिक आहेत, असा सुरुवातीला माझा समज होता. आपण किती अल्पसंख्याक आहोत किंवा आपण थोड्या दिवसांत नामशेष होण्याच्या अवस्थेत आहोत याची मला जाणीव नव्हती. त्यामुळे माझा प्रवास इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांहून बरोबर उलटा झालेला आहे.
शालेय वयात असताना सगळ्यांसारखी मी पण मैत्रिणी, खेळ यांमध्येच गुंतलेले होते. त्यामुळे आपण तर नास्तिक आहोत पण बाकीच्या कशा आहेत, याचा कधी विचार केला गेला नाही. लहानपणी माझ्या आजोबांनी एक चांगलं केलं की, लायब्ररीमधून पुस्तकं आणून देऊन मला वाचायची आवड लावली. एक सात-आठ वर्षांपर्यंत वय असतं, तोपर्यंत आस्तिक-नास्तिक हा विचार करण्याच्या वयात आपण नसतो. तर तेव्हा मी कृष्णाची पुस्तकं आणायचे. त्यांची मुखपृष्ठेपण सुंदर असायची. कृष्ण दिसायचा पण छान! असं म्हणता येईल आताच्या भाषेत की, तो माझा पहिला क्रश होता. कृष्ण!! मी मुलांमध्ये क्रिकेट खेळायचे. त्यामुळे कोणी बॉल मारला तरी मला कृष्णासारखा मारता येईल का? किंवा कोणी बॉलिंग टाकली तरी कृष्णासारखी टाकता येईल का? असं मनात येत राहायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्ण बेस्ट आहे असंच मला वाटायचं. त्यामुळे जर कृष्ण असेल तर त्याच्याशीच लग्न करायचं हे माझं पक्कं होत. नंतर मला कळलं की माझी चुकून मीरा वगैरेच झाली असती.
मोठी झाल्यानंतर मात्र प्रश्न पडायला सुरुवात झाली. नागाच्या डोक्यावर एवढा लहान मुलगा नाचेल का? एवढ्याश्या करंगळीवर एवढा मोठा पर्वत त्याला कसा उचलता येईल? सुदैवाने माझ्या आजीने किंवा आजोबांनी “असे प्रश्न विचारायचे नाहीत, मोठ्या माणसांचं खरं मानायचं” अशी बळजबरी कधीही केली नाही. माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली. शाळेतसुद्धा मी भरपूर प्रश्न विचारायचे. त्यामुळे कधीकधी, सगळं शिकवून झाल्यावर मी काहीच विचारलं नाही तर शिक्षक वैतागून म्हणायचे, “तुला आज काही विचारायचं नाहीये का?” इतकी त्यांना माझ्या प्रश्नांची सवय झाली होती.
तर हे एक प्रकारे माझं नशीब होतं की अशा घरामध्ये मी जन्मले. माझे आजोबा कट्टर लोहियावादी होते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. आता थोडंसं विषयांतर होईल पण सांगते. त्या काळामध्ये त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपदक मिळालं होतं. देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा भ्रष्टाचार उघडकीला येऊ लागले, तेव्हा त्यांनी ते ताम्रपदक नाकारलं. मला आठवतंय, मी छोटी असताना कलेक्टरचा माणूस वारंवार ते ताम्रपदक घेऊन यायचा. आणि आजोबा त्याला कडक शब्दात सांगायचे की, त्यांना ते ताम्रपदक मान्य नाही. इतके ते तत्त्वनिष्ठ होते. त्या काळामध्ये आजीवर समाजाचा किती दबाव असेल याची आता मी कल्पना करू शकते. आजच्या काळातसुद्धा बायका एवढे रीतिरिवाज मानतात तर, त्याकाळामध्ये किती मानत असतील? तरीपण आजी स्वतःच्या विचारांवर ठाम राहिली.
रोहा हे माझं माहेरचं गाव आहे. मला त्या गावातल्या लोकांचं पण कौतुक वाटतं. त्या लोकांनी आजीला कधीही त्रास दिला नाही किंवा वाळीत टाकल्यासारखं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या भावनिकदृष्ट्या वाळीत टाकणं असं काही केलं नाही. त्या दोघांना गावामध्ये भरपूर मान होता. नास्तिक असूनसुद्धा, एका छोट्या गावामधे राहत असूनसुद्धा त्या गावाने त्यांना अव्हेरलं नाही. तर मुद्दा असा की या लोकांसोबत असल्यामुळे मला कधीही आपण नास्तिक असल्याचा अपराधबोध झाला नाही. नास्तिक्य म्हणजे जणू आपल्याला एखादा रोग झाला आहे असं कधीच वाटलं नाही.
हा सगळा प्रचंड बदल लग्नानंतर झाला. माझ्या सासूबाई धार्मिक होत्या आणि सामान्यतः ब्राह्मणआळ असते तशा वसाहतीच्या मध्यभागी आमचं घर होतं. सगळे अगदी संकष्टी करणारे वगैरे करणारे, असा टीपिकल माहोल आजूबाजूला होता. मला अगदी एका वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटलं. जणूकाही आपण एलियन आहोत. सगळ्या गोष्टी इतक्या वेगळ्या होत्या, व्रतवैकल्य होती, उपासतापास होते. आमच्या घरासमोर रामाचं देऊळ आहे. तिथं ते महालक्ष्मीचा मुखवटा वगैरे करत. तिथं त्या सगळ्या आळीतल्या बायका जमत. मी एकटीच जात नसे. त्यामुळे त्यांना वाटायचं की ही कोण मोठी शहाणी समजते स्वतःला. आम्ही सर्व एवढ्या शिकलेल्या (आणि होत्या पण त्या शिकलेल्या) आणि ही त्या मानाने साधी गृहिणी, तरी ही मिसळत नाही. म्हणजे ही स्वतःला काहीतरी खास समजते. आता मी हे काही कोणाला समजावून सांगायला गेले नाही की, मी देव मानत नाही तर तिथे कशी जाऊ? शिवाय लोक काय म्हणतील याचं प्रेशरही माझ्यावर आलं नाही. याचं कारण मी प्रगल्भ होते असं मुळीच नाही. उलट असं केल्यामुळे आपण अप्रिय होतोय, आपण लोकांमधून वेगळे पडतोय हे समजण्याइतकी मॅच्युरिटीही माझ्यात नव्हती. त्यामुळे मी तिथं कधी गेले नाही. तेव्हा नास्तिक असण्याचा तोटा काय असतो हे मला लग्नानंतर काही काळाने हळूहळू कळायला लागलं. तेव्हा जाणवलं की आपल्याला लोक वेगळं समजतात. लहानपणी ती अग्ली डकलींगची गोष्ट वाचल्यामुळे आपण तेच आहोत असा समज मी तेव्हा स्वतःच करून घेतला होता.
नास्तिकतेकडून उलटा प्रवास करताना म्हणजे विचारांचा उलटा प्रवास होताना अजून एक गोष्ट मला अशी जाणवली की, बायका या गोष्टी जास्त धरून ठेवतात. का धरून ठेवत असतील? तर पूर्वीच्या काळी बायकांना एकत्र यायला दुसरं काही कारण नव्हतं. म्हणजे आता जशी भिशी आहे, किटी पार्टी आहे, तसं काहीही नव्हतं. त्यामुळे सणावारांनाच बायका एकत्र जमायच्या. पुरुष इतर अनेक कारणांनी एकत्र यायचे. पण बायकांना तशी सोय नसल्याने मग मंगळागौर, हळदीकुंकू असे कार्यक्रम त्यांच्यासाठी अनिवार्य ठरत होते. त्यांच्यासाठी त्या एकत्र येऊन थट्टामस्करी करण्याच्या जागा होत्या. हे जर आपण नाही केलं तर मग आपण एकत्र यायचं कसं? कारण गंमत म्हणून एकत्र जमायला त्या काळामध्ये परवानगी नव्हती. म्हणून हे सगळं बायकांच्या हाडीमासी खिळलं. मग ते व्रतवैकल्यांचे वारसे आई मुलीला देणार आणि मग ते तसतसे पुढे चालत राहणार.
लहानपणी मी जेव्हा बघायचे, आता कोणी रागावू नये पण हे माझं आपलं एक निरीक्षण आहे की एकत्र आल्यावर बायका साधारणपणे साड्या, दागिने, सासू, नणंद, घरातले हेवेदावे, अशा विषयांवरच गप्पा करत आणि पुरुष मात्र तिकडे राजकारण, खेळ वगैरे बोलून मज्जा करत. त्यामुळे मला कायम वाटत आलं आहे की बायका जरी शिकल्या तरी एकत्र जमल्या की “माझ्या नणंदेच्या साडीचे काठ अगदी असेच आहेत”, किंवा “अशाच पोपटी रंगाची माझ्या वहिनीची साडी आहे” हे बोलतात. म्हणजे सामाजिक गोष्टींबद्दल चर्चा करायचीसुद्धा तसदी त्या घेत नाहीत. शेजारच्या देशात भूकंप झालेला ह्यांना माहिती नसतो. दुसऱ्या राज्यात निवडणूक आहे हे माहिती नसतं. आजही शिकलेल्या बायका साडी, सासू आणि टीव्हीमालिका याच्यात एवढ्या का अडकल्या आहेत, हा मला पडलेला प्रश्न आहे.
आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे चारित्र्य ह्या संकल्पनेबाबत. ते नेमकं कसं डिफाईन केलं आहे? त्याचा आवाका काय आहे? एखादा नेता भ्रष्ट आहे. त्याने भेसळ केली, एखादा पूल पडला, शंभर लोक मेले, लोकांना फरक पडत नाही. पण, आस्तिक-नास्तिकतेचा प्रश्न आला की कशी गंमत असते बघा. एक मुख्यमंत्री दरवर्षी विठोबाच्या देवळात जाऊन सपत्नीक पूजा करतो. दुसरा एखादा मुख्यमंत्री नास्तिक आहे आणि त्याने सांगितलं की मी ही पूजा करणार नाही. पुढच्या निवडणुकांच्या वेळी डिपॉझिट जप्त होईल त्याचं. कारण, तुम्ही जर विठोबाला मानत नाही तर आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही, अशी आपली जनता आहे. पण पहिल्याने कितीही भ्रष्टाचार केला तरी लोक त्याला मतं देऊ शकतात. म्हणजे आज तुमच्या चारित्र्यापेक्षासुद्धा तुमचं आस्तिक असणं महत्त्वाचं ठरतं. हे चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे हे जे भक्त लोक असतात, म्हणजे मोदींच्या संदर्भात नाही तर, देवाचे भक्त – त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही सामान्य माणसांचे नियम देवाला लावू शकत नाही. म्हणजे मी जेव्हा असे प्रश्न विचारले की हत्तीचं डोकं माणसाला कसं लावू शकतं कुणी? तर म्हणतात की देवाचं सगळं वेगळंच असतं. देव काहीही करू शकतो. आता लोक देवाला जर वेगळं लॉजिक लावत असतील, किंवा सामान्य माणसांचे नियम देवाला लागू नाही असं म्हणत असतील तर या लोकांशी कोणी युक्तिवाद करूच शकत नाही आणि त्यांची आस्तिकताही घालवू शकत नाही. किमान तर्कनिष्ठ विचार जर कोणी करत नसेल तर त्याची मतं बदलणं खूप कठीण आहे.
फेसबुकबद्दल मला एक विशेष सांगायचं आहे. फेसबुकचा मला प्रचंड फायदा झाला. अनेक तर्कनिष्ठ नास्तिक लोकांच्या संपर्कात मी आले आणि कळायला लागलं की जगामध्ये अगदी थोडी का होईना पण आपल्यासारखी माणसं आहेत. माझा एकटेपणा दूर झाला. मग हळूहळू थोडीशी वैयक्तिक ओळख झाली. मग हे असे नास्तिक मेळावे वगैरे होतात त्याविषयी कळायला लागलं. मागच्या वर्षीसुद्धा मी एका मेळाव्याला हजर होते. यावर्षी इथे आहे. खरं सांगते, समाजमाध्यमं आल्यापासून आपल्या आजूबाजूलासुद्धा खूप मोठं जग आहे आणि त्यात समविचारी माणसं आहेत हा विश्वास बायकांमध्ये निर्माण झाला.
तर शेवटी सांगायचं असं आहे की, बायकांनी अतिशय तर्कनिष्ठतेने रूढी-परंपरांतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला हवा. टीव्हीवर चालणाऱ्या सीरियल्स, सणवार यापलीकडेही जग असतं. त्या जगाशी जोडून घेण्याचा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा. जो मीदेखील करते आहे. फार यश येत नाहीये. पण प्रयत्न करा असं आवाहन मात्र मी सगळ्यांना करेन.
धन्यवाद!
ह्या परिसंवादाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास