परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठे?

नमस्कार,

हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे सगळ्यांवर साधारणपणे जे संस्कार होतात तसे माझ्यावरसुद्धा झाले. लहानपणी आपल्याला योग्य अयोग्याची तशी समज नसते. आई-वडील सांगतात त्यावर आपला विश्वास असतो. ते सांगतात तसेच आपण करत असतो. माझंही तसंच होतं. पण वाढत्या वयात काही काही गोष्टी निरीक्षणात यायला लागल्या आणि प्रश्नही पडायला लागले. आजूबाजूचे लोक कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात हे दिसायला लागलं. प्रश्न पडू लागला की गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती देव कसा काय होऊ शकेल? गणपतीच्या बाबतीत तर विशेषच. त्या मूर्तीत जर देवत्व आहे तर ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल? किंवा त्या मूर्तीचं विसर्जन कसं करता येईल? किंवा एकीकडे आपण म्हणतो की गणपतीची प्रतिष्ठापना करायची आणि मग त्या मूर्तीचं विसर्जन करायचं? Is that so easy? एवढं सोपं आहे ते? मला पटायचं नाही. पण घरच्यांना प्रश्न विचारला तर उत्तर हेच मिळायचं की, आम्ही आमच्या आई-बाबांना असं काही विचारलेलं नाही, तूही आम्हाला विचारायचं नाहीस. आम्हाला जे सांगितलं ते आम्ही करतो. आम्ही जे सांगू ते तू करायचं.

चौथी-पाचवीनंतर मला पुस्तक वाचायची आवड लागली. माझ्या पिढीमध्ये सगळ्यांचं दैवत होतं सावरकर! सावरकरांचं एक वाक्य मी वाचलं होतं, “वेद जर पाच हजार वर्षे जुने असतील तर, ते पाच हजार वर्षे मागासलेले ग्रंथ आहेत.” हे वाचून मनातील कल्लोळ अजूनच वाढला. मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्थित होत होते. पण त्यांची उत्तरं सापडत नव्हती.

लहानपणी मी कुटुंबासोबत देवदर्शनाला गेलो तर तिथे श्रीमंतांची वेगळी रांग. पाचशे रुपयांचा पास घेतला की स्पेशल दर्शन! मला हे पटायचं नाही. देव खरंच असेल तर तो श्रीमंत, गरीब असा भेदभाव कसा करू शकतो? त्यामुळे ज्या ठिकाणी पैसे घेऊन दर्शन मिळतं त्या ठिकाणी फक्त दगडी मूर्ती आहे, देव नाही असं माझं ठाम मत व्हायला लागलं. तरीही ही दगडी ‘मूर्ती’ आहे असंच वाटत होतं. म्हणजे ‘देव नाही’ याच्यावर विश्वास नव्हता.

मग हळूहळू मला लक्षात यायला लागलं की जेव्हा लोक म्हणतात, ‘ही माझी श्रद्धा आहे’, तर ती श्रद्धा नसून फक्त भीती असते. म्हणजे देवाचा प्रकोप होईल, देव आपल्यावर चिडेल, आपल्यासोबत काहीतरी वाईट होईल ह्या भीतीने बहुतांश लोक कर्मकाण्ड करत असतात. 

देवाला न मानणारे लोक नास्तिक समजले जातात. पण, कोणता देव? कोणता ईश्वर? खरंतर नास्तिक लोक देवाला नाकारतात असं म्हणण्यापेक्षा देवाच्या कल्पनेला नाकारतात असं आपण म्हटलं पाहिजे. कारण देव ही कल्पनाच आहे, प्रत्यक्षात तो नाहीच. तर ते देवाच्या अस्तित्वाला नाकारत नाहीयेत, तर देवाच्या कल्पनेलाच नाकारत आहेत.

नास्तिक लोक नेमक्या कुठल्या कल्पनेला संपूर्ण नाकारतात ते समजून घेऊया. तर ईश्वर हा कुठल्यातरी आकाशात वर बसला आहे, तो खूप दयाळू आहे, तो खूप न्यायी आहे, तो पूजापाठ केल्याने प्रसन्न होतो, होमहवन केल्याने प्रसन्न होतो, मंत्रोच्चार केल्याने प्रसन्न होतो, पोथ्या वाचल्यावर प्रसन्न होतो आणि भक्तांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचे निवारण करतो, इच्छा पूर्ण करतो, निपुत्रिक असतील तर त्यांना संतान देतो. थोडक्यात, या देवाला सौदेबाजी मान्य आहे. 

आपण काल इथे सत्यनारायणाचं नाटक बघितलं. (संदर्भ – यशोधन गडकरी ह्यांची ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ ही एकांकिका. ह्या अंकात तीदेखील प्रकाशित झाली आहे.) सत्यनारायणाची कथा आणि साधू हे सगळं आपल्या माहितीचं आहे. ह्याबद्दलसुद्धा मला खूप प्रश्न पडायचे. आमच्या घरी सत्यनारायण पूजा व्हायची. अजूनही होते. पण ती पूजा नाकारण्याचं धाडस मला आजवर झालं नव्हतं. ‘मी करणार नाही, मी बसणार नाही.’ हे म्हणायचं धाडस नव्हतं. पण कालचं नाटक बघितल्यावर माझ्यात ते धाडस आलं असल्याचा विश्वास वाटतो आहे.

पुढे दहावी, बारावी झाले, इंजिनीअरिंगला गेलो तसं वाचन आणखी वाढायला लागलं. विचारांमध्ये स्पष्टता यायला लागली. ज्या पुस्तकामुळे माझं सगळ्यात जास्त आणि लवकर परिवर्तन व्हायला लागलं ते म्हणजे ‘गोफ जन्मांतरीचे!’ सुलभा ब्रह्मनाळकरांचं पुस्तक आहे ते. नंतर रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘The Selfish Gene’, ‘The God Delusion’ ही पुस्तकं वाचली. स्टीफन हॉकिंगची ‘The Big Bang theory’ याच्यावरील खूप पुस्तकं वाचली. त्यामुळे हे विश्व कसं तयार झालं याबद्दल स्पष्टता यायला लागली. मग तर देव, धर्म हे माणसानेच तयार केलेले आहेत ह्याबद्दल मनात कुठलीही शंका उरली नाही. 

माझ्यामते, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक, जे कोणत्याही परिस्थितीला बाह्य घटक कारणीभूत आहेत असं समजतात. जसं की, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं. आणि दुसरे, ज्यांच्या स्वतःवर विश्वास असतो, स्वतःवर नियंत्रण असते. हे दुसऱ्या प्रकारचे लोक नास्तिक असतात असा माझा विश्वास आहे.

काही लोक म्हणतात की देव नाही हे मान्य आहे. पण कुठेतरी भावनिक आधार पाहिजे ना माणसाला! कुणाला पोथी वाचल्यानंतर बरं वाटतं, कुणाला जप केल्यावर. ठीक आहे! पण ह्यावर काल जावेद अख्तर म्हटले तसं, “हा दारूचा पेग आहे.” याचं व्यसनच लागणार. कुठे थांबायचं ते कळणारही नाही. त्यापेक्षा त्याच्या नादाला न लागलेलं बरं! आणि भावनिक आधार हवा असेल तर त्यासाठी देवच कशाला हवा? आपण व्यायाम करू शकतो, कविता वाचू शकतो, चांगली पुस्तकं वाचू शकतो, निसर्गाच्या सान्निध्यात राहू शकतो. यातूनसुद्धा भावनिक आधार मिळतोच की. मग काहीजण विचारतात, “अशी कोणती गोष्ट आहे जिच्यासमोर तुम्ही नतमस्तक होता? कशाबद्दल तरी काहीतरी तर वाटत असेल ना, की तेही नाही?” तर, नास्तिक्याचा अर्थ कशाबद्दलही काहीच न वाटणं, कोणाची फिकीर नसणं असा होत नाही. माझ्या आजूबाजूला एवढे सगळे लोक आहेत जे माझी काळजी घेतात, माझ्यावर प्रेम करतात, माझ्या भावनांची कदर करतात. मी धडधाकट आहे, माझ्या गरजेपुरते कमावतो आहे, याबद्दल मलादेखील कृतज्ञता आहे. तर, मी कुठे नतमस्तक होत नाही किंवा मला कुठल्याच भावना नाहीत असं अजिबात नाही. फक्त त्यासाठी मला देवाच्या संकल्पनेची गरज पडत नाही.

माझ्या नास्तिक विचारांमधून मी अधिकाधिक परिपक्व होतो आहे. ही परिपक्वता स्वतंत्रपणे विचार करण्यातून येते. देव ह्या संकल्पनेच्या कुबड्यांची मला आतापर्यंत अजिबात गरज वाटलेली नाही. अगदी संकटाच्या प्रसंगातसुद्धा नाही. आई मला म्हणते की, संकट आल्यावर कळेल. मी म्हणतो, “संकट आल्यावर काय करणार आहे देव? आणि देव खरंच असेल तर मला तो संकटात का टाकेल?” 

मला आत्तापर्यंत वाटायचं की माझी नास्तिकता मी मिरवायला नको. ती काही मिरवायची गोष्ट नाही. पण कालपासून इथे ज्या काही चर्चा झाल्या, भाषणं झाली, त्यावरून मला वाटायला लागलं आहे की नास्तिकता मिरवलीच पाहिजे. कारण, जर मी माझी नास्तिकता मिरवली नाही तर मी माझ्या विचारांवर ठाम आहे, माझे विचार स्पष्ट आहेत, माझे विचार क्रिस्टल क्लिअर आहेत, माझी लाईन ऑफ थिंकिंग स्पष्ट आहे हे लोकांना कळणार कसं? मी नास्तिक का आहे? नास्तिकतेची गरज का आहे? याविषयी जर मी उत्कटपणे लोकांसमोर बोललो नाही तर लोकांना कळणार कसं? एरवी आपला एक वेगळा समुदाय बनून आपण फक्त आपसातच बोलत राहू. त्यापेक्षा मला आता स्पष्ट वाटू लागलं आहे की आपली नास्तिकता आपण मिरवली पाहिजे. जिथं शक्य आहे तिथं ह्यावर बोललं पाहिजे. इतरेजन सहमत होतीलच असं नाही, ते गरजेचंपण नाही. आपले विचार मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.

आपण हा जो नास्तिक मेळावा घेतला आहे, यामध्ये आपण प्रत्येकाने एखादा आस्तिक सोबत आणला पाहिजे. असा आस्तिक जो कट्टरतावादी नाही. त्याची देवावर श्रद्धा असेल पण नवे विचार ऐकण्यासाठी तो तयार असेल. आपण आपापसातच भेटत आणि बोलत बसलो तर नास्तिकतेचा विचार इतर लोकांपर्यंत पोहचणार नाही. 

असो. माझ्या मते नास्तिकतेची व्याख्या खूप सोपी आहे. प्रत्येक तर्कशुद्ध विचार करणारा माणूस हा नास्तिक असणार याची मला खात्री आहे.

धन्यवाद!

ह्या परिसंवादाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

अभिप्राय 1

  • नास्तिक असणं ही मिरवण्याची गोष्ट आहे असं वाटत नाही. विज्ञाननिष्ठ असणं,समाजाची सेवा करणं, सर्जनशील लेखन करणं,निसर्ग संवर्धन करणं या गोष्टींचा अभिमान असावा. जी गोष्ट नाहीच आहे ती नाही आहे असे अभिमानाने सांगणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे असे मला काही वेळा वाटते. त्यापेक्षा विज्ञान प्रसार करून अप्रत्यक्षपणे गैरसमजुतींवर प्रहार करणे हे जास्त “Bright ” वाटतं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.