आपले आरोग्य चांगले असावे असे कोणाला वाटत नाही? मला शारीरिक व्याधी जडू नये, मला कोणताही मानसिक आजार होऊ नये ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र हे होऊ नये यासाठी जी काळजी घ्यावी लागते त्यासाठी मात्र कोणाचीच तयारी नसते. कारण ही तयारी ठेवायची तर स्वतःला खूप बदलावे लागते. आरोग्याबाबतच्या अंधश्रद्धेचेही असेच आहे. आरोग्य तर चांगले पाहिजे पण त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धा सोडायच्या नाहीत, तर हे जमणार कसे? यासाठी आरोग्य आणि अंधश्रद्धा यांचा काय संबंध आहे हे आपण आता समजून घेऊया.
आरोग्याशी संबंधित अनेक अंधश्रद्धा आहेत, ज्या निखालसपणे अज्ञानावर आधारित आहेत. तिथे ज्ञानाचा प्रकाश आला की त्या अंधश्रद्धा वितळून जातात. आपण एक उदाहरण पाहूया. ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ असे आपण वाचतो. हजार तर सोडा, लाख रुपये दिले तरी आता देवीचा रोगी सापडणार नाही. पण एक काळ असा होता की एखाद्या व्यक्तीला ताप का येतो हे माहीत नव्हते. व्यक्तीला ताप येई, तापाबरोबर तोंडावर फोड येत, काही दिवसांनी ताप जाई, तोंडावरचे फोडही जात. त्याच्या खपल्या पडत, परंतु व्रण कायम राहात आणि तोंड ठोक्याच्या भांड्यासारखे दिसे. म्हणून देवीचा कोप आहे असे मानले जाऊ लागले. हा ‘देवीचा रोग’ समजला जाऊ लागला. मग एक वेळ अशी आली की ज्यावेळी देवीच्या लसीचा शोध लागला. लक्षात असे आले की देवीचा जंतू हा फक्त माणसांकडून माणसांकडे जाऊ शकतो. हे लक्षात आल्यावर देवीची लस सर्वांना टोचण्यात आली. देवीचा रोगी उरलाच नाही. देवीच्या कोपाने देवीचा रोग होतो ही आरोग्याशी संबंधित अंधश्रद्धा ज्ञानाचा प्रकाश पडताच निघून गेली.
पण आरोग्याविषयीच्या सगळ्या अंधश्रद्धा संपल्या का? तर नाही. आता रक्तदानाचेच पहा. रक्तदानाबाबत प्रचलित अंधश्रद्धा अशी आहे की रक्तादानामुळे खूप अशक्तपणा येतो आणि एड्स होऊ शकतो. खरे पाहता कलियुगामध्ये रक्तदानासारखे उचित कर्म नाही. ६० किलो वजनाच्या निरोगी माणसात ५ लिटर रक्त असते. त्यातील केवळ २०० ते ३०० मि.ली. रक्त काढणे म्हणजे भरलेल्या हौदातून एक बादली पाणी काढण्यासारखे. त्यामुळे अशक्तपणाला अजिबात वाव नाही. शरीर हे रक्त झपाट्याने भरून काढते आणि रक्तदानानंतर अल्पसा थकवा किंवा चक्कर येण्याची शक्यताही कमी असते. प्रत्येकवेळी निर्जंतूक सुई व केवळ एकासाठीच वापरल्याने एड्स होण्याचा प्रश्नच उरतच नाही. शिवाय रक्त घेताना रक्तदात्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण, वजन, मलेरिया, कावीळ, एड्स इत्यादी तपासण्या करून रक्त घेतले जाते.
आता आपण कुष्ठरोगाकडे वळूया. कुष्ठरोग म्हणताच सर्वप्रथम आठवण येते ती बाबा आमटे या महापुरुषाची. बाबा आमटेंच्या भगीरथ प्रयत्नांमुळे कुष्ठरोग्यांना समाजात स्थान मिळाले. पण अद्यापही आपल्या मनात कुष्ठरोग म्हणजे महाभयंकर रोग आहे किंवा मागील जन्माचे पाप आहे, दुष्कृत्यांचे फळ आहे या अंधश्रद्धा आढळतात. ८०% कुष्ठरोगी संसर्गप्रसारक्षम नाहीत. कुष्ठरोग आनुवंशिक नाही की पूर्वसंचिताचाही तो परिणाम नाही. हा रोग मायक्रोबॅक्टेरियम लॅप्रासच्या रोगजंतूंमुळे होणारी व्याधी आहे. वैद्यकीय तज्ज्ञाकडून वेळेवर उपचार केल्यास रुग्ण निश्चित बरा होतो. प्रतिष्ठा, समाजातील स्थान इत्यादी गोष्टींचा विचार न करता कुष्ठरोगाची लागण झाल्याचा संशय येताच तज्ज्ञाकडून त्याची तपासणी केली व वस्तुस्थितीस सामोरे जाऊन योग्य उपचार घेतला तर कुष्ठरोगाचे उच्चाटन होऊ शकते.
क्षयरोग म्हणजे टी.बी.बाबतही बर्याच अंधश्रद्धा अथवा गैरसमज आहेत. चांगल्या सदृढ माणसाला क्षयरोग होत नाही. ग्रामीण भागातच क्षयरोग होतो. अतिसंभोगामुळे क्षय होतो. क्षय झाला म्हणजे हा लवकर मरणार असे गैरसमज आढळतात. ते निखालस खोटे आहेत. टी.बी. किंवा क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकिलॉय या रोगजंतूमुळे होतो. योग्यवेळी, योग्य निदान, लवकर उपचार व उपचाराचे सातत्य यामुळे क्षयरोग बरा होतो.
ज्या आजारात शरीरावर नागासारखा पट्टा उमटला जातो त्याला ‘नागीण’ म्हणतात. हा आजार हरप्रिस झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो. पण कुणीतरी जादूटोणा केल्यामुळे हा आजार होतो व पट्टा पूर्ण झाला की मृत्यू येतो अशी अंधश्रद्धा नागिणीबाबत प्रचलित आहे. या आजारात भयंकर वेदना, दाह, पुरळ उठणे हे होते. पण ५-६ दिवसांनी त्यावर खपल्या धरतात व आजार बरा होतो. यावर अद्याप प्रभावी औषध नसल्याने तांत्रिक-मांत्रिकांचे फावते.
अर्धशिशीमध्ये मळमळ, उलटी, दृष्टिभ्रम व अर्धडोकेदुखी इत्यादी त्रास होऊ लागतो. अर्धशिशी ही रक्तवाहिन्यात असणारी तात्पुरती विकृती असून रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी होतो व भयंकर डोके दुखते. यावर लोक मंत्रोपचार घेतात. काहीजण तांब्याचा पैसा, नाहीतर चुना, नाहीतर बिब्बा लावतात. या सार्या अंधश्रद्धा आहेत. या अर्धशिशीवर Ergotamine, Ciplar, Sibelium इत्यादी प्रभावी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
पुरुषांचे पुरुषत्व आणि स्त्रियांचे स्त्रीत्व याविषयी तर प्रचंड अंधश्रद्धा आहेत. ‘गेलेली जवानी परत मिळवा, निराश होऊ नका’. हमखास इलाज, केवळ २१ दिवसांच्या उपचारात आपली ताकत पुन्हा परत मिळवा. भेटा डॉ. अमुक अमुक, लंडन, अमेरिका पत्ता : अमुक अमुक लॉज, रूम नं. अमुक-तमुक, केवळ दर गुरूवारी. अशा भोंदू डॉक्टरांच्या जाहिराती व त्याला बळी पडणारे शेकडो तरुण, कामगार पाहिले की मन विषण्ण हाते. या असल्या प्रकारात हजारो रुपयांची पिळवणूक होते. शिवाय याबाबत कुठे वाच्यता करण्याचाही संकोच होतो. खरे तर वैद्यकीय कायद्यानुसार कोणत्याही डॉक्टरला अशी जाहिरात करताच येत नाही. त्यामुळे अशा जाहिराती खोट्याच समजाव्यात. याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच लैंगिक शिक्षण द्यावे. वयाच्या १२-१३ व्या वर्षी स्त्री-पुरुष दोघांनाही अनुक्रमे स्त्रीत्व व पुरुषत्व प्राप्त होण्यास सुरुवात होते. नेमक्या या वयात सुप्त भावना चाळवल्या गेल्यास भावनांना विकृत वळण लागू शकते. यासाठी आई, वडील, पालक, शिक्षक यांचे आपल्या पाल्याशी, मुलामुलींशी मित्रत्वाचे नाते असणे गरजेचे आहे. योग्यप्रकारे लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे लैंगिकविषयी असणारे कुतूहलाचे शमन होईल.
स्त्रियांच्या बाबतीत तर स्त्रीला मूल झाले नाही तर तिलाच वांझ ठरवून अत्यंत अपमानित केले जाते. केवळ मुली झाल्यास चालत नाही. मुलगा व्हावा लागतो. त्यासाठी तिला मुलगा होईपर्यंत अनेकवेळा गर्भधारणेच्या दिव्यातून जावे लागते. पुरुषांमध्येही वंधत्व असते. पण वांझोटी म्हणून स्त्रीकडेच थेट बोट दाखविले जाते. पुरुष ३-४ बायका बदलतो. वैद्यकीय तपासणी केली तर ५०% दोष पुरुषाचाही असू शकतो. तरीही स्त्रिलाच अनेक जाचातून जावे लागते. याचा फायदा मांत्रिक, तांत्रिक, तथाकथित बुवा, भगत, देवर्षी उठवतात आणि अंधश्रद्धेचे बीज फोफावले जाते. कंबरदुखी, पाठदुखी स्त्रियांचे अंगावरून पांढरे जाणे, अनियमित पाळी, पुरुषांमध्ये लिंगाची लांबी, शीघ्रपतन, झोपेत वीर्यपतन, नपुंसकता इत्यादिंविषयीपण बरेच गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. याबाबतीतही शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे हे तज्ज्ञांकडून जाणून घ्यायला हवे.
या शारीरिक आरोग्याच्या अनास्थेबरोबर मन, मनाचे आजार, भूत, भानामती, जादूटोणा याबाबतही समजून घ्यायला हवे. शरीरात मन दाखवता येत नसले तरी त्याचे अस्तित्व सतत जाणवत असते. विचार, संवेदना, भावना, स्मृती, झोप, जागृतावस्था अशा सर्व गोष्टींचा अनुभव म्हणजे मन असते. त्यामुळे मनाचे स्थान मेंदूत असते हे निश्चित समजावे. मनाचे दोन भाग कल्पिले आहेत. एक बाह्यरूप जे जागृतावस्थेत बाह्यजगात आपल्याला जाणविणार्या गोष्टींचा अर्थ लावते. बाह्य मन झोपेत काम करीत नाही. पण अंतर्मन मात्र जागेपणी आणि झोपेतही सतत काम करीत असते. मानवी मनाचे हे कार्य मेंदूमधल्या विशिष्ट पेशींवर व त्यांच्या कार्यावर अवलंबून असते. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींच्या कार्यात बिघाड होतो, संतुलन तुटते किंवा पेशी मुळातच दोषपूर्ण असतात तेव्हा मन आजारी पडते. वर्तन, भावना, विचार, संवेदना, आठवण, जाग, झोप यामध्ये बदल होतात ते त्या मानवाला व इतरांना त्रासदायक ठरतात. यालाच मनाचे आजार किंवा मनोविकार असे म्हणतात.
भूतबाधा हा असाच एक मनाचा आजार आहे. विश्वात भूत अस्तित्वात नाही. ती एक संकल्पना आहे. भूतबाधा या आजारात मनाचे कार्य बिघडते. मन उत्तेजित होते, भीतीची भावना वाढते. असुरक्षित वाटू लागल्याने रुग्ण इतरत्र पळू लागतो, गप्प बसतो, वा कुणावरतरी हल्ला करतो. विचित्र बोलणे, राग येणे, हातवारे करणे, रात्री झोप न येणे, न जेवणे वा अति जेवणे, छातीत धडधडणे, घाम येऊन हातपाय गार पडणे, येथपासून ते हृदय बंद पडणे पर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे यावर तंत्र, मंत्र, भूत उतरविणे हे उपाय नसून मानसोपचार तज्ज्ञास दाखविणे हाच शास्त्रीय उपाय आहे.
मनोविकार कधी कधी तीव्रही असतात. तीव्र मनोविकारात रोगी नीट विचार करू शकत नाही. काम करू शकत नाही. तो विचित्र वागतो. उदा. लोक त्याच्या विरूद्ध आहेत असे वाटून तो त्यांच्याशी भांडतो. जेवणात विष घातले असे वाटून तो जेवण टाळतो. ऐकू आल्याचा, कोणी शिव्या दिल्याचा भास होतो. जीवनाचे नित्यकर्म त्याला योग्यप्रकारे करता येत नाही. आजाराच्या उन्मादावस्थेत रुग्ण कोणालाच आवरत नाही. ही सारी लक्षणे सिझोफ्रेनिया या मनोविकाराची आहेत. पण याबाबत खूप अंधश्रद्धा आहेत. या आजाराला कुणीतरी करणी केली आहे, भूतबाधा झाली आहे असे मानले जाते. त्यावर अंगारा लावणे, उतारा करणे, मारहाणीने भूत उतरविणे, बळी-विधी करणे इत्यादी उपाय केले जातात. कधी कधी या रोग्यालाच दैवी पुरुष समजून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे वेळीच सिझोफ्रेनियाचे निदान करून तज्ज्ञाकडूनच मानसोपचार घेतल्यास हा रोगी बरा होऊ शकतो हे त्याच्या नातेवाईकांनी व समाजाने जाणले पाहिजे.
जेव्हा अचानक माणूस जागी कोसळतो अन् बेशुद्ध होतो, हातापायांना झटके देतो. तोंडातून फेस येतो, विचित्र बडबडतो, पळत सुटतो, तेव्हा त्याला मिरगी नावाचा मनोविकार झालेला असतो. पण लोक या आजारासही दैवी कोप समजतात. दैवी उपचार व मंत्रोपचार घेतात. अर्धवट झटक्याला भूतबाधा समजली जाते, झटके चालूच राहिल्यास मृत्यूपण ओढवू शकतो. अशावेळी त्याला कोणीतरी मूट मारली असा अंदाज व्यक्त केला जातो. पण हे सारे खरे नसते. तो मनोरुग्ण असतो. त्याला योग्य उपचारांची गरज असते.
नैराश्य हासुद्धा मनाचाच आजार आहे. कधी कधी शारीरिक त्रासानंतरही हा आजार होऊ शकतो. या आजारात रुग्णाचे कशातच मन लागत नाही. विरक्ती येते. आत्महत्येचे विचार उगीचच मनात येऊ लागतात. यश मिळणार नाही असे समजून तो कामे टाळतो. प्रयत्न थांबवतो, दैववादी बनतो. अपयशाची कारणे न शोधता नशिबाला दोष देतो. त्यामुळे ज्योतिष, ग्रहपीडा, ताईत, अंगठ्या, गंडेदोरे अशा अनेक अंधश्रद्धांमागे लागतो. स्वत:ला पीडा करून घेऊन अनेक उपाय, जसे कडकडीत उपास, फटके मारून घेणे यांसारखे देवाला प्रसन्न करून घेण्याचे उपाय करू लागतो. नवविवाहितेस नैराश्य आल्यास तिला दृष्ट लागली, तिच्यावर चेटूक केले, ती स्वतःच पांढर्या पायाची म्हणून सुख घेता येत नाही असे समजले जाते. अशा अंधश्रद्धा न बाळगता नैराश्याची लक्षणे वेळीच ओळखून मानसोपचार केल्यास नैराश्य हा आजार दूर होऊ शकतो.
अशाप्रकारे चित्तभ्रम, दृष्टिभ्रम, भूत दिसणे, हिस्टेरिया, अंगात येणे, दातखीळ बसणे इत्यादी थोड्याफार फरकाने मनाचेच आजार आहेत. त्यांवर योग्य मानसोपचार केले जात नाहीत. तेंव्हा आपणास किंवा इतरत्र कोठेही असे शारीरिक किंवा मानसिक आजार आढळल्यास प्रचलित गैरसमजुतींना व अंधश्रद्धांना फाटा देऊन तज्ज्ञ डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करवून घेणेच योग्य. संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. आंबेडकर आणि अलीकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना आपण वाचले, ऐकले आणि आचरणात आणले तर तुमचे व समाजाचे आरोग्य ठणठणीत झालेच म्हणून समजा हे आता सांगायलाच हवे का?
संदर्भ:
१. आरोग्य आणि अंधश्रद्धा – डॉक्टर संजयकुमार लढ्ढा व मनिषा लढ्ढा
२. तिमिरातूनी तेजाकडे – डॉक्टर नरेंद्र दाभोलकर
३. डॉक्टर नसेल तेथे – डॉक्टर रमेश पोतदार
४. Introduction to Psychology – Morgan and King
मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड
माजी कुलसचिव शिवाजी विद्यापीठ
जी 2/121 इंदिरा पार्क, चिंचवडगाव, पुणे ४११०३३
मोबाईल: ९४२२५१७५७०, ईमेल: rdkankariya@rediffmail.com