वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात तेव्हा राजकारण्यांचे लक्ष तिकडे जाते आणि राममंदिर हा भक्तीचा नव्हे तर राजकारणाचा विषय होतो. राम हा दर्शनी किंवा ‘फ्रंट’ म्हणतात तसा दाखवायचा भाग बनतो आणि त्याच्या आडून राजकारणाची सूत्रे हलू लागतात.
धर्म हाच भारताला जीवन देणारा घटक आहे हे स्वामी विवेकानंदांचे मत आपल्याला ठाऊक आहे. पारतंत्र्याच्या काळातील परिस्थितीत केलेले ते विधान सार्वकालिक सत्य असेलच असे नाही. या धर्माच्या मुद्द्यावरूनच पाकिस्तान निर्माण झाले आणि ‘सिंधुशिवाय हिंदू म्हणजे प्राणाशिवाय कुडी’ वगैरे वाग्विलासाने अखंड भारताचे अवास्तव स्वप्न लोकमानसात काही प्रमाणात रूजले. ‘धारणात् धर्म मित्याहुः’ हे महाभारतातले लोकप्रिय अवतरणदेखील मला माहीत आहे. पण व्याकरण किंवा शब्द कसा बनला त्याचे एक स्पष्टीकरण एवढ्याच अर्थाने ते खरे असेल. वास्तवात बौद्धधर्म सोडल्यास सर्वच धर्मांच्या निमित्ताने किती हिंसा झाली आहे आणि होत आहे ते पाहिल्यावर धर्म हे समाजधारणेचे नव्हे तर विघटनाचे एक कारण आहे असेच वाटू लागते. आणखी एक कालसापेक्ष विधान एवढेच त्याचे महत्त्व! आणखी एक, कोणत्याही चर्चेत वेद, रामायण इत्यादी अवतरणे ही चिरंतन सत्ये असल्याच्या थाटात वापरण्याची सवय आपण प्रयत्नपूर्वक दूर केली पाहिजे. आजूबाजूला काय घडत आहे ते डोळे उघडे ठेवून पाहायला आपण केव्हा शिकणार?
हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन हे तीन प्रमुख धर्म आपल्याला माहीत आहेत. येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांना ‘दाउ शॅल्ट नॉट वर्शिप अदर गॉड्स’ असे सांगतो. पैगंबराचा धर्म इतर धर्मियांना काफर ठरवतो. हिंदूंचा एक ग्रंथ किंवा प्रेषित नाही आणि धर्मांतराचा इतिहास नाही हे खरे आहे; पण हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्यांना या औदार्याचेच एक तर वावडे असावे किंवा इतर धर्मियांच्या कडवेपणाचे कौतुक, आकर्षण असावे. पण आक्रमक असल्याशिवाय आपण तग धरू शकणार नाही असा काहीतरी ग्रह करून घेतल्याप्रमाणे त्यातील चळवळ्यांचे तरी बोलणे, वागणे दिसते. एकूण काय तर, धर्माचा धारणेशी संबंध आता उरलेला दिसत नाही. जागतिकीकरणाच्या या काळात धर्म समाजजीवनात आणणे हे धोकादायक आहे. तो कुटुंबात, घरातच राहिलेला बरा!
खरा कठीण प्रश्न हाच आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार करणे, बुद्धिवाद या सर्व गोष्टी सर्वांना पटतात पण मन, भावना यांचा आपल्यावर असलेला प्रभाव नाकारण्यातही अर्थ नाही. मनुष्य हा विचार करणारा (रॅशनल) प्राणी आहे पण त्याचे विचार भावनांचे रंग घेऊन येतात. केवळ, निव्वळ विचार तो करतो का? याचे उत्तर देणे कठीण आहे. हृदय आणि मेंदू यांच्यातले अंतर दोन ध्रुवांवर आहे तेवढेच नव्हे तर त्याहीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे धर्माचा प्रभाव रोखण्यास बुद्धिवादी यशस्वी होत नाहीत असे दिसते. मार्क्सच्या मते सर्व जगात साम्यवाद येईल तेव्हाच त्याचे फायदे दिसू शकतील तसेच या बुद्धिवाद्यांचे म्हणणे आहे. सर्व लोक बुद्धिवादी बनतील तेव्हाच त्याची फळे दिसतील. पण ते शक्य होईल असे बुद्धीला पटत नाही. हृदय आणि मेंदू यांच्यातील कधीही न संपणाऱ्या या द्वन्द्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्म आणि विज्ञान/बुद्धिवाद यांच्यातील ही कधी न संपणारी चढाओढ!
या स्फुट लेखात बुद्ध धर्माच्या इतिहासात हिंसा नाही हा तपशील चुकीचा आहे . कोणताही धर्म अपवाद नाही हे लक्षात घ्यावे.
या अंकातील बरेच लेख आपल्या नातलगांनी आणि मित्रमंडळींनी वाचावेत असे वाटते. असे लेख व्हाट्सअप च्या माध्यमातून किंवा अन्य रीतीने पाठवण्याची सोय झाली तर बरे होईल. अख्खा अंक पाठवला तर तो वाचला जाण्याची शक्यता जरा कमी होते. हे लेख अन्यत्र पाठवताना इंटेल प्रॉपर्टी राइट्स चा भंग होणार नाही अशी आशा आहे.
प्रिय सुभाष
सस्नेह.
आपण एकेका लेखाची स्वतंत्र लिंक पाठवू शकतो. ह्याप्रमाणे निवडक लेख निवडक लोकांना तुम्ही पाठवू शकाल.
तुम्ही टेक्स्ट कॉपी करून पाठवू शकता. पण त्यात लेखकाचे नाव आपोआप येणार नाही. तुम्हाला ते त्यात manually add करावे लागेल. तसे केले तर आम्हाला चालेल. सोबत आजचा सुधारकचा उल्लेख असेल तर बरे वाटेल.
लेखाची स्वतंत्र लिंक पाठवणे हा त्यातला त्यात सर्वांत सोपा उपाय वाटतो आहे.